सफर ग्रँड कॅनियनची: भाग १ - Sea World

Submitted by AD75 on 17 September, 2026 - 00:11

दोन हजार आठ साली जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेव्हा माझ्या वडिलांनी मला निक्षून सांगितलं होतं की ग्रँड कॅनियन आणि नायगारा पाहील्या शिवाय भारतात परत येऊ नको. नायगारा पाहून झाला, तो ही चांगला दोनदा पाहिला. पण ग्रँड कॅनियन बाबत मी काही इतका सिरीयस नव्हतो. प्रोजेक्ट पूर्ण होत आलं होतं, भारतात निघायची तारीखही दोन महिन्यांवर आली. बाबा म्हणाले "तू कसही कर पण ग्रँड कॅनियनला जाऊनच ये, अरे जगातलं नैसर्गिक आश्चर्य आहे". शेवट भारतात यायच्या पंधरा दिवस आधी मी ग्रँड कॅनियन पाहून आलो, अगदी एकटा, माझ्याबरोबर अक्षरश: कोणीही नव्हतं. ग्रँड कॅनियनच्या साऊथ रिमला एका कड्या (मॅथर पॉईंट) वर उभा राहिलो, शेकडो लोक असून त्यात मी एकटा ग्रँड कॅनियनच्या कड्यावर उभा होतो, डोळे विस्फारून-विस्फारून ती निसर्गाची जादू बघितली. मी वेडाच झालो होतो. त्या दिवशी बाबांची खूप आठवण आली....रात्री घरी फोन करून सांगितलं "आज मी सह्याद्रीचा मोठा भाऊ पाहिला!"

मे महिन्याच्या लाँग विकेंडला लागून मी दोन दिवसांची सुट्टी पदरात पाडून घेतली होती. मला या सुट्टीत ग्रँड कॅनियनला जायचे होते. मी अमेरिकेत दाखल झालो ते दोन तीव्र इच्छा मनाशी बाळगूनच; एक म्हणजे नायगारा धबधबा आणि दुसरं म्हणजे ग्रँड कॅनियन. खरतरं ग्रँड कॅनियन हे माझ्या वडिलांनी माझ्या डोक्यात शिरवलं नाही तर सुरुवातीला मी त्याच्याबद्दल इतका काही सिरियस नव्हतो. बाबा म्हणाले होते परत यायच्या आधी काहीही करा पण ग्रँड कॅनियन पाहून ये, अरे जगातील नैसर्गिक आश्चर्य आहे! माझं नशीब थोर म्हणून मला नायगारा छान दोनदा बघायला मिळाला. पहिल्यांदा त्याचं दर्शन झालं ते ऐन थंडीत खालची नदी संपूर्ण गोठली होती. पण त्या गोठलेल्या नायगाराची मजाही काही औरच होती.
एकलाच चलो रे
तसा मी मित्र मंडळी च्या बाबतीत नशिबवान माणूस. मला देवानी बहुतेक मित्र हिंडते-फिरते म्हणजे हिंडाय - फिरायची हौस असणारे दिले. पण इथे अमेरीकेत मात्र मला असा कोणी भिडू मला मिळाला नाही, नाही म्हणायला एक जोडपं होतं; पण, "एकटा जीव सदाशिव" चे फायदे त्यांच्याकडे नव्हते. काही मंडळी तर अशी होती की त्यांना विचारणे म्हणजे "हात दाखवून अवलक्षण करणे." ते न आलेलेच बरे ! आपली सहल कुठे बिघडवता ? म्हणुन मी एकटेच जायचे ठरवले. जशी सुट्टी मिळाली तसा मी कॅनियन मागे लागलो किंबहुना मला कॅनियनने झपाटले! फिर हुआ यु कि मिल बैठे तीन यार "मै, कॅनियन और गुगल. पण खरच या गुगल नावाच्या वेब साईटला मनापासुन शतशः धन्यवाद ! मला कॅनियन मनसोक्त बघायची होती. डोळ्यात भरवुन घ्यायची होती. मी तीन दिवस ग्रँड कॅनियन साठी, एक दिवस सॅन दिएगोच्या सी वल्ड साठी आणि शेवटला दिवस लॉस एंजिलीसच्या 'युनिवर्सल स्टुडीयो साठी राखून ठेवले. खरतर मला पु.लंचं 'मिस्टर सॅन फ्रॅन्सिस्को' बघायचे होते पण सगळं काही मनासारखं होत नाही. सॅन फ्रान्सिस्को हे कॅलिफो -र्नियाच्या बरेच उत्तरेत आहे. सॅन दिएगो हे दक्षिणेत. मी एकटाच असल्याने मला बस किंवा विमान यावर अवलंबून राहावे लागणार होते. माझ्या वेळापत्रकात 'सॅन फ्रेंन्सिस्को कुठेच बसत नव्हते, म्हणून इच्छा नसुन देखिल मला लॉस एंजलिस माझ्या वेळापत्रकात आणावे लागले व सॅन फ्रेंन्सिस्को ला वेळापत्रकातून काढून टाकावे लागले. मग सहल अशी ठरली की बॉस्टन ते लॉस एंजलिस. लॉस एंजलिसला मुक्काम करून सकाळी सी वल्ड ची बस घ्यायची. त्याच दिवशी रात्री लास व्हेगास चे फ्लाईट घ्यायचे. तीन दिवस तिथेच राहुन ग्रॅंड कॅनियनचे टूर करायचे. चवथ्या दिवशी सकाळचे फ्लाईट घेउन प्रथम लॉस एंजलिस व 'युनिव्हर्सल स्टुडीयो' बघुन बॉस्टनला परतायचे. व्हेगास हे मोठे पर्यटन केंद्र असल्याने तिथून बॉस्टन चे फ्लाईट फार महाग. त्यामुळे पुन्हा लॉस एंजलिसला येणे भाग पडले.

दोन जीन्स आणि चार टी-शर्ट घेतल्या. मी शुद्ध शाकाहारी प्राणी म्हणुन मुद्दाम इंडियन स्टोअरमध्ये जाउन चिवडा, चितळेंची बाकरवडी, (अमेरीकेत बाकरवडी खायला मिळणे म्हणजे चैन आहे चैन!) आणि हल्दिरामची शेव आणली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा कॅननचा SLR कॅमेरा घेतला आणि मी कॅनियनवर स्वारी करायला सज्ज झालो.
"पाठिवरती बि-हाड विंचवाचं चाललय.
थांबायच नाय गड्या आता थांबायच नाय…."

बॉस्टन ते Sea World

विमानाची तिकीटं बुक करुन झाली, टूर बुक करून झाले, सगळे पैसे अर्थात $ देउन झाले. अमेरीकेच्या पूर्व किनाऱ्यावर रोड आयलँड नावाचे सगळ्यात छोटे राज्य आहे यात वुनसॉकेट नावाचे एक छोटे शहर आहे, शहर नाही Town आहे!. Hachi (9 वर्ष रोज न चुकता, मरेपर्यंत आपल्या देवघरी गेलेल्या मालकाची वाट पाहणारा हा इमानदार कुत्रा!) या चित्रपटात जे Railway Station aahe ते Woonsocket Railway Station! याच शहरात मी सव्वा वर्ष राहिलो. इथून बॉस्टन तासाभरा -च्या अंतरावर आहे. आता लॉस एंजलिसला जायचे म्हणजे पूर्वे कडून पश्चिमेला जायचे, संपूर्ण अमेरीकाच ओलांडायची होती. बॉस्टनहुन माझे विमान संध्याकाळी साडेसहा ला होते व रात्री साडे नऊ ला सहा तासाचा प्रवास करत लॉस एंजलिस येथे पोचणार होते. ठरल्या प्रमाणे सगळं पार पडल. लॉस एंजलिसला हॉटेल मध्ये पोचलो, ते चक्क गुजराती माणसाचे हॉटेल निघाले. पिझ्झावर पोट भरून रात्री छान ताणून दिली. सकाळी आठच्या ठोक्याला सी वल्ड टुरची बस हजर झाली. मी ड्रायव्हरला मला रात्री साडेनऊला फ्लाईट पकडायचे आहे असे सांगितले तर त्यानी मला अशी रिस्क घेऊ नका असा सल्ला दिला कारण संध्याकाळी सॅन दिएगो ते लॉस एंजलिस खूप ट्राफिक असतो त्यामुळे ट्राफिक जामही होतो, फ्लाइटही चुकू शकते. शेवटी मी माझे सी वल्ड चे तिकीट त्याच्याकडून घेतले व रेंटल गाडी घेउन सी वल्डला जायचे ठरवले. पण या सगळ्यात 52$ चा भुर्दडं मात्र मला सोसावा लागला. मी रेंटल गाडी घेऊन एकटाच सी वल्ड कडे निघालो व विचार केला की ती बस साडे-पाच ला सी वल्ड सोडते तर आपण साडे तीन-चार पर्यन्त तिथुन निघु व ट्राफिकमध्ये अडकुनही वेळेत विमानतळावर पोहचु.
मला गाडी चालवायचा भयंकर कंटाळा आहे आणि एकटं गाडी चालवणं तर विचारता सोय नाही. शेवटी...
अडला हरी गाढवाचे पाय धरी
तेव्हा माझ्याजवळ Sony Ericsson चा Walkman Series चा फोन होता त्याच्यावर काही गाणी होती ती गाणी लावली. त्या गाण्यांबरोबर कधी मीही गात होतो….
मुसाफिर हू यारो न घर है ना ठिकाना…
मी माझा जी. पी. एस. (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, पत्ते (रस्ता) दाखवणारी मशीन) घेतली होती अमेरीकेत पत्ता कोण दाखवणार? म्हणून ही मशीन सतत सॅटेलाईट -च्या संपर्कात राहुन क्षणा क्षणाला नकाशा अपडेट करून दाखवते. तेव्हा Smart फोन नव्हते iPhone नुकता आला होता!, LA ते San Diego रस्ता रहदारीचा आहे, शिंदी सारखी झाडं, शुष्क आणि थोडं वाळवंटी वातावरण मला जाणवलं. साधारण सव्वा ते दीड तासात Sea World ला पोचलो.
सी वल्ड म्हणजे एक अजब जागा, जलचरांचे झू! पण हा नुसता झू नसून, ते प्राणी अनेक करामाती पण करून दाखवतात. त्यांच्या त्या खेळाचे वेळापत्रक म्हणजे Time Table असते. इथलं सगळ्यात प्रसिध्द जर काही असेल तर ते आहे, श्यामु! म्हणजे किलरव्हेल जातीचा देव मासा. सगळे श्र्वास रोकुन आणि प्राण डोळ्यात एकवटुन हा शो बघतात. त्याचं शब्दात वर्णन करणे फार कठीण. या श्यामुसाठी एक प्रचंड तलाव बांधला आहे. त्यात ते अजब कर्तब करून दाखवतात.
श्यामु शिवाय मी इथे आणखीन एक खेळ पाहीला तो म्हणजे 'Pet Rule'. कुत्री, मांजरं, बदकं असे त्या खेळात सामील झाले होते. कुत्रा, मांजरांना शिकवणे समजु शकतो पण डुकरांना आणि बदकांना कसे शिकवले असेल? हे पेट स्टेडीयम पण छान सजवले होते. कुत्रा- मांजरांची मोठ्ठाली छायाचित्र होती, व्यासपीठावर काय सांगावे? कुठे मनीमाऊ येते तर अचानक दुडु-दुडु धावणारा तांबड्या रंगाचा Labrador जातीचा मोत्या आपल्या समोरुन निघुन जातो मग त्याच्या पाठोपाठ त्याची 'गर्ल फ्रेंड' येते. मोत्या आणि त्याची मालकीण एकाच दोरीवर उड्या मारतात. झाडाच्या ढोलीतून मनीमाऊ येते क्षणार्धात एका खांबावर चढून, एका दोरीवरून पलीकडे जाते. एव्हड्यात तिला शोधत तिचा मालक येतो, तिला या बाजूला बोलावतो. ती ऐकत नाही, पण शेवट जड अंत:कारणाने येते आणि खांबाच्या पायरीवरून मालकावर उडी घेते. तांबड डुक्कर डुरुक-डुरुक आवाज करत इकडून तिकडे पळतं. सारा समूह हर्षित होतो आणि आबालवृद्धांच्या टाळ्या घेतो. पेट शो संपेपर्यंत चांगले दोन-अडीच वाजले होते. माझा छायाचित्र घेण्याचा सपाटा सुरू होता. SLR घेतल्याचा आनंद मनात खदखदत होता!

Sea World ते Vegas

उरलेलं Sea World भरभर पाहत सुटलो. एक Dolphin show बघितला, Dolphin त्यांच्या trainer बरोबर, trainer जसं करेल तसं हुबेहूब त्या करतात. अंतरीचा तळीराम हाका मारू लागला, तसं आजूबाजूला काय खायला मिळेल याचा शोध घेतला. एक छोटं Sandwich शॉप दिसलं. आज पोटोबांची सोय काही नीट लागते की नाही? असं वाटलं. व्हेज सँडविच संपून गेले होते. मग रेस्तराँ वाल्या बाईंनी "Oops We are so sorry" म्हणत केवळ मला माझ्यासाठी Veg. Sandwich बनवून दिलं! अगदी आजी जसं विचारते छान दहीभात कालवते थोडा, घेतो का? याच भावनेनी त्यांनी मला थोडी spaghetti पण दिली! बाईंना मी मनःपूर्वक धन्यवाद दिले. अतिथी देवो भव, या धर्माचं त्यांनी कसोशीनं पालन केल! अमेरिकेत सहसा कुठल्याही स्टोअरमध्ये जा, कर्मचऱ्यांच्या कपाळावर आठ्या नाहीत; वेळेप्रमाणे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, इव्हिनिंग करणार, सगळी कामं हसतहसत! Store मधून निघतांना हॅव अ गुड नाईट! गुड डे! किवा Have a nice विकेंड म्हणायला विसरत नाही. मी एक थंडगार कॉफी घेतली, मला तासभर गाडी चालवायची होती. कंटाळवाण्या ड्रायव्हिंगव्यतिरिक्त डोक्यामागे हा दुसरा उद्योग हवा होता, म्हणजे झोप येणार नाही!

सी वर्ल्डहून निघालो, थोडाच पुढे जात नाही तर ट्रॅफिकमध्ये अडकलो, पोटात गोळा आला "फ्लाइट मिस झालं तर" भयंकर ट्रॅफिक, होता. पण इथे लोकं गाडी शिस्तीत चालवतात. मी वेळेत लॉस एंजेलिसला पोहोचलो, हॉटेलवर जाऊन बॅग घेतली व रेंटल गाडी परत करायला गेलो.

या रेंटल वाळ्यांची सेवा फार उत्तम. मस्त नवीन कोऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या हे लोक ठेवतात. त्या फार कमी चाललेल्या असतात. मला एकदा फक्त 3000 माईल चाललेली गाडी चालवायला मिळाली होती. रेंटल कंपनीचे ऑफिस विमानतळाच्या खूप जवळ असते. विमानतळावरुन आणायची व सोडून दयायची उत्तम सोय असते. 'इंटरप्राइज' हे या रेंटल कंपनीचे नाव. अश्या अमेरीकेत तीन-चार कंपन्या आहेत. विमानतळावर पोचलो तर साउथ वेस्टचे विमान तासभर लेट, छान! पण विमानतळ किव्वा रेल्वे स्टेशन या कंटाळा यायच्या जागा नाहीच मुळी. मग ते भारतातले असो की आणिक कुठले. अजागळ बंड्या पासुन तर सुटाबुटातील साहेबापर्यन्त, सगळे लोक बघायला मिळतात. पण हे लॉस एंजलिस शहर आणि हे विमानतळ मला काही फारसे आवडले नाही. अमेरिकेच्या मानाने हे विमानतळ फारच अस्वच्छ. शहर ओंगळवाणे!

अमेरिका या शब्दाचा अर्थ स्वयम् सेवा अर्थात सेल्फ सव्हिस होतो की काय कुणास ठाऊक? आपला बोर्डींग पास आपणच प्रिंट करायचा. तिकीटाचा पी.एन.आर. असला की झालं! आपल्या विमान कंपनीच्या टेबल जवळ जायचं तिथल्या मशीनमध्ये तो पी.एन.आर. किंवा कन्फरमेशन कोड टाकायचा नाव टाकायचं की मशीनबुवा आपली माहिती पटा-पटा लिहुन घेतात. खात्री झाली म्हणजे मशीनच्या पोटातुन एक कागद बाहेर येतो हाच बोर्डींग पास. पण प्रत्येक विमान कंपनीच्या सेवेत फरक असतो. बरेचदा याच्यावर जरी बोर्डींग पास लिहिलेलं असलं तरी हा प्रत्यक्षात बोर्डींग पास नसुन तुम्ही आले आहात याची नोंद असते. विमानात बसायच्या आधी ज्या दरवाजावर तुमचे विमान लागले असते, त्या दरवाज्यावर तुम्हाला खरा बोर्डीग पास मिळतो. बॉस्टनहुन निघताना असच झाल. मशीननी दिलेला एक बोर्डिंग पास घेउन दारावर पोचलो तर तिथे लोकांच्या नावाचा पुकारा सुरु होता. सगळी मंडळी पास घेउन विमानात बसायच्या रांगेत उभी राहु लागली. आमच्या नावाचा पुकारा काही शेवटपर्यन्त झाला नाही.

“तव्हा शेवटले चार-दोन प्याशिंजर शिल्लक व्हते म्हणुन म्या इच्चार केला का साहेबानं आपलं नाव काहुन घेतलं नाय ? मग दबकत दबकत टेबलवाल्या साहेबापाशी गेलो. हातात असलेला कागद समोर केला तर साहेब म्हणते कसा, Thats why we were calling you! आत्ता घ्या, आली का पंचाइत म्हणजे शाहेबानं आगोदर आपलं नाव पुकारल असनार. या अमेरीकन लोकायले लै वाईट सवय हाय, अ-मो-ल दा-ण्डे-क-र असं चांगलं भारदस्त नाव अस्तातांना यानं म्हणलं असल ए. मोल... दंदे-कर... पुन्हा आपलं हसं झालं"

गप गुमान बोर्डींग पास घेउन रांगेत उभा राहीलो. साउथ-वेस्टचे विमान म्हणजे आपल्याकडील एस.टी. छापच होतं! काहीका असेना घेउन जाताय ना लास व्हेगासला मग धन्यवाद!
व्हेगासला उतरून बाहेर आलो. सात डालर मध्ये हॉटेलवर घेउन जाणारी मीनी बस होती, त्याच्यात बसलो. बाहेर फारच गरम होत नागपुरच्या उन्हाळ्याची आठवण झाली. सोयी काय असतात? व त्या कश्या कराव्या हे इथं पाहावं! कोणालाही विचारावं लागत नाही आणि विचारलच तर आनंदांनी सांगतात. त्यांना माहीत नसेल तर थोडे ओशाळुन दिलगीरी व्यक्त करतात आय.एम सॉरी म्हणतील. अंगावर खेकसणार नाहीत. मी हॉटेलच्या वेब साईट वर विमानतळावरून हॉटेलला कस यावं हे वाचलं होतं. व्हेगास शहर म्हणजे रंगेली करण्याचे शहर! बस हळुहळू शहराच्या मुख्य भागाकडे सरकू लागली. संध्याकाळी साडे-सात आठ च्या सुमारास चिडीचूप होणाऱ्या अमेरीकेत हे शहर मात्र अपवाद. लोक जथ्या-जथ्याने हिंडत होते. हॉटेल चे देखावे पाहात होते. शेवटी मी हॉटेलमधील माझ्या खोलीत दाखल झालो रात्रीचे साडे बारा-एक वाजलेला. मला भुताखेतांची- चेटकी - हडळींची प्रचंड भीती वाटते. शिवाय ही अमेरीकन भूत अगम्य अश्या इंग्रजीत बोलणारी! मी खोलीत पोचल्यावर दिवाबत्तीची सोय पहिली. बाकी अमेरीकन लोकांच उजेडाशी वावडं आहे. क्षीण पिवळे बल्ब लाउन ते अख्ख आयुष्य काढतात. उलट आम्हाला पांढरा स्वच्छ आणि लख्ख उजेड पडला नाही तर सुचत नाही. मी होते, नव्हते ते सगळे दिवे लाउन, AC चे कान पिळगाळून चादर ओढून झोपी गेलो!

Pictures: https://photos.app.goo.gl/aUcStddFohta9EWt9

Next
A unique untouched part of the Grand Canyon: The Thrilling Tuweep!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults