स्फुट २७ - तो शर्ट

स्फुट २७ - तो शर्ट

Submitted by बेफ़िकीर on 17 August, 2016 - 02:28

एकदाचा बोहारणीला दिला
आईने, तो माझा शर्ट
तसे इतरही कपडे होते त्या ढिगात
घासाघीस सुरू होती
एक पातेले, एक डाव आणि एक ओगराळे
एवढे मिळाले त्या बदल्यात
आईला!!
आणि मला?
मला मिळाला तडफडाट,
आकांत!!
अबोल, केविलवाणी खिन्नता!

बराच वेळ बोहारणीच्या मागून चालत राहिलो!
वाटले, परत मागावा शर्ट,
पण कंटाळलो, टपरीवर चहा प्यायला
घरी आलो

एका खूप, खूपच महत्वाच्या नात्याचा
अंतिम अवशेष
आता रस्त्यारस्त्यावरून मिरवला जात होता
बोहारणीच्या ओरडण्याच्या तालावर

एका नात्याचे प्रेत
बोहारीण वळेल तिकडे वळत होते

तो शर्ट
परत मागण्याची इच्छा
जन्मून पुन्हा पुन्हा मरत राहिली

Subscribe to RSS - स्फुट २७ - तो शर्ट