तटस्थ व्हायला हवे

मनात क्रोध साठतो, तटस्थ व्हायला हवे

Submitted by बेफ़िकीर on 16 June, 2019 - 10:43

मनात क्रोध साठतो, तटस्थ व्हायला हवे
अथांग शांततेकडे मला निघायला हवे

विकारयुक्त देह, एकमेव प्रश्न आपला
बनून धूलिकण हवेत विरघळायला हवे

अनिश्चितात बावरून नाव हेलकावते
दिसेल त्या दिशेस स्वत्व वल्हवायला हवे

जुन्यास लांघल्यावरी नवे शिखर सतावते
स्वतःच एकदा तरी शिखर बनायला हवे

हिशोब कोणता इथे अपूर्ण व्हायला नको
रडून जन्म घेतला, हसून जायला हवे

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - तटस्थ व्हायला हवे