नीजवेळा

नीजवेळा !

Submitted by चैतन्य दीक्षित on 16 December, 2015 - 04:54

झोपलेसे माझे पिल्लू छातीवर ।
हृदया हळुवार धडधड ।
श्वासांनो तुम्हीही लांबचा घ्या मार्ग ।
स्वप्नांना संसर्ग नको त्याच्या ।
कुंतल कुरळे कुरवाळू नका ।
हातांनो, नेमका उठेल तो ।
ओठांनो आवरा चुंबनाचा मोह ।
डहुळेल डोह निरागस ।
हळूच थांबवा स्पंदनांनो नाव ।
पऱ्यांचा तो गाव, आला बघा ।
मना, राही जागा, ठेवी पंचप्राण-
जागे, भोगी क्षण, दुर्मिळ हे ।
पिल्ला येता नीज, संवेदना जागे
गुंफले हे धागे देवाजीने ।
धाग्यांची त्या शाल हळू पांघरता
हास्य फुलें ओठां झोपेतच ।
-चैतन्य दीक्षित

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - नीजवेळा