||उपोद्घात||
चित्त-स्पंदन
(स्पंदन लहरींच्या लयीतून घेतलेला 'जाणिवे'च्या तळाचा वेध)
"जेव्हा मेंदूतील न्यूरॉन्सच्या स्पंदनांची लय विश्वाच्या मूळ स्पंदनांशी जुळते, तेव्हा विज्ञानाच्या सीमा ओलांडून 'जाणिवे'चा प्रवास सुरू होतो. हा ब्लॉग म्हणजे केवळ वैद्यकीय संशोधनाची नोंद नसून, स्पंदनशास्त्राच्या माध्यमातून मानवी चित्ताचा घेतलेला एक सखोल शोध आहे."
नमस्कार,
मी दीपंकर तेलंग. शिक्षण आणि व्यवसायाने न्यूरोसायंटिस्ट आहे. विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने सुरुवातीला माझ्यासाठी 'ज्ञान' या शब्दाची व्याख्या ही केवळ मोजता येण्याजोगा 'डेटा', लॅबमध्ये निरीक्षण करता येतील असे बदल आणि प्रयोगांती सिद्ध होणारा कार्यकारणभाव (Empirical Causality) एवढ्यापुरतीच मर्यादित होती. कॉलेजच्या दिवसांत मला भारतीय दर्शनांबद्दल (Philosophies) खूप कुतूहल होते खरे; पण त्यातील द्वैत, अद्वैत किंवा सायुज्यमुक्ती यांसारख्या अमूर्त संकल्पनांमध्ये मला विशेष रस नव्हता. या संकल्पना म्हणजे केवळ जुन्या पोथ्यांमधील शब्दच्छल किंवा कल्पनाविलास आहेत, अशी माझी तेव्हा ठाम समजूत होती. किंबहुना, भारतीय तत्त्वज्ञानातील या संकल्पनांचा आणि आधुनिक न्यूरोसायन्सचा काही संबंध असू शकतो, हे जर मला दोन वर्षांपूर्वीपर्यंत कुणी सांगितले असते, तर त्या व्यक्तीला मी चक्क वेड्यात काढले असते.
पण सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असते, याचा प्रत्यक्ष अनुभव मी मागील दोन वर्षांत घेतला आहे. त्यातून मी हे शिकलो की, सध्या उपलब्ध असलेल्या आधुनिक न्यूरोसायन्सच्या मर्यादा ओलांडून अधिक सखोल सत्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाच्या समन्वयातून निघू शकतो.
माझ्या या प्रवासाबद्दल सांगण्यापूर्वी, मी या कहाणीची पार्श्वभूमी थोडक्यात सांगू इच्छितो. माझे वडील, धनंजय तेलंग; भारतीय सैन्यातील एक निवृत्त कर्नल आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांना मेंदूच्या एका असाध्य आजाराने ग्रासले. आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपलब्ध उपचारांच्या मर्यादा आणि वडिलांची ढासळत चाललेली मानसिक-बौद्धिक अवस्था, या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी अतिशय वेदनादायी होत्या. त्या हतबलतेतून मार्ग काढण्यासाठी मी प्रगत तंत्रज्ञानावर आधारित एक नवी उपचारपद्धती विकसित केली आणि माझा मित्र डॉ. रोहित सालफळे याच्या मदतीने त्यांच्यावर प्रायोगिक उपचार केले. या संपूर्ण प्रवासात केवळ बाबांच्या प्रकृतीतच सुधारणा झाली नाही, तर माझ्या स्वतःच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला एक नवी दिशा सापडली. माझ्यामधील या सकारात्मक बदलाची ही कहाणी, जिचा उलगडा मी या 'समन्वय' लेखमालेतून करणार आहे.
विद्यार्थिदशेत भारतीय दर्शनांचे वाचन करताना एका विचारधारेने माझे विशेष लक्ष वेधून घेतले होते—ती म्हणजे लोकायत किंवा चार्वाक परंपरा. लोकायत म्हणजे जे केवळ दृश्य जगाला, प्रपंचाला आणि या भौतिक विश्वालाच सत्य मानते. पारलौकिक स्वर्ग, मोक्ष, पुनर्जन्म या सगळ्याचा धिक्कार करणारे हे तत्त्वज्ञान ऐहिक वास्तवावर उभे राहते. दुर्दैवाने या परंपरेतील बहुतांश मूळ ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झाले; त्यांचे केवळ खंडन-मंडनात्मक उल्लेख प्रतिस्पर्धी दर्शनांमध्ये उरले. पण इसवी सनाच्या साधारण आठव्या शतकात लिहिलेला एक दुर्मीळ ग्रंथ आजही उपलब्ध आहे, ज्याने तत्कालीन तात्त्विक विश्वात प्रचंड उलथापालथ घडवून आणली होती. तो ग्रंथ म्हणजे जयराशी भट्ट यांचा 'तत्त्वोपप्लवसिंह'.
जयराशी भट्ट हे चार्वाक परंपरेतील 'बार्हस्पत्य' विचारसरणीशी जोडले गेलेले एक विलक्षण विचारवंत होते. 'तत्त्वोपप्लवसिंह' या नावाचा अर्थच मुळी "सर्व तात्त्विक सिद्धांतांचा संपूर्ण उलटफेर (संप्लव) करणारा सिंह" असा होतो. जयराशी भट्ट हे निव्वळ भौतिकवादी नव्हते, तर ते त्या काळातील एक टोकाचे संशयवादी (Radical Skeptic) आणि ज्ञानमीमांसा-शून्यवादी (Epistemological Nihilist) होते. तत्कालीन सर्वच प्रस्थापित दर्शनांची—मग ते न्याय, मीमांसा असो वा जैन आणि बौद्ध—जी 'प्रमाणमीमांसा' (Epistemology) होती, त्यावर त्यांनी तर्काच्या आधारे प्रहार केला.
त्यांचा रोख अगदी स्पष्ट होता: ज्ञान सिद्ध करण्यासाठी जे 'प्रमाण' वापरले जाते, त्या प्रमाणाची सत्यता सिद्ध करायला दुसरे प्रमाण लागते; आणि हे चक्र अनंत दोषात (Infinite Regress) अडकते. त्यामुळे प्रत्यक्ष (Perception), अनुमान (Inference) किंवा शब्द (Testimony) यांपैकी कोणतेही ज्ञानप्रमाण अंतिम आणि निर्दोष सत्य सिद्ध करू शकत नाही. थोडक्यात, "कोणतेही तत्त्व अंतिम नाही, कशाचीही व्याख्या त्रुटीरहित नाही."
पारंपरिक ज्ञानाची एकही व्याख्या तर्काच्या निकषावर टिकत नाही, हा त्यांचा काहीसा विध्वंसक युक्तिवाद वाचताना त्या वयातील स्वतःला प्रखर बुद्धिवादी मानणाऱ्या माझ्या बौद्धिक अहंकाराला (The Intellectual Hubris) एक समाधान मिळाले होते. विज्ञानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असणारा माझा 'रिडक्शनिझम' (Reductionism) मला सांगत होता की, जे इंद्रियांना मोजता येत नाही आणि जे पुराव्यांनी सिद्ध होत नाही, ते मुळात अस्तित्वातच नाही! मला वाटले, जयराशी भट्ट हे तर प्राचीन काळातील खरे 'कट्टर वैज्ञानिक' होते, ज्यांनी सर्व अंधश्रद्धांना आणि पोकळ तात्त्विक इमल्यांना उद्ध्वस्त केले.
पण त्या ग्रंथाचा समारोप वाचताना मात्र माझा प्रचंड भ्रमनिरास झाला. सर्व दर्शनांच्या मर्यादा उघड करून ज्ञानाचे सर्व दावे जमीनदोस्त केल्यानंतर, अखेरीस जयराशी भट्ट एक अत्यंत अनपेक्षित विधान करतात. ते म्हणतात: तात्त्विक पातळीवर कोणतीही तत्त्वे सिद्ध होत नसली, तरीही प्रत्यक्षात जगण्यासाठी मात्र 'लोकव्यवहार' म्हणजेच समाजात माणसांनी मिळूनमिसळून, सर्वसामान्य रूढी-व्यवहारांशी जुळवून घेऊन सामंजस्याने राहणेच श्रेयस्कर ठरते!
त्या वयात मला वाटले होते की, हा तर्काचा केवढा मोठा पराभव आहे! एका विचारवंताने सर्व सिद्धांतांचे विच्छेदन केले, आणि शेवटी तत्कालीन समाजाच्या भयापोटी किंवा एका अपरिहार्यतेतून ही माघार घेतली? तर्काच्या अंतिम शिखरावर पोहोचून शेवटी सामान्य लोकव्यवहाराची शरणागती पत्करायची? तो समारोप मला निव्वळ एक तडजोड वाटली होती. त्या निष्कर्षामागचे प्रगल्भ शहाणपण अर्थातच मला तेव्हा उमगले नव्हते.
ते मला खऱ्या अर्थाने आता म्हणजे गेल्या दोन वर्षांत उमगले; माझे वडील, कर्नल धनंजय तेलंग यांच्या उपचारादरम्यान. तीच कहाणी मी तुम्हाला या लेखमालिकेतून उलगडून दाखवणार आहे.
दीपंकर तेलंग, PhD
सहाय्यक प्राध्यापक, न्यूरोलॉजी विभाग
संचालक, The Center for Resonant Neuromodulation
हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन
बाल्टिमोर, MD २१२३५, USA
Email: dtelang@hopkins.edu.md
शास्त्र आणि मिथक यांच्या
शास्त्र आणि मिथक यांच्या सीमारेषेवरील कूट प्रश्नाची नांदी झाली आहे. पर्णीका यांच्या मागील कथेच्या अनुभवातून या मालिकेविषयी उत्सुकता जागृत झाली आहे.
अतिशय वेगळा आणि उत्सुकता
अतिशय वेगळा आणि उत्सुकता वाढवणारा विषय! पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
कथा विभागात आहे. हे निवेदन
कथा विभागात आहे. हे निवेदन आहे का?
म्हणजे खर्या व्यक्तीचे कथन आहे का? पुढे वाचायला आवडेल.
या विषयावर (लोकायत दर्शन) काही दिवसांपूर्वी इथेच लिहीले होते.
https://www.maayboli.com/node/89000