
कधी काळी नात्यातल्या एका बाईंना चिक्कू म्हणून हसायचो.कारण त्या बाजारात जी भाजी स्वस्त मिळेल ती घेऊन यायच्या आणि त्याचे विविध पदार्थ करून घरच्या मंडळींना खाऊ घालायच्या. म्हणजे वानगी दाखल म्हणायच झालं तर वांगी स्वस्त असली कि दोन किलो वांगीच घ्यायची आणि वांगी भात , वांग्याची भरली भाजी, वांग्याची चटणी,वांग्याचे भरीत असा मेनू करीत आणि मग ती भाजी संपे पर्यंत असा सब कुछ वांगी सप्ताह चालायचा.
परवा या स्पर्धे विषयी वाचले आणि त्या बाईंची आठवण झाली. पण त्या मागची कल्पकता सुद्धा होती हे आता लक्षात येतेय. असो.
हे वांगी पुराण इथेच थांबवत माझे कोबी पुराण सान्गायला सुरुवात करते.
कोबी च्या भाजीची आठवण म्हणजे घड्याळात पावणे अकरा झालेत, आईने मोठ्या कढईत कोबी उभा चिरून , त्यात डाळ घालून भाजी परतली आहे, ती पोळ्या लाटत आहे, मी घाईने तव्यावरची गरम पोळी आणि कढईतली अजून किंचित क्रिस्प कच्ची असणारी भाजी पानात घेऊन जेवायला सुरुवात केली आहे ,आणि बाहेर मुसळधार पाऊस सुरु होतोय , आणि ती आईच्या हाताची पोळी भाजी अहाहा ...आठवणीने दिल खुश हो गया!
चला तर मग मी कोबी पासून मिनी थाळी कशी केली ते सांगते.
पूर्वतयारी म्हणून कोबी फूड प्रोसेसर ला स्लायसिंग ची चकती लाऊन बारीक चिरून घेतला , लांब लांब.!, दोन वाट्या कणिक मळून ठेवली,मग धन जिरा पूड केली, कोथिंबीर चिरून घेतली, भाजलेल्या दाण्याचं कूट केलं ,फ्रोझन मटार अँड गाजर वाटीभर पाण्यात ठेऊन पाच मिनिटे सभ्य तापमानाला आणलं.डाळे मिक्सरवर फिरवून अगदी पूड करून घेतली.आणि मग प्रथम कोबीचे पराठे बनवले .त्याची कृती आणि साहित्य खालील प्रमाणे :कोबीचे पराठे:
साहित्य आणी कृती : उभा चिरलेला कोबी (तीन वाट्या) ,एका भांड्यात थोडे मीठ टाकून पाच मिनिटे ठेवला, मीठ सगळीकडे लागेल अस हाताने मिक्स केलं. त्याला पाणी सुटलं, म्हणजे अहो सुटतेच ! ते पाणी काढून पिऊन टाकायचे, टाकून द्यायचे नाही ! बरं , ते झाले की त्यात म्हणजे त्या चिरलेल्या मीठ घातलेल्या कोबीत लाल तिखट,धना जिरा पावडर, चिरलेली कोथिंबीर,पाव भाजी मसाला,आणि मिक्सर वर बारीक केलेले डाळे पूड घालायची .जवळपास अर्धी वाटी पूड घातली मी त्या तीन वाटी चिरलेल्या कोबी मध्ये.मग दोन जाडसर पोळ्या लाटून घ्यायच्या . पोळपाटा वर एक पोळी ठेवून त्यावर हे कोबीचे सारण पसरायचं.दुसरी पोळी त्यावर ठेवून कडा चिकटवून पोळी परिघावर बंद करून टाकायची ,मग एका बाजूने रोल करत एक लांब गुंडाळी करून घ्यायची . ती गुंडाळी चार पाच भागात कापून घ्यायचि. मग प्रत्येक भाग दोन हातात थापून त्या चपटया गोळ्याला हलक्या हाताने पराठा वरून तीळ आणि कलोंजी घालून लाटून गरम तव्यावर भाजला . (थोडेसे तूप अथवा तेल लावावे दोन्ही बाजूनं आणि छान भाजून घ्यावा.)
हा झाला पराठा तयार !
आता भाजी कशी करायची ते सांगते. दोन तीन चमचे तेलाची फोडणी करून त्यात जिरे मोहरी हिंग कडीपत्ता हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत ,त्यात कोबी (तीन वाट्या) आणि भिजवलेली मुग डाळ अर्धी वाटी आणि गाजर मटार आणि चिरलेला कोबी घालून मस्त परतून घायचे , त्यात चवीनुसार मीठ साखर घालायची वरून आणि ओले खोबरे घालायचे. पाचेक मिनिटात भाजी तयार .फार गिच्च शिजवायची नाही हि हि भाजी. भारी लागते किंचित करारी.
कोशिंबीर म्हणजे नेहमीचे यशस्वी कलाकार ,दही,मीठ,साखर, दाण्याचे कूट, कोथिंबिर त्यात अगदी बारीक कोबी चिरून घालायचा, (मी फूड प्रोसेसरवर अगदी बारीक करून घेतला.)सगळे मिक्स करायचे कि झाली कोशिंबीर!
मग काय झाली थाळी ! देवाला नैवेद्य दाखवायचा अन गट्टम करायची. तिन्ही पदार्थात भरपूर फायबर , आणि प्रोटीन पण आहे त्याशिवाय कोबीच्या भाजीचे विशेष फायदे आहेत . गुगलून पहा हवे तर कोबी कसा आपल्या शरीरासाठी चान्गला असतो ते! 
आमच्या गावी बाजारात लोक " कोबी" ला कोबू म्हणायचे ", टोमॅटोला "टमाटू" ! पण कोबी करारी वाटतो. त्याला कोबू नाव शोभत नाही. त्याला कोबी हेच नाव बरे ! हेजाता जाता उगीचच !
ही प्रवेशिका नक्की कोणत्या
ही प्रवेशिका नक्की कोणत्या स्पर्धेसाठी आहे ते शीर्षकात लिहा. शीर्षकाबद्दलचा नियम वाचा.
पराठा मस्त खमंग दिसतोय!!
पराठा मस्त खमंग दिसतोय!!
छान
छान
मला कोबी आवडतो. करुन पाहीन.
मला कोबी आवडतो. करुन पाहीन. खूप छान.
मस्त खमंग खरपूस दिसत आहे
मस्त खमंग खरपूस दिसत आहे पराठा.
कोबीची भाजी आणि कोबीचे पराठे आमच्याकडे वरचेवर होत राहतात. कारण मला आवडते कोबीची कचकच. चिकन स्टार्टर सोबत कच्चे कोबी देतात त्यावर सुद्धा मी तुटून पडतो.
शिजवतांनाच्या पादेल वासामुळे
शिजवतांनाच्या पादेल वासामुळे कोबी आवडत नाही पण लिहिलेले आवडले.
“सभ्य तापमान” तर खूपच आवडले.
प्रतिसादात पाल्हाळ अलाउड आहे
प्रतिसादात पाल्हाळ अलाउड आहे असा समज असल्याने पुढील पाल्हाळिक प्रतिसाद (नसेल तर तसे सांगा, प्रतिसाद काढून टाकण्यात येईल
) :
⭐ आमच्या गोतावळ्यात आधी कोबी आणि फ्लॉवर दोघांना कोबी म्हणायचे - एक पानकोबी आणि एक फूलकोबी. नंतर मुंबईत आल्यावर कोबी म्हणजे तुम्ही वापरलाय तो आणि दुसरा “फ्लॉवर” झाला.
⭐ कोबी ला आमचे उत्तरेतले मित्र बंदगोभी म्हणतात. फ्लॉवरला फूलगोभी. फ्लॉवरला खुली गोभी तरी म्हणावे तर ते नाही. Actually दोन्ही बंदच असतात की पण … सोडा ते.
⭐ विंग्रजी Cabbage हे baggage, luggage ला rhyme होते. नकोच. त्यापेक्षा तुमच्या गावचे “कोबू” आणि “टमाटू” जास्त क्यूट वाटले.
⭐ त्यातल्या त्यात कणभर-थेंबभर पाणी न टाकता फक्त तेलावर कमी शिजवला तर कोबी “खाणेबल” होतो. पाणी टाकून शिजवला तर तो तीव्र उग्र वास दोन मजले खाली आणि दोन मजले वर पसरतो.
⭐ एका सुगरिणीनी एकदा कोबीची खीर आणली होती आणि ती “खाऊन बघाच” असा मला नखशिखांत घाबरवणारा आग्रह केला होता. मग कशीबशी सुटका करून घ्यावी लागली. त्यांनीच पुढे आल्याची खीर, कांद्याची खीर, लसणाची खीर असा चढत्या भाजणीचा torture plan आखल्याने आमची मैत्री तुटली ती तुटलीच.
⭐ चायनीज, म्हणजे भारतीय चायनीजमधे मात्र कोबी घरातल्या कर्त्या पुरूषाच्या भूमीकेत दिसतो. जिथे कमी तिथे आम्ही. स्प्रिंग रोलस् मधे कोबी तसा काही वाइट लागत नाही पण चायनीज रेस्तरां वाले कोबीकात्रणांच्या गालीच्यावर रोल्स, चिकन नगेट्स वगैरे का मांडून आणतात ते कोडं आहे. Anyone knows ? please enlighten.
⭐ माबदौलत कितीही नाके मुरडत असले तरी तुम्ही केले तसे कोबीचे पराठे कधीकधी करण्यात येतात न्याहरी म्हणून. पण कसंय, कोबीची खीर केली म्हणून मैत्री तोडता येते, कोबी पराठा खायला भाग पाडले म्हणून डिवोर्स घेता येत नाही. Domestic violence ची व्याख्या अधिक व्यापक करण्याची गरज अधोरेखित होते याठिकाणी.
पुढचं कोबी पाल्हाळ आता लिहा कुणी.
(गंमत म्हणून लिहिलेय. कोबी आवडणारे घरात आहेत आणि तुमचा धागा त्यांना फॉरवर्ड केला आहे)
>>>दोन्ही बंदच असतात की पण
>>>दोन्ही बंदच असतात की पण
फुलगोभी तर फुललेला असतो की बंद कुठे असतो?
>>>>असा मला नखशिखांत घाबरवणारा आग्रह केला होता. मग कशीबशी सुटका करून घ्यावी लागली. त्यांनीच पुढे आल्याची खीर, कांद्याची खीर, लसणाची खीर असा चढत्या भाजणीचा torture plan आखल्याने आमची मैत्री तुटली ती तुटलीच.

>>>> Domestic violence ची व्याख्या अधिक व्यापक करण्याची गरज अधोरेखित होते याठिकाणी.

काय मस्त प्रतिसाद दिलाय अनिंद्य
पराठा छान दिसतोय. चांगले
पराठा छान दिसतोय. चांगले लिहिलेय.
अनिंद्य मस्त पोस्ट.
छान दिसतंय, पाल्हाळही मस्त.
छान दिसतंय, पाल्हाळही मस्त.
अनिंद्य भारी लिहिलंय.
चांगले लिहिले आहे. पराठा मस्त
चांगले लिहिले आहे. पराठा मस्त. कोबी आवडतो.
ही प्रवेशिका नक्की कोणत्या स्पर्धेसाठी आहे ते शीर्षकात लिहा प्लीज.
अनिंद्य, मस्त पाल्हाळ. आवडले.
Anyone knows ? please enlighten.>>>>> स्वस्त मिळत असावा म्हणून कदाचित.
Kimchi cha swad aani sugandh
Kimchi cha swad aani sugandh ghetala aahe ka? Ekda eka asian neighbor ne ghari aanun dila hota. Annala nave thewat nahiye. Pan te kimchi baryapaiki strong hote.
.. Kimchi cha swad aani
.. Kimchi cha swad aani sugandh ghetala aahe ka?..
हो तर.
Frankly it’s a torture to smell and god forbid, eat it ! पण व्यक्ती तितक्या प्रकृती. घरात मेंब्रांना, मित्रमंडळात अनेकांना किमची खूप आवडते. मला वासच नकोसा होतो, खाणे तर दूरच.
ही प्रवेशिका नक्की कोणत्या
ही प्रवेशिका नक्की कोणत्या स्पर्धेसाठी आहे ते शीर्षकात लिहा कृपया. शीर्षकाबद्दलचा नियम वाचा.
लेखन स्पर्धा - पाककृती लेखन
की
पाककृती स्पर्धा १: जिन्नस एक, पदार्थ अनेक
की दोन्ही ?
मी किमची फॅन नाही पण कोबीभक्त
मी किमची फॅन नाही पण कोबीभक्त आहे. मात्र हो थाळी उपडी करुन शिजवायचा नाही.