पाककृती स्पर्धा क्रमांक ३ : सुगंधित मोसंबी सरबत - ऋतुराज.

Submitted by ऋतुराज. on 25 September, 2026 - 08:48

सुगंधित मोसंबी सरबत

यंदाच्या गणेशोत्सवात एकतरी पाककृती करायची म्हणजे करायची असे सुरुवातीपासून ठरवूनसुद्धा आज मुहूर्त लागला.
का? तर आज शेवटचा दिवस म्हणून Lol
हापिसातील कामे (ह्यांना एक सणासुदीला चेव येतो) मग घरचा गणपती - गौरी यातून आज वेळ मिळाला. पण पाकृ टाकायचीच, नाहीतर उगीच "गेले करायचे राहून " मधील एक गोष्ट वाढायची.
स्पर्धेसाठी एवढ्या चांगल्या आणि चवदार रेसिपी आल्यावर मी वेगळे काय करणार म्हणा. तसं पेयासाठी फळ आणि मसाला ठरवणं अगदीच सोप्प. पण त्यात फुल पण हवं. आणि तिथे नेमकी गाडी अडली.
गुलाब, गोकर्ण, जास्वंद यासारख्या बिनीच्या शिलेदारांना सगळ्या हुशार सुगरणींनी आधीच वापरून टाकले होते.
मग आणखी कोणती फुले वापरता येतील असा प्रश्न पडला. अंबाडीच्या फुलांचे सरबत झकास होते पण ती फुले आता उपलब्ध नव्हती. त्याची पावडर होती पण ती चालेल का नाही हे ठाऊक नव्हते. तसा पळसाच्या फुलांचा चहा / सरबत पण माझ्या डोक्यात होता पण ती फुले सुद्धा आता ह्या ऋतूत कुठून आणणार. आंबेमोहोर (तांदूळ नाही हो) वापरून पण एक पेय करतात असे ऐकले होते पण तो सुद्धा आता उपलब्ध नाही. इतरांनी आधी वापरलेली फुले वापरायची नव्हती . मग परवा अचानक मंदिरात गेलो असताना गडव्यात तीर्थ ठेवले होते ते चमच्याने हातावर घेतले आणि प्यायलो आणि तिथेच "युरेका" असे झाले. त्या गडव्यात डोकावून पाहीले तर त्यात सोनचाफ्याचे फूल होते. ठरलं तर मग.

साहित्य:
Screenshot_20260925_163023_Gallery.jpg

मोसंबी -
ही चांगली गोड, पिकलेली पाहून घ्या. आमच्याकडे बाजारात गेल्यावर फळांकडे पाहिले की लगेच तो फळवाला "साब आओ, लेलो जो मंगता हय वो, सब मीठा हय" असे म्हणतो आणि आम्हाला फसवतो. बरेचदा ती मोसंबी घरी आल्यावर आंबट निघतात नाहीतर सपक असतात. ती खाल्य्यावर घरचे माझ्याकडे बघून तोंड सुद्धा अगदी तसेच करतात. ह्यावेळी मी चांगली मोठी फळे बघून आणली. निवडताना तोच काढून देत होता. मी म्हटले "रुको, मै चुनता हूं , वो मत डालो ये डालो ". मग तो पण म्हणतो "ठीक हय, आपका भी बराबर हय. आप ले रहे हो तो आपका भी चॉईस रेहेना चाहिए". घराबाहेर आपलं असं कुणीतरी सांगितलेलं ऐकलं की बरं वाटत.

सोनचाफ्याची फुले - दोन किंवा तीन. फुले ताजीच हवीत, बाजारातून आणली तरी उगीच मरगळलेली, निस्तेज आणू नका. आपल्याला त्याचा सुगंध हवा आहे. काही ठिकाणी दहा- दहा फुले व्यवस्थित प्लास्टिक पाकिटात मिळतात. कोणाच्या दारात, सोसायटीत झाड असेल आणि त्याची ताजी फुले मिळाली तर उत्तम.

वेलदोडे पूड - आवडीनुसार

केशराच्या काड्या - २- ३ (ऐच्छिक) (फोटोत नाही. फोटो काढताना विसरलो)

साखर - मोसंबी किती गोड निघतात त्यावर अवलंबून आहे.

कृती:
प्रथम सोनचाफ्याच्या दोन फुलांच्या पाकळ्या काढून घ्या. फुलाचा मधील भाग आणि देठ आपल्याला वापरायचा नाही.
ह्या पाकळ्या धुवून एक अर्धी वाटी पाण्यात झाकून ठेवा. हेच पाणी सुगंधित होईल, हेच आपल्याला वापरायचे आहे. केशर वापरायचे असेल तर यात आताच टाकून ठेवा.

आता मोसंबी सोलून घ्या. इथे मायबोलीवर काही कळले नाही की लगेच "संत्रे सोला" असे म्हणतात प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त कठीण मोसंबी सोलणे आहे. त्यातील फोडींच्या पांढऱ्या साली, आतील बिया नीट काढून टाका. त्या राहिल्यास रस कडवट होऊ शकतो आधीच सांगतो "फिर मत केहना ऋतुराज आपने बताया नहीं" सोलता सोलता (फक्त) एक दोन फोडी खाऊन नक्की तुम्ही गोड मोसंबी आणल्या आहेत का याची परत खात्री करून घ्या. आता त्या गोड नसतील तर नाविलाज आहे. मनात साखर किती लागेल गणित करायला सुरवात करा.

आता त्या फोडी मिक्सर मध्ये टाकून त्याचा रस करून घ्या, तदनंतर तो व्यवस्थित गाळून घ्या.

आता त्यात चवीनुसार साखर टाका. यात वेलदोड्याची पूड टाका आणि ते सुगंधी, केशरी पाणी टाका. आता हा रस नीट ढवळून तसाच १०-१५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
आता यातील पाकळ्या काढून तो सर्व्ह करा. झाला तयार सुगंधित मोसंबी सरबत.
Screenshot_20260925_163055_Gallery.jpgटिपा:
सोनचाफ्याची फुले जरा कडवट असतात. त्यामुळे ती फक्त पाण्यात टाकून, झाकून ठेवायची आहेत.
या पाकळ्यांना गरम पाण्यात ठेऊ नये किंवा पाण्यात उकळू नये यामुळे त्यांचा कडवटपणा पाण्यात उतरतो.

ऋतुराज.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच... वास किती सुंदर येत असेल ह्याला. तसा चाफा माझा खूप आवडता.
फोटो सुंदर आलाय. पितळ्याचा गडू मस्त वाटतोय.

.. सोनचाफ्याची फुले चवीला कडवट असतात…

असेच ऐकले होते पण तुम्ही स्वत: करून चाखून बघितले म्हणजे तसे नसणार.

प्रोसेस आणि नेहेमी असते तसे नीटनेटके सादरीकरण आवडले, चव imagine करता आली नाही.

संत्र सोला Lol मोसंबं सोलणं कठीण खरंच, ते संत्र्यासारखं सोलता नाही येत. चार भागात चिरून जास्त पटापट सोलता येतं. संत्र आणि सोनचाफा छान कॉंबो आहे. करून बघण्यात येईल

सुंदर!! सोनचाफ्याचा वास आवडतो. पाणी खूप सुंदर लागेल असे वाटते.

संत्री नसल्याने आणि मोसंबीचा रस थोडा माइल्ड असल्याने तो सोनचाफ्याचा वास पाण्यात उतरेल असे वाटते.

छान आयडिया आहे. मोसंबी सरबताचा सोनचाफ्याचा वास देणे. तसेही आमच्याघरी मोसंबी सरबत आजारपणात प्यायची पद्धत आहे. तेव्हा औषध गोळ्यांच्या वासाने वैतागलेल्या जीवाला सोनचाफ्याचा वास चांगलाच.

वा छान दिसतंय. पण पाकळ्यांचा स्वाद लगेच इतका उतरतो का पाण्यात?

सध्या घरातल्या सोनचाफ्याला दिवसाआड दोन तरी फुले येत आहेत. करून बघेन हे नक्की. ह्यावर्षी असे सोनचाफ्याचे सुगंधी पाणी करून आम्ही गौरी जेवतात त्या दिवशी अत्तर दाणी मध्ये वापरले, मस्तच सुगंध.. लोकांना जाम आवडला तो सुवास. चाफ्याची फुले तोडून हातात पाच दहा सेकंद जरी ठेवली तरी तळहाताला त्याचा सुवास लागतो.

सोनचाफा खूपच आवडतो, त्याचा वापर असा करता येईल कधीच वाटलं नव्हतं, ती फुलं बघून आहाहा झालं. सुगंध पोचला.

खुसखुशीत लेखन, फोटो नेत्रसुखद.

मस्त सुंगधी सरबत...!

सोनचाफा माझं सर्वांत आवडतं फुलं..
कालच बाजारातून फुलं घेतली तेव्हा मनात आलेलं चाफा कुणी अजून
वापरलेला दिसला नाही..

काय जबरदस्त आयडीया आहे!! सोनचाफा.मी पण मागचा आठवडा विचार करत होते की जास्वंद गोकर्ण झेंडू गुलाब झाले आता कोणतं फुल वापरता येईल.
पेय फार सुंदर दिसतंय.सोनचाफा मिळाला की करून पाहणार.

सोनचाफा खूपच आवडतो, त्याचा वापर असा करता येईल कधीच वाटलं नव्हतं>>+१

सोपं वाटतय. चवीचा अंदाज यायला करुन बघेन

फोटो फारच छान
लिखाण आवडतेच.
मोसंबी सोला Lol
आपका भी चॉईस रेहेना चाहीये Lol
छान लागेल असे वाटतेय.

Pages