या वर्षीच्या अंकांबद्दल, त्यातल्या भल्याबुऱ्या साहित्याबद्दल चर्चा करण्यासाठी, आवड निवड कळवण्यासाठी हा स्पेशल लेखन धागा.
मला सर्वात उल्लेखनीय वाटणारा दिवाळी अंक म्हणजे पहिल्यांदाच प्रकाशित होत असलेला तथाकथित (मंडळींचा) दिवाळी अंक. या अंकासाठी त्यांनी अनेकांना विविध फोटो 'प्रॉम्प्ट' म्हणून दिले आणि त्यावरून जे सुचेल ते एका फॉरमॅट मध्ये लिहायला लावले. हा एक प्रकारे मानवी सृजनशील बुद्धीला पुन्हा मानवी करण्यासाठी केलेला एक चांगला प्रयोग होता. यातले प्रॉम्ट म्हणजे नामांकित मराठी छायाचित्रकारांनी (इंद्रजित खांबे, कानविंदे) काढलेली छायाचित्रे होती. अर्थात यात अनेकांनी मेटा AI होऊन लेखन केले आहे का ते मलाही ठाऊक नाही. त्यामुळे ही जाहिरात तर आहेच पण एका चांगल्या प्रयोगाची दखल देखील आहे. या अंकात माझी 'चिरंतनाचा गंज' ही कथा आहे. (जी मी स्वतःच लिहिलेली आहे, शिवाय या अंकात मुलं लिहीत असल्याने ती टोन डाऊन करावी लागली) या अंकाच्या संपादक रुचिता भुजबळ असून त्यांनी अतिशय बारकाईने संपादन देखील केले आहे. (फर्स्ट हँड अनुभव) रुचिता भुजबळ जरी मुख्य संपादक असल्या तरी अंकाच्या मुखपृष्ठापासून ते साहित्याच्या निवडी - संपादनापर्यंत, हा एक कलेक्टिव एफर्ट आहे. अशा प्रकारचा ग्रुप ने केलेला प्रयत्न म्हणून देखील या अंकाची विशेष दखल घ्यावी लागेल. या ग्रुप चे नाव तथाकथित मंडळी असे आहे. रुचिता भुजबळ यांची स्टूडट फिल्म 'पंख' इथे पाहता येईल. तथाकथित मंडळींचे कार्यकारी मंडळ इतर अनेक उपक्रम देखील राबवत असते. त्यात उल्लेखनीय म्हणजे त्यांची दी लॅब्स नावाची संस्था. या संस्थेमार्फत लहान मुलांना AI ready करण्याचे काम केले जाते. AI रेडी म्हणजे AI वापरून चमकोगिरी करायचे प्रशिक्षण नव्हे बरं का. (म्हणजे मुलांना LLM वापरायचे प्राथमिक ज्ञान देऊन त्यांच्याकडून वयाहून मोठ्या असणाऱ्या चमको गोष्टी करून घेणे नव्हे)
AI चा एकूण व्यापार, वापर आणि वैज्ञानिक बैठक काय, त्यात येणारे येऊ शकणारे मानवी बायसेस काय, त्यापासून आपण स्वतःचे स्वत्व कसे सांभाळायचे, कुठपर्यंत वाहवत जायचे कुठे रोखायचे, त्याची तात्विक बैठक आणि व्यावहारीक इमॅप्क्ट यांचा ताळमेळ मुलांना समजून यावा, त्यांनी त्यांची सृजनशक्ती आणि अन्वयबुद्धी AI ला गहाण न टाकता त्याचा वापर करून त्यावर मांड ठोकावी आणि हे करत असतानाच स्वतः ला कोसळू न देता यावे अशा प्रकारचे शास्त्रशुद्ध कोर्सेस ते चालवतात.
त्यांच्या या पार्श्वभूमी वर त्यांना असा दिवाळी अंक काढणे समयोचितच आहे किंबहूना सृजन करणाऱ्यांना देखील मुळापासून या प्रश्नाकडे त्याच सृजनात्मक दृष्टीने सजगपणे पाहायला लावणाराही आहे.

.
.
.