तरही -जगाला तू हवा आहेस बहुधा

तरही - जगाला तू हवा आहेस बहुधा

Submitted by बेफ़िकीर on 12 December, 2017 - 01:18

तरही - जगाला तू हवा आहेस बहुधा

मनांचा कंगवा आहेस बहुधा
जगाला तू हवा आहेस बहुधा

नभाच्या पिंजर्‍याला ना जुमाने
स्मृतींचा पारवा आहेस बहुधा

सुखे होतात रस्त्यातून बाजू
व्यथांचा कारवा आहेस बहुधा

जिणे व्याधीप्रमाणे सोसती जे
अशांसाठी दवा आहेस बहुधा

कधीच्या संपलेल्या मैफिलींची
उमटती वाहवा आहेस बहुधा

तुझी ना सावली देते पडू जग
विषारी गारवा आहेस बहुधा

हवा श्वासागणिक देते सलामी
हवेसाठी नवा आहेस बहुधा

उडे अष्टौप्रहर दाही दिशांना
अपेक्षांचा थवा आहेस बहुधा

Subscribe to RSS - तरही -जगाला तू हवा आहेस बहुधा