निर्मिती

निर्मिती

Submitted by भारती.. on 14 October, 2013 - 14:05

निर्मिती

मी असते इथेच, आत्ताच, अशीच
खोलीच्या तपमानावर बहरलेली वेल;
मृगजळावर पोसलेलं असतं माझं पानपान;
क्षुधा वाढवणारी फळं धरतात मला.

कोणत्या काळाचा अ‍ॅनास्थेशिया
हुंगत असते मी ?
भूतवर्तमानभविष्याचे मुक्त
आवर्तप्रत्यावर्त उठतात,
कोणत्या किनार्‍यावर
नेऊन टाकतात मला ?
जिथे मी ठरवते भरती ओहोटी ,
अस्ताच्या रंगच्छटा
सुहृदांचे सहवास वियोग .

दडपण आणणारं स्वातंत्र्य
दिलं जातं मला ;
भरकटून टाकणारे तपशील
पुरवले जातात मला.

मी मुठीत घट्ट धरून ठेवते
संचितातल्या निष्कर्षांचा पारा
घडल्या- न- घडलेल्या घटनांमधून
काळजीपूर्वक काढलेलं तात्पर्य

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - निर्मिती