पाककृती स्पर्धा १- sonalisl - दुधी भोपळा

Submitted by sonalisl on 25 September, 2026 - 18:28

मुख्य पदार्थ : मस्त दुधाळ रंगाचा दुधी भोपळा.

ताजेपणाची ओळख: भोपळ्याचा रंग दुधाळ-हिरवा असावा आणि त्यावर जास्त डाग नसावेत. नखाने दाबून पाहिल्यास तो सहज दाबला गेला पाहिजे, म्हणजेच तो कोवळा आहे.
आरोग्यासाठी वरदान : दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. याचा रस किंवा भाजी वजन कमी करण्यासाठी, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.
नेहमी दुधी वापरण्यापूर्वी त्याचा तुकडा चखून पहावा; जर तो कडू लागला तर त्याचा वापर अजिबात करू नये.

मी केलेले पदार्थ : भजी, धपाटे, हलवा
प्रथम दुधीची साल काढून तो किसून घेतला. मग त्याचे तीन वाटे केले. हलव्यासाठी जो वाटा घेतला, त्याचा रस काढून तो धपाटे करायला वापरला.
मिक्सरच्या छोट्या भांड्यात ७-८ हिरव्या मिर्च्या, लसूण आणि जीरे वाटून घेतले.

भजी :
किसलेल्या दुधीत चवीनुसार मिर्चीचे वाटण, मीठ, ओवा, हिंग, हळद, भरपूर बारीक चिरलेला कडीपत्ता घालून भजी तळून घेतली. कोथिंबीर चटणीत थोडे सावर क्रिम घालून ते भजीबरोबर मस्त लागते पण मी येथे केचअप घेतले आहे.

धपाटे :
किसलेल्या दुधीत बारीक चिरलेला कांदा, मिर्चीचे वाटण, तीळ, हळद, हिंग, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिसळून घेतले. त्याला पाणी सुटायला लागते. मग त्यात दुधीचा रस, छोटी वाटी ज्वारीचे पीठ, १/२ वाटी तांदळाचे पीठ आणि मावेल तसे बेसनाचे पीठ घालून ते सैलसर मळून घेतले.
एक कॉटनचा कपडा पाण्यात ओला करून घेतला. पिठाचा एक छोटा गोळा घेऊन ओल्या कपड्यावर ठेवून हाताला पाणी लावून तो गोळा थापून मध्यम आकाराचे धपाटे तयार केले.
तापलेल्या तव्यावर थोडे तेल सोडून त्यावर धपाटा उलटा करून कपडा अलगद काढला. दोन्ही बाजूंनी खमंग आणि सोनेरी रंग होईपर्यंत तेल लावून चांगले भाजून घेतले. हे दह्याबरोबर मस्त लागतात.

दुधीचा हलवा :
तुपावर दुधीचा किस परतत त्यात कंडेन्स मिल्क, सुका मेवा (बदामाचे काप, काजूपिस्ताची भरड, भोपळ्याच्या बिया) आणि वेलची पावडर घातली. मिश्रण घट्ट होत आल्यावर गॅस बंद केला.
आता ही आपली दुधीची मिनी थाळी तयार!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! दुधीचे पराठे, धपाटे, भजी, हलवा सारे आवडीचे.
फक्त भाजी त्याची बिलकुल आवडत नाही.
तीच यात नसल्याने पूर्ण ताट उचलतो Happy

Non glamorous दुधीचे तीन तीन प्रकार केलेत तुम्ही.

जय हो !

धपाटे, हलवा होतात वरचेवर. दुधीची भजी कधी केली/खाल्ली नाहीत. करून बघणार 👍

….वापरण्यापूर्वी त्याचा तुकडा चखून पहावा; जर तो कडू लागला तर त्याचा वापर अजिबात करू नये….

+ १

अनुभवाचे बोल.

भारीच
मी वाट बघत होते इथे दुधी कधी येणार याची.