सच्चाई का सामना

Submitted by शिवम on 16 July, 2009 - 10:52

दुरचित्रवाणीवरील कार्यक्रमांच्या सवंगपणाबद्दल थोडंसं...

आजकल दुरचित्रवाणीवर वाहिन्यांचा इतका महापुर आला आहे की काही विचारता सोय नाही. जितक्या वाहिन्या तितक्याच त्याच त्याच प्रकारच्या मालिका, कार्यक्रम. मागिल काही वर्षात तर स्त्रिवर्गाला आकर्षित करण्याचा एकता कपुरने जणु विडाच उचलला अन मग "क" च्या संपुर्णतः काल्पनिक कौटुंबीक मालिकांचा सपाटा सुरू झाला. मग प्रत्येक वाहिनीवर थोड्या अधिक फरकाने त्याच त्याच मालिका दिसु लागल्या.

मध्यंतरी दुरचित्रवाणीवर 'सत्यताप्रधान कार्यक्रमां'चे (रिअ‍ॅलिटी शो) पेव फुटले. याची सुरुवात कधी अन कशी झाली माहित नाही. "कौन बनेगा करोरपती"नं तर प्रसिद्धी चे उच्चांक मोडले. अश्या कार्यक्रमातुन मुबलक पैसा अन प्रसिद्धी मिळते हे उमगल्यावर तर मग प्रत्येक वाहिनीवाले काही ना काही सत्यताप्रधान कार्यक्रम घेऊन हजर होऊ लागले; अन ते प्रेक्षकांच्या माथी मारू लागले.

अश्या काही कार्यक्रमातुन सामान्य ज्ञान मिळतं, मनोरंजन होतं, तर काहींतुन नवीन कलागुणांना वाव मिळतो. उदाहरणादाखल आपण सारेगमप, एका पेक्षा एक, नच बलिये, होम मिनिस्टर, कौन बनेगा करोरपती ही नावं घेऊ शकतो. पण असे अनेक कार्यक्रम आहेत की त्यातुन त्यांना काय द्यायचं आहे तेच कळत नाही. उदा. खतरोंके खिलाडी, स्वयंवर राखी का, इस जंगल से मुझे बचाव. यामध्ये आपण इ-टीव्ही वरच्या क्राईम डायरी चा ही उल्लेख करू शकतो.

कालपासुन स्टार टीव्ही वर "कौन बनेगा करोरपती" च्या धर्तीवर एक सत्यताप्रधान कार्यक्रम सुरू झालाय - नाव आहे "सच्चाई का सामना". हा कार्यक्रमही एका इंग्रजी कार्यक्रमाची कॉपी आहे. अगदी कुतुहल म्हणुन हा कार्यक्रम पाहण्यास बसलो.

कार्यक्रमाचे साधारण स्वरूप असे : २१ प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली तर स्पर्धकाला १ कोटी रुपये मिळणार. पण प्रश्न संपुर्णतः वयक्तिक जिवनाशी निगडीत. प्रश्नांची उत्तरं बरोबर की चुक हे कोणी व्यक्ति नव्हे तर मशिन ठरवणार. कार्यक्रमापुर्वी हेच सारे प्रश्न 'पोलिग्राफ टेस्ट' च्या सहाय्याने स्पर्धकाला विचारलेले असतात. त्या उत्तरांशी कार्यक्रमादरम्यान स्पर्धकाने दिलेल्या उत्तराशी बरोबरी झाल्यास उत्तर बरोबर, नाहीतर चुक. प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाचं उत्तर देणं बंधनकारक.

कालच्या कार्यक्रमात स्पर्धक म्हणुन एक स्त्री होती. विवाहाला १६ वर्षं पुर्ण झालेली. पती अन २ मुलं असा संसार. कार्यक्रमादरम्यान पती, दीर, आई अन बहीन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकानं विचारलेले काही प्रश्न साधारणपणे असे होते :

(१) काय तुम्हाला लग्नापुर्वी माहित होतं की तुमचे सासरे तुमच्या पतीपेक्षा सुंदर आहेत ?

(२) तुमच्या आई-वडिलांचं तुमच्यापेक्षा तुमच्या भावावर जास्त प्रेम आहे म्हणुन तुमची मनातुन जळफत होत असायची का?

(३) तुमच्या मोठ्या बहिणीचे वापरलेले कपडे, पुस्तके तुम्हाला वापरावी लागत, म्हणुन तुम्हाला तिचा राग येत असे का?

(४) तुमच्या दुसर्‍या बाळंतपणाच्या वेळी तुमची आई जवळच असुनही तुमच्याजवळ आली नाही, यासाठी तुम्ही तिला माफ करू शकला आहात का?

(५) तुमच्या आईपेक्षा तुमची सासु तुम्हाला अधीक जवळची वाटते का?

(६) तुमचे पती पुन्हा दारूच्या आहारी जातील अशी अजुनही मनामध्ये भिती आहे का?

(७) तुमच्या पतीची हत्या करण्याचा विचार कधी मनामध्ये आला होता का?

हे, अन अश्या प्रकारचे प्रश्न उत्तरं मी शांतपणे ऐकत होतो. यावर कळस म्हणुन की काय सुत्रसंचालकानं हा प्रश्न विचारला...

(८) जर तुमच्या पतीला कळणार नसेल तर तुम्ही परपुरुषाची शय्या सजवाल का? (त्या प्रश्नाच हे सुसंस्कृत भाषांतर आहे. शब्दशः भाषांतर खुपच किळसवणं वाटलं असतं. अ‍ॅडमिनबंधु, कृपया यामध्ये काहीही काटछाट करू नका. लोकांनाही कळायला हवं!)

आता बोला!! हा प्रश्न ऐकल्याबरोबर माझं डोकंच गरगरायला लागलं. अन कहर म्हणजे तिने यावर "नाही" असं ठाम उत्तर देऊनही त्यांच्या मशिनने तिचं उत्तर चुक ठरवलं. या वेळी तर माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. जर मी तिथे उपस्थित असतो तर नक्कीच पायातील वहाण काढुन त्याच्या श्रीमुखात सणकवली असती.

अरे काही तरी नितीमत्ता बाळगा. सत्यतेच्या नावाखाली काय तमाशा मांडता आहात तुम्ही? आपल्या समाजात घरी टीव्हीवर कार्यक्रम पाहत असताना कार्यक्रमातील ललनेच्या सौंदर्याची पतीराजांनी स्तुती जरी केली तरी पत्नी पतीशी भांडण करते. मग विचार करा अशा कार्यक्रमात पतीच्या समोर अगदी खुलेआम पत्नीच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवले गेले तर त्यांच्या घरी नंतर काय वादळ निर्माण झालं असेल? २ मोठी कळणारी मुलं आपल्या आईबद्दल असं काही ऐकल्यावर काय विचार करतील? विचारच न केलेला बरा.

स्टार टीव्ही सारख्या नामांकीत वाहिनीवरील कार्यक्रमांची प्रतिमा इतकी खालच्या दर्जाची असु शकते यावर माझा विश्वासच बसेना. १ कोटीचं आमिष दाखवुन लोकांच्या भावनांशी खेळणं कितपत योग्य आहे? यात कसला आलाय खेळ? अशा कायक्रमातुन काय सिद्ध अन साध्य करु पाहता आहात तुम्ही? खरच तुम्हाला पैसे वाटायची इतकी हौस आहे का? प्रसिद्धी अन पैसा कमवायच्या हव्यासापोटी समाजाला कुठे घेवुन चालला आहात? तुमच्या अशा या बाजारू अन गल्लेभरू कार्यक्रमातुन कुणाची मनं दुखवली जातील, कायमची कटुता येईल, कुणाचे संसार उध्वस्त होतील याचं थोडंतरी भान ठेवा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सच का सामना मध्ये वादग्र्स्त टाईपच्या लोकांनाच बोलावले जात आहे. पापभीरू, सज्जन असा स्पर्धक त्यांनी आणलाच नाही आहे. या वरूनच त्यांचा उद्देश स्पष्ट होतोय.

Pages