रामायण आणि अनुषंग - संयुक्त धागा

Submitted by अस्मिता. on 8 November, 2026 - 16:19

खूप लांब झाल्याने स्वतंत्र धागा काढला. संयुक्त धागा आहे, कुणालाही काहीही लिहावं वाटलं तर आवर्जून लिहा.‌ फक्त चित्रपटच नाही तर रामायणाच्या अनुषंगाने असलेली सगळी माहिती, चर्चा, गंमत व चित्रपटावरील अभिप्राय इथे चालतीलच. अवांतराचे सुद्धा स्वागत आहे. गडबडीत पटकन लिहून टाकलेय. सांभाळून घ्या ! स्पॉयलर्स आहेत थोडेफार.
---------
रामायण - रणबीर कपूर (राम), साई पल्लवी (सीता), यश (रावण), रवी दुबे ( लक्ष्मण), अरूण गोविल ( दशरथ), आदिनाथ कोठारे (भरत), लारा दत्ता ( कैकयी), रकुल प्रीत (शूर्पनखा) , विवेक ओबेरॉय (विद्युतजीव- माझ्या माहितीप्रमाणे विद्युतजिव्हा होते शूर्पनखेच्या नवऱ्याचं नाव) , अजिंक्य देव (विश्वामित्र) , शीबा चड्ढा (मंथरा), सौरभ सचदेव ( मारीच) , काजल अगरवाल (मंदोदरी), फैजल मलिक (कुंभकर्ण). हा पंचायत मधला प्रल्हाद. शोभना पिल्लै (केकसी)

मला "रामायण" आवडला. कुठेही कंटाळवाणा होत नाही. मुलांना सुद्धा आवडला. खूप मजा आली आणि व्हिएफएक्स उत्तम आहेत म्हंटले. रिअल डी थ्री डी मधे पाहिला. सगळ्यात कमाल म्हणजे तगडे मार्केटिंग - आमच्या घराजवळच असणाऱ्या एएमसी मधे आला. तेथे कधीही कुठलाही भारतीय चित्रपट येत नाही कारण आमच्याकडे अजिबात डायव्हर्सिटी नाही. त्यामुळे फारच बरं वाटलं. त्यामुळे तर आवर्जून लगेच गेलो. तीन तास दहा मिनिटांचा रनटाईम आहे. चार तासांचाच कार्यक्रम झाला.

कथा तर सर्वांनाच माहीत असणारीच आहे पण तरीही काही गोष्टी उकरून नवीन जोडल्या आहेत. सुरवात एरवी श्रावण बाळाच्या गोष्टी पासून होते. तो शाप मग दशरथाला आशा आणि पुत्रकामेष्टी यज्ञ आणि चार मुलं. पण यांनी मुद्दाम ते सगळं टाळलं आहे व रावणाचे पूर्वायुष्य दाखवलं आहे. जे मला माहिती होते पण त्याला एक साऊथ इंडियन छाप दिला आहे. त्यात बऱ्याच चुका आहेत. माझ्या माहितीप्रमाणे तुलना केली तर काही गोष्टी उगाच वाढवल्या आहेत किंवा फक्त फिल्मी करण्यासाठी वेगळ्या दिशेने नेल्या आहेत. सुरवातीला रावणाला खूप, खूप फुटेज आहे. खरंतर रावणावर एक तास झाल्यावर मग राम येतो म्हंटले तरी चालेल. मलाही रावणायन वाटलं बऱ्यापैकी. थोडा कंटाळा आला तेव्हा आणि रामाची "पल पल है भारी वो विपदा है" आयी करत वाट पाहू लागले. थ्रीडी मुळे आणि राक्षस पाताळात राहात असल्याने थोडा अंधार वाटत होता पडद्यावर. किंवा पहाटेच्या अंधुक प्रकाशात केलेलं चित्रिकरण कसं दिसेल तसं दिसत होते. पण हे थ्री डी लव्हर्सना आवडतही असेल. मी ओल्ड स्कुल आहे एकदम, आहे त्याच खुर्चीवर आपलं सरळ सरळ दाखवा काही उडायबिडायचा- अंगात येऊन घुसायचा अनुभव नको. जास्त स्टिम्युलेशन सोसवत नाही गटात. तुम्ही जर चांगली कलाकृती केली असेल तर आम्हाला उडवायची, घुसवायची गरज नाही, जशी आहे तशी अनुभूतीही पोचू शकते. शिवाय देहबोली - आता हे थ्री डी मुळे की काय मला बऱ्यापैकी फ्रोजन वाटली काही जणांची. शेखर सुमनचे जुने मुव्हर्स ॲंड शेकर्समधे चेहरा लालूचा लावून ओठ तोच हलवून बोलायचा त्याची आठवण झाली. पण सगळ्यांची नाही अर्थात. दशरथ, दोन राण्या आणि ऋषी मुनी. बेसिकली ज्येना. Lol ज्येना हलत नव्हते पण बोलत होते. घरी ते दारी!

आधीचे रावणायन व त्यावर सौदिंडियन छाप - यासाठी रावणमाता केकसी हिने असुरांच्या वतीने युद्धात भाग घेतला होता व इंद्राला विष्णूचे वरदान असल्याने तो विजेता झाला व असुरांचा पराभव झाला. यातली एक नॅक - रावण राक्षस होता का असुर होता? दोन्ही वेगवेगळे आहेत. असुर हे सुरांचेच चुलत भाऊ व राक्षस पृथ्वीवर राहणारे होते. ह्याची मलाही खात्री नाही. पण दितीचे दैत्य, दनुचे दानव, अदितीचा आदित्य, विनितेचे वैनतेय गरूड. यात नेहमी फक्त सुरा पिणारे सुर ( देवता) व न पिणारे ते असुर असेही वाचले आहे. ज्यात राक्षस कुठेच नाहीत. कारण ते पृथ्वीवासी होते नेहमीच. त्यामुळे मला ह्या युद्धाचा प्रपंच नीट कळाला नाही. त्यात केकसी राक्षस वंशाची व रावणाचे वडील पुलस्त्य वंशी ऋषी. त्यामुळे रावण अर्धा राक्षस - अर्धा ब्राह्मण. इथे त्याच्या वडिलांचा लवलेशही दाखवला नाही पण सतत जाणवं घातलेलं मात्र दाखवलं आहे. पण एवढं आवर्जून म्हंटले आहे की बिभिषण पित्यावर गेला आहे, कुंभकर्ण आणि शुर्पनखा आजोळवर आणि रावण मात्र "बेस्ट ऑफ बोद वर्ल्ड्स" असल्याने बळ आणि बुद्धी दोन्ही त्याच्या ठायी जन्मजात आहे.

अगदी सुरुवातीला केकसी आणि असुर गट यांचा दणदणीत पराभव होऊन इंद्र जिंकून घेतो आणि लंका कुबेराची असते तेथे पाताळात या पिडीत राक्षसांना राहावे लागते व तेथे त्यांची अन्नान दशा होते. मग केकसी रावणाला उचकावते, तू यांना याच्या बाहेर काढ. तू जर हे तुणतुणं वाजवत बसलास तर आमचं काय होणार. (वीणा)

येथे पूर्ण साऊथ इंडियन छापाची दुर्दशा व तारणहाराची वाट पाहणारी प्रजा. वर लंका कुबेराची म्हणून देव असुरांवर वाटेल तसा अन्याय करत आहेत असे दाखवण्यासाठी खूप वेळ घालवला आहे. मग रावण तपश्चर्या करायला निघून जातो व सगळे लूपहोल ताडून जवळपास अमरत्वाचे वरदान मागतो. परत आल्यावर त्याचा रजनीकांत झालेला असतो तो दे दणादण- दे दणादण देवांना एकटाच मारायला सुरुवात करतो. देवांचे ढीगच्या ढीग! एवढे तर एखाद्याच्या देवघरातही नसतील. चक्क साऊथ इंडियन स्टाईलने मां का कर्ज+ बदला= देवांचे ढीग. पण कुबेर पळून जातो कारण देव तर मरत नाहीत. इथे लूपहोल - लंका पार्वतीसाठी महादेवाने घडवली, नंतर कुबेराने मागितली तर भोळ्या सांबाने त्याला दिली आणि कुबेर रावणाचा सावत्र भाऊ होता. ह्याचा उल्लेखच नाही. रावणाने लंका त्याला मागितली व त्याने देऊन टाकली होती. त्यामुळे तर दागिने न ल्यालेल्या स्त्रियांसाठी "लंकेची पार्वती" ही म्हण आहे. कारण मुळात सोन्याची लंका पार्वतीची होती पण तिला मिळालीच नाही. हे "रजनीकांतीकरण" विनाकारण होते. कुठल्यातरी व्हर्जन मधे हे होते असे म्हणून काहीही खोडून काढता येते, कसेही वाढवता येते हाच पौराणिक कथांचा फायदा आहे.

पण हिरो लार्जर दॅन लाईफ दाखवायला आधी व्हिलनला त्याहीपेक्षा खौफनाक दाखवायची नेहमीची क्लृप्ती रामायणासाठी अनावश्यक होती. राम लोकांच्या जनमानसात आद्यनायक आहे, मर्यादापुरुषोत्तम आहे. त्यामुळे रावणही आपोआपच आद्यखलनायक होताच. असो. क्रिएटिव्ह लिबर्टी. ती बोअरिंग नाही मात्र. त्यांनी ती रंजक- वेधकच केली आहे.

जटायू लहानपणापासून रामाच्या आयुष्याचा भाग होता हे एक नवीन. तो नेहमीच अयोध्येला हॅंग आऊट करताना दिसला. त्याचं रामावर जातीने लक्ष होतं. एवढंच काय तो चोचीतून घंटा सोडायचा, त्या राम डोळ्यांवर पट्टी बांधून लक्षवेधी बाणाने मारून टणत्कार घुमवायचा. ऐकावे ते नवलच! रावणाला फुटेज दिल्याने राम वसिष्ठांच्या आश्रमात जे शिकला ते फारच कमी दाखवून पुन्हा जटायूला "घंटा ट्यूटर" केले आहे.

हे सगळे बघायला चांगलेच वाटावं असे व्हिज्युअल्स ठायी ठायी आहेत फक्त मलाच आवर्जून लिहावं वाटलं. कैकयीच्या रोलमधे लारा दत्ता आवडली, मस्त काम केले आहे.अरुण गोविलही बरा वाटला, त्याला विशेष कामच नाही. हेही पथ्यावर पडले.

अजिंक्य देव विश्वामित्र म्हणून खूप मस्त सरप्राइज होतं आणि त्याचं कामही छान आहे आणि तो दिसलाही छान. सिक्स पॅक, उंचे पुरे मादक ऋषी पाहायची सवयच नव्हती. शीबा चड्ढा अगदी पर्फेक्ट मंथरा आहे. मला तिचं काम नेहमीच आवडतं. रादर मला सगळी कास्टिंग पर्फेक्ट वाटली.‌ साई पल्लवी खटकली नाही , चालून गेली. इथे सीतेला तलवार चालवताना व अभ्यास करताना शिवाय शेतीचे प्रशिक्षण देताना दाखवलं आहे. आणि काही वेळा ती लढतानाही दाखवली आहे. पण एवढी शांत, विचारी असूनही सुवर्ममृगाचा एक मोहाचा क्षण आणि कैकयीचा एक दुस्वासाचा क्षण, त्यांना त्यांच्या स्वभावाच्या विपरीत वागायला भाग पडतो. सौरभ सचदेव एकदम मारिचासारखाच छद्मी वाटतो, फार संवाद नाहीत तरीही लक्षात राहातो.

रावणाचे कमळासारखे फिरणारे पुष्पक, ग्रहताऱ्यांसाठी केलेली यंत्रणा फार वेगाने दाखवली आहे. शिवाय इंद्राचा एआय ऐरावत व गेंड्यांवरून असुरांनी केलेलं युद्ध जरा कैच्याकै वाटले. गेंड्यांना झूल पांघरली तरी त्याचा युद्धात वापर केला जात असेल?! एआय सिजिआय वापरता येते म्हणून उद्या डायनासोर घेतील पण झेपायला हवं.

खरदुषण सोबतच्या युद्धात कुत्री जी हाईना सारखी वाटतात ते पाहायला बरं वाटलं. सीता बुद्धिमान दाखवली आहे, ती लक्ष्मणाचा वास ह्या कुईनांना ( कुत्री+ हाईना) लक्षात राहू नये म्हणून जखम पाण्याने धुवून काढते. नंतर उपचार करते. तिचं बुद्धिमान असणं फार वरवरचंच दाखवलं आहे पण "नहीं मामुसे नकटा मामु अच्छा!"

रणबीर कपूर मला नेहमीच आवडतो, यातही आवडला आहे. यापेक्षा जास्त चांगले कोणी दिसलेही असते आणि वयही जास्त आहे पण त्याचा वावर आणि काम दोन्ही आवडले. त्याचा आवाज आणि देहबोली अजिबात चंचल न वाटता कुठेतरी सतत स्थितप्रज्ञ आणि विचारी वाटते. एखादं माणूस एकाच वेळी व्हल्नरेबल आणि कणखर दोन्ही असणं - सुपरपावर नसूनही ईश्वर होत जाणं हे रामाचं मर्यादापुरुषोत्तम असणं होय. तो जास्तीत जास्त माणूसच वाटायला हवा. तसा हा वाटला आहे. त्याचे संवादही चांगले आहेत. त्याचे व सीतेचे मोजकेच संवाद आहेत , तरीही कंफर्टेबल वाटतात. लक्ष्मणाचे काम चांगले आहे, विनोदी केले आहे. पण फक्त ताण हलका करण्याइतपत विनोदी वाटेल इतकेच. गोड चेहरा आहे त्याचाही.

विवाहाच्या वेळी खूप सुंदर वाटतं पाहायला पण दागदागिने मला आवडले नाहीत. काही वेगळेपणा नाही. अयोध्येचे, मिथिलेचे आणि लंकेचे लोक सारखेच दागिने घालतात असं वाटलं. जे शक्य नाही. कपडेपट वेगळा आहे पण दागदागिन्यांत वैविध्य दिसलं नाही. मला रणबीरची धनुर्विद्या/ ती देहबोली आवडली. बाण मारणारे काही शॉट्स जमून आलेत. आर्चरीचे ट्रेनिंग घेतलं असावं त्याने.

चित्रिकरण छान आहे. काही ठिकाणी अतिशय सुंदर दृश्य आहेत. काही ठिकाणी मात्र खोटं वाटतं, जसं की ताडका, खर, दुषण, कुंभकर्ण हे सिजिआय असल्याने उगाच अवाढव्य आणि लिबलिबीत शरीराचे मांसाचे गोळे वाटतात. हॅग्रीडचे मावस भाऊ केल्यासारखे वाटले पण चेहरा तरी जिवंत द्यायचा असता. ट्रोल टाईप चेहरे आहेत.

संगीत - पार्श्वभूमीवर जे येते ते सुरेख आहे. कुठे घंटेची किणकिण, नदीचा प्रवाह, मंत्रांचे ध्वनी, शांतेतेचे नाद, पक्ष्यांचा किलबिलाट, रथांची चाकं , टणत्कार वगैरे उत्तम. मला "मंगल रंग" गाणं खूप आवडलं. त्यात काही तरी"अवधी" आहे. अजिबात कव्वाली सारखे वाटले नाही. जसं असायला हवं तसंच आहे. गुणगुणत राहावं असं आहे.

रावणाचे काम चांगले आहेच आणि अपेक्षेपेक्षा जास्त आव्हानात्मक आहे. खूप छटा आहेत. स्वतःच्या बहिणीवरच्या प्रेमापासून तिच्या नवऱ्याला मारण्यापर्यंत. बऱ्याचदा विधिनिषेध राहात नाही, दोन मनांमधे संवाद होऊन अहंकारी मन तेवढं जिंकते. दशबुद्धी दशानन रावण कसा दहापट बुद्धी असलेला होता वगैरे विषादाच्या रूपाने येऊन जातं. पण अजून "डेफ्थ" येऊ शकली असती याला. VFX खूप कमी ठिकाणी खटकले असं वाटलं. त्यापैकी इथे अगदी योग्य वापर झाला आहे. दहा तोंडे, दहा शरीरं आणि दहा विचार. मग त्यात सगळ्याच भावना येऊन अहंकाराचाच विजय होतो. कल्पक वाटलं.

मी बऱ्याच त्रुटी लिहिल्या आहेत पण चित्रपट मला आवडला आहे. रंजक आणि एंगेजिंग आहे. कामं चांगली आहेत. काही गोष्टी अतिशय जलद वाटतात. उगाच फापटपसारा नाही पण काही गोष्टींवर खूप वेळ घालवून काही तरी नवं द्यायचा प्रयत्न केला आहे. मी एन्जॉय केला सिनेमा. राम-रावण हा विषय कोळून प्यायलेला आहे त्यामुळे खरेतर एंगेजिंग करणं चॅलेंजिंग असेलही आणि आदिपुरूषचा धसका घेतलेले प्रेक्षकही आहेत. पण तरीही मजा आणतो सिनेमा. रामायण - महाभारत म्हणजे आपली पाळेमुळे - ज्यावर आपली नीतीमुल्ये सुद्धा कुठेतरी पोसलेली आहेत त्यामुळे यावेळी तेच महाकाव्य कशा नव्या स्वरूपात आलं असेल हे पाहण्याची उत्सुकता होती आणि मजाही आली. मी एक "प्लेटो" आलेला प्रेक्षक आहे, मी सगळ्याला समान दृष्टीने पाहायचा निदान प्रयत्न करते. मला होमरचे ओडिसी आणि वाल्मिकीचे रामायण सगळेच कुठंतरी मेटॉफॉरिकल काव्य होते हे माहीत आहे आणि प्रत्येक जण अनादी काळापासून आपापल्या परीने त्या काव्याचे वेगवेगळे अनोखे अर्थ लावत आहे. कथा तशी सरळसोटच असली तरी अर्थ अनेक निघू शकणे हीच कुठल्याही काव्यामागची गंमत असते. खूप अपेक्षा न ठेवता ती गंमत जाणून घ्यायला पाहायचा असेल तर नक्की पाहा. Happy

-अस्मिता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे काय दोनदा नाहीच जन्मले न >> तो काय आमचा जीझस आहे का दोनदा जन्मायला! Wink स्पार्कलला धाग्याचं वळण बदलायचं असेल तर सोय करुन देतो! Wink Lol

>> कारण हनुमान जन्मला त्या कथेत हेच पायस घारीने टू गो केले व अंजनीला दिले म्हणे <<

पायस तर बरेच म्हणायचे.
पण एका हाताने पर्वत धरून उडत असताना समुद्रात हनुमानाचा घाम पडतो तो एक मगर गिळते, मग तिला मकरध्वज नावाचा मुलगा होता.
=====

या दोन ओळींच्या स्टोरीत संपूर्ण बायलोजी, इकॉलॉजी, इव्होल्युशन सगळ्याची अक्षम्य आणि उत्तुंग वाट लावली आहे. सलाम आहे त्या कल्पनाशक्तीला. मूळ टेक्स्ट मध्ये इतके फ्रिडम आणि कल्पना लढवल्या असतील तर आपले लोक हे असलं संस्कृती संस्कृती काय करत असतात येड्यागत?

घाम पडला तुम्हा लोकांना पचवायला! लेखक काय इतके येडे होते काय घाम पडला लिहायला!
तुकारामांची गाथा इंग्रज होते म्हणून बर्‍यापैकी मूळ शब्दांत राहिली. आपण संस्करणे करुन त्याला बोथट केलेच आहे.

ते घामच आहे. नाहीतर दुसरे काहीही हनुमानाच्या मूळ वृत्तीला ( (ब्रह्मचर्य) विसंगत आहे. पर्वत घेऊन एका हाताने उडता उडता कष्ट होऊन घाम येणे सयुक्तिक वाटते.

घाम येणे संयुक्तित आहे आणि विसंगत नाही, आणि बाकीचे सगळे जे विसंगत आहे त्यात मात्र उत्तुंग कल्पनाशक्ती! Rofl
तसंही ब्रह्मचर्य एकदा का चिकटलं की काय अशक्य नाही! मग घामच असेल! Lol
बाकी उडताना वरती वारा असेल ना? का वायुपुत्राला घाम वाळवायला वारा ही मिळेना? Wink Lol

घाम असो वा "पायस" मगरीपासून प्रजोत्पादन कसे होईल. कितीही कोडवर्डेड करा. ही गोष्ट माहीत आहे पण कळाली नाही किंवा आताच्या भाषेत सुद्धा ॲनलाईझ करता येत नाही.

पण मला अशा आणि सत्यवती पराशर किंवा विश्वामित्र मेनका वगैरे अनेक कथा वाचून पुराणाचे खरे खोटे जरी सोडून दिले तरी ज्या कल्चर मधे अशा कथा प्रचलित आहेत ते किती पुढारलेले असेल असे वाटते. सेक्शुअली मॉडर्न वाटतात.

सेक्शुअली मॉडर्न >> मॉडर्न नाही, रानटी ना? रानटी प्रथा आहेत ना या?
आता आपल्याला अती झाल्याने त्याचा उबग येऊन कायतरी व्हरायटी म्हणून हे मॉडर्न वाटतं असंच आहे ना?

काही वेळा मॉडर्न, काही वेळा सॅवेज. पण आताच्या तुलनेत तो काळ सेक्शुअली वेगळाच वाटतो. बरेचदा मागासलेला नाही वाटत, पुढारलेला वाटतो. आता काही कळायचा मार्ग नाही आणि गोष्टीच आहेत.

चॉईस असणे हे फक्त माझ्या मते महत्त्वाचे आहे. तो सिलेक्टिव्ह होता. अंबा, अंबिका, अंबालिका, सीता, कौसल्या, सुमित्रा, कैकयी, द्रौपदी कुणाला चॉईस न्हवता. किंवा फार सिलेक्टिव होता. कुंतीला होता किंवा तिने घेतला वगैरे ठीक आहे. गांधारीला चॉईस न्हवता. उर्मिलेला न्हवता.
मला काही तो काळ पुढारलेला वगैरे वाटत नाही. अती मागासच वाटतो. आपलंच बरं चाललंय! Lol

तो मकरध्वज मुळ वाल्मिकी रामायणात आहे की नाही ते शोधायला हवे आधी. यशोदीप देवधर हे गृहस्थ वाल्मिकी रामायणाची ओळख व्हावी म्हणून २१ नोट्स ह्या युट्यूब चॅनल वर ऍनिमेशन+नॅरेशन ह्या फॉर्म मध्ये रामायणाची गोष्ट सांगतात. खुप सुंदर चॅनल आहे. त्यांचे एक दोन पॉडकास्ट पण मी ऐकले. त्यांच्या म्हणण्यानुसार मुळ वाल्मिकी रामायणात राम देव नाही एक आदर्श पुरुष आहे, इतका थोर आहे की ज्याचे चरीत्र पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक होईल म्हणून तुम्ही ते लिहा अशी विनंती नारद वाल्मिकींना करतात आणि म्हणुन रामायण लिहिले गेले. त्यांच्या चॅनल आणि मुलाखतीतून खालील गोष्टी समजल्या.

(१) वाल्मिकी रामायणात अहिल्येचा उद्धार नाही कारण ती शीळाच नाही, हाडामासाची स्त्री आहे, तिला इंद्र म्हणजे गौतम ऋषी नाहीत हे कळले होते तरीही तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हे कळल्यावर गौतम ऋषीं सर्व शिष्य परिवारासह हिमालयात निघून गेले. तिला तिथेच ठेवून. तू तपश्चर्या कर आणि स्वतःच स्वतःच्या चुकीचे असेसमेंट कर असे सांगून. तिनेही ते केले. राम लक्ष्मण तिला भेटले तेव्हा ती बरीच वृद्ध होती. या वयोवृद्ध तपस्विनीला वंदन करा असे विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाला सांगितले आणि त्यांनी ते केले.

(२) मिथिलेत सीतेचे स्वयंवर नव्हते. विश्वामित्र धनुष्य दाखवायला अयोध्येत परतताना राम लक्ष्मणाला तिथे घेऊन गेले. तिथे त्यांनीच रामाला ते धनुष्य उचलून बघायला सांगितले. मुलगा चांगला आहे, केपेबल आहे हे लक्षात घेऊन जनकाने कोण कुठला म्हणून चवकशी केली आणि लग्न ठरवले. दशरथ आणि बाकी लोक आल्यावर उरलेली तीन लग्ने ठरली.
(३) लक्ष्मण रेषेचा प्रसंगच रामायणात नाही. म्हणजे अशी कुठली रेषा आखुन लक्ष्मण गेला नाही. मारीचाने हुबेहूब रामाचा आवाज काढला जो ऐकून सीता फसली पण लक्ष्मण नाही. तो जायला तयार नव्हता पण सीतेने त्याला अतीशय कठोर असे वाक्ताड्न केले जे त्याला सहन झाले नाही आणि तो गेला. तो गेल्यावर तिथेच लपून बसलेल्या रावणाने सीतेचे बळजबरीने म्हणजे उचलुन घेऊन हरण केले.
(४) जटायु, हनुमान आणि जांबुवंत हे तिघेही मनुष्य होते गिधाड, माकड किंवा अस्वल नाही. हे आपापल्या कम्युनिटी ची ओळख म्हणुन तसा ड्रेस करायचे. त्यामुळे मानवांना असलेल्या सगळ्या मर्यादा त्यांना होत्या. सीतेचा शोध घेण्यासाठी १०० योजने समुद्र ओलांडताना हनुमान उडी मारुन नाही तर पोहुन गेला.
(५) संपुर्ण उत्तर रामायण (रामाने सीतेचा त्याग करणे, लव आणि कुश ह्यांचा जन्म इ) प्रक्षिप्त आहे. राम, सीतेला घेऊन अयोध्येत परतल्यावर त्याचा राज्याभिषेक होतो. त्यानंतर वाल्मिकी ऋषींनी फलशृती लिहिली आहे! त्यांनी काही तज्ञांचे मत कोट केले की फलशृती पर्यंतची भाषा आणि त्यानंतरची भाषा (किंवा काव्यरचना) ह्यात जाणवण्याइतका फरक आहे.

पर्णीका
छान माहितीपूर्ण post आहे. यशोदीप देवधर ह्यांचा चॅनल बघायला पाहिजे.

घाम वगैरे तरी देखील ठीक आहे. कुठेतरी DNAचा संबंध आहे. पण मी वाचले आहे की काही वेळा केवळ "नजरेनच " "काम" करून टाकले. ख रे झोटे देव जाणे.

काल हा चित्रपट बघीतला. एकदा पहाण्यासारखा नक्कीच वाटला.

'यश' हा अभिनेता त्याच्या ओव्हर अ‍ॅक्टींगमुळे (त्याचे KGF १,२ सह आणखीन बरेच चित्रपट पाहूनही) मला कधीच आवडला नव्हता, पण ह्या चित्रपटात त्याने रावणाचा रोल जबरदस्त केला आहे (कदाचित तो ह्या चित्रपटाचा सह-निर्माता असल्याने व्यावसायिक गणिते सांभाळण्यासाठी आपल्या ओव्हर अ‍ॅक्टींगवर त्याने थोडे नियंत्रण ठेवले असावे, असे मानण्यास वाव आहे ).

बहुतांश चित्रपट CGI, VFX आणि AI Generated दृश्यांनीच भरलेला असल्यामुळे रामाच्या भूमिकेतल्या रणबीर कपूरला आपल्या अभिनयाची चुणूक वगैरे दाखवण्यासाठी काहीही स्कोप नाही. चेहऱ्यावर सतत तेच मेणचट भाव आणि संवादात तोच एकसुरी स्वर. त्याच्या जागी जुन्याकाळातला प्रदीपकुमार किंवा भारतभूषण सारखा एखादा 'ठोकळा' म्हणवला जाणारा अभिनेताही सहज खपुन गेला असता, इतका तो 'मोनोटोनस' रोल असल्यामुळे रणबीर चालून जाण्यासारखा वाटला. चित्रपट अगदी संपायला येताना जटायूच्या मृत्यूनंतर राम आणि लक्ष्मणाचा एक संवाद आहे, जिथे रणबीरला आपल्या अभिनयाची नाही पण किमान संवादफेकीच्या कौशल्याची चुणूक दाखवण्याची एकमेव संधी होती, पण तिथे ह्या साहेबांनी माती खाल्ली आहे. (तसे बघितले तर एक रावण आणि दुसरा लक्ष्मण सोडल्यास चित्रपटातल्या बाकी सर्वच व्यक्तिरेखा मोनोटोनसच आहेत.)

सीतेच्या पात्रासाठी केलेली साई पल्लवीची निवड ही कास्टिंग डायरेक्टरने केलेली एकमेव घोडचूक वाटली. रकुल प्रीतला सीतेच्या भूमिकेत आणि साई पल्लवीला शूर्पणखेचे भूमिकेत घेतले असते तर बहार आली असती असे वाटले. काजल अगरवालाला ह्या पहिल्या भागात काही रोलच नाही. नाही म्हणायला एक-दोन ओळींचे दोन-किंवा फारतर तीन संवाद तिच्या वाट्याला आले आहेत, बस्स...

चित्रपटात भरपूर कलाकार मंडळी हिंदीपेक्षा तेलगू, तामिळ चित्रपटसृष्टी गाजवणारी आहेत. विश्वामित्र ऋषींच्या भूमिकेत अजिंक्य देव, अगस्ती ऋषींच्या भूमिकेत मुकेश तिवारी आणि बिभीषणाच्या भूमिकेत हरीश उथमन (तेलगू/तामिळ चित्रपटांतला प्रसिद्ध चेहरा) मस्त शोभले आहेत. प्ण साई पल्लवीच्या जागी राकुल प्रीत किंवा मालविका शर्मा नक्कीच शोभून दिसल्या असत्या असे राहून राहून वाटते आहे.

बाकी टीका करण्यासारख्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत.... पण राम-सीता विवाह आणि एखाददोन प्रसंग प्रचंड संथ वाटले असले तरी एकंदरीत चित्रपट लांबीला मोठा आणि त्याकडून फार काही अपेक्षा नसूनही तो मनोरंजक वाटला ही जमेची बाजू आहे.

चित्रपटाचा दुसरा भाग २०२८ साली, म्हणजे, तब्बल दोन वर्षांनी येणार असल्याचे समजल्यावर मात्र घोर निराशा झाली.

टीप: पुढच्या रांगेतली एक महिला 'राम सीता आणि लक्ष्मण वनवासात जायला निघतात' त्या प्रसंगी आणि 'जटायूच्या मृत्यूप्रसंगी' हमसून हमसून रडत होती, त्यामुळे भावनाप्रधान लोकांनी हा चित्रपट पाहायला जाताना सोबत दोन-तीन हातरुमाल किंवा गेला बाजार काही टिश्यू पेपर बरोबर घेऊन जाणे श्रेयस्कर ठरेल Happy

Pages