रोज मारून मन जगावे का

रोज मारून मन जगावे का

Submitted by बेफ़िकीर on 11 August, 2016 - 12:32

रोज मारून मन जगावे का
मी पुन्हा माणसात यावे का

भांडते आजकाल माझ्याशी
सोडुनी जीवनास जावे का

जा पुढे वा निदान जा मागे
एकजागीच हेलकावे का

दरवळत राहतेस केव्हाही
सांग! मागीतले पुरावे का?

कोण आहात ते तरी सांगा
चेहर्‍यांना असे गिलावे का

आपल्यांनी तरी विचारावे
आपल्यातील हे दुरावे का

भूतकाळा तुला कुठे ठेवू
एवढे छान उलगडावे का

ही गझल नीटनेटकी होणे
हे तुझे लागणे सुगावे का

एक तर वाटही नकोशी ही
त्यात वाटेत ह्या विसावे का

आपले का म्हणायचे ह्याला
एवढी ह्या मनात नावे का

सांजवेळी विचार का येतो
मी जरा 'बेफिकीर' व्हावे का
===================

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - रोज मारून मन जगावे का