हा हुंदका कशाचा...... वनिता-३

हा हुंदका कशाचा.....

Submitted by वनिता तेंडुलकर ... on 5 February, 2013 - 03:01

हा हुंदका कशाचा कंठात दाटलेला?
का थेंब आसवाचा डोळ्यांत साठलेला?

रडशील काय आता, नाते विरून गेले
अभिशाप यातनांचा, प्रीतीस लागलेला

स्वप्ने सरून गेली, गेल्या गळून आशा
झोळीत दान सारे, कोनाच फाटलेला

सांगू कशी कुणा मी? माझी व्यथा निराळी
माझ्याच भावनांचा, संहार मांडलेला

माझे मलाच आले, समजून आज सारे
माझ्यासवेत माझा संवाद चाललेला

सांभाळले स्वतःला, ओलावल्या मनाने
आल्या सुखांत आता, आनंद मानलेला

उसळून आज येती काव्ये जरी मुखाशी
ओठांवरी 'नितू'च्या तो स्त्रोत आटलेला

Subscribe to RSS - हा हुंदका कशाचा...... वनिता-३