आदिशक्तीचा जागर!

Submitted by मीस्वच्छंदी on 15 October, 2026 - 13:43

आदिशक्तीचा जागर!

बहुतांशी सर्व देवीभक्ताना यातील बरीचशी माहिती आधीपासून असेलच. पण माझ्यासारखे काही असतीलच जे बऱ्याचदा पाण्याबाहेर असतात किंवा काठावरून आत डोकावून काही गवसते का असे चाचपडत असतात. अशा सगळ्यांसाठी हा लेख!

देवीचे उगमस्थान काय असावे? देवी आणि ती संकल्पना कधी अस्तित्वात आली? याविषयी काही खोदकाम केले असता बरीच रोचक माहिती मिळाली.

प्राचीन संदर्भ >>>
इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन पूर्व 500, म्हणजे सुमारे साडेतीन ते चार हजार वर्षांपूर्वीच्या या प्राचीन वैदिक काळामध्ये, शक्ती देणारी आणि अन्नधान्य पुरविणारी माता, धरतीमाता, या दोन स्वरूपात देवीचे अस्तित्व होते आणि त्या तशा रूपातच तिचे पूजन होत असे.

सगळ्यात पहिल्यांदा आढळलेल्या देवीच्या मूर्ती किंवा चित्रे ही दुर्गामातेची होती.
सिंहावर आरूढ झालेली दुर्गा माता हे स्वरूप खूप पुढे, इ.स. पूर्व १०० ते इ.स. ३०० या काळात, म्हणजे दोन एक हजार वर्षांपूर्वी प्रचलित असल्याचे आढळून आले
उत्तर प्रदेश, बंगालमध्ये उत्खननादरम्यान, सिंहावर आरूढ झालेली दुर्गा माता महिषासुराचा नाश करतानाची चित्रे किंवा मुद्रण असलेल्या मातीच्या अनेक पाट्या/ टाईल्स मिळाल्या. पुराणतत्व शास्त्रज्ञांनुसार या कुशाण आणि सुंग राजवटीत घडविल्या गेल्या आहेत.

देवीच्या पूजेची परंपरा हजारो वर्षे जुनी असली तरी तिची उपासना, निसर्गात मोकळ्या जागी टेकाडावर, गुहांमध्ये किंवा झाडाखाली होत असे. देवीची मंदिर त्या मानाने खूप नंतर बांधली गेली.

पाचव्या शतकात, गुप्त साम्राज्यात, खडकांमध्ये शिल्पकाम करून गुहा-मंदिरे तयार केली गेली. मध्यप्रदेशातील उदयगिरीच्या गुहेत, इ.स. ४००-४१५, महिषासुरमर्दिनीची सर्वात जुनी आणि स्पष्ट शिल्पे कोरली गेलेली आढळतात.

त्यानंतर हळूहळू वास्तुकलेचा विकास झाला तशी स्वतंत्र दगडी मंदिरेही उभारण्यात आली.
जसे पाचव्या-सहाव्या शतकात, ऐरन किंवा देवगड येथील गुप्तकालीन लहान दगडी मंदिरे, जिथे दुर्गा आणि सप्तमातृकांच्या मूर्ती आढळतात.
भारतातील आणि जगातील सर्वात जुने, अजूनही अस्तित्त्वात असलेले दगडी बांधणीचे पहिले मंदिर म्हणजे 'मुंडेश्वरी देवी मंदिर' होय. या देवळाचे बांधकाम ६०० ते ६३५ दरम्यान झाले. हे अष्टकोनी (Octagonal) आकाराचे दुर्मिळ दगडी मंदिर आहे. येथे भगवान शिवाचे पंचमुखी शिवलिंग आणि 'महेशमर्दिनी' (मुंडेश्वरी देवी) रूपात देवीची प्राचीन मूर्ती स्थापित आहे. मंदिरातील शिलालेखांनुसार या टेकडीवर पूजेची परंपरा अगदी इ.स. १०८ पासून सुरू असल्याचे पुरावे मिळतात.

तर पुढे सातव्या शतकात, महाबलीपूरम येथे पल्लव राजा नरसिंहवर्मन प्रथम यांनी एकाच महाकाय अखंड पाषाणात (Monolith) देवी दुर्गेचे मंदिर, द्रौपदी रथ मंदिर कोरून घेतले. याचे नाव जरी द्रौपदी रथ असले तरी हे मुख्यत्वे दुर्गामातेचे मंदिर आहे.

गुप्त साम्राज्याच्या काळात, पाचव्या-सहाव्या शतकात, अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट घडली, देवीमाहात्म्य रचले गेले.
त्याआधी प्रत्येक प्रदेशात देवीचे वेगवेगळ्या रूपात पूजन केले जाई. पण देवी महात्म्यामुळे देवीला एक महादेवी आदिशक्ती स्वरूपात दाखविले गेले, जे पुढे रूढ झाले. त्यामुळे देवीच्या पूजाअर्चनेला एक सुसूत्रता आली.
दुर्गामाता आणि महिषासुराचे युद्ध, जे नऊ दिवस चालले होते, त्या नऊ दिवसांमध्ये ठराविक व्रत, उपासना याविषयीचे नियम मांडले गेले. तेच आपण आज साजरे करतो ते शारदीय नवरात्र होय!

पुढील काळात देवीची अनेक मंदिरे बांधली गेली. नवरात्री उत्सवांना राजाश्रय मिळाला. विशेषकरून सोळाव्या शतकादरम्यान नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात सामाजिक स्तरावर साजरा केला जाऊ लागला.
अकराव्या ते सोळाव्या शतकाच्या दरम्यान कर्नाटकातील विजयानगर साम्राज्यात महानवमी खूप राजेशाही थाटात केली जात असे. तर सोळाव्या शतकात सतराव्या शतकात राजा बाबानंद मुजुमदार यांनी बंगालमध्ये पहिला अतिशय भव्य दिव्य असा दुर्गा पुजा उत्सव साजरा केला होता.

विविध राज्यांमधील नवरात्रोत्सव >>>

नवरात्रीचे सूत्र एक असले तरी, विविध राज्यांमधे ते निरनिराळ्या प्रकाराने साजरे केले जाते.

आपल्याला सगळ्यांना गुजरातचा गरबा/ दांडिया रास माहीतच आहे. त्यात पारंपरिक पद्धतीनुसार, मध्यभागी एक गर्भ दीप - म्हणजे एक मातीचे भांड ज्याच्या आत एक दिवा ठेवलेला असतो - जे मातृ गर्भाचे किंवा जीवाचे प्रतीक असते. आणि त्याभोवती फेर धरून देवीची गाणी म्हणायची अशी प्रथा आहे.

तर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गा पुजा होऊ लागली आणि त्याचा बराच प्रसारही झाला.

दक्षिणे कंदील तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशामध्ये गोलू म्हणजे एक छोटी बाहुली असते, तिची पूजा करता. ती परंपरा अगदी घरोघरी लोकप्रिय झाली.

वर उत्तरेत रामलीला केली जाते. रामाचा विजय साजरा करण्याचं दिवस म्हणजे दसरा विजयादशमी पण त्याच्या आधी पूर्ण नवरात्र भर रामलीला, म्हणजे रामाच्या जीवनावरील नाट्य सादर होत आणि शेवटी दसऱ्याला रावणाचे दहन होतं.

आता छत्तीसगडमध्ये बस्तर दशेरा साजरा केला जातो. हा सगळ्यात मोठा म्हणजे 75 दिवस राहणार उत्सव आहे. हा उत्सव मुख्यत्वे, स्थानिक देवता देवी दंतेश्वरी आणि आदिवासींच्या ऐक्यासाठी केला जातो.
यात सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे यथयात्रा - एक सुंदर कोरीव काम केलेला रथ रस्त्यांवरून लोकं स्वतः ओढत घेऊन जातात.
तर पंजाब आणि जम्मू मध्ये माता मातेचे जागरण करायची पद्धत आहे, माता की चौकी. त्यावेळी रात्रभर भक्ती भजन वगैरे गाऊन देवीची, मुख्य करून वैष्णोदेवीची, स्तुती केली जाते. तसेच कन्या पूजन केलं जातं.

आणि मुख्य, आपल्या महाराष्ट्रातील घटस्थापना - देवीला कलशाच्या (पाण्याने भरलेला घट) रूपात प्रतिष्ठापना करून, भोवती पसरलेल्या मातीत, धान्य पसरवून उगवायची म्हणजे देवीचं सृजनाचं रूप!

ही सगळी माहिती वाचा असताना एक आश्चर्य वाटतं, ते म्हणजे की कन्याकुमारी पासून ते जम्मू कश्मीर पर्यंत सगळ्या ठिकाणी तो साजरा होतो. आणि जरी थोड्याफार पद्धती वेगळ्या असल्या तरी त्यात समान धागे सापडतात - जसे तो ठराविक काळामध्ये, नऊ दिवसाच्या चौकटीत राहून केला जातो, देवीची पूजा अर्चना या स्वरूपातच साजरा केला जातो.
त्याविषयी अजून काही धागेदोरे तपासले असता जाणवतं ..

देवी महात्म्य आणि देवी भार्गव पुराण या दोन्ही मध्ये दुर्गामाता/ महिषासुरमर्दिनी आणि महिषासुराचा लढा केंद्रस्थानी ठेवूनच नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो.

हिंदू तत्त्वज्ञानुसार हे वैष्णव त्रिगुण सूत्रावर आधारित आहे. नवरात्रीतकल्या नऊ दिवसांचेही तीन- तीन-तीन असे विभाजन होते.
त्यानुसार, पहले तीन दिवस हे तामस (तामस - म्हणजे दुष्ट शक्तींचा संहार) शक्तीला म्हणजे कालीमाता / दुर्गामाता याना वाहिलेले आहेत,
तर पुढचे तीन दिवस हे राजस (समृद्धी, सुख, कृती ) शक्तीचे म्हणजे लक्ष्मीचे आहेत,
तर शेवटचे तीन दिवस हे सत्व ( पावित्र्य, तेज ) शक्तीचे म्हणजे देवी सरस्वतीचे आहेत.

या नऊ दिवसांमागे अजूनही एक तत्व असावे.
माणूस जन्माला येण्याआधी नऊ महिने मातीच्या उदरात असतो. नवरात्रीतील नऊ दिवस, हे या नऊ महिन्यांचे एक प्रातिनिधिक स्वरूप आहे. या नऊ दिवसात केलेली पूजा, जप जाप्य, व्रत वैकल्य यांमुळे माणसाच मन ही शुद्ध होत. त्यातील विकार गाळून पडतात आणि मन शुद्ध, सात्विक होत.

एखाद्या गोष्टीमागे इतकं खोल तत्वज्ञान आहे हे समजल्यावर जाणवलं कदाचित म्हणूच ही परंपरा, हा उत्सव आज हजार - दीड हजार वर्षांनंतरही इतक्या भक्तिभावाने साजरा होत असणार. !

मूळ लेख

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users