निकाल

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

१५ नोव्हेंबर २००७. या दिवशी या सर्व पर्वाचा अंत झाला. सुरवात झाली २८ एप्रिल २००० रोजी. पण खरी सुरवात झाली
ती १८ मार्च १९९३ रोजी. त्या काळात असे वाटत होते कि याचा अंत कधीच होणार नाही का ?
आता काय आहे स्थिती ? मी या सगळ्याकडे तटस्थपणे पहायला शिकलो का ? जखमा बुजल्या, खुणाही नाहीत. पण ...
सल नक्कीच आहे. एका अर्थाने मी श्रीमंतही झालोय. ज्यानी त्या काळात जपलं, त्यांचे कधीच न फ़िटणारे ऋण आहे. पण एकदातरी हे सगळे लिहून काढायचे आहे. त्या सगळ्याना हे वाचून दु:ख होणार आहे. त्यानी जपलं नसतं तर मी आज उभाही राहु शकलो नसतो. पण त्यानाही हे सगळे कुठे माहित आहे ? दिनेश आपला आहे आणि त्याला जपायचं, या कर्तव्य भावनेने, ते मला जपत राहिले. अजूनही जपत आहेत. त्याना कल्पनाही नाही, कि त्यानी मला कुठल्या वादळात सहारा दिला. त्यानी मला एवढे बळ दिले कि आज मी इतराना जपण्याची वल्गना करु शकतोय. एका कोलमडलेल्या झाडाला, परत उभे करण्याच्या किमयेची, हि कहाणी.

ते म्हणजे माझे मायबोलीकर. माझे आई वडील, भावोजी, बहीण, भाऊ, वहीनी, भाचा, भाची, पुतण्या सगळ्यांची साथ होतीच. पण ती माझ्या रक्ताची माणसे आहेत. त्यांची साथ मी गृहीतच धरली होती. पण या मायबोलीकरानी, त्यांची साथही त्यानी, मला गृहित धरायला भाग पाडले. एखाद दुसरा अपवाद वगळता, सगळेच माझ्यापेक्षा वयाने लहान. पण त्यांचा ( आणि त्यांच्या कुटूंबियांचादेखील ) समजूतदारपणा, बघता, त्यांच्याकडून दादा म्हणवून घ्यायला, मला खरे तर संकोच वाटतोय. आज हा सगळा संकोच बाजूला ठेवतोय.

आणि हेदेखील मला मानायलाच हवे, कि बघा मी किती शूर आहे, सगळे कसे धैर्याने सोसतोय, हा माझा गर्व देखील या काळात दूर झाला, कारण माझ्यापेक्षा शूर माणसे, मला इथेच या मायबोलीवर भेटली. मला जमिनीवर ठेवल्याबद्दल मी त्यांचाही ऋणी आहे.

तसेच हे सगळे इथे लिहिण्यामागे, कुठलीही सनसनाटी निर्माण करण्याचा माझा उद्देश नाही. आपण सर्व "शहाणे" आहात आणि शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढायची नसते, हेही आपण जाणताच. त्यामुळे होते काय, कि आपल्या कोर्टाच्या कामकाजाबद्द्लच्या कल्पना या सिनेमा, नाटकातील (बहुतांशी) खुळचट दृष्यावर बेतलेल्या असतात. मी तूझ्यावर केस करिन वा माझ्यावर केस कर अशी भाषा (इथेही ) अगदी सहज वापरली जाते. तसेच एखाद्याने वैवाहिक समस्या मांडली तर त्याबद्दल चुकीचे
मार्गदर्शन केले जाते किंवा या दृष्टीने सल्ले दिले जात नाहीत. ( हे दोन्ही अलिकडेच झाले इथे ) तर कोर्टाचे कामकाज कसे चालते. ४९८ अ कलमाचा दुरुपयोग कसा केला जातो. पोलीस व सरकारि वकिलांची भुमिका काय असते, कोर्टात पुराव्यांची छाननी कशी होते, कोर्टाची भाषा कशी असते, कोर्ट आपल्या निर्णयापर्यंत कसे पोहोचते, या सगळ्यांची पण नीट कल्पना यावी, हा माझा हेतू आहे.

दुसरे म्हणजे कुणाचीही बदनामी करण्याचा माझा हेतू नाही. मी काही वर्षांपूर्वी इथे लिहिले होते त्यावेळी, चंपकने, त्या मुलीची बाजू देखील मांडली जावी, असे लिहिले होते. (चंपक आणि त्याचे कुटूंबीय आता माझे खास मित्र आहेत ) मॆ. कोर्टाने तशी पूर्ण संधी दिली होती. तसेच फ़िर्यादीच्या वतीने इथे मायबोलीवर माझी बदनामी करण्याचा प्रयत्नही झाला होता. माझ्या मायबोलीकरानी (खास करुन श्यामली, मिलिंदा आदी ) तो प्रयत्न हाणून पाडला होता. नंतरही असे तुरळक प्रयत्न होत राहिले. त्यावेळी या खटल्याचे कामकाज चालू असल्याने, मला प्रत्यूत्तर देता आले नव्हते.

सुरवात करतोय ती मे.वसई कोर्टाच्या निकालपत्रापासुन :- तर ते असे आहे. ते इंग्रजीत आहे. पण त्याचे भाषांतर न करता ते, जसेच्या तसे इथे देतोय. यातले काहि उल्लेख, सत्य असले तरी, मी टाळतोय, कारण ते इथे लिहिण्याजोगे नाहीत.
( आणि या निकालपत्रापर्यंतचा खडतर प्रवासही, क्रमाक्रमाने येतोच आहे )

प्रकार: 

भयानकच आहे हे सगळे.............
आजच पहिल्यान्दा वाचले.....
सुन्न झालोय..... तुमच्या धीराला _/\_...

Pages