“सुंदरता”
सुंदर, सुबक मूर्तीकडे किंवा रूपाकडे न्याहाळताना अस्तित्व विरघळत जाताना अनुभवणे म्हणजे भक्ती, प्रेम, लगाव की शांततेची सुरुवात! सुंदरता व्याख्येमध्ये कैद करण्याएवढी छोटी नाही आणि आकाशाच्या कवेत सामावेल एवढी क्षुद्र सुद्धा नाही.. सुंदरता मनाच्या पलीकडील आणि कदाचित या स्थूल आणि सूक्ष्माच्या जंजाळापलीकडील निस्सीम, अखंड, कालातीत अशी स्फूर्ती आहे.. हीच स्फूर्ती जी या विधात्याला या सृष्टी निर्माणासाठी कारणीभूत ठरली, हीच स्फूर्ती त्या मूर्त स्वरूपातील डोळ्यांमधील स्तब्धतेत गवसते.. अनुभव जरी बांधून ठेवता आला नाही तरी ती हृदयाच्या तळाशी रुजलेली भावना आणि त्यातील रोमांच उठविणारी संवेदना अवतीभवती नेहमी तरळत राहते… हीच सुंदरता आपल्याला तिच्यासारखे करून टाकते, उत्कटता भेट म्हणून आपला हिस्सा करून टाकते, सुंदरता नियमात राहत नाही तर ती स्वतः नियम होऊन जाते.. जगातील प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा ती पदोपदी जाणवू लागते, एखाद्या अशांत ठिकाणी गोंगाटातही जेव्हा समोर दिसणार्या ध्यानस्थ मूर्तीच्या निरामय स्वरूपाने आपल्याला अंतर्बाह्य उजळून टाकते, जेव्हा आपल्याआधी आपल्या येऊ घातलेल्या क्षणांचा ताबा घेऊन वावरू लागते तेव्हा त्या ओथंबून वाहणार्या बाप्पाच्या डोळ्यांतील आश्वासक शांततेचा श्रीगणेशा झालाच म्हणून समजा!
सुंदरता म्हणजे एक अखंड धागा जो अथ पासून इति पर्यंत राहणारा.. आपल्याआधीपासून आपल्यानंतरपर्यंत! नश्वरतेला आस्तिकतेने बांधणारा.. आणि शाश्वताला अमरत्वाशी जोडणारा… सुंदरता उलगडते ज्याची त्याला, ज्याच्या त्याच्या रीतीने.. ना तिची तर्हा आहे आणि ना तिची रीत!! ती ब्रह्मांडभर पसरलेली असंख्य कणांमध्ये विखुरलेली विभूती आहे जशी सागरकिनार्यावर पहुडलेली रेती.. अगदी सुटसुटीत अन तेवढीच घट्ट स्वतःमध्ये सामावून घेणारी विदुषी! सुंदरतेचा माग नाही घेता येत.. तर तिला शरण जावे लागते.. आपली किल्मिषं, जाळीजळमटं दूर सारून स्वतःचं क्षणभंगूर असणं एकदा उमजलं की जगरहाटीचे पापुद्रे झडायला सुरुवात होते आणि आपली आपल्याला नवी ओळख गवसू लागते… शांतता जेव्हा आवाजातही सापडते अन मौन सहप्रवासी होतो तेव्हा सुंदरता एक आखीवरेखीव नदीप्रमाणे हिमालयातील शुभ्र स्फटिकांप्रमाणे भोवतालच्या अंधाराला उजेडाशी जोडू लागते!
एखाद्याच्या सहवासात, एखाद्या संभाषणात, एखाद्या प्रवासात, एखाद्या निखळ स्मितहास्यात, एखाद्याच्या चेहर्यात किंवा एखाद्याच्या निव्वळ असण्यातही सुंदरता सापडू लागते… समाधानाशी नाते जोडणारी आणि समाधानाला प्रत्येक आनंदानंतर स्वानंदातून अत्युच्च परमानंदाकडे घेऊन जाणारी वाट म्हणजे सुंदरता! काही मिळवणे आणि काही गमावणे या भावनेपलीकडील काहीही नसणे या अवस्थेमध्ये सुखाचे तरंग उमटवणारी दैवी प्रमाणबद्ध अवस्था म्हणजे सुंदरता! अवघड आणि क्लिष्टतेचे निकष लावून माणूस माणसाला खोटे ठरवत असतो तेव्हा सुंदरता माणसाचे माणूसपण सिद्ध करण्यासाठी माणसाला सोपे सोपे दुवे प्रदान करत असते… ती अलिप्त नाही आणि लिप्तही नाही.. ती साध्यही नाही, ती साधनही नाही आणि ती अवस्थाही नाही… तिचे काहीच नसणे हेच तिच्या सुंदरतेचे प्रतीक आहे..
गाभार्यामध्ये पिंडीवर होणारा अविरत अभिषेक म्हणजे सुंदरता.. एखाद्या फुलाच्या सुगंधाचे आसमंत दरवळणे म्हणजे सुंदरता, असंख्य निनादणार्या टाळ नी चिपळीच्या संगीतातील समाधी म्हणजे सुंदरता, अमूर्त भावनांचे मूर्त रोमांच म्हणजे सुंदरता, विलोभनीय आणि अद्वितीय नामघोषातील एकसूर म्हणजे सुंदरता.. जंगलामधील पायवाटेची वर्षानुवर्षे चाललेली तपस्या म्हणजे सुंदरता.. सागरामध्ये मिसळून गेल्यानंतर नदीचे तर्पण म्हणजे सुंदरता.. स्वतःचा अभिनिवेश झिडकारून निसर्गाचे पाईक होणे म्हणजे सुंदरता..
सृष्टीचे गणितीकरण आणि त्या विधात्याचे समीकरणीय कोडे समजण्यासाठी गाठी हवी ती सुंदरता… निर्विवाद निष्पक्ष, नितळ आणि निरामय जर काही असेल तरी ती आहे सुंदरता.. प्रेम जर आश्वासकता देत असेल, लगाव जर आपलेपणा सिद्ध करत असेल आणि भक्ती जर निरंतर जोडून ठेवत असेल तर या सगळ्यांना एका समीकरणात बांधणारे अगणिती सूत्र म्हणजे सुंदरता!
-निलेश सकपाळ
२४ सप्टेंबर २०२६