गढूळलेला समाज

गढूळलेला समाज....

Submitted by बेफ़िकीर on 3 June, 2018 - 11:39

गझल - गढूळलेला समाज
========

गढूळलेला समाज गातो अराजकाचे विषण्ण गाणे
विखारवारा न सोसल्याने उभे तिरंगे उदासवाणे

बघाल तेथे जहाल वक्ते, मशालमोर्चे, सवंग चर्चा
हरेकजण चालवीत आहे समानतेचे स्वतंत्र नाणे

नकोस तू आवरू मनाचा जुना पसारा.... असे न होवो....
स्वतःहुनी जे गहाळले ते पुन्हा मनाला भिडून जाणे

तुझ्यामुळे जे सुचायचे ते अजूनही ऐकवीत असतो
मुशायरे आजही कसे त्यावरीच तगतात कोण जाणे

कसेबसे राखलेत माझ्या मनावरी लेप विस्मृतींचे
उगीच पाहू नकोस, उकरू नकोस दुखणे जुनेपुराणे

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गढूळलेला समाज