दुखावणारे अतीत कोणी स्मरू नये
Submitted by बेफ़िकीर on 15 February, 2014 - 03:39
दुखावणारे अतीत कोणी स्मरू नये
मनस्थितीचा उगाच बाऊ करू नये
स्वतःकडे जर असेल काहीतरी खरे
स्वतःस कोणापुढे कधी अंथरू नये
अनेकजण लाजतील देण्यास उत्तरे
सवाल उठवायला कधी चाचरू नये
कुणीतरी आणते तुझ्यावर परिस्थिती
परिस्थितीला सदैव दोषी धरू नये
सराव राहो हसायचाही अधेमधे
रडू न आले चुकून तर गुदमरू नये
तुझ्या नव्या पावसाळण्याला जुनी शपथ
सरीपरी ते अवेळच्या ओसरू नये
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा: