पाककृती स्पर्धा २ - फ्रेश फ्रुट केक, फसवा - अनामिका.

Submitted by अनामिका. on 26 September, 2026 - 00:44

नमस्कार. _^_
ह्या स्पर्धेची घोषणा झाली तेव्हाच ठरवले कि शक्य झाले तर या स्पर्धेत भाग घ्यायचाच पण पदार्थ सुचत नव्हते. आई म्हणाली तिखट मोदक किंवा मटार करंजी करतेस का तर मी नको म्हणाले. नेहमीचे पदार्थ सोडून काहीतरी वेगळे हवे होते. मग जाऊदे नको घेऊया म्हणून रद्द केले आणि एका प्रवासात हा पदार्थ आठवला. जरा शोधाशोध करून रेसिपी आणि साहित्य पाहिले. दहीवडा / दही भल्ला तसाही केला / खाल्ल्या जातोच पण त्याचे रूप पालटून करायचा होता.
दही मुख्य कलाकार आणि मी अनंत चतुर्दशीच्या आदल्या संध्याकाळी घरी पोचणार होते तर कसे करूया म्हणून आईला विचारले कि तू मदत करशील का? (जी ती नेहमीच करत असते, पण तरी ::D:)
तर हा जो फसवा फ्रुट केक मी इथे सादर करतेय त्यामध्ये मी आणि आई दोघी सहभागी आहोत.

साहित्य -
१. मूग आणि उडीद डाळ - २ मध्यम वाट्या
२. दही - १ ते १.५ लिटर दुधाचे
३. पिठीसाखर आणि साधी साखर (२ छोटे चमचे)
४. साधे मीठ
५. काळे मीठ
६. जिरेपूड, लाल तिखट
७. चिंचेची चटणी
८. हिरवी चटणी
९. खारी बूंदी - सजावटीसाठी
१०. फळे - डाळिंबाचे दाणे, सफरचंद, पेअर आणि अननस बारीक चिरून.
११. इनो - १ पुडी
१२. पनीर - ३ छोटे क्यूब (ऑप्शनल)

कृती -
१. आदल्या दिवशी रात्री दोन्ही डाळी ४ ते ५ पाण्याने स्वच्छ धुवून भिजवून ठेवल्या.
२. दही जमवले.
३. सकाळी डाळी पाण्यातून उपसून गंध वाटून घेतल्या आणि बीटरने ते मिश्रण छान हलके होईपर्यंत फेटले. वाटीत पाणी घेऊन त्यात जर ह्या मिश्रणाचा गोळा सोडला आणि तो पाण्यावर तरंगला तर मिश्रण हलके झाले आहे असे समजावे.
IMG_8024_under100kb.jpg

४. सकाळीच एकीकडे दह्याचा चक्का लावून घ्यावा.
५. आता फेटलेल्या मिश्रणात थोडे मीठ आणि इनो घालून एकत्र करून केक टिन मध्ये केक वाफवायला ठेवला.
साधारण २० मिनिटात हा केक तयार होतो.
एकीकडे साखरेचे पाणी तयार करून घ्यावे.
IMG_8027_under100kb.jpg

६. केक थंड झाल्यावर मधून कापावा आणि त्यावर साखरेचे पाणी घालावे. साधारण मध्यम आकाराच्या वाटीने पाऊण वाटी पाणी पुरते.
मी तीन भाग केले केकचे.
IMG_8029_under100kb.jpg

अनंत चतुर्दशीच्या दिवस, गणपती विसर्जन, स्वयंपाक, जेवणं आणि हा केक करेपर्यंत दुपार झालेली.
"ए, तू आज परत काय करते आहेस? काहीतरी इंटरेस्टिंग दिसतंय." ह्या नवऱ्याच्या प्रश्नाचा रोख ओळखून, "अरे, मी आजची संध्याकाळ मायबोलीला देणार आहे, राहिलेल्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी." असे चमत्कारिक उत्तर दिले. "मग दुपार कुणाला देणारेस?" "अर्थात मायबोलीला." असे मी मनातच म्हणाले ::D: आणि वर्किंग डे असल्याने ऑफिसची काही अर्जंट असलेली कामे करायला घेतली. तोपर्यंत चक्काही छान तयार झाला.

संध्याकाळी केक असेम्बल करायला घेतला.
७. तयार चक्का आणि थोडे हातानेच कुस्करलेले पनीर एकत्र करून बीटरने छान फेटून घेतले. सॉफ्ट पिक्स बऱ्यापैकी आल्या.
IMG_8039_under80kb.jpg

८. दोन केकमध्ये चक्क्याच्या मिश्रणाचा एक थर द्यावा. त्यावर चिंचेची चटणी आणि थोडी हिरवी चटणी पसरवावी. केकचा दुसरा भाग वर ठेवून परत तीच प्रोसेस रिपीट करावी. ह्यात मी थोडे फळांचे तुकडे घातले आहेत. पण ते नाही घातले तरी चालतात.
IMG_8043_under100kb.jpg

९. आता सगळ्यात वरच्या आणि बाहेरच्या भागाला चक्क्याच्या मिश्रणाने आयसिंग करायला घ्यावे. आणि हवे तसे सजवावे. फसवा फ्रेश फ्रुट केक तयार आहे.
IMG_8045_under100kb.jpg

खायला घेतांना ह्यावर जिरेपूड, लाल तिखट, आणि आणखी दही वाढून घ्यावे.
IMG_8054_under100kb.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणीतरी हे करेल (किंवा करावे) असे वाटत होते.
दहीवडा केक बेस्ट.

फसवणूक कोशंट = high sir (ma’m) 🫡

प्लेटिंग, सजावट, surprise element सगळेच जमून आले आहे.

काय सुंदर सुंदर एन्ट्री येतायत या स्पर्धा कॅटेगरी मध्ये!!
मला हा खायचाय.एकदम पाहिला की उचलून तोंडात टाकावा वाटतोय.

Wow
खूप yummy पाककृती आहे ही
हवाय मला

खतरनाक ! आणि कल्पक
मायबोली लिहिलेली एक्स्ट्रा एफर्ट प्लेट सुद्धा मस्त!

यावेळी कोणाला मत द्यायचे हा गोंधळ वाढत चालला आहे. काही ठरवावे आणि अशी एन्ट्री यावी. एकापेक्षा एक वरचढ..

यावेळी कोणाला मत द्यायचे हा गोंधळ वाढत चालला आहे. काही ठरवावे आणि अशी एन्ट्री यावी.
>>>
अगदी!
मला दहीवडा एवढा आवडतो की मी सारखी येऊन इथे बघुन जाते आहे

स्वानंदी१ - जर साखरेचे पाणी साखरेमुळे वगळणार असाल तर नुसते कोमट पाणी तरी वापरा. आपण तळलेले दहीवडे जसं कोमट किंवा साध्या पाण्यात भिजवून पिळून काढतो ती स्टेप आहे ही. त्यामुळे केक / दहीवडा मस्त मुरतो आणि चव खुलते.

हेहे अनामिका, खरंच एकदा हा केक गटग प्लॅन करायला हवे.
ही आयडीया अतिशय आवडलेली आहे.दहिवडा आवडता. अश्या स्वरूपात दिला तर थोडी भारतीय पेक्षा पाश्चात्य पदार्थ जास्त आवडणारी टीनेजर्स पण उचलून तोंडात टाकतील.
नुसता पाण्याचा स्प्रे पण चालेल.

जबरदस्त ट्विस्ट.
प्लेटिंग, प्रेझेंटेशन, सजावट आवडली.
Innovative.

आता अशा फसव्या पदार्थांसाठी एक विशेष गटग आयोजित केलं पाहिजे आणि सगळ्या फसवणूककर्त्या मंडळींकडून ते पदार्थ सादर करायची (घरून करून आणून - म्हणजे गप्पांना पण वेळ पुरेल अशी) अट ठेवली पाहिजे Proud
संबंधितांनी मनावर घेणेचे करावे Wink

Pages