समन्वय (भाग ३)

Submitted by पर्णीका on 14 October, 2026 - 23:27

||२||

चित्त स्पंदन
("स्पंदन लहरींच्या लयीतून घेतलेला 'जाणीवे'च्या तळाचा वेध”)

"जेव्हा मेंदूतील न्यूरॉन्सच्या स्पंदनांची लय विश्वाच्या मूळ स्पंदनांशी जुळते, तेव्हा विज्ञानाच्या सीमा ओलांडून 'जाणीवे'चा प्रवास सुरू होतो. हा ब्लॉग म्हणजे केवळ वैद्यकीय संशोधनाची नोंद नसून, स्पंदनशास्त्राच्या माध्यमातून मानवी चित्ताचा घेतलेला एक सखोल शोध आहे.”

समन्वय लेखमालिका: भाग २

२०२० ते २२ ही वर्षे माझ्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक आघाड्यांवर बरीच धामधुमीची होती. पण २०२३ मध्ये माझी हॉपकिन्स मधली घडी व्यवस्थित बसली आणि मानसिकदृष्ट्या मला जरा निवांतपणा मिळाला. त्यानंतर हळूहळू मला जाणवायला लागले की बाबांच्या वागण्यात बदल होतो आहे. आई-बाबांशी फोनवर बोलणे झाले की हमखास आईकडून बाबांच्या “विसरभोळेपणाचे” किंवा “वेंधळेपणाचे” किस्से ऐकायला मिळायचे. आईसाठी आलेल्या फोनवरचा निरोप आईला द्यायला विसरणे, सकाळी मॉर्निंग वॉकवरून येताना दूध घेऊन येणे विसरणे, गॅलरीत ठेवलेल्या कुंड्यांना दोन वेळा आणि कधी कधी तर तीन वेळा पाणी घालणे, असे बरेच काहीबाही.

सगळ्यात विशेष म्हणजे मिठ्ठूचा उल्लेख करताना हमखास तिचे नाव विसरणे. मिठ्ठू ही आई-बाबांच्या शेजारी राहणारी लहान मुलगी. म्हणायला शेजारी, पण खरंतर आई-बाबांसाठी ती त्यांची नातच होती. तेव्हा ती जेमतेम ३ वर्षांची असल्याने दिवसभर घरीच असायची आणि वरचेवर आई-बाबांच्या घरी येऊन त्यांच्याशी खेळायची. ती बोलायला शिकली तेव्हा बाबांनी तिला मिठ्ठू म्हणायला सुरुवात केली. मग हळूहळू सगळेच तिला मिठ्ठू म्हणायला लागले.

आई हे सगळे गमतीत घेत होती. आतापर्यंत अशा छोट्या-मोठ्या चुका झाल्या तर आईकडून व्हायच्या, बाबांकडून नाही. त्यामुळे बाबांच्या चुकांची चेष्टा करण्याची संधी मिळाली की ती मला आवर्जून सांगायची. तिच्या मते हे वयोमानापरत्वे होणारे विस्मरण होते. बाबांच्या वयोगटातील व्यक्तींमध्ये ही तशी सामान्य गोष्ट असली, तरी मला बाबांचे विस्मरण खटकत होते. मला हेपण जाणवायला लागले होते की हल्ली बाबांची चिडचिड होते आहे; विशेषतः हवा तो शब्द किंवा संदर्भ आठवत नसेल तर. भावनांवर नियंत्रण ठेवणे हा लष्करी शिस्तीचाच एक भाग असतो, बाबांच्या तर ही सवय अंगवळणीच पडली होती. त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदाच मी त्यांना असा वरचेवर संताप व्यक्त करताना बघत होतो. आईला हापण वार्धक्याच्या चाहूलिचा आविष्कार वाटत होता. पण माझ्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकत होती.

२८ सप्टेंबरला घडलेला प्रकार आईकडून ऐकल्यावर माझी खात्रीच पटली. ह्या दिवसाला बाबांच्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. २८ सप्टेंबर १८२७ रोजी 'बॉम्बे माउंटन बॅटरी'ची स्थापना झाली होती, जी आताच्या भारतीय तोफखान्याचा पाया मानली जाते. त्याची आठवण म्हणून भारतीय लष्कर २८ सप्टेंबरला “आर्टिलरी डे” साजरा करते. १९८५ ते १९९९ पर्यंत बाबा आर्टिलरी विभागात कार्यरत होते. बाबांची आर्टिलरी ब्रिगेड ही “रेड ईगल” म्हणजे 4th Infantry Division चा भाग होती. ह्या ब्रिगेडशी संबंधित काही युनिट्स पुण्यात खडकीला तैनात असतात. त्यामुळे खडकीच्या ऑफिसर्स मेसमध्ये दरवर्षी २८ सप्टेंबरचे सेलिब्रेशन होते. ह्या रेजिमेंटशी बाबांचे खूप घट्ट भावनिक बंध असल्याने पुण्यात आल्यापासून ते आणि आई दरवर्षी खडकीच्या ऑफिसर्स मेसमधल्या डिनरला जातात.

लष्करी अधिकाऱ्यांचा कार्यक्रम असल्याने वेळेची शिस्त अगदी काटेकोरपणे पाळली जाते. ८ च्या कार्यक्रमाला उशीर व्हायला नको म्हणून आई-बाबा ७ वाजताच घरून निघाले. कोथरूड ते खडकी हा तसा सरळसोट रस्ता, शिवाय बाबांच्या अगदी परिचयाचा. पण त्या दिवशी रेंज हिल्स परिसरात आल्यानंतर बाबा एकदम गोंधळून गेले. त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि २-३ मिनिटे ते स्टिअरिंग हातात घट्ट धरून नुसतेच बसून होते. गाडीत एसी सुरू असूनही त्यांच्या कपाळावर घाम आला होता, श्वासोच्छ्वासाची लय वाढली होती आणि चेहऱ्यावर एक विचित्र ताण होता. “काय झाले हो?” आईने धास्तावून विचारले. बाबांनी उत्तर दिले नाही, पण प्रयत्नपूर्वक श्वासांची गती कमी केली. मिनिटभरानंतर ते म्हणाले, “काही नाही ग, मनात काहीतरी वेगळे विचार चालले होते, त्यामुळे एकदम गोंधळायला झाले मला.” असे म्हणून त्यांनी गाडी सुरू केली. उरलेला प्रवास सुरळीत पार पडला; पण बाबांसारख्या नॅव्हिगेशन एक्स्पर्टच्या बाबतीत असे घडणे ही नक्कीच सामान्य बाब नव्हती.

त्यावेळी बाबांनी स्वतःला लगेच सावरले असले, तरी आईच्या सांगण्यानुसार त्यानंतर बाबा पूर्ण कार्यक्रमात काहीसे अस्वस्थ होते. टोस्ट प्रपोज करताना बाबांना बोलण्याचा आग्रह केला गेला तेव्हा ते काहीसे अडखळले आणि डिनरच्या वेळी एरवी सवयीचे असलेले ‘कटलरी एटिकेट्स’ पाळणे त्यांना अवघड जात होते. बाबांची लक्षणे अगदी क्लासिक होती: Sundowning म्हणजे संध्याकाळच्या वेळी वाढणारा ताण जो भीती किंवा अस्वस्थतेमुळे येतो, Topographical Disorientation म्हणजेच ओळखीच्या रस्त्यांवर दिशाभूल होणे, Apraxia (काटे-चमचे हाताळताना उडालेला गोंधळ) आणि Anomia (बोलताना नेमका शब्द न आठवणे). ही सगळी लक्षणे मेंदूतील वार्धक्याऐवजी (Aging) ऱ्हास (Decay/Decline) दर्शवणारी होती. मी रोहितशी चर्चा करून, त्याच्या मदतीने बाबांच्या चाचण्यांची व्यवस्था केली. चाचण्यांचे निष्कर्ष असे होते: बाबांच्या आकलनक्षमतेचा सौम्य प्रमाणात ऱ्हास झाला होता, त्यांच्या मेंदूतील स्मृती केंद्राचा आकार ९.५% कमी झाला होता, मेंदूच्या काही भागांतील पेशींना पुरेसे पोषण मिळत नव्हते आणि बाह्य थरात अमायलॉइड प्रथिनांचा जैविक कचरा साठला होता.

रोहितचे निदान होते: Based on the integration of clinical presentation, longitudinal history, and multi-modal imaging: "Prodromal Alzheimer’s Disease presenting as Mild Cognitive Impairment (MCI).”

कारगिल युद्धात बाबांना झालेली दुखापत पूर्णपणे कधीच बरी झाली नव्हती, पण आतापर्यंत तिच्या वाढीचा वेग धीमा असल्याने ते कुणाच्याच लक्षात आले नव्हते. पण आता मात्र त्यांच्या मेंदूत Tau आणि 'Amyloid’ प्रथिने साठण्याचा वेग वाढला होता आणि हळूहळू तो उग्र स्वरूप धारण करत होता. उदबत्तीतून निघणाऱ्या धुराच्या लडी हवेत विरघळून जाव्यात, तसे बाबांचे अस्तित्व बाबांच्याच मेंदूत कणाकणाने विरघळत होते.

डॉ. दीपंकर तेलंग, PhD
सहाय्यक प्राध्यापक, न्यूरोलॉजी विभाग
संचालक, The Center for Resonant Neuromodulation
हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन
बाल्टिमोर, MD २१२३५, USA
Email: dtelang@hopkins.edu.md

Group content visibility: 
Public - accessible to all site users