पानगळ चक्क वाजवी होती

पानगळ चक्क वाजवी होती

Submitted by बेफ़िकीर on 8 November, 2012 - 05:35

पानगळ चक्क वाजवी होती
त्याच भावात पालवी होती

पूर्ण रस्ता मुशायरा बनतो
जे तुला पाहती...... कवी होती

आज होती जुनीच दु:खे पण
आजची कारणे नवी होती

रोज कोमेजणे फुलत होते
रोज सुकण्यात टवटवी होती

काल काही निमित्तही नव्हते
काल मी घ्यायला हवी होती

जन्म सुरुवात फक्त मृत्यूची
लावणे सूर...... भैरवी होती

त्यातले आपले नसो कोणी
बालके सर्व लाघवी होती

पाळले तेवढे कटाक्षाने
ज्या सलोख्यात यादवी होती

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - पानगळ चक्क वाजवी होती