'बिलॉन्गिंग' (पुस्तक अभिप्राय)

Submitted by संप्रति१ on 16 November, 2026 - 23:34

चार दिवस सोनिया गांधींच्या आत्मचरित्रानं मनमस्तिष्क व्यापून टाकलं. एखाद्या सिनेमासारखी ही लव्हस्टोरी चालू झाली.‌ प्रेमात डुबून गेलेल्या एका स्त्रीची गोष्ट.‌ वाचत राहिलो वाचत राहिलो वाचत राहिलो.‌ कधीतरी वॉशरूमला उठलो तेव्हा बाहेर पक्ष्यांचा आवाज ऐकू आला, तेव्हा लक्षात आलं की पहाट झालीय. म्हणजे सलग आठेक तास वाचत होतो.

यांचं लग्नाधीचं आयुष्य, माहेर, एकदमच मिडलक्लास आहे. इटलीच्या छोट्या गावात राहणारे साधे सरळ नोकरपेशा लोक. आर्मीतून रिटायर झालेले कडक शिस्तीचे वडील. आणि इकडून रोज पत्रामागून पत्रं पाठवून वडिलांना कन्व्हिन्स करण्याबाबत सोनियाला सल्ले देणारे राजीव.

केंब्रिजमधलं यांना काहीच आवडत नव्हतं ते राजीव भेटल्यानंतर अचानक सगळं जादूसारखं आवडायला लागलं. रोमान्स. विरह. घालमेल. बुजरेपण. या सुरूवातीच्या भागात मॅडम तर कवयित्री झाल्यात एकदम. 

स्वतःबद्दल, फॅमिली लाइफबद्दल लिहिताना सोनिया गांधींनी फारसं हातचं राखलेलं नाही. लिखाणात एक जबरदस्त फ्लो आहे. मानवी संवेदनांनी खचाखच भरलेलं, धरून ठेवणारं लिखाण. पुढे राजकीय आयुष्याचा भाग सुरू होतो तेव्हा मात्र हा फ्लो काहीसा तुटतो. राजकीय घटनांबद्दल लिहिताना त्या अधिकाधिक कॉन्शस होत गेलेल्या दिसतात. स्वतःला रोखून धरतात. सुरुवातीच्या भागातला मोकळेपणा आणि बेदरकारी इथे जाणवत नाही. पहिल्या साडेतीनशे पानांनी वाचनीयतेचा जो ग्राफ उंचावून ठेवला आहे, तो हळूहळू सपाट व्हायला लागतो. शेवटी शेवटीच्या काही काही पानांमधला मजकूर एकदम सपाट राजकीय विवेचनासारखा वाटला.

बाकी, म्हातारपण छानपैकी घ्यायला जमलेलं आहे. पक्व म्हातारपण आल्यावरच अशी जुन्या आठवणींची कशिदाकारी जमत असावी. अतिशय बारीकसारीक आठवणी, अगदी व्यवस्थित डिटेलिंगसह, मुरवून मुरवून शांतपणे मांडल्या आहेत. दहाएक वर्षे लागली म्हणतात हे लिहायला. वाचताना जाणवतंही.

अशा गोष्टी ज्या फक्त एक बायकोच नवऱ्याबद्दल लिहू शकते. ज्या फक्त एक सूनच सासूबद्दल लिहू शकते. ज्या फक्त आयाच आपल्या मुलांबद्दल लिहू शकतात. आणि 'सत्ता' 'लीडरशीप' वगैरे गोष्टींबद्दल अशा फिलॉसॉफीकल/ डिटॅच्ड नजरेनं पाहून लिहिणंही अशाच व्यक्तीला शक्य आहे, जी तीस-पस्तीस वर्षं सत्ताकेंद्रात वावरली आहे, जिनं सत्ता हाताळली आहे आणि 'सत्ता' नावाच्या गोष्टीतल्या फॉल्टलाईन्स अनुभवातून जिला कळलेल्या आहेत.

एका सर्वस्वी अनोळखी जगात आलेली स्त्री. एका माणसावर विश्वास ठेवून. मागचं सगळं मागे टाकून. राजीव यांची चॉइस मात्र परफेक्ट होती, हे काळानं सिद्ध केलं आहे.

भारतात पहिल्यांदा आल्यानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत इथले रंग, गंध, ध्वनी, आहार, पोषाख, भाषिक लकबी, रस्ते, घरं, खिडक्या, झाडं... या सगळ्यांमधलं निराळेपण त्यांनी ज्या पद्धतीनं टिपलं आहे, त्यासाठी एक सर्जनशील मन लागतं. त्याची झलक या वर्णनांमधून दिसतेच म्हणजे. शिवाय माणसांना बारकाईनं ऑब्झर्व करण्याचा त्यांना छंद असावा. ही निरीक्षणं राष्ट्रप्रमुखांची, परदेशी पाहुण्यांची आहेत आणि बॉडीगार्ड्स, शेफ, स्टाफमधल्या लोकांबद्दलचीही आहेत.

इंदिरा गांधींबद्दल लिहिताना सुरुवातीला राजीवज् मदर, मग मदर-इन-लॉ, मग मिसेस गांधी, मग ममी अशी संबोधनं येतात. ही संबोधनं प्रसंगानुसार, भावनेनुसार, काळानुसार बदलतायत हे एक शंभरेक पानं वाचल्यानंतर जाणवलं. 

पहिल्यांदा दिल्लीत फिरताना रस्त्याकडेच्या भिंतींवर लालभडक शिंतोडे दिसलेले जे त्यांना रक्त वाटलेलं. कळत गेलं नंतर की ह्या पानाच्या पिचकाऱ्या आहेत. हे 'अशा प्रकारे' सांगायला असं कुणीतरी लागतं ज्याच्या गाठीशी दोन ऑलटुगेदर वेगळ्या जगांचा अनुभव आहे. 

एवढी वर्षे ही स्त्री आपल्या डोळ्यांपुढे पब्लिक लाईफमध्ये दिसत आली आहे तरी आपल्याला यातलं काहीही माहीत नव्हतं, याचं आश्चर्य.! आठवणींची लड लावून दिलेली आहे मॅडमनी. खजाना आहे यांच्याकडे तर.! इंदिरा-राजीव यांच्या काही सवयींचा खरपूस समाचार घेतलेला आहे. कसलेल्या लेखिकेसारखा सटल सेन्स ऑफ ह्युमर ठेवून लिहिलंय ते. हे किस्से, निरीक्षणं वाचणं एक डिलाईट, एक मौज आहे.

आत्मचरित्र वाचतोय की एखादी कादंबरी वाचतोय, असा भ्रम व्हावा असं लिखाण. प्रसंग, संवाद, मनस्थिती यांची मांडणी एवढी प्रभावी की डोळ्यांसमोर घडतंय असं वाटावं.‌ साठेक वर्षांचा मोठा पट आहे. आणि लेखिका वाचणाऱ्याला त्यात गुंतायला भाग पाडते. या प्रवासात वाचणारा मनानं त्यांच्यासोबत असतो. त्यांच्या घरात राहतो. त्यांच्यासोबत वावरतो, माणसांना भेटतो, देशात विदेशात, सभांमध्ये, कुठे कुठे.

इंदिरा गांधींच्या, राजीव गांधींच्या हत्येचे प्रसंग, त्यानंतरची मनस्थिती, दहशत, भावनांचे बेभान स्फोट, इंटेन्स रॉ इमोशन्स, डिप्रेशन.‌ छाती दडपून गेली. लांबून बघताना वाटत असतं हे काय गांधी घराणं, रॉयल, ग्लॅमरस लोक आहेत वगैरे ! पण हे लाईफ काही झेपलं नसतं आपल्याला तर.! डेंजर आहे हे. नॉर्मल जगणंच उरत नाही काही. कितीही ठरवा, यातनं एस्केप करणं शक्य होत नाही. परिस्थितीचा दबाव दुसरा मार्गच ठेवत नाही. हे लिहून काढल्यामुळे सोनिया गांधींच्या मनावरचं ओझं उतरलं असेल कदाचित, पण जे कुणी वाचतील त्यांच्या मनावर या आठवणींचं ओझं पडत राहणार आहे, पुढची दहा पंधरा वीस पंचवीस तीस वर्षे, जसजसं हे पुस्तक झिरपत जाईल तसतसं. 

महात्मा गांधींचं आत्मचरित्र हे माणसानं स्वतःबद्दल किती खरंखुरं लिहावं, याचा बेंचमार्क मानला जातो. त्या लेव्हलला जाणं अवघड आहे. पण हे पुस्तकही काही कमी नाही. स्वतःच्या कमतरता, भीती, मानसिक द्वंद्वं लिहायला जिगर लागते.

पेंग्विननं हे पुस्तक नाकारून कर्मदरिद्रीपणा केला. ज्याला चांगला कंटेंट कळतो असा कुणीही संपादक असला ऐवज नाकारणार नाही. दबाव असणार, समजू शकतो. पण मग बसा आता हात चोळत ! तिकडे हार्पर-कॉलिन्सवाल्यांच्या हातावर रेष उमटली. ज्याचं त्याचं नशीब !

बाकी, काही जणांचा अभिप्राय पडला की या पुस्तकाच्या माध्यमातून बिगर-नोंदणीकृत कुजबूज गॅंगला परस्पर उत्तर मिळालं असेल. मला तसं काही वाटलं नाही. त्यांना कोण उत्तरं देत बसणार.! एक उत्तर द्यायला जावं तर त्यातनं अजून दहा कंड्या पिकवतील.

तर माणसानं आपापलं लिहावं, हे बरं. जसं यांनी लिहिलंय. आपापली गोष्ट लिहिलीय.‌ चांगल्या अंतःकरणानं, मोकळ्या मनानं लिहिलीय. आणि हे गांधी-नेहरूज् सभ्य लोक आहेत. त्यामुळे शालीन संयत सुसंस्कृत डिग्निफाईड भाषा अपेक्षितच होती. एवढी वर्षे एवढ्या बेकार पद्धतीने ट्रोलिंग होऊनही कटुतेचा लवलेश नाही, विखार नाही, हे मात्र भारी.! 

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यथार्थ अभिप्राय.
ह्या स्त्रीने आयुष्यात काय काय सहन केले आहे ह्याची झलक दाखवणारे आत्म चरित्र.
पण भगवे एव्हढे का चिडले आहेत?

वाचणार तर नक्कीच.
एका परक्या देशातील मुलगी इथे येऊन इथली भाषा संस्कृती आत्मसात करते हे खूपच कौतुकास्पद आहे.

नेहरू गांधी घराण्याबद्दल आदर आहे. इंदिरा गांधींबद्दल मिळतील ती पुस्तकं वाचली आहेत.

आवडला अभिप्राय.
मी प्रि ऑर्डर केलं होतं आणि येऊन पडलंय. आतले फोटो तेवढे पाहिलेत. त्यांच्या ट्विटर हँडलवर आलेला मजकूर वाचलाय. हे पुस्तक सलगच वाचायचं आहे.
१९९१ नंतरचं त्यांचं आयुष्य तसं पब्लिक गेझमधलं आहे, त्यामुळे त्याबद्दल फार कुतूहल नाही.

छान परिचय करून दिला आहे संप्रति. सोनियांचे आयुष्य कादंबरी सारखेच वाटत आले आहे, तसेच पुस्तकातही उतरलेले दिसतेय.

.. गंध, ध्वनी, आहार, पोषाख, भाषिक लकबी, रस्ते, घरं, खिडक्या, झाडं... या सगळ्यांमधलं निराळेपण टिपलं आहे….

याबद्दल नेहेमी खूप उत्सुकता असते. बाहेरून आलेल्यांना आपला देश-माणसं पहिल्या नजरेत कशी दिसतात त्याची.

घरी आले आहे पुस्तक. सध्या बाबा वाचताहेत. तुमचा रेको आहे म्हणून त्यांचे झाले की वाचेन.

हे पुस्तक येणार हे पहिल्यांदा वाचल़ं तेव्हाच ते वाचायचं नक्की केलं. अजून घेतलं नाहीये. घेतेच आता.
मला फार उत्सुकता आहे सोनिया गांधींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. काय धक्के सोसलेत त्यांनी आयुष्यात!

मी पुपुल जयकरांनी लिहिलेलं इंदिरा गांधींचं चरित्र ( मराठी अनुवाद) वाचलं आहे खूप पूर्वी. ते मला 'पुस्तक' म्हणूनही खूप आवडलं होतं. हेही तसंच असेल असं तुम्ही म्हणताय तर छानच.

पुपुल जयकरांनी लिहिलेलं इंदिरा गांधींचं चरित्र>> मी पण वाचलंय ते. कॅथरीन फ्रँक ने लिहिलेलं जास्त आवडलं मला.
त्यात एक प्रसंग आहे,
सोनिया गांधींनी तयार केलेला ब्रेकफास्ट आवडला नाही म्हणून संजय गांधींनी प्लेट फेकली होती. तेव्हाच वाटलं, बापरे.. ह्या परक्या देशातून आलेल्या मुलीला काय वाटलं असेल..

सहमत.
Belonging+ नावाची आठ दहा पुस्तकं आहेत इंग्रजीत. मराठीत या शब्दाचा अर्थ आपल्या वस्तू किंवा आपूलकी हा होतो. इटली देश सोडून भारताच्या संस्कृतीत सोनिया रुजल्या . भाषा, पेहराव, भावधरून आपुलकी अर्थ बरोबर आहे.

वाचायला घेतलंय. पाचशे पानांचं म्हणून अधले मधले भाग प्रथम वाचले. फ्लो चांगला आहे. पुढे राजकीय भाग आल्यावर थोडं त्रोटक होतं हे मान्य आहे कारण आता त्या राजकीय जीवनात सोनिया सक्रीय आहेत. उगाच राळ उडवून भडक करण्याची वृत्ती नाही. पेन्ग्विनने नाकारण्याचं कारण हेच असेल. सनसनटी टीका टिप्पणी केल्यास वाचकांच्या उड्या पडतात. किंवा गॉसिप ( मराठीत?) वाचणे आणि चघळणे खप वाढवते.[ हेच मत खुशवंत सिहांनी व्यक्त केलंय त्यांच्या पुस्तकांबद्दल, लेखनाबद्दल. पेन्गिनने छापलीत]
चित्रे वीसेक आहेत पण काळी पांढरी. ओके. भर लेखनावर आणि व्यक्त होण्यावर आहे.
[या अगोदर ओबामाचं A Promised Land (2020) पहिला भाग वाचला होता. त्यात त्यांनी विविध देशांतील प्रमुख नेत्यांवर केलेली टिप्पणी आहेत. ते पडले पेशाने सांसदीय वकील त्यामुळे भाषा आणि कथन भारीच आहे.शिवाय अध्यक्ष. पुढचे दोन भाग येणारेत ते आले नाहीत.ओबामाने अध्यक्षीय निवृत्तीनंतर पुस्तक लिहिले आहे.इतर पुस्तके अध्यक्ष होण्याअगोदरची आहेत. हा फरक आहे.]
असो.
आत्मचरित्र प्रकारात हे पुस्तक प्रमूख राहील हे निश्चित.
( भगवे राळ का उडवतात याचं उत्तर मी म्हणेन की स्वतंत्रपणे लेखन समीक्षा करणारे , वाचणारे थोडेच असतील आणि बाकीचे कुणीतरी सांगितलेल्या गोष्टी गिरवणारे असावेत. राजकीय मतं आणि समज बाजूला ठेवून पुस्तक वाचावे लागते.)
आत्मचरित्र लिहिणाऱ्यांचे पाच सहा गट पाडू शकतो. १.सामान्य लोक, २.कलाकार, ३.सरकारी किंवा खासगी नोकरवर्ग , ४.मोठमोठे उद्योगपती,५ इतर प्रख्यात लोक, ६.मोठे राजकीय नेते.
क्रमांक (३) आणि (६) यांचेकडून वाचक फारच अपेक्षा ठेवतात किंवा काही गुपीत बाहेर पडेल या आशेने पाहतात.
.....
आता किंमत आठशे रुपये आहे पण मुंबईत ( हुतात्मा चौकात) महिन्याभरात स्वस्तात मिळेल किंवा वाचन शुल्कात मिळेल.

इंग्रजीच्या बाबतीत फारच आनंद असल्याने मराठी अनुवाद फारच दर्जेदार अनुवादकाकडून एखाद्या प्रतिष्ठित प्रकाशक मंडळीकडून लवकर उपलब्ध व्हावा ह्या प्रतीक्षेत आहे.

परिचय आवडला.
वाचायची फार उत्सुकता न्हवती, पण परिचय वाचुन आता घ्यावसं वाटतंय.
(पेंग्विनने पुस्तक नाकारुन... आता बघितलं तर इथे प्रकाशक पेग्विनच आहे, म्हणजे फक्त भारतातल्या पेग्विनला स्पाईन नाही असं असणार)

युवराजांनी काल भर सभेत माझे पप्पा माझ्या मम्मीला नेहमी मांडीवर बसवून जेवत असत असे विधान करुन खळबळ माजवली.
मम्मीचे मांडीवर बसून जेवणे इतके सवयीचे झाले होते की मित्रांच्या घरी त्यांच्या आईबापांना वेगळ्या खुर्च्यांवर बसून जेवताना पाहून मला खूप आश्चर्य वाटत असे.
ह्या "राया मला मांडीवर घेऊन बसा" प्रकरणावरून काही प्रश्न पडले आहेत की. प्रत्येक जेवण अशा प्रकारे करता येईल का?
चांगली पोक्त बाई मांडीवर घेऊन बाप्याला डायनिंग टेबलावरचे व्यवस्थित जेवता येत असेल का?
खुद्द राजमाता अशा प्रकारे कुणाच्या मांडीवर बसून नीट जेवू शकत असतील का?
इंदिराजी अनेकदा सगळ्या कुटुंबासोबत जेवत. तेव्हा ह्या "राया मला मांडीवर घेऊन बसा" स्टाईलच्या जेवणाबद्दल त्यांची प्रतिक्रिया कशी असेल?

युवराजांचे हे मनमोकळे प्रतिपादन ऐकून अनेक निष्ठावान काँग्रेसी आपापल्या बायकांना मांडीवर घेऊन जेवत आहेत असे फोटो विविध माध्यमांवर टाकू लागले आहेत असे कळते.

राजमाता आणि राजपित्याच्या खाजगी जीवनातले आणखी कोणकोणते पैलू युवराज भविष्यकाळात उलगडतात ते पाहणे मनोरंजक ठरेल!

शेंडे, यू आर चो च्वीट!!
बाप्या,बाई,आणि मुलं यांच्यापैकी कोणीही उपासमारीने मेलं नाही त्या अर्थी त्यांचं भरणपोषण नीट होत होतं असं मानायला हरकत नसावी, पण तुम्हाला काळजी वाटली हे किती गोड आहे!

बाकी या धाग्यावर पुस्तकाबद्दल / या परिचयाबद्दल काही नाही बोलणार तुम्ही? बरं असू दे असू दे.

आता युवराजांनी भर सभेत हे सुंदर सत्य संगितले आहे. ह्याला विकृत म्हणत असाल तर हा राजद्रोह आहे हे लक्षात घ्या.

माझ्या सांगण्यावरून युवराज भर सभेत हे बोलते झाले असे काही म्हणताय का? पण मी युवराजांशी असे काहीच बोललो नव्हतो.
संबंधित सभा ही ह्या पुस्तकाशी संबंधित होती. तेव्हाच युवराजांनी ही बहुमोल माहिती दिली.
कदाचित पुढच्या आवृत्तीत "राया मला मांडीवर घेऊन बसा" असे नवे प्रकरण घालून राजमाता प्रकाशित करतील अशी आशा!

पुन्हा तेच. मी स्वतः हे म्हटले असते तर विकृत आहे म्हणता येईल.
पण जर खुद्द युवराज आपल्या डोळ्यांनी हे सुंदर दृश्य प्रत्येक जेवणाच्या वेळी पाहत होते असे स्वतः सांगत आहेत तर त्यात माझे स्कूल, माझी बालवाडी, माझे कनिष्ठ महाविद्यालय, माझे महाविद्यालय वगैरे कुठून आले? आणि त्याला विकृत का ठरवत आहात?
उलट आणखी काही उदाहरणे देऊन हे अगदी नॉर्मल आहे, घरोघरी हे घडत असते असे सांगाल अशी अपेक्षा होती.

शेंड्ये त्या शेजारच्य धाग्यावर चक्कर टाका की. लोक तुमची वाट पहात आहेत.

सुंदर परिचय. पुस्तक विकत घेणार आहे. सोनिया गांधींविषयी आदर आहे. त्यांना आयुष्य रोलरकोस्टरसारखं मिळालं पण मॅडम कणखर आहेत. लवस्टोरी अतिशय गोड. एवढी वर्ष त्यांनी पर्सनल लाइफविषयी काहीही फारसं बोललं नव्हतं, त्यामुळे वाचायचं कुतुहल आहे.

Pages