पाककृती स्पर्धा क्रमांक ३ : सुगंधित मोसंबी सरबत - ऋतुराज.

Submitted by ऋतुराज. on 25 September, 2026 - 08:48

सुगंधित मोसंबी सरबत

यंदाच्या गणेशोत्सवात एकतरी पाककृती करायची म्हणजे करायची असे सुरुवातीपासून ठरवूनसुद्धा आज मुहूर्त लागला.
का? तर आज शेवटचा दिवस म्हणून Lol
हापिसातील कामे (ह्यांना एक सणासुदीला चेव येतो) मग घरचा गणपती - गौरी यातून आज वेळ मिळाला. पण पाकृ टाकायचीच, नाहीतर उगीच "गेले करायचे राहून " मधील एक गोष्ट वाढायची.
स्पर्धेसाठी एवढ्या चांगल्या आणि चवदार रेसिपी आल्यावर मी वेगळे काय करणार म्हणा. तसं पेयासाठी फळ आणि मसाला ठरवणं अगदीच सोप्प. पण त्यात फुल पण हवं. आणि तिथे नेमकी गाडी अडली.
गुलाब, गोकर्ण, जास्वंद यासारख्या बिनीच्या शिलेदारांना सगळ्या हुशार सुगरणींनी आधीच वापरून टाकले होते.
मग आणखी कोणती फुले वापरता येतील असा प्रश्न पडला. अंबाडीच्या फुलांचे सरबत झकास होते पण ती फुले आता उपलब्ध नव्हती. त्याची पावडर होती पण ती चालेल का नाही हे ठाऊक नव्हते. तसा पळसाच्या फुलांचा चहा / सरबत पण माझ्या डोक्यात होता पण ती फुले सुद्धा आता ह्या ऋतूत कुठून आणणार. आंबेमोहोर (तांदूळ नाही हो) वापरून पण एक पेय करतात असे ऐकले होते पण तो सुद्धा आता उपलब्ध नाही. इतरांनी आधी वापरलेली फुले वापरायची नव्हती . मग परवा अचानक मंदिरात गेलो असताना गडव्यात तीर्थ ठेवले होते ते चमच्याने हातावर घेतले आणि प्यायलो आणि तिथेच "युरेका" असे झाले. त्या गडव्यात डोकावून पाहीले तर त्यात सोनचाफ्याचे फूल होते. ठरलं तर मग.

साहित्य:
Screenshot_20260925_163023_Gallery.jpg

मोसंबी -
ही चांगली गोड, पिकलेली पाहून घ्या. आमच्याकडे बाजारात गेल्यावर फळांकडे पाहिले की लगेच तो फळवाला "साब आओ, लेलो जो मंगता हय वो, सब मीठा हय" असे म्हणतो आणि आम्हाला फसवतो. बरेचदा ती मोसंबी घरी आल्यावर आंबट निघतात नाहीतर सपक असतात. ती खाल्य्यावर घरचे माझ्याकडे बघून तोंड सुद्धा अगदी तसेच करतात. ह्यावेळी मी चांगली मोठी फळे बघून आणली. निवडताना तोच काढून देत होता. मी म्हटले "रुको, मै चुनता हूं , वो मत डालो ये डालो ". मग तो पण म्हणतो "ठीक हय, आपका भी बराबर हय. आप ले रहे हो तो आपका भी चॉईस रेहेना चाहिए". घराबाहेर आपलं असं कुणीतरी सांगितलेलं ऐकलं की बरं वाटत.

सोनचाफ्याची फुले - दोन किंवा तीन. फुले ताजीच हवीत, बाजारातून आणली तरी उगीच मरगळलेली, निस्तेज आणू नका. आपल्याला त्याचा सुगंध हवा आहे. काही ठिकाणी दहा- दहा फुले व्यवस्थित प्लास्टिक पाकिटात मिळतात. कोणाच्या दारात, सोसायटीत झाड असेल आणि त्याची ताजी फुले मिळाली तर उत्तम.

वेलदोडे पूड - आवडीनुसार

केशराच्या काड्या - २- ३ (ऐच्छिक) (फोटोत नाही. फोटो काढताना विसरलो)

साखर - मोसंबी किती गोड निघतात त्यावर अवलंबून आहे.

कृती:
प्रथम सोनचाफ्याच्या दोन फुलांच्या पाकळ्या काढून घ्या. फुलाचा मधील भाग आणि देठ आपल्याला वापरायचा नाही.
ह्या पाकळ्या धुवून एक अर्धी वाटी पाण्यात झाकून ठेवा. हेच पाणी सुगंधित होईल, हेच आपल्याला वापरायचे आहे. केशर वापरायचे असेल तर यात आताच टाकून ठेवा.

आता मोसंबी सोलून घ्या. इथे मायबोलीवर काही कळले नाही की लगेच "संत्रे सोला" असे म्हणतात प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त कठीण मोसंबी सोलणे आहे. त्यातील फोडींच्या पांढऱ्या साली, आतील बिया नीट काढून टाका. त्या राहिल्यास रस कडवट होऊ शकतो आधीच सांगतो "फिर मत केहना ऋतुराज आपने बताया नहीं" सोलता सोलता (फक्त) एक दोन फोडी खाऊन नक्की तुम्ही गोड मोसंबी आणल्या आहेत का याची परत खात्री करून घ्या. आता त्या गोड नसतील तर नाविलाज आहे. मनात साखर किती लागेल गणित करायला सुरवात करा.

आता त्या फोडी मिक्सर मध्ये टाकून त्याचा रस करून घ्या, तदनंतर तो व्यवस्थित गाळून घ्या.

आता त्यात चवीनुसार साखर टाका. यात वेलदोड्याची पूड टाका आणि ते सुगंधी, केशरी पाणी टाका. आता हा रस नीट ढवळून तसाच १०-१५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
आता यातील पाकळ्या काढून तो सर्व्ह करा. झाला तयार सुगंधित मोसंबी सरबत.
Screenshot_20260925_163055_Gallery.jpgटिपा:
सोनचाफ्याची फुले जरा कडवट असतात. त्यामुळे ती फक्त पाण्यात टाकून, झाकून ठेवायची आहेत.
या पाकळ्यांना गरम पाण्यात ठेऊ नये किंवा पाण्यात उकळू नये यामुळे त्यांचा कडवटपणा पाण्यात उतरतो.

ऋतुराज.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे खरेच चवीला चांगलं लागतं का? कारण वैज्ञानिक दृष्ट्या सोनचाफा व त्याचा अर्क वा रस हा खाणं योग्य नाही.
आमच्या ओळखीतले आयुर्वेदिक डॉक्टर ह्यांनी असा एक त्यांच्या रुग्णाचा अनुभव सांगितलेला ज्याला सतत शौचास होवु लागले व १-२ वर्षे तोच त्रास होता.
काही तीव्र वासाची फुलांमध्ये जे रसायन असते ते चांगले नसते तर सोनचाफा ह्याच कॅटगरीत आढळतो. आतड्याला सूज आणते.
कोणी वाचलं नसेल तर समजु शकतो.

स्पर्धेत हि एक अट हवी होती कि खाण्यास योग्य असलेलीच फुले हवीत. व संयोजकांनीच मोजकी फुलांचा पर्याय देवुन स्पर्धा असती तर आणखी मज्जा असती.

भारतातील सहज उपलब्ध व खाण्यास ( उपचारास व पेय म्हणून) योग्य,
मेरिगोल्ड( एक प्रकारचा झेंडु)
पारिजात
भोपळा
गोकर्ण,
सदाफुली
हादगा
गावठी गुलाब
मोगरा
बकुळ
जास्वंद
शेवगाची फुलं
भारताबाहेर बरीच आहेत पण सहज उपलबध असणारी हि काही,
नास्टर्तियम
मॅगनोलिया
कँमोमाईल( बाहेर तर सह्ज मिळतात)
लवेंडर
काही हिवाळ्यातील फुले जी बाहेर मिळतात ( नाव विसरले)

बाकी, आयडिया आणि बघण्यास म्हणून वरचे पेय छान आहे. संयोजकांनी जरा विचार करायला हवा होता. उत्सहात कोणी कुठलीही फुलं वापरुन काहीही होवु शकते.
आता, कोणाच्या अंगात खोड्या असतील(च) तर गुगलून पहाच उगाच माहित नसताना पिंका टाकण्याएवजी.

मस्त लिहिलंय
खुमासदार पाककृती
कडक उन्हाळ्यात अशा सुगंधी सरबताने बाहेरून येणाऱ्याचे स्वागत झाले तर काय मजा ना

झंपी, तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि दाखवलेल्या काळजी बद्दल धन्यवाद.

मुळात तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे.
....भारताबाहेर बरीच आहेत पण सहज उपलबध असणारी हि काही,
नास्टर्तियम
मॅगनोलिया.

यातील मॅग्नोलिया म्हणजेच सोनचाफा.
सोनचाफ्याचे शास्त्रीय नाव Magnolia champaca आहे. Botanical synonym is Michelia champaca.

हे खरेच चवीला चांगलं लागतं का?
हे मी स्वतः बनवले आहे. धाग्यात दिल्याप्रमाणे मला सोनचाफ्याचा रंग किंवा चव नको होती. मला त्याचा सुगंध हवा होता. सोनचाफा चवीला कडू असतो हे मी "टिपा" मध्ये आधीच लिहिलं आहे. त्या फुलांना फक्त पाण्यात ठेऊन त्यांच्या सुंगंधाने सुगंधित होणारे पाणी ह्या पेयासाठी वापरले आहे. आमच्या येथील मंदिरात हे असेच तीर्थात फुले टाकून सुगंधित करून देतात. यावरूनच हि कल्पना सुचली.

वैज्ञानिक दृष्ट्या सोनचाफा व त्याचा अर्क वा रस हा खाणं योग्य नाही.
टिप क्रमांक दोन मध्ये "या पाकळ्यांना गरम पाण्यात ठेऊ नये किंवा पाण्यात उकळू नये यामुळे त्यांचा कडवटपणा पाण्यात उतरतो." हे लिहिले आहे त्यामुळे त्याचा अर्क, रस खायचा प्रश्नच येत नाहीये.

आमच्या ओळखीतले आयुर्वेदिक डॉक्टर ह्यांनी असा एक त्यांच्या रुग्णाचा अनुभव सांगितलेला ज्याला सतत शौचास होवु लागले व १-२ वर्षे तोच त्रास होता.>>>>> माहितीबद्दल धन्यवाद. हे सोनचाफ्यामुळे झाले का? कारण चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. सफेद चाफा/ देवचाफा/ खुरचाफा/ Frangipani याची फुले खाद्य नाहीत. तसेच त्याचा चीक देखील विषारी आहे. त्यामुळे झाले नाही ना?

सोनचाफ्याचे आयुर्वेदात उल्लेख आढळतात.
ओषधीसंग्रह - डॉ वामन देसाई या पुस्तकात सोनचाफ्याच्या फुलांबद्दल पुढील माहिती दिली आहे.
फुलांचा फांट परम्यांत देतात. त्यानें लघवीची जळजळ कमी होते आणि लघवीचे प्रमाण वाढतें. फुलें ठेंचून खोबऱ्याच्या तेलाबरोबर सुजेवर बांधतात. त्वग्रोगांत फुलें वापरतात. उदा:-कुष्ठ, गळवें, खरूज वगैरे. फुलें तिळांच्या तेलांत वाढून नाकांतून पू वाहत असल्यास व स्राव होणाऱ्या व्रणावर लावतात. डोकेदुखी आणि भोंवळींत तिळाच्या तेलांत फुले वाटून डोक्यावर बांधतात. ज्वरांत फांट देतात. कुपचनांत उमासे कमी होतात. डोक्यांत भ्रम चढल्यास पानास तूप लावून व जिऱ्याचे चूर्ण छाटून डोक्यावर बांधतात. हा उपाय उन्माद व ज्वरांत करतात.

वनौषधीगुणादर्श - आयुर्वेदाचार्य शंकर दाजीशात्री पदे यांच्या पुस्तकातही सोनचाफ्याच्या औषधी गुणधर्माची माहिती दिली आहे.

DravyagunaVijnana - Dr JLN Sastry यांच्या पुस्तकातही सोनचाफ्याच्या द्रव्य गुण शास्त्रीय भागाची माहिती दिली आहे.

काही आयुर्वेदीय संदर्भ:

चम्पकः कटुकस्तिक्तः शिशिरो दाहनाशनः ।
कुष्ठकण्डूव्रणहरो गुणाढ्यो राजचम्पकः ।I
राजनिघण्टु

चम्पकः कटुकस्तिक्तः कषायो मधुरो हिमः । विषक्रिमिहरः कृच्छ्रकफवातास्त्रपित्तजित् ॥ भावप्रकाश निघंटु

चम्पकं रक्तपित्तघ्न शीतोष्णं कफनाशनम् । सुश्रुत संहिता सूत्रस्थानम ४६/२८८

उत्सहात कोणी कुठलीही फुलं वापरुन काहीही होवु शकते.>>>>> याबद्दल सहमत.

-पहिले म्हणजे तुम्ही माझी पोस्ट नीट समजुन घेतली व खास करुन मुद्दा( हेतु) व संयत प्रतिसाद दिलाय ह्या बद्दल आभार.
लिहिण्याची कारणं बरीच आहेत. आणि पहिले मुख्य कारण “काळजी” होती.
हि फुले कोणीही घरी उगवली तरी ती काही पेस्टीसाईड फ्री असतीलच असे नाही. मातीतच किती व कशी झिरपलेली केमिकल्स असतील सांगु शकत नाही. म्हणून कुठलाही खाण्याच्या प्रकारातील फुलं सुद्धा कशी उगवली हे महत्वाचे आहे.
-दुसरा मुद्दा, मग्नोलिया मध्ये बरेच प्रकार आहेत. हे तुम्ही सुद्धा लिहिले आहेच. पण,
१) मी इथे “ सोनचाफा“ बद्दल लिहिलेय कारण तुम्ही ते वापरलेय.
हा जो सोनचाफा आहे हा एडिबल( मग तो नुसता पाण्यात ठेवून सुद्ध) कॅटगरीत येत नाहीच. आणि हे मी आयुर्वेदानुसार सांगितलेय.
आणि वरच्या लिस्टीत मी जे मॅगनोलिया एडिबल आहे ते “मिशेलिया अल्बा “ ) ह्या फुलाबद्दल लिहिलेय. त्याचा वापर करु शकता.
जरी दोन्ही फुलांची पेरेंट फॅमिली( किंवा क्लास) सेम असला तरी वासाचे रासायनिक घटक वेगळे आहेत दोन्ही फुलांचे, खास करुन सोनचाफ्याचे. मिशेलिया चाम्प्का( सोनचाफा) पर्फ्युम मध्ये ज्यास्त वापरतात. त्याचा खाण्यात असा वापर सहजासहजी करतच नाहीत/ आढळत तरी नाही.
२) दुसरे म्हणजे, मी आधी लिहिल्याप्रमाणे “तीव्र” फुलांचे वास हे त्यांच्या ठरावीक रासायनिक कॉपोजिझन मुळे असते.
उदाहरणादखल, जास्मिनचा चहा किंवा इतर काही ताजि फुले हि न उकळता फक्त पाण्यात ठेवून सुद्धा त्याचा वास पाण्यात उतरतो. ती त्यांच्यातील काही वासाची आणि पाण्याची रासायनिक क्रिया होवुन उतरतो. त्यामुळे कुठलीही फुले पाण्यात ठेवुन पाणी पिणं हे धोकादायक ठरु शकते एखाद्याला. त्यात वर म्हटल्याप्रमाणे, खतं , माती कुठली वापरली, कशी रुजली/ वाढवली , मातीतली रेसिड्युज वर ह्यावर सुद्धा अवलंबुन आहे फुलांचा वापर.
दुसरे उदाहरण, प्रत्येक जास्वंद चहातील रसायन त्याच वरायटी( अगदी वेगवेगळ्या लाल जास्वंद) मध्ये वेगळे असते.
कोणी उगाच वाद घालण्यासाठी म्हणतील, पिवळी जास्वंदीचा का नाही पिवु शकत? तर पिवु शकता ना पण हे मेडिकली फायदेशीर नाही. हाच तो मुद्दा आहे व होता.
असोच. बरीच उहापोह झाली सायन्सची.
तुम्हाला स्पर्धेच्या शुभेच्छा!

शेवटचा मुद्दा, तुमचा आयुर्वेदिक मंत्रात असलेला उल्लेख नीट वाचल्यास लक्षात येइल की चंपक म्हटलेय. सुवर्ण चंपक असा नाही. आणि तरी बरेच जण अगदी काही अयुर्वेदिक नवशिके डॉक सुद्धा गोंधळ करतात त्याचा उल्लेख “सुवर्णचंपक” म्हणून घेतात( अयुर्वेदिक डॉ ६० वर्षे प्रॅक्टीस).

हे मी सुद्धा अयुर्वेदिक डॉक्टरांशी चर्चा करताना समजले.

आपण “खाण्याविषयी” बोलतोय, लेप किंवा बाह्य वापराविषयी नाही.त्यांमुळे बरेच डॉक्टरांची मतांतरे असु शकतात त्यामुळे मी सुद्धा इथेच थांबते.
कारण मुळ मुद्दा सेफ्टी आहे. अगदी नेहमीची खाण्यातील फुले सुद्धा जपुनच निरखुनच्च त्यांचा उगम कुठुन आहे हे बघावे हावर भार असावा.

>>> सोनचाफ्यामुळे झाले का? कारण चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. सफेद चाफा/ देवचाफा/ खुरचाफा/ Frangipani याची फुले खाद्य नाहीत. तसेच त्याचा चीक देखील विषारी आहे. त्यामुळे झाले नाही ना?<<<
सोनचाफा -घरी वाढवलेला.

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मुळात तुमची काळजी कळली आणि ती अगदी रास्त आहे.
मिशेलिया अल्बा>>>>
M. alba is a hybrid of Magnolia champaca (सोनचाफा) (L.) Baill. ex Pierre and Magnolia montana (Blume) Figlar (International Plant Names Index (IPNI) Life Sciences Identifier (LSID).
या संकराबद्दल मी माझ्या "चाफ्याच्या झाडा.." या लेखात मायबोलीवर लिहिले आहे.

हि फुले कोणीही घरी उगवली तरी ती काही पेस्टीसाईड फ्री असतीलच असे नाही. मातीतच किती व कशी झिरपलेली केमिकल्स असतील सांगु शकत नाही. म्हणून कुठलाही खाण्याच्या प्रकारातील फुलं सुद्धा कशी उगवली हे महत्वाचे आहे.>>>> बरोबर.

त्यामुळे कुठलीही फुले पाण्यात ठेवुन पाणी पिणं हे धोकादायक ठरु शकते एखाद्याला. त्यात वर म्हटल्याप्रमाणे, खतं, माती कुठली वापरली, कशी रुजली/ वाढवली , मातीतली रेसिड्युज वर ह्यावर सुद्धा अवलंबुन आहे फुलांचा वापर.>>>>>> ह्याबद्दल सहमत. आणि हे सगळ्याच फुलांच्या बाबतीत आहे खरंतर.

अगदी नेहमीची खाण्यातील फुले सुद्धा जपुनच निरखुनच्च त्यांचा उगम कुठुन आहे हे बघावे हावर भार असावा.>>>> अगदी अगदी.

आयुर्वेदिक मंत्रात असलेला उल्लेख नीट वाचल्यास लक्षात येइल की चंपक म्हटलेय. सुवर्ण चंपक असा नाही. आणि तरी बरेच जण अगदी काही अयुर्वेदिक नवशिके डॉक सुद्धा गोंधळ करतात त्याचा उल्लेख “सुवर्णचंपक” म्हणून घेतात( अयुर्वेदिक डॉ ६० वर्षे प्रॅक्टीस).>>>>>> हे सर्व मंत्र संदर्भ मी वर उद्धृत केलेल्या पुस्तकातून घेतले आहेत. जी मजजवळ आहेत. जेथे जेथे सोनचाफ्याचे उल्लेख आहेत त्या त्या पानावर आयुर्वेद संदर्भ म्हणून वरील मंत्र दिले आहेत. आयुर्वेदात चंपक म्हणून सोनचाफाच ग्राह्य धरला आहे. कारण दुसरा चाफा (Plumeria) indigenous नाही.
सुवर्णचंपक असा संदर्भ असलेला आयुर्वेदिक मंत्र/ संदर्भ असल्यास मला वाचायला आणि संदर्भ म्हणून वापरायला आवडेल.
तसेच सोनचाफ्याच्या वापराबद्दल मी एका आयुर्वेद महाविद्यालयातून सेवानिवृत (MD कायचिकित्सा, MD द्रव्य गुणविज्ञान) वैद्यांशी चर्चा करून लिहिले आहे.
तुम्ही लिहिल्याप्रमाणे डॉक्टरांची मतांतरे असु शकतात आणि त्याबद्दल मला आदर आहे.

मी सुद्धा इथेच थांबतो.
तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि शुभेच्छा साठी पुन्हा एकदा धन्यवाद.
वनस्पती, फुले हा माझ्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय असल्याने या निमित्ताने मला देखील याकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहता आले. Happy

वा वा वा.
सोनचाफा म्हणजे...
नादच नाय....

Pages