अजून काही अजून काही

Submitted by पुरंदरे शशांक on 2 October, 2026 - 00:10

अजून काही अजून काही

पहाटवेळी आभाळभाळी
लख्ख चमकली शुक्र चांदणी
शिरशिर अंगी वाढत सांगे
अजून काही अजून काही

बिंब रवीचे ढगात लपते
पुन्हा झळकते उन सोनेरी
शिडकावा येताच ओंजळी
अजून काही अजून काही

मंद मोगरा ग्रीष्मी उधळत
गुलाब फुलला पानोपानी
आम्रतरुचा मोहर सांगे
अजून काही अजून काही

शरद चांदणे हळु पसरले
वेलि बागा मना बिलगले
तरुतळीची वाट अंथरे
अजून काही अजून काही

लिहिता लिहिता विसरुन जाते
लिहायचे ते हरवून काही
मनात उरते सांगायाचे
अजून काही अजून काही

अजून काही अजून काही.......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर कविता! "अजून काही" ही ओळ कमतरतेची किंवा अतृप्ततेची नाही, तर आनंदाची आणि अनुभवांची सतत समृद्ध होत जाणारी साखळी वाटली.

मला तरी या कवितेचा अर्थ - कितीही शब्दात मांडा, काहीतरी दिव्य असे निसटू पहाते - असा लागला. प्रत्यक्ष निसर्ग - लॉस्ट इन ट्रान्स्लेशन.

छान कविता.
अजून काही अजून काही..हे फार सटली आले आहे.. ( सॉरी. सटली ला समर्पक मराठी शब्द सापडत नाहीये) ..त्यातून हाव जाणवत नाही... Happy

सटल - फुलपाखराच्या पंखांवरील वर्खासम Happy
पण होय, शब्द नाही सापडत.
----------------
वर्ख सटल नसतो म्हणा. पण तितकं हळूवार आणि अध्धर, नाजूक.

अस्मिता, Happy
छान आहे.
अलवार शब्द मराठी आहे का मूळचा? फारसी वाटतो!