अजून काही अजून काही

Submitted by पुरंदरे शशांक on 2 October, 2026 - 00:10

अजून काही अजून काही

पहाटवेळी आभाळभाळी
लख्ख चमकली शुक्र चांदणी
शिरशिर अंगी वाढत सांगे
अजून काही अजून काही

बिंब रवीचे ढगात लपते
पुन्हा झळकते उन सोनेरी
शिडकावा येताच ओंजळी
अजून काही अजून काही

मंद मोगरा ग्रीष्मी उधळत
गुलाब फुलला पानोपानी
आम्रतरुचा मोहर सांगे
अजून काही अजून काही

शरद चांदणे हळु पसरले
वेलि बागा मना बिलगले
तरुतळीची वाट अंथरे
अजून काही अजून काही

लिहिता लिहिता विसरुन जाते
लिहायचे ते हरवून काही
मनात उरते सांगायाचे
अजून काही अजून काही

अजून काही अजून काही.......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर कविता! "अजून काही" ही ओळ कमतरतेची किंवा अतृप्ततेची नाही, तर आनंदाची आणि अनुभवांची सतत समृद्ध होत जाणारी साखळी वाटली.