आठवांची पखाल आहे मी

आठवांची पखाल आहे मी

Submitted by बेफ़िकीर on 3 August, 2013 - 13:03

आठवांची पखाल आहे मी
आसवांचा दलाल आहे मी

देत भोज्या गहाळतो मृत्यू
जीवनाची कमाल आहे मी

एकदा वेळ काढुनी भेटू
काय सांगू... धमाल आहे मी

जर कुठे पाहिलेत तर कळवा
की कुठे आजकाल आहे मी

चोरुनी भेटते मला अजुनी
आणि म्हणते खुशाल आहे मी

बघ जरा पांघरून हृदयावर
एक उबदार शाल आहे मी

नाक मुरडून ही सुखे गेली
काय इतका बकाल आहे मी

होत नाही अश्या परिक्षेचा
लागलेला निकाल आहे मी

उंबर्‍यावर तुला रडू आले
वेदनांचा महाल आहे मी

जन्म कोड्यात टाकुनी म्हणतो
एक साधा सवाल आहे मी

या कुणीही... हवी तिथे मिरवा
एक विझली मशाल आहे मी

गर्भश्रीमंत 'बेफिकीर' असो
पण गरीबास ढाल आहे मी

Subscribe to RSS - आठवांची पखाल आहे मी