सफर ग्रँड कॅनियनची: भाग 2: The Thrilling Tuweep!

Submitted by AD75 on 5 October, 2026 - 15:21

IMG_2453.JPGसफर ग्रँड कॅनियनची: भाग १ - Sea World: https://www.maayboli.com/node/88843

सफर ग्रँड कॅनियनची: भाग 2: The Thrilling Tuweep!
Pictures: https://photos.app.goo.gl/KPb4GbVTEuKrY9wK7
(टिप: हे लिखाण वाचताना वर दिलेल्या फोटो लिंक वर टिचकी मारा, फोटो बरोबर तुम्हाला हा प्रवास अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि त्याचा आनंद द्विगुणित होईल. हे प्रवासवर्णन फोटोंना अनुसरूनच लिहिले आहे, ज्यामुळे प्रत्येक ओळीतील प्रसंग तुम्हाला थेट फोटोशी जोडता येईल.)
व्हेगास ते ट्युविप
सकाळी सातला उठून तयार होऊन बसलो. सातच्या ठोक्याला 'पिंक जीप टुर' असं ठळक अक्षरात लिहिलेली गुलाबी रंगाची एक मोठी व्हॅन मला न्यायला आली होती.
"Good morning Sir! I am Robert. I will be your host today." रॉबर्टनी मला एक कडक हस्तांदोलन करत स्वागत केलं, आणि त्या टुमदार कोचमध्ये मी जाऊन बसलो. आत माझे सहप्रवासी बसले होते. संपूर्ण टक्कल पडलेला टेड ऑस्ट्रेलियाहून आला होता व एक ४०-४५ वर्ष वयाचं जोडपं न्यू जर्सी, अमेरिका येथून आलं होतं. न्यू जर्सी म्हणजे मी जीथे राहायचो न्यू इंग्लंड, तिथून फक्त तीन तासांवर. इस्ट कोस्ट वाले भेटले म्हणून मला उगाचच बरं वाटलं. पण ही भावना फक्त माझीच नव्हती तर सौ. न्यू जर्सी यांनी ती बोलून दाखवली. अरे माणूस माणूस म्हणतात ना तो हाच! रॉबर्टनी आमची चांगली बडदास्त ठेवली होती. त्या दहा-बारा लोकं मावणाऱ्या गाडीत आम्ही फक्त चार जणं होतो व रॉबर्ट पाचवा. थोड्याच वेळात गाडी व्हेगास बाहेर पडली. लक्ष होतं Tuweep. हा खूप दुर्गम, Remotely located towards North Rim of Grand Canyon, असं हे ठिकाण आहे. Tuweep is magnificent! असं मी एका वेबसाईटवर वाचलं होतं. मुळात ग्रँड कॅनियन फार मोठं आहे. याची लांबी 227 माईल्स अर्थात 446 km आहे. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय पाहायचं आहे हे ठरवावं लागतं. मला तीन दिवस काय पाहायचं हे मी काळजीपूर्वक ठरवलं. Tuweep बद्दल जसं मी वाचलं, काही फोटो पाहिले आणि ताबडतोब मी याचा टुर बुक केला. जसं बहिर्जींनी सुरतेचं वर्णन केलं आणि महाराजांनी पोरगी एकदम पसंत करून टाकली तसं मी ही म्हंटलं [Pause]
मकरंद ठेवा लुटण्यासी आला….[Pause]
सुमारे पंधरा मिनिटांच्या रस्त्यानंतर मी मनात स्वतःची पाठ थोपटू लागलो कारण रस्ता सुंदर होता.[Pause]
वाटं वळणाची जीवाला या ओढी
समोरं दिसते नरसोबाची वाडी..

Pictures: https://photos.app.goo.gl/KPb4GbVTEuKrY9wK7

असल्या भावना मनात होत्या. आपण पाहात असलेल्या निसर्ग सौंदर्यानी लोणकढ्या तुपासारखं मन खदखदुन खुसखुशीत झालं होतं! बाबांची सतत आठवण येत होती कारण माझ्या डोक्यात ग्रँड कॅनियन खरतर बाबांनीच भरवली. सुरवातीला मी काही याच्याबद्दल फारसा सिरियस नव्हतो.
रॉबर्ट आम्हाला रस्त्याची, भौगोलिक, जीवशास्त्रिय माहिती सतत सांगत होता. त्याच्या गाडित या भागाबद्दल माहिती देणारी अनेक बहुउंगी-बहुढंगी पुस्तकं होती. त्यातल्या भूगर्भशास्त्राच्या पुस्तकावरून मला आठवलं की मी देखील BSc ला असताना तीन वर्ष भूगर्भशास्त्राचा विद्यार्थी होतो. उदाहरणादाखल Grand Canyon चा अनेकदा उल्लेख सर करत व पुस्तकातूनही येई. हे भूगर्भशास्त्र मनाच्या खोल गर्त्यातून त्या पुस्तकाची पानं चाळतांना बाहेर आलं. मग सहज इथल्या डोंगर आणि टेकड्यांकडे लक्ष गेलं तर त्या डोंगरांचे Land Patterns, Parallel Drain Patterns या प्रकारात मोडणारे होते. सगळंच भूगर्भशास्त्र मी विसरलो नाही याचं मनात बरही वाटलं! बाहेर सगळं शुष्क वातावरण. वर्षाकाठी सरासरी 4 ते 6 इंच पाऊस होतो फक्त. हायवे वाहता असला तरी अमेरिकेच्या इतर हायवेसारखा वाहता नव्हता. विरुद्ध बाजूनं एकट दुकट ट्रक दर्शन देई. बाकी सगळ्या तांबड्या रंगाचा भूभाग. मध्येच टेकड्या, त्यात कुठे लाल दगड तर कुठे चुनखडीसारखा पिवळा. मोठमोठाले दगड-घोंडे लक्ष वेधून घेत होते. लाकडात जश्या रेश्या असतात किंवा Slate जातीच्या दगडात जश्या रेषा असतात त्याचप्रमाणे त्या गुलाबी, तांबड्या, लाल दगडात जमिनीपासून आकाशाकडे ४५ अंशाच्या कोनात त्या रेश्या होत्या. पुस्तकं चाळता-चाळता ‘Reptiles found in Grand Canyon’ या पुस्तकात मला Rattlesnake चे दर्शन झाले. आम्हा डांडेकर मंडळींना 'सापाबद्दल' भयंकर उत्सुकता. तेव्हा मी
रॉबर्टला म्हंटलं "Rattlesnake बघायला मिळेल का?"
तो म्हणाला “शुभ बोल रे नाऱ्या, तर म्हणे मांडवाला आग लागली”
“सॉरी, Your safety comes first, it's a deadly poisonous snake."
मधूनच एखादा गाव येई, मग हिरवळ दिसे. काळपट तांबड्या आणि खुरट्या झुडुपांच्या त्या प्रदेशात ती हिरवळ फारच उठून दिसे. रॉबर्ट फारच उत्तम एटरटेनर होता. मग एका ठिकाणी गाडी भुकेसाठी थांबली. आम्ही टीमसोबत एक फोटो सेशन उरकलेलं. तासाभराच्या प्रवासानंतर गाडी उजवीकडे वळली. कच्चा मुरुमाचा रस्ता, अमेरिकेतही असे रस्ते आहेत म्हणायचे. आमच्या नाचणगावच्या हराळपुरवरून - दत्तापुरुच जणु!
“आकाशात ढगांची दाटी झाली आहे. लालसर पिवळट मुरुमाचा रस्ता समोरच्या डोंगरांना जाऊन भिडला आहे. खुरटी झाडी वाऱ्याच्या तालावर डोलेते आहे. क्षितिजावर काळ-निळं आभाळ लोंबलं आहे. मी भान विसरून गाडीपासून क्षितिजापर्यंत भिरभिरत्या नजरेने चहू बाजू न्याहाळतो आहे. भूगोलात थोडा बदल आहे. काही झाडं आहेत पण असं वाटतंय की यांच्यात काही व्यंग आहे. कारण त्यांची खोडं, फांद्या एखाद्या विशाल वृक्षासारख्या आहे पण उंची जेमतेम चार ते सहा फूट. ती झाडं बोन्सायसारखी वाटतात आहे. ही सगळी झाडं थोडी भयानकही वाटतात. नारायण धारपच्या गोष्टींचं स्मरण होतं. इतक्यातच गाडी थांबते मी झटकन खाली उडी घेतो. रॉबर्ट म्हणतो नशिबात असेल तर रॅटल स्नेक दिसू शकतो. मन म्हणतं
झलक दिखलाजा
एक बार आजा आजा….
काही झुडपं कांद्याच्या पातीसारखी आहेत त्याच्या मधोमध कंद असल्यासारखा बल्ब आहे. म्हणजेच ही झुडपं यात पाणी साठवून घेत असावीत. गाडी सुरू होते थोड्याच वेळात आधी दूर भासणाऱ्या त्या डोंगर रांगेत गाडी शिरते. यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं की हा लोहगड आहे की काय? शेवटच्या चेक पोस्टवर गाडी परत थांबते. रॉबर्ट 10 मिंनीटांची. सुट्टी जाहीर करतो, चेक पोस्टवर तो काही लिखा पढी करतो, सरकारी औपचारिकता. मी सहज मागे वळून पाहतो तर हिरवट जमिनीवरून वळणा-वळणाची पिवळट रंगाची रस्त्याची लकेर आकर्षक दिसते. पार क्षितिजाजवळ धुळीचे थोडके लोट उडवत, एक ट्रक मंद गतीने पुढे सरकतो आहे. मैलोनगणती मनुष्य नाही, औषधालाही दिसत नाही. तांबडी-पिवळी माती थोडी हिरवळ. छाताडावर येणारे डोंगर….”
हा वनविभागाचा शेवटचा नाका होता. इथून पुढे थेर ट्युवीप पण काही म्हणा आतापर्यंतचा प्रवास फुलटू पैसे वसूल होता! आता उत्कंठा शिगेला पोचली होती. ट्युवीप कसं असेल?. इतक्यात काही मंडळी काऊ बॉय सारखी घोड्यावर बसून येताना दिसली. आता गाडी चालवायला रस्ता फारच कठीण झाला होता. रॉबर्टची परीक्षा. अनेक भयानक उतरंडे तर तितकेच भयानक चढाव. डाव्या हाताला कॅम्पिंगचे प्रांगण गेले. थोडेच दूर गेल्यावर समोर काही गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या, तेव्हाच लक्षात आलं की ट्युवीप ट्युवीप म्हणतात ते हेच कदाचित.
रॉबर्टनी गाडी थांबवली आणि सांगितलं की हेच ट्युवीप. समोर बघताच लक्षात आलं की हे जे दिसतं आहे त्याच्या खालून नदी वाहते. सगळेच भराभरा धावत सुटलो आणि थोड्याचं वेळात...

ट्युवीपच्या कड्यावरून

“मी एका उंच कड्यावर उभा आहे. डावीकडून उजवीकडच्या विस्तीर्ण भागातून २५००-३००० फूट खोल धनुष्याच्या आकारात कोलोरेडोमाई वाहते आहे. सगळी जमीन, डोंगर तांबड्या रंगाचे आहेत. समोरच्या नदी पल्याडच्या भागाची उंची जास्त आहे, काही डोंगर भयानक उंच आहेत. त्यांनी आपलं डोकं थेट आकाशालाच भिडवलं आहे. खालची कोलोरेडोमाई स्पष्ट दिसते आहे. तिचा रंग निळसर-हिरवा तर कुठे मातकट दिसतो आहे. मला बाबांची खूप आठवण येते, बाबा का नाही हो व्हिसा काढला? सह्याद्रीच्या पावसाळ्यात नेहमी हिरव वैभव पाहतो आणि पावसाळा संपला की हिरव्याच सोनं होतं! आजच वैभव तांबडं आहे, इतकं की हा मंगळावरील एक फोटो म्हणून सहज खपेल . या तांबड्या रंगात एक प्रकारची झळाळी आहे. लाव्हा रसाचे थर स्पष्ट दिसतात आहे. मनात सहज येतं अरे हा तर सह्याद्रीचा मोठा भाऊ. आता मोठा भाऊ का? कारण, उंची! सह्याद्रीतलं कळसुबाई शिखर ५,००० फुटापेक्षा उंच तर ग्रँड कॅनियन ८,००० फुटापेक्षा जास्ती उंचीला जाऊन भिडते. कोलोरेडोसारखी सतत 450 किमीचा अखंड प्रवास करणारी एकच नदी नाही. असं असलं तरी चारी मुंड्या चीत करणाऱ्या कोकण कड्याला विसरून कसे चालेल? शिवाय इथे कमी भासते ती गडकिल्ल्यांची. इतक्यात मी भानावर आलो, मला पाठीमागून रॉबर्टनी हाक मारली व माझा कॅमेरा मला दिला. माघाशी मी उत्साहात कॅमेरा गाडीतच विसरून आलो. मी आध्यास्यासारखा फोटो घेत सुटतो…”
डावीकडे नजर जाईल तिथपर्यंत डोंगर रंगा होत्या. इतक्यात रॉबर्टनी आमचे लक्ष एका काळ्या उतरंड्याकडे वेधले व म्हणाला हा व्होलकॅनो आहे. पण…. हजार वर्षापूर्वीचा! मी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास सुरू केला. प्रत्येक कड्याचा कोन निराळा. मग प्रत्येक कड्यावर खाली बसून वाकून पाहत होतो. अशा वेळी प्रवासातला एकटेपण जाणवतो. समोरच्या सौंदर्याची प्रतीमाच चेहऱ्यावर उतरलेली असते पण ती व्यक्त करायला कोणीच गडी नसतो किंवा पाठीवर कुणाची थापही येत नाही. कान मात्र “काय मस्त आहे यार!” हे ऐकायला आसुसलेले असतात. फोटो काढून झाल्यावर मी कॅनियनचा मनसोक्त आनंद घेतला. नेत्रात साठवून घेतली. इथला भू-भाग दगड, झाडं, झुडपं सारंच निराळं, जगावेगळं म्हणूनतर जगातील आश्चर्य. रॅटल स्नेक दिसायची १००% संधी आहे पण जरा सांभाळून - रॉबर्ट म्हणाला. काही ठिकाणी लाव्हा वाहिला आणि वाहता वाहता थंड झाला असं स्पष्ट दिसतं. थरांचे बनलेले मोठमोठे दगड-घोंडे स्पष्ट दिसतात. अनेक जातीचे सरपटणारे प्राणी इथे वास्तव्यास आहेत. नाही म्हणायला एक-दोन सरेडे, सापसुरळ्या यांनी दर्शन दिलं. तसेच काही विशिष्ट पक्षी विशेषतः घारी आणि गरुड इथे बघायला मिळतात.
उन सावल्यांचा खेळ सुरू होता. उन पडलं की कॅनियन अधिकच झळाळी मारे!
पाहता पाहता तास-दीड तास गेला. कॅम्पिंग ग्राउंडवर काही मंडळी मुक्काम करणार होती त्यांचा थोडा हेवा वाटला. अशा वेळी गडकिल्ल्यांवर रमणाऱ्या मित्रांच्या टोळक्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. वेळ संपत आली परतीचा प्रवास सुरू झाला.
"पाऊल थकले जड झाले ओझे जिवलगा राहिले रे दूर घर माझे"
असले 'आर्त भाव' कुठल्याही सहलीच्या कार्यक्रमाच्या शेवटी मनात आल्याशिवाय राहत नाही. जड झालेल्या जीवाचं आणि शरीराचं ओझं गाडीत बसवलं. चार तासांचा परतीचा प्रवास गप्पा, व्हिडिओ यात निघून गेला पण हेच व्हिडिओ बघताना मला कळलं की
Death Valley, Red Rock Canyon, Valley of Fire, Zion National Park, Bryce Canyon National Park यासारख्या सुंदर जागा सुद्धा आजूबाजूच्या परिसरात बघण्यासारख्या आहेत.
व्हेगासला पोहोचलो, संध्याकाळी थोडं पायी फिरून हे शहर बघितलं. माझ्या वर्णनापेक्षा या शहराची छायाचित्र जास्त बोलकी आहे. त्या दिवशी पोटोबांची सोय 'चिपोटले' नावाच्या मेक्सिकन रेस्टरांमध्ये बरीटो खाल्ल्या. बरीटो म्हणजे ब्लॅक बिन्सची उसळ, कांदा, टमॅटो, Avacado ची चटणी हे सगळं भातात मिसळून खातात. सँडविचनंतर हे पक्वान्ना पेक्षा कमी नाही.
रात्री उशिरा घरी फोन लावला, बाबांना भरभरून वर्णन केलं व सांगितलं, "आज मी सह्याद्रीचा मोठा भाऊ बघीतला." बाबा म्हणाले आज तुझ्या डोळ्यांनी मी पण Grand Canyon बघितली! अगदी काकाला सुद्धा फोन करून सांगितलं त्यालाही फार आनंद झाला.

Coming Up Next
West Rim – The Western Wonder!

IMG_2533.JPGIMG_2453.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रॉकिज म्हणजे मोठा भाऊ नाही बरं का. वयाचा विचार केला तर आपला सह्याद्री त्याचा भाऊ कशाला, खापर पणजोबा शोभेल. एनिवे, मधून मधून फोटो पेरत जा म्हणजे अजून मजा येईल वाचायला...

Thank you so much!
I tried my level best to insert images.
I have given the pic link, inserting images hre is very undeveloped.

मस्त लिहिलंय.
उत्सुकता, आणि दर्शन झाल्यावर झालेला आनंद शब्दातूनही पोहचतोय.