एक रिकामेपण हाताशी उरले आहे

एक रिकामेपण हाताशी उरले आहे

Submitted by बेफ़िकीर on 17 March, 2016 - 12:54

सारे काही अज्ञातात विखुरले आहे
एक रिकामेपण हाताशी उरले आहे

अगम्य माझी मनस्थिती ही पाहिलीस का?
तुझा विषय नसलेले काही स्फुरले आहे

तितक्यावर तर हजार गालिब झाले असते
तुझ्या नि माझ्यामध्ये जितके उरले आहे

डोळ्यांमध्ये काही केल्या येईना ते
कुठेतरी खात्रीने पाणी मुरले आहे

आठवले तर ठीक, न आठवले तर उत्तम
कोणासाठी युगे युगे मन झुरले आहे

ओठ म्हणाले होते 'आता सर्व थांबवू'
डोळे सांगत होते 'मी आतुरले आहे'

ऐकवायला बसलो तर संपेल जन्म हा
मनात जे मी खूप खोलवर पुरले आहे

Subscribe to RSS - एक रिकामेपण हाताशी उरले आहे