मातीचा सुगंध (प्रेरणादायी कथा)

Submitted by निमिष_सोनार on 14 November, 2026 - 09:06

महाराष्ट्राच्या एका छोट्याशा गावात राघव आणि आरव हे दोन जिवलग मित्र लहानाचे मोठे झाले होते. दोघांचीही घरं साधी. मातीची. अंगणात तुळस आणि मागच्या बाजूला जनावरांचा गोठा. अंगणात खाट आणि बाजूला बैलगाडी.

फरक एवढाच होता की, राघवच्या डोळ्यांत शहराची स्वप्नं होती आणि आरवच्या डोळ्यांत गावाचं भविष्य. राघवचे वडील लहानपणी वारले होते.

एके दिवशी दोघे गावच्या विहिरीजवळ बसले होते.

“राघव, पुढे काय करणार?” आरवने विचारलं.

राघवने आकाशाकडे पाहत उत्तर दिलं, “पुण्याला जाणार. मोठं शिक्षण घेणार. मग मुंबई, मग… परदेशात! जग जिंकायचं आहे मला! त्या सिकंदर सारखं!"

आरव हसला,“परदेशात काय करणार?”

“काय करणार म्हणजे? मोठी नोकरी, मोठं ऑफिस, मोठी गाडी, मोठं घर… आणि भरपूर पैसे कमावणार!”

“आणि मग?”

“मग सुखी होणार!”

आरवने हसत विचारलं, “या सगळ्या जगभरातील वारीमध्ये नेमके सुख कुठे मिळतं याचा पत्ता आहे का तुझ्याकडे?”

राघवने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाला, “तू शेती कर आणि मला जगभरचं तत्त्वज्ञान शिकव!”

दोघे खळखळून हसले.

••••

काही वर्षांत दोघांचे रस्ते वेगळे झाले.

राघव पुण्यात शिकला. नंतर मुंबईत नोकरी लागली.

कॉर्पोरेट जगाने त्याच्यासमोर एक वेगळीच दुनिया उघडली.

काचेच्या भिंतींची ऑफिसेस.

कार्ड स्वाइप करून उघडणारे दरवाजे.

लिफ्टमध्ये परफ्यूमचा वास.

हातात लॅपटॉप.

गर्दीतही कानाला हेडफोन.

आणि चेहऱ्यावर कायम “मी खूप बिझी आहे” असा भाव.

काही महिन्यानंतर राघवने आईला फोन केला, “आई, माझं ऑफिस बघितलंस तर तुला विश्वास बसणार नाही!”

आई हसली, “वा. छान. जेवायला वेळेवर बसतोस ना?”

“अगं, आता मी कॉर्पोरेटमध्ये आहे. जेवायला वेळ कुठे असतो?”

“जेवायला वेळ नाही? मग वेळ विकत मिळतो का तिकडे? थोडा विकत घे आणि जेवून घे बाबा. असे तर नाही ना की, कॉर्पोरेटमध्ये गेल्यावर काचेच्या खिडक्यांमधून परावर्तित होणारे प्रकाश किरण आपोआप तुझे पोट भरतात? त्या धूप खाणाऱ्या जादू सारखे?"

राघव हसला, “तू पण ना आई…!”

फोन ठेवल्यानंतर आई मनात हसत म्हणाली, "इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला?... अरे फिसल गया...! अशी तुझी गत नको होऊ देऊ म्हणजे मिळवलं रे बाबा!"

••••

यथावकाश राघवाचे लग्न झाले. मुलं झाली. पगार वाढत गेला. पद वाढत गेलं. जबाबदाऱ्या वाढल्या आणि प्रचंड कामामुळे राघव आणि त्याच्या कुटुंबामधलं अंतरही नकळत वाढत गेलं.

कालांतराने राघव आईला शहरात घेऊन आला. गावाकडची शेती विकली. घर मात्र विकले नाही.

••••

दरम्यान आरवने पुण्यात कृषी शिक्षण घेतलं. पदवी घेतली आणि तो गावाकडे परतला.

गावकऱ्यांनी विचारलं, “अरे आरव, एवढं शिकून पुन्हा गावात?”

आरव हसला, “हो. कारण पदवी पुण्यात घेतली, पण माझ्या पोटाची भूक गावातच भागेल हे मला माहिती आहे.”

त्याने आधुनिक पद्धतीने शेती सुरू केली. ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती, फळबाग, प्रक्रिया उद्योग. हळूहळू त्याने गावात छोटं कृषी केंद्र उभं केलं.

गावातील तरुण त्याच्याकडे येऊ लागले आणि विचारू लागले:

“आरव, यात खरंच पैसा आहे का?”

"तू शेती का करतोस?”

आरव हसत म्हणायचा,“पैशासाठी करतो. पण फक्त पैशासाठी नाही.”

••••

दहा-पंधरा वर्षांत राघव एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर पोहोचला. त्याच्या केबिनच्या बाहेर त्याचं नाव चमकत होतं.

“RAGHAV — VICE PRESIDENT”

त्याच्या अनेक अमेरिकन दौऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर झळकले. न्यूयॉर्क. सॅन फ्रान्सिस्को. महागडी हॉटेल्स. बिझनेस क्लास.

पण त्या फोटोंच्या बाहेर एक वेगळीच कथा होती.

घरी मुलगा म्हणत होता, “बाबा, माझ्या स्कूलमध्ये आज Annual Day आहे.”
“बेटा, बाबांची महत्त्वाची मीटिंग आहे. पुढच्या वेळी नक्की.”

मुलगी म्हणत होती, "माझे आर्ट एक्झिबिशन आहे! बघायला या!"
"सॉरी, बेटा. अर्जंट कस्टमर डिलिव्हरी आहे!"

पत्नी म्हणायची, “आपण सगळे चार दिवस कुठेतरी फिरायला जाऊया.”
“नक्की. हा प्रोजेक्ट संपला की मग.”

कालांतराने राघवच्या आईला आजार होऊन ती निधन पावली. त्यावेळेला सुरुवातीला राघव काही काळ न्यूयॉर्क मध्ये होता. आईच्या शेवटच्या दिवसात तो घरी परतला होता.

••••

नंतर काळ पटापट आपले पंख उडवत पुढे पुढे उडत राहिला. त्याने राघवला उचलून आपल्या पाठीवर बसवून पन्नाशीच्या उंबरठ्यावर धाडकन आणून सोडले.

तिथे राघवला पहिला मोठा धक्का बसला.

किंबहुना... अनेक धक्के बसले!

ब्लड प्रेशर. नंतर डायबेटीस. मग कोलेस्ट्रॉल. पाठदुखी. झोप न लागणे. ताण. एकामागे एक या सगळ्या गोष्टी त्याच्या मानगुटीवर येऊन बसल्या.

डॉक्टरने एक दिवस रिपोर्ट हातात देत विचारलं, “तुम्ही किती तास काम करता?”

"तेरा चौदा किंवा जास्त!"

“व्यायाम?”

“वेळ मिळाला तर.”

“झोप?”

“चार किंवा सहा तास.”

डॉक्टर म्हणाले,“तुमच्या शरीराने resignation letter दिलंय. पण तुम्ही accept करत नाही आहात!”

राघव हसला, “डॉक्टर, माझं शरीर इतकं easily resign होणार नाही.”

डॉक्टर गंभीर झाले, “शरीराला HR नसतो राघव साहेब. Notice period ही नसतो.”

राघवचा हसरा चेहरा शांत झाला. पुढच्या काही वर्षांत त्याने जे कमावलं होतं त्याचा मोठा भाग हॉस्पिटलमध्ये जाऊ लागला. एका रात्री हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये तो एकटाच बसला होता. समोर बिलाचा कागद होता. रक्कम मोठी होती. रक्कम एकवेळ जाऊ द्या, पण शरीराचे न भरून निघणारे नुकसान झाले होते.

राघवने कागदाकडे पाहिलं.

मग स्वतःशीच पुटपुटला, “आयुष्यभर पैसे कमावले… आणि आता पैसे देऊन आयुष्य विकत घ्यायची वेळ आली.”

••••

काही महिन्यांनी गावातील जुन्या मित्रांचे गेट-टुगेदर ठरले. राघव बर्‍याच वर्षांनी गावात आला. गाव तसंच होतं. पण राघव बदलला होता. पूर्वी ज्याला गाव छोटं वाटायचं, त्याला आता गाव विलक्षण मोठं वाटत होतं. हवेचा सुगंध मोठा. आकाश मोठं. माणसांची मनं मोठी.

आणि वेळ? भरपूर!

गेट-टुगेदरमध्ये आरव आला. दोघांनी एकमेकांना पाहिलं. क्षणभर दोघे काहीच बोलले नाहीत.

मग आरव म्हणाला,“काय रे अमेरिकेच्या विमानात बसणाऱ्या माणसा… गावची बस पकडायला भीती वाटते का? का लाज वाटते?”

राघव हसला, “नाही रे. काय मस्करी करतोस. बरं मला सांग, इतक्या वर्षात तुझी शेती किती वाढली?”

आरव म्हणाला, “ती वाढतेय.”

“आणि तुझं बँक बॅलन्स?”

“ते कमी-जास्त होत राहतं.”

“माझं बँक बॅलन्स खूप वाढलं.”

आरव शांतपणे म्हणाला, “हो. पण तुझं आयुष्य?”

राघवचा चेहरा गंभीर झाला, “त्याचा बॅलन्स शीट कधी काढलाच नाही रे.”

राघवने थोडक्यात त्याला आपली सर्व कहाणी सांगितली.

दोघे गावाबाहेरच्या माळावर चालत गेले. राघवने दूरवर हिरवीगार शेती पाहिली.

“हे सगळं तुझं?”

“काही माझं. काही लोकांचं. काही निसर्गाचं.”

“तू अजूनही एवढा तत्त्वज्ञानी आहेस?”

आरव हसला, “तू अजूनही एवढा कॉर्पोरेट आहेस?”

राघवही हसला, “कॉर्पोरेट काय असतं माहितीय?”

“नाही.”

“जिथे पाच जण एका टेबलावर बसतात आणि सहावा माणूस त्यांचं काम एक्सेलमध्ये मोजतो.”

आरव खळखळून हसला.

“आणि शेती?”, राघवने विचारलं.

“जिथे शेतकरी काम करतो आणि निसर्ग त्याचं performance appraisal करतो.”

दोघे पुन्हा हसले.

मग आरव अचानक म्हणाला, “पण एक सांग… तू आनंदी आहेस?”

राघवने उत्तर देण्याआधी बराच वेळ घेतला.

“माहित नाही.”

“का?”

“माझ्याकडे सगळं आहे… पण जे हवं होतं ते आहे की नाही, हे कधी तपासलंच नाही. आयुष्यभर ही सगळी धावपळ नेमकी कशासाठी केली हेच मला आता कळत नाही आहे."

आरव शांत राहिला.

राघव पुढे म्हणाला, “मी मुलांसाठी कमावलं. पण त्यांच्या बालपणात मी कुठेच नव्हतो. पोरं लहानाचे कधी मोठी झाली ते कळलेच नाही.”

तो थांबला.

“आईला गाव सोडून शहरात आणलं. पण तिच्या शेवटच्या दिवसांत तिच्यासोबत किती वेळ होतो? फारच कमी.”

हे सांगताना त्याचा आवाज भरून आला.

“मी करोडो किमतीचा मोठा बंगला घेतला… पण घरात राहिलो किती? फार कमी. सगळा वेळ ऑफिसातच घालवला”

आरवने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

“राघव…”

राघवने डोळे पुसले.

“मी जग जिंकलं म्हणत होतो रे… पण स्वतःचं आयुष्य हरवत गेलो.”

••••

दुसऱ्या दिवशी सकाळी राघव आरवच्या शेतावर आला.

आरवने विचारलं, “काय झालं?”

“मला तुझ्याकडे काम पाहिजे.”

आरव दचकला, “काय?”

“हो. नोकरी नाही. काम.”

“कशासाठी?”

“माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत. पण आता मला मनसोक्त जगायचं आहे.”

आरव काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला.

“गावात येऊन राहशील?”

“हो.”

“काय करणार?”

“माहित नाही.”

“मग?”

राघव हसला.

“तू मला शेती शिकव.”

आरव म्हणाला, “तुला माती हाताला लागली की, ऍलर्जी होईल.”

राघवने चप्पल काढून बाजूला फेकली आणि मातीवर अनवाणी उभा राहिला.

“वीस वर्षं मी काचेवर चाललोय रे… आता थोडी माती लागली तर चालेल.”

आरवच्या डोळ्यांत पाणी आलं.

••••

राघवने शहर सोडलं. मुलं शिक्षणासाठी शहरातच राहिली. पत्नी आणि मुलांनी मिळून मुलांचे करिअर काय करायचे याचा पूर्ण निर्णय त्याने मुलांवर सोपवला.

पत्नीने विचारलं, “खरंच गावात राहणार?”

राघव म्हणाला, “हो.”

“मग आम्ही?”

“तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे. पण आता मी तुमच्यासाठी पूर्ण उपलब्ध असेन. तुम्हाला वेळ देईन. जाऊन येऊन असेल. तुम्हीही गावाकडे जाऊन येऊन रहा."

मुलाने फोनवर विचारलं, “बाबा, तुम्ही गावात काय करणार?”

राघव हसला, “तुमच्या बाबांचा पहिला प्रोजेक्ट — स्वतःचं आयुष्य पुन्हा उभं करणं.”

“आणि कंपनी?”

“कंपनीत माझी जागा दुसरा कुणी माणूस घेईल. त्यांना काही फरक पडत नाही. कंपनीत आपली जागा घ्यायला भरपूर लोक असतात या अफाट जगात!"

••••

आरवचे दोन मुलगे. त्यापैकी वीर हा कृषी अभियांत्रिकी शिकून गावातच परतला होता आणि त्याने आरवच्या कृषी केंद्राला आधुनिक तंत्रज्ञान (सोलर पंप, ड्रोन सर्वे, प्रोसेसिंग युनिट) जोडले. आता तो छोटे स्टार्टअप चालवतो आणि गावातील तरुणांना प्रशिक्षण देतो.

आणि दुसरा मुलगा स्वराज, याने अन्न प्रक्रिया आणि मार्केटिंग शिकून पुण्या-मुंबईत थोडा काळ काम केले, पण नंतर गावात परतून सेंद्रिय फळे, मसाले आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची ब्रँडिंग व ऑनलाइन विक्री सुरू केली.

तो शहरात विक्रीचे जाळे विस्तारतो, पण राहतो गावातच.

••••

काही महिन्यांनी…

एका सकाळी आरवने राघवला शेतात पाहिलं.

डोक्यावर टोपी.

अंगावर साधा शर्ट.

पायात चिखल.

हातात रोप.

आरव म्हणाला,“काय, Vice President साहेब?”

राघव म्हणाला, “Former Vice President.”

“आता?”

राघवने रोप मातीमध्ये लावत उत्तर दिलं, “Vice President नाही… Village President!”

दोघेही खळाळून हसले.

राघवने माती हातात घेतली, डोळे मिटले आणि मातीचा सुगंध घेतला, “ही माती इतकी वर्षं माझी वाट पाहत होती का रे?”

आरव हसला, “माती कोणाची वाट पाहत नाही राघवा. आपणच तिच्याकडे परतायला उशीर करतो.”

राघवने दूरवर पाहिलं. उगवता सूर्य, हिरवी शेती आणि पाखरांचा आवाज.

संध्याकाळी दोघे गावच्या जुन्या विहिरीजवळ बसले होते.

जिथे कधीकाळी राघवने अमेरिकेची स्वप्नं पाहिली होती.

राघव म्हणाला,“आरव, त्या दिवशी तू मला विचारलं होतंस ना—‘सुख कुठे मिळतं याचा पत्ता आहे का?’”

“हो.”

“तेव्हा मला वाटलं होतं, सुखाचा पत्ता न्यूयॉर्क, मुंबई किंवा पुणे असेल.”

आरव हसला.

“आता?”

राघवने समोरच्या मातीच्या घराकडे पाहिलं.

“आता कळलं…”

तो थांबला.

“सुखाला पत्ता नसतो. पण त्याला मातीचा सुगंध असतो, आपल्या माणसांचा आवाज असतो आणि मनाला मिळालेली शांतता असते.”

आरवने हात पुढे केला. राघवने त्याचा हात घट्ट धरला.

दोन मित्र. दोन वाटा. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा एकच रस्ता. मातीचा!!

••••

राघव गावात स्थायिक झाल्यानंतर काही महिन्यांनी त्याचा मोठा मुलगा आदित्य शहरातून गावात आला. लहान मुलगी मात्र करिअरसाठी शहरात राहिली.

आदित्य बाबांना म्हणाला: “बाबा, मी शहरात राहून तुमच्यासारखं ‘मोठं’ होण्याचा प्रयत्न करतोय. पण मला कळलं की, तुम्ही जे हरवून बसला होतात, तेच मी आता शोधत आहे. तुम्ही वीस वर्षं काचेच्या ऑफिसात चाललात आणि शेवटी मातीकडे परतलात. मी आताच मातीकडे येतो, म्हणजे मला नंतर मातीची वाट पाहण्याची गरज पडणार नाही!"
(समाप्त)

लेखक: निमिष सोनार, पुणे
(अर्थ मराठी 2026 दिवाळी अंकात छापून आलेली कथा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users