गावात लोचनांच्या अश्रूकपात होते
Submitted by बेफ़िकीर on 1 July, 2014 - 14:22
गावात लोचनांच्या अश्रूकपात होते
धास्तावल्या मनाची भटकी जमात होते
जातो जिला कराया संपन्न रातराणी
ती मी निघून जाता का पारिजात होते
ह्या धावत्या युगाला सांगायचे कसे की
कोणीतरी कुणाचे सारी हयात होते
ह्या मत्सरी जगाशी तो झुंजतो कशाला
हारून जिंकतो अन् जिंकून मात होते
ज्याचे भले कराया हा जन्म काढला मी
ते हे शरीरसुद्धा नुसतीच कात होते
पूर्वी अनेक दु:खे हल्ला करत अचानक
हल्ली गझल कुणाची एका दमात होते
प्रस्थापिण्या निघाले सर्वत्र शांतता ते
त्यांचेच बोलणे पण उच्चारवात होते
विषय:
शब्दखुणा: