आज खरं तर सुमो रेसलिंगच्या मॅच बघायला जायचं होतं, पण तिकिटे न मिळाल्याने दुसर्या दिवशी आम्ही शिबुया इथे जायचे ठरवले. हॉटेलपासून हे अंतर त्यातल्या त्यात जवळ होते (म्हणजे तरी सबवेने २०-२५ मिनिटे). तिथे पोहोचलो तर जपानमध्ये जे अगदीच अनपेक्षित होते, ते शिबुया स्टेशनसमोर दिसले. तिथे एकजण भीक मागत होता, पण बिचाऱ्याला लाज वाटत असेल म्हणून मोठा गॉगल आणि टोपी घालून त्याने स्वतःचा चेहरा लपवला होता.
हचिको (Hachikō)चा पुतळा
हिदेसाबुरो युएनो या माणसाने पाळलेला एक कुत्रा होता, त्याचे नाव हचिको. हिदेसाबुरो हा तोक्यो युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होता. हा हचिको दररोज मालक कामावरून येणार, त्यावेळी संध्याकाळी स्टेशनवर त्याला घ्यायला येत असे. १९२५ साली कामावर असतानाच हिदेसाबुरोचे निधन झाले. तेव्हा हचिको फक्त २ वर्षांचा होता. पण तो पुढील १० वर्षे (त्याचे स्वतःचे आयुष्य संपेपर्यंत) दररोज संध्याकाळी, ठरलेल्या वेळी आपल्या मालकाची वाट पाहत शिबुया स्टेशनवर उभा असे. त्या कुत्र्याचे १९३५ साली निधन झाले तेव्हा त्याच्या स्मृतीनिमित्त इथे पुतळा उभारण्यात आला आहे. आज जगभर हचिको(Hachikō) हा निष्ठेचे (loyalty) प्रतीक बनला आहे.
शिबुया क्रॉसिंग
हे जगातील सर्वात बिझी "पादचाऱ्यांचे क्रॉसिंग" समजले जाते. प्रत्येक वेळी सिग्नल हिरवा झाला की तिथून हजारो लोक रोज प्रवास करतात. सर्व रस्त्यांचे सिग्नल एकाच वेळी लाल होतात. तेव्हा सगळे जण एकाच वेळी पूर्व - पश्चिम - उत्तर - दक्षिण असे सर्व बाजूंनी रस्ता ओलांडतात. पण अजिबात आरडाओरडा किंवा दाटीवाटी न होता सगळे शांतपणे रस्ता ओलांडतात. गंमत अशी आहे की तेव्हा पादचाऱ्यांचा सिग्नल चिव-चिवचिव असा हळूवारपणे चिवचिवाट करत असतो. ते ऐकायला खूप मजा येते. हा चिवचिवाट पूर्ण जपानमध्ये इतर ठिकाणी सुद्धा ट्रॅफिक सिग्नलसाठी वापरला जातो.
Meiji Shrine हे शिबुया क्रॉसिंग पासून चालत साधारण २० मिनिटांवर आहे. तिथे जाताना निव्वळ योगायोगाने या इमारतीच्या शेजारून गेलो. मायबोलीवर एकदम फिट बसेल, म्हणून लगेच हा फोटो काढला.
(टीपः मी भाजप, काँग्रेस, आप... कुणाचाही समर्थक वा विरोधक नाही.
)
Meiji Shrine हे बुद्धाचे अजून एक टेंपल आहे, पण हे शिन्तो प्रकाराचे आहे म्हणे. आता कालच्या सेन्सोजीमध्ये आणि आजच्या शिन्तोमध्ये काय फरक आहे, ते मला माहीत नाही. मलातरी दोन्ही जवळपास एकाच प्रकारचे वाटले, फक्त इथे पॅगोडा दिसला नाही.
या ड्रम्समध्ये साके ही जपानमधील तांदळापासून केलेली वाईन भरून ठेवली आहे. Emperor Meiji आणि Empress Shoken यांचे आत्मे या मंदिरात आहेत, असा एक समज आहे. (Souls are enshrined here.) त्या दोघांसाठी ही साके दरवर्षी त्यांना अर्पण केली जाते.
Emperor Meiji आणि Empress Shoken यांच्या स्मरणार्थ हे टेम्पल आहे. इथे जाताना आधी Torii Gate लागते आणि मग बराच वेळ दाट जंगलातून चालत जावे लागते. त्यामुळे खूप छान वाटले. Senso-ji च्या मानाने इथे गर्दी बरीच कमी होती. Emperor Meiji याला पाश्चिमात्य जीवनशैलीबद्दल आपुलकी होती. फ्रान्समधील वायनरीजनी त्याला भेट दिलेली उत्कृष्ट वाईन पुढील चित्रात दिसेल.
Emperor Meiji आणि Empress Shoken बऱ्याच Waka (traditional Japanese poems) करायचे. Emperor ने आयुष्यात जवळपास १ लाख आणि Empress ने ३०,००० Waka लिहिल्या. त्याचा एक नमुना. Waka poem of Emperor Meiji
Should one desire
to follow a path of learning
even though busy,
we can always find time to study
even in this world of ours.
जपानमध्ये बहुतेक सर्व टेंपलमध्ये प्रथा आहे की लाकडाच्या छोट्याश्या तुकड्यावर आपली इच्छा लिहून तिथे बांधून ठेवायची. कधीकधी कुणी आपल्या मृत आई-वडील-नातलग यांच्यासाठी सदिच्छा पाठवतात. दुसऱ्या दिवशी monk येऊन प्रार्थना करतात. त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होते. त्या एका दिवसात किती जणांनी अशा इच्छा लिहिल्या आहेत, ते पुढील फोटोमध्ये दिसेल.
जपानमध्ये Goshuin म्हणून छोट्या वह्या मिळतात. (साधारणतः २००० yen) ती एक वही वेगवेगळ्या shrine मध्ये वापरता येते. प्रत्येक मंदिरात गेले की तिथे मंदिराचा विशिष्ट ठसा (एक प्रकारचे seal, stamp) त्या वहीत उठवायची प्रथा आहे. पुढील फोटोत एक जण shuin चा ठसा उमटवताना दिसत आहे. नंतर मग तिथले monk त्या वहीत सुंदर कॅलिग्राफीने एखादा मंत्र किंवा संदेश लिहितात, अशी पद्धत आहे.
वरच्या रस्त्यावर दिसलेला, टोक्योमधील कॅसिनो
फिरता फिरता सहज एक नेपाळी रेस्टॉरंट जेवायला मिळाले, जिथे आम्हाला चिकन करी, नान, चिकन टिक्का, सॅलड आणि मँगो लस्सी इतके सारे जेवण मिळाले. (११०० येन). तिथे भरपेट जेवण करून आम्ही मग ऊएनो (Ueno) पार्क मध्ये फिरलो. तिथे मुलासाठी Sukajan Jacket शोधण्यात जवळपास २ तास गेले. कारण ते असेच हवे, तसेच नको, अमुकच कलर पाहिजे, ड्रॅगन आणि गरुडाचे चित्र पाहिजे, त्यात ड्रॅगन लाल रंगाचा आणि गरुड गोल्डन पाहिजे असे हजार क्रायटेरिया होते. हवे ते जॅकेट शोधण्यात, बायकोचे लेकाबरोबर फोन संवाद चालू असताना, approval वाद न घालता मिळवण्यात माझे डोके एकदम बधीर झाले. शेवटी माय-लेकरांचे एकमत झाले आणि खरेदी झाली. अशा खरेदीच्या वेळी, I don't buy things, I buy peace. 
त्यानंतर आम्ही अकाहाबारा (Akahabara) इथे गेलो. अकाहाबारा या भागात इलेक्ट्रॉनिकची बरीच दुकाने आहेत आणि ती पण मोठी मोठी, म्हणजे एका मजल्यावर फक्त कॉम्प्युटर गेम्स, दुसऱ्यावर लॅपटॉप वगैरे, तिसऱ्यावर कॅमेरे, चौथ्यावर घड्याळे, पाचव्यावर टीव्ही वगैरे असला प्रकार. पण जिकडेतीकडे खूप दाटीवाटीने आणि खच्चून माल भरला होता, त्यामुळे खरं तर गुदमरल्यासारखे झाले. मुलाला विशिष्ट जॅपनीज घड्याळ हवे होते, ते घेतले. (日本製 Made in Nippon घेतले, ते तुलनेत महाग असतात.) नवीन असे काहीच दिसले नाही म्हणून मग थोडीफार भटकंती करून बाहेर पडलो.
रात्रीचे जेवण Udon Noodles with Tofu and fish (१४०० येन अंदाजे)
(क्रमशः)





वाचतोय. पण लिखाण त्रोटक वाटलं
वाचतोय.
पण लिखाण त्रोटक वाटलं
अजून जरा सविस्तर लिहिलेलं आवडेल.
व्वा मस्तच.
व्वा मस्तच.
हा भाग देखील मस्त.
Meiji Shrine फोटो सुंदर. याचे तोरी गेट चांगलेच उंच आहे.
चिवचिवाट>>>> मस्त निरीक्षण
तो लांबलचक त्रिकोणी नान खाल्ला का ?
मस्त...
मस्त...
साके बऱ्याचदा ट्राय करून बघितली आहे पण विशेष आवडली नाही. कदाचित एखाद्या मादक जपानी 'साकी' नं पेल्यात ओतल्यावरच खरी चव येत असावी.