तुझ्या आकाश होण्याच्या प्रयत्नांची

रिकामेपण

Submitted by आनंदयात्री on 31 January, 2014 - 01:24

तुझ्या आकाश होण्याच्या प्रयत्नांची दया येते
कितीही व्यापुनी जागा, रिकामेपण तुला येते

जरी आशा-निराशेला भिकार्‍याचे जिणे देतो
तरीही सोबती कुणि ना कुणी कायम पुन्हा येते

म्हणालो, 'हे असे का'? - तर म्हणाले, "मागणी आहे"!
अशी झटक्यात प्रश्नांची उकल, सांगा कुणा येते?

भराभर श्वास घेण्याने गरज तर भागते सारी
कधी हळुवार श्वासांना रुबाबाची मजा येते

कुणी जगतात अस्सल तर कुणी मरतात निष्ठेने
तशी बहुतेक सार्‍यांना हजेरीची कला येते

ऋतूही कोरडे सारे, दिशाही ओस पडलेल्या
अशा निष्प्राण जगण्याला विरक्तीची नशा येते

- नचिकेत जोशी

Subscribe to RSS - तुझ्या आकाश होण्याच्या प्रयत्नांची