भस्मबीज - भाग २५
पूर्वभाग
कल्लेश्वर पिशाच्चबंधनाच्या साहाय्याने अभिजितला पळवून नेतो आणि नग्न वेताळाच्या चरणांशी त्याचा बळी देण्याची तयारी करतो; मात्र देवप्पा योग्य वेळी पोहोचून पवित्र शंखनादाने पिशाच्चांचे नियंत्रण मोडतो आणि भस्मशैलातील जागृत शक्तीच्या प्रहाराने अभिजित कल्लेश्वरला धडक देतो. पण पराभवाच्या उंबरठ्यावर असलेला कल्लेश्वर अनन्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगतो आणि क्षणार्धात तिथून गायब होतो. देवप्पाला कळते की कल्लेश्वरच्या आधीच्या तांत्रिक प्रयत्नांचा अंश अनन्याच्या चेतनेत अडकला आहे. त्याच वेळी सुप्यात अनन्या मध्यरात्री विहिरीच्या काठावर परक्या, भयाण स्वरात आईला सांगते की आता धावून काही उपयोग नाही, वेळ संपली आहे.
************************************************************************************************************************
भस्मबीज - भाग २६ - विहीर
विहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या अनन्याच्या तोंडून आलेला तो खोल, थरकाप उडवणारा आवाज ऐकून स्वातीच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली.
"अनु... हे काय बोलतेस तू बाळा? खाली उतर, हात धर माझा," स्वातीने घोगऱ्या आवाजात, हात पुढे करत विनवले. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.
विहिरीच्या काठावर उभी असलेली अनन्या किंचितही हलली नाही. तिच्या चेहऱ्यावर थंड, भावशून्य हास्य खिळले होते.
"तो म्हातारा रक्षक यानाला बसून कुणाकुणाला वाचवणार?" आवाजात दोन वेगळे स्वर मिसळल्यासारखे वाटत होते; एक अनन्याचा ओळखीचा सूर आणि दुसरा एखादा खोल विहिरीतून येणारा, जड. "या कुळाचा शेवट माझ्या हातूनच व्हायचा होता. "
शब्द हवेत विरतात न विरतात, तोच अनन्याचा चेहरा थरथरला. तिचे डोळे क्षणभर घट्ट मिटले, आणि जेव्हा उघडले, तेव्हा त्यांत स्वातीला तिची स्वतःची पोर दिसली. घाबरलेली, हरवलेली.
"आ... आई? आई... मला कळत नाहीये मी कुठे आहे... माझे पाय..."
स्वातीने एक पाऊल टाकलं, मग आणखी एक. दोघींमध्ये दोन हातांचं अंतर उरलं.
पण तेवढ्यात अनन्याच्या चेहऱ्यावर वेदनेची कळ उमटली. जणू तिच्या आत दोन शक्ती एकमेकींशी ओढाताण करत होत्या.
आणि मग अचानक अनन्याचे हात निर्जीव होऊन खाली पडले. डोळ्यांतलं भय एका क्षणात विझलं आणि त्या जागी पुन्हा तोच थंड तांबूस प्रकाश परतला. तिने मान वर केली.
"ती आता तुझं ऐकणार नाही," दुसरा आवाज म्हणाला.
तिने दोन्ही हात बाजूला पसरले. तिची नजर स्वातीवर खिळलेली होती. चेहऱ्यावर एक भेसूर हसू आणत तिने एका क्षणात तोल सोडला आणि स्वतःला त्या काळोख्या विहिरीच्या खोल पाण्यात झोकून दिले.
"अनन्या!" स्वातीच्या घशातून काळीज चिरून टाकणारी किंकाळी फुटली.
त्याच क्षणी, वाड्याच्या मुख्य दरवाज्यातून आजोबा आत शिरले. त्यांनी पडवीतून अंगणातील दृश्य पाहिले होते, अनन्या विहिरीच्या काठावर उभी होती. धोका ओळखून, आजोबांनी मागच्या दाराने बाहेर पडून वाड्याला वेगाने वळसा घातला होता. त्यांच्या वयाची सगळी बंधने एका क्षणात गळून पडली होती. अंगात वीज संचारावी तसे ते धावत वाड्याच्या मुख्य दरवाज्यातून अंगणात घुसले.
अनन्याच्या शरीराने विहिरीचा काठ सोडलेला त्यांनी डोळ्यांनी टिपला होता. विचार करायला सेकंदाचाही उसंत नव्हती. एकाच हिसक्यात त्यांनी कमरेच्या धोतराचा घट्ट कासोटा बांधला. पाय जमिनीवर रोवून त्यांनी धाव घेतली, विहिरीच्या दगडी काठावर पाय टेकवला आणि काठावरून हवेत सूर मारत थेट त्या काळोख्या पोकळीत उडी घेतली.
विहिरीच्या अंधाऱ्या पोटात थंडगार, जड पाण्याचे प्रचंड लोट उसळले. पाण्याचा तळ गाठण्याआधीच त्यांनी हात पसरून चाचपडायला सुरुवात केली. बोटांना पहिल्यांदा लागला तो ओला, तरंगता कपडा. मग हात, मग केस. त्यांनी अनन्याला कवेत घेतलं आणि पायांनी जमिनीला रेटा देत वर उचलण्याचा प्रयत्न केला. विहिरीच्या पाण्यात एक विचित्र, भयानक ताकद होती. आणि कसलेतरी अदृश्य पाश अनन्याला तळाशी खेचून नेण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांची छाती फुटायला आली होती. त्यांनी पाण्यातच दात आवळले आणि सगळं बळ एकवटून त्यांनी अनन्याला वरच्या दिशेला ओढलं पण काहीच उपयोग झाला नाही. छातीतली उरलीसुरली हवा बुडबुड्यांच्या रूपाने वर निघून गेली. डोळ्यांसमोर तांबडे ठिपके नाचू लागले. हात सैल पडू लागले.
तेवढ्यात त्यांच्या हाताखाली अनन्याचं गार मनगट अचानक कोमट झालं. एखाद्या विझत्या निखाऱ्यावर कुणीतरी फुंकर घालावी तसं. ती उब तिच्या अंगातून हळूहळू त्यांच्या बोटांत उतरली आणि तिथून हातांत, दंडांत. आता ते एकटे ओढत नव्हते. त्यांना असं वाटलं की त्यांच्या हातांबरोबर आणखी कुणाचे तरी हात अनन्याला वरच्या दिशेला ओढत आहेत. ताकद त्यांची नव्हती, अनन्याचीही नव्हती, किंवा कदाचित दोघांचीही होती. ती कुठून येत होती, ते त्यांना कळलं नाही, आणि विचार करायला वेळही नव्हता. पण अदृश्य बळ आजोबांना मिळाले. त्यांनी उजव्या हाताने आणि दोन्ही पायांनी पाण्याचा रोख छाटत प्रचंड हिसका दिला. पाश तुटले.
आजोबा अनन्याला छातीशी घट्ट धरून पाण्याच्या पृष्ठभागावर आले. त्यांनी एका हाताने विहिरीची जुनी, शेवाळलेली दगडी पायरी घट्ट पकडली. आणि त्या विहिरीच्या पडक्या पायऱ्यांवरून अनन्याला कवेत घेऊन सावकाश वर चढले.
आजी पाण्याचा आवाज आणि स्वातीची किंकाळी ऐकून धडपडत बाहेर आली होती, हा सगळा गोंधळ बघत अथर्व अंगणात थरथरत उभा होता त्याला तिने जवळ घेतले.
वर येताच आजोबांनी अनन्याला दगडी चौथऱ्यावर आडवं केलं. आधी तिला कुशीवर वळवलं आणि तळहाताने तिच्या पाठीवर जोरात दाब दिला, दोन-तीन वेळा दाब दिल्यावर तिच्या तोंडातून पाणी बाहेर पडले आणि खोकल्याची जोरदार उबळ आली.
"बाबू, जा पळ घोंगडी आन," आजोबा धापा टाकत अथर्वला म्हणाले.
"आता पोरीला वाईच मोकळा श्वास घिऊ द्या. मागं व्हा, गर्दी करू नका."
अनन्याचे डोळे मात्र बंदच होते. तिचं अंग विहिरीच्या पाण्यापेक्षाही जास्त गार लागत होतं. स्वातीने तिचा हात हातात घेतला, तर तो बर्फासारखा थंड आणि निर्जीव होता. अथर्वने आतून धावत जाऊन घोंगडी आणली. आजीने तिला त्यात गुंडाळलं आणि तळहातांनी तिचे पाय चोळायला सुरुवात केली.
आजोबा तिच्या शेजारी खाली बसले. बराच वेळ ते काही बोलले नाहीत. मग त्यांनी खाली मान घालून, अगदी हळू आवाजात विचारलं, "सूनबाई, काय झालं हुतं? ती तिथं हिरीच्या काठाव कशी पोचली?"
स्वातीने घसा खाकरला. बोलताना तिचे ओठ थरथरत होते. "पहाटे चारच्या सुमाराला जाग आली, बाबा. अंथरुणात ती नव्हती. दार आतून लावलेलं होतं, पण कडी उघडी होती. मी बाहेर आले तर ती त्या विहिरीच्या काठावर उभी... आणि तिचा आवाज..." तिने डोळे गच्च मिटले. "तो तिचा आवाज नव्हता. जड, म्हाताऱ्या माणसासारखा. ती म्हणाली, 'आता धावून काही उपयोग नाही, वेळ संपली आहे.' मग तिनं माझ्याकडे बघत...स्वतःला विहिरीत झोकून दिलं."
“बया...पोरीला कुणाची दृष्ट लागली काय जणू? रातच्याला चांगली हसत-खेळत झोपली आन आता हे आसलं आक्रीत घडलं.” आजीच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं.
आजोबांनी विहिरीकडे वळून पाहिलं. "पाण्यातबी कायतरी हुतं," ते जणू स्वतःशीच बोलले. "तिला खाली वढणारं. मी खच्चून जोर लावला, तवा सुटलं. "
************************************************************************************************************************
पूर्वेकडे जंगलाच्या शेंड्यांवर आभाळ फिकट होत चाललं होतं. मशालीचा उजेड आता गरजेचा राहिला नव्हता.
"अभिजित, अनन्याच्या जीवाला कुणीही धोका पोहोचवू शकत नाही." देवप्पा म्हणाला.
अभिजितने चमकून त्याच्याकडे पाहिलं. "धोका पोहोचवू शकत नाही? देवप्पा, कल्लेश्वर स्वतः म्हणाला की त्याने काहीतरी पाठवलं आहे. तुम्हीच म्हणालात की त्याचा अंश माझ्या मुलीत अडकला आहे!"
"म्हणालो." देवप्पाने मान हलवली. "अंश अडकला आहे. तिच्या वागण्यात फरक पडेल, ती वेगळी वाटेल. पण तो तिच्या जीवाचं काही बरंवाईट करू शकत नाही. ती सुरक्षित आहे."
"तुम्हाला हे कसं माहीत?"
देवप्पाने नजर क्षणभर बाजूला वळवली. मग पुन्हा अभिजितकडे पाहिलं. "मला कारण माहीत आहे," तो म्हणाला. "पण ते आत्ता सांगणार नाही. योग्य वेळ आली की सांगेन."
"तुम्ही माझ्यापासून पुन्हा काहीतरी लपवताय," अभिजित थकल्या आवाजात म्हणाला.
"लपवत नाही," देवप्पा म्हणाला. "थांबवून ठेवतोय. चुकीच्या वेळी सांगितलेलं सत्य खोटं बोलण्यापेक्षा जास्त घातक ठरू शकतं. तु माझ्यावर विश्वास ठेव. हे तुझ्या भल्यासाठीच आहे."
देवप्पाने अभिजितच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या वृद्ध बोटांचा स्पर्श खूपच उबदार होता.
************************************************************************************************************************
माजघरात अनन्याच्या अंगावर तीन घोंगड्या होत्या, तरीही तिचं अंग अजून गार लागत होतं. अथर्व तिच्या उशाशी बसून तिचा हात धरून होता. आजी देवघरासमोर डोळे मिटून हात जोडून उभी होती. फोन वाजला तेव्हा स्वाती दचकली. स्क्रीनवर अभिजितचं नाव होतं.
ती दार ओढून ओसरीवर आली. "हॅलो?"
"स्वाती, सगळे ठीक आहेत ना?" अभिजितचा आवाज घोगरा होता, रात्रभर न झोपल्यासारखा. "अनन्या..."
स्वातीला खूप रडावसं वाटलं पण तिने हुंदका आवरत विचारले, "तुला कसं माहीत?"
"कल्लेश्वर म्हणाला त्याने सुप्यात काहीतरी पाठवलंय. काय झालं?"
तिने एका दमात सगळं सांगितलं. पलीकडे बराच वेळ काहीच ऐकू आलं नाही. मग स्वातीला जड श्वासाचा आवाज आला.
"ती काय म्हणाली?" अभिजितने विचारलं.
स्वातीने डोळे मिटले. "'तो म्हातारा रक्षक यानाला बसून कुणाकुणाला वाचवणार? या कुळाचा शेवट माझ्या हातूनच व्हायचा होता."
ती क्षणभर थांबली. "ते तिचं बोलणं नव्हतं, अभिजित."
"ती आतून लढतेय," अभिजित म्हणाला. "मला माहीत आहे. मी तिथे येतो..."
“नको." स्वातीने त्याला मध्येच थांबवलं, आणि तिला स्वतःलाच आश्चर्य वाटलं की तिचा आवाज किती स्थिर झाला होता. "तू आत्ता निघालास तर काय करणार? बाबा आहेत इथे. आई आहे. मी आहे. तू तुझं काम कर. मला फक्त एवढंच सांग, हे आता थांबलं आहे का?"
"देवप्पा म्हणतात, अनन्याला कसलाही धोका नाही." अभिजितला म्हणाला. "त्यांना कारण माहीत आहे. पण ते आत्ता सांगायला तयार नाहीत. योग्य वेळ आली की सांगतील, असं म्हणतात."
स्वातीला मुंबईतली ती रात्र आठवली. अथर्वच्या डोळ्यांतली भीती आणि त्याने सांगितलेले ते शब्द. "मी तिला न्यायला आले होते." "अभिजित, अथर्व म्हणाला होता ती ताईला न्यायला आली होती. आणि आज ती पोर विहिरीत बुडून मरता मरता वाचली. आणि आता धोका नाही? कशावरून?"
"माहीत नाही," अभिजित म्हणाला. त्याचा आवाज खाली गेला. "मलाही हेच विचारायचं आहे, स्वाती. पण ते सांगणार नाहीत."
"तुझा त्यांच्यावर विश्वास आहे?"
अभिजितने मान वळवून मागे पाहिलं. देवप्पा झोपडीच्या दारात उभा होता, पूर्वेच्या उजेडाकडे तोंड करून, आणि त्याच्या ओठांची हालचाल दिसत होती. तो काहीतरी पुटपुटत होता. "आहे," अभिजित म्हणाला.
स्वाती काही क्षण गप्प राहिली. "ठीक आहे. मी इथे आहे. तू काळजी करू नकोस."
फोन बंद झाला. तिने तो बराच वेळ हातात तसाच धरून ठेवला.
आजोबा ओसरीच्या पायरीवर बसले होते. अंगावरचा ओला पंचा तसाच खांद्यावर होता, पण आजीने आणून दिलेली कोरडी बंडीही त्यांनी घातली नव्हती. स्वाती बाहेर आली तेव्हा त्यांनी मान वर करून तिच्याकडे रोखून पाहिलं.
"अभ्याचा फोन हुता?"
"हो, बाबा."
"सुनबाई, कशापाई म्हाताऱ्याच्या जीवाला घोर लावताय, वर माळ्याव बखर घावली, त्यात काय हुतं ती सांगितलं न्हाय, घराण्याची तलवारबी अशीच मोघम उत्तर दिऊन न्हेली. अभ्या पहिल्यापासनच गैबानं नेभळाट बोड्याचं हाय. त्याला त्वांड उचकाटायची सवय न्हाय निदान तुमीतरी तसं वागू नका."
स्वातीने त्यांच्या शेजारी पायरीवर बसकण घेतली. आजीही अनन्याच्या उशाशी अथर्वला सोपवून ओसरीच्या दारात येऊन उभी राहिली.
स्वातीने खोल श्वास घेतला आणि सांगू लागली, "गेले कित्येक महिने अभिजितला एकच स्वप्न पडत होतं, बाबा. गुहा, राख आणि एका बाईचा आवाज. ते स्वप्न त्याला यानाला घेऊन गेलं. तिथे देवप्पा भेटले, आणि त्यांच्याकडून सगळं कळलं." ती थांबली. "उत्तर कन्नडमध्ये बारा बायका वेगवेगळ्या वर्षांत गायब झाल्या होत्या. प्रत्येक वेळी अधिक मासाच्या अमावास्येला त्यांचा बळी दिला गेला. आणि तेरावी बळी आहे येत्या जूनमध्ये."
आजी घाबरून तोंडावर हात ठेवत हळूच ओरडली, "बारा बळी!"
"त्या सगळ्यांमागे कल्लेश्वर नावाचा एक अघोरी साधू आहे. तो एका शक्तीला जागं करतोय, तिचं नाव भस्मबीज. आणि तो रोखण्याचं काम आपल्या कुळाचं आहे."
"आपल्या कुळाचं?" आजोबांनी भुवया आक्रसल्या.
"सन्कन्ना इनामदार. आपले पूर्वज? ते त्याच रक्षकांच्या वंशातले होते. त्यांनी साठाव्या वर्षी भस्मबीजाशी लढून त्याला बंद केलं, आणि मग सत्तराव्या वर्षी बखर लिहिली. ती बखर माळ्यावरच्या त्या नक्षीदार पेटीत होती.”
"बाबा. आणि आपलं खरं कुळदैवत..." स्वाती क्षणभर थांबली. "ते पाली-तुळजापूरचं नाही."
आजोबांनी चमकून तिच्याकडे बघितलं. "काय?"
"खंडोबा आणि भवानी आपले आहेतच. पण आपलं खरं कुळदैवत वीर-शास्ता आहे. देवप्पांनी ते ओळखलं. कवचावरच्या मंत्रानेही तेच सांगितलं."
आजोबा बराच वेळ बोलले नाहीत. त्यांचे हात त्यांच्या गुडघ्यांवर थरथरत होते. "वीर-शास्ता," जणू ते नाव पहिल्यांदा जिभेवर घेत होते. "ऐकलं बी न्हाई कधी. चारशे वर्सं. आन आम्हाला कुणी सांगितलं बी न्हाई? माझ्या बापानं बी न्हाई, आजानं बी न्हाई?"
"सन्कन्नांनी जे बघितलं, ते पुढच्या पिढ्यांपर्यंत नीट पोहोचलं नाही, बाबा," स्वाती म्हणाली. "कुणाचा दोष नाही."
आन ती तलवार..." आजोबा मान हलवत म्हणाले, आणि त्यांच्या डोळ्यांत पहिल्यांदा ओल जाणवली.
"त्याच तलवारीने अभिजितने कुळशपथ घेतली, बाबा. त्याने स्वतःच्या रक्ताचा थेंब दिला. आता त्याचं नवं कवच आहे, भस्मशैल, जे त्याला ओळखतं."
"म्हणून तो आसा झालाय," ते म्हणाले. "मला अनु सांगत व्हती. बोलायला धीट, नजर कडक. मला वाटलं सगळ्या पोरीचं आसतं तसं तिलाबी बापाचं लय कौतुक वाटतंय."
आजोबा उठून उभे राहिले. "अभ्याला सांग, ही लढाई आता त्याची एकट्याची न्हाई." ते म्हणाले. "मी जित्ता आसंपातूर घरची काळजी करू नगं. आन मी काय इतक्यात मरत नसतो"
स्वाती उठली आणि माजघरात परतली. अनन्या आता शांत झोपली होती. गालावर पुन्हा रंग येऊ लागला होता. अथर्व तिच्या शेजारीच भिंतीला टेकून तिचा हात अजूनही हातात धरून झोपी गेला होता.
स्वातीने काही वेळ तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहिलं. पहाटे विहिरीच्या काठावर उभी असलेली ती परकी आकृती आणि तिचे ते शब्द, "या कुळाचा शेवट माझ्या हातूनच व्हायचा होता", तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत राहिले.
देवप्पांना कारण माहीत होतं. आणि स्वातीला पहिल्यांदाच धोक्यापेक्षा त्या कारणाची भीती वाटली.
************************************************************************************************************************
अनन्याला जाग आली तेव्हा दुपार कलली होती. काही क्षण तिला आपण कुठे आहोत तेच कळलं नाही. माजघराच्या खिडकीतून तिरकं ऊन आत येत होतं, घसा वाळल्यासारखा कोरडा पडला होता. ती उठायला गेली आणि हात जड लागला. पायांच्या पोटऱ्या ठणकत होत्या, जणू रात्रभर कुणीतरी त्यांना काहीतरी गुंडाळून ठेवलं होतं.
"दीदी उठली!" अथर्व इतक्या जोरात ओरडला की आजीच्या हातातलं तांब्याचं भांडं ठणकन वाजलं.
स्वाती धावत आली. तिने अनन्याच्या कपाळाला हात लावला, मग गालाला, मग मानेला. सकाळी बर्फासारखं असलेलं अंग आता नेहमीप्रमाणे उबदार झालं होतं. स्वातीच्या डोळ्यांत पाणी आलं, पण ती हसली.
"आई, तू असं काय बघतेस?" अनन्याने कोरड्या आवाजात विचारलं. आवाज तिचाच होता. जरासा चिडका, जरासा झोपाळू. त्यात दुसरं काहीही नव्हतं. स्वातीने तो एक वाक्य ऐकण्यासाठी सकाळपासून किती प्रार्थना केल्या होत्या, हे तिचं तिलाच ठाऊक.
"काही नाही. आधी पाणी घे."
अनन्याने तांब्या तोंडाला लावून घटाघटा पाणी प्यायलं. "माझे पाय का दुखतायत इतके? आणि या एवढ्या घोंगड्या कशाला? मी आजारी आहे का?"
स्वातीने क्षणभर आजीकडे पाहिलं. आजीने डोळ्यांनीच "सांगू नको" असा इशारा दिला. स्वातीने विचार केला आणि निर्णय घेतला. "तू रात्री उठून अंगणात गेली होतीस, बाळा. विहिरीजवळ तुझा पाय घसरला. आजोबांनी तुला बाहेर काढलं."
"मी?" अनन्या कपाळाला आठ्या घालून म्हणाली. "मी तर झोपले होते. मला काहीच आठवत नाही. फक्त..." ती थांबली. "फक्त थंडी वाजत होती. खूप थंडी."
"तेवढंच लक्षात आहे?"
"हो. का? आणखी काही झालं होतं का?"
"नाही गं. तू पडलीस आणि घाबरलीस. बास." स्वातीने तिचे केस कानामागे सारले. तिचा स्वतःचा आवाज तिला खोटा वाटला, पण अनन्याने त्यावर शंका घेतली नाही.
तेवढ्यात उंबऱ्यावर आजोबा उभे राहिले. हातात पितळी वाटीत हळद घातलेलं गरम दूध. चेहऱ्यावर थकवा तसाच होता. "उठली का आमची राणी?" ते हसून म्हणाले. "हि धर, पिऊन टाक."
"बाबा कुठे आहेत?" अनन्याने थोड्या वेळाने विचारलं. "मला फोन करायचाय."
"संध्याकाळी करतील," स्वाती म्हणाली. "त्यांच्या ट्रेनिंगमध्ये रेंज नसते."
अनन्याने मान हलवली आणि दूध पिऊ लागली.
पण वाटीच्या काठावरून तिने नकळत एकदा खिडकीतून बाहेर विहिरीकडे नजर टाकली. आणि लगेच ती परत फिरवली, जणू तिथे काहीतरी होतं जे तिच्या स्मृतीत अजूनही जागं होतं.
जबरदस्त आणि उत्कंठावर्धक....
जबरदस्त आणि उत्कंठावर्धक....
चुकीच्या वेळी सांगितलेलं सत्य खोटं बोलण्यापेक्षा जास्त घातक ठरू शकतं.>>>>>>> जबरी
पहिल्यापासनच गैबानं नेभळाट बोड्याचं हाय. त्याला त्वांड उचकाटायची सवय न्हाय निदान तुमीतरी तसं वागू नका.>>>>>> आंग्गाssशी. आत्ताशिक कुटं सातारी गडी वाटतुया
पुढचा भाग लवकर टाका....
रात्री वाचू की नको, वाचू की
रात्री वाचू की नको, वाचू की नको करत वाचलाच शेवटी.
पॉझिटिव्ह झाला आहे हा भाग..
आता आजोबा आणि आजी पण पाठबळ द्यायला आहेत.
कुटुंब असे पाठीशी उभे राहिले तर असले सत्तर कल्लू पण काही वाईट करू शकत नाहीत...
मस्तच!
मस्तच!
आत्ताशिक कुटं सातारी गडी वाटतुया >>>> सातारी नाय ओ.. भीमथडी!
अरे मस्त ...हा हि भाग मस्त ..
अरे मस्त ...हा हि भाग मस्त ....
आता आजोबा आणि आजी पण पाठबळ द्यायला आहेत.
कुटुंब असे पाठीशी उभे राहिले तर असले सत्तर कल्लू पण काही वाईट करू शकत नाहीत...> +९९९