बहकणे

ओळखी, मैत्री, बहकणे, प्रेम इत्यादी

Submitted by बेफ़िकीर on 11 June, 2015 - 13:56

नवी गझल - ओळखी, मैत्री, बहकणे, प्रेम इत्यादी

ओळखी, मैत्री, बहकणे, प्रेम इत्यादी
पावसाळ्याच्या चुकांची अर्धवट यादी

एकटा पडल्यामुळे मी हारलो होतो
पण तुझ्या हद्दीत माझी गाजली प्यादी

स्त्री कधी धजलीच नाही हे कळवण्याला
कोणत्या वेळी तिला मानू नये मादी

एकमेकांशी कधीही बोललो नाही
पण तरीही राहिले हे प्रेम संवादी

जग हवे तेव्हा मला लाथाडते आहे
ती हवे तेव्हा जगाला लावते नादी

हे कुठे सांगीतले होतेस तू गांधी
कंबरेखाली कधी नेसू नये खादी

लोक माझ्या रोज तक्रारी करत बसले
मी कुणापाशी करू ह्या सर्व फिर्यादी

कोणता इतिहास नोंदवणार आहे हे
कोण वादी व्हायचा अन् कोण प्रतिवादी

Subscribe to RSS - बहकणे