लेखन उपक्रम - गेले करायचे राहून - मीस्वच्छंदी

Submitted by मीस्वच्छंदी on 24 September, 2026 - 20:56

विषय वाचल्यावर माझ्या डोक्यात पहिल्यांदा पटकन दोन गोष्टी आल्या.
ज्यातली पहिली गोष्ट जी राहूनच गेली.. कधी परत जमेल याची शक्यता आता शून्य आहे.
आणि दुसरी आतापर्यंत करायची राहून गेली आहे.

१. त्यावेळी, म्हणजे मी शाळेत असताना, बरोबरची मुलंमुली नाच, पेटी किंवा तबला असं शिकायला जायचे.
परंतु स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे तंतुवाद्य जसं गिटार, व्हायोलिन याचे विशेष क्लासेस नव्हते किंवा माझ्या माहितीत तरी एवढे नव्हते. किंवा ओळखीचं कोणी जातंय असंही नव्हतं.
आमच्या इकडे जवळच एक चर्च होतं, त्या गल्लीमध्ये मात्र व्हायलीन/ गिटार दुरुस्तीच दुकान होतं.

त्यावेळी खूप वेळ मनात येऊन गेल आपण गिटार किंवा व्हायोलिन शिकव का?
पण मी कधी घरी या विषयी बोलले नाही. पुढे कधी स्वतःही प्रयत्न केला नाही.

नंतर खूप वर्षांनी, मुलाने शाळेत व्हायोलिन घेतलेले ( बहुदा त्यामागे माझी राहून गेलेली इच्छा / आकर्षण असावं का?) त्यावेळी त्यावर हात चालवून बघायचा प्रयत्न केला.
पण दोन हातांचं एवढ अचूक कॉर्डिनेशन मला अजिबात झेपण्यासारखे नाही हे कुठेतरी कळून चुकले.

तेव्हा गिटार/ व्हायोलिन सारखे एखादे तंतूवाद्य वाजवायला शिकणे हे ‘गेले करायचे राहून’ या यादीत कायमचं समाविष्ट झाले आहे .

२.
त्याच चर्चच्या भागात एका घराच्या इकडे पाटी लावलेली,
पॉटरी ची. हे कुंभारकाम एकदातरी शिकावं, जमतं का बघावं याची खूप उत्सुकता होती.

पण परत ते झालं, तेही अजिबात कॉमन नव्हतं.
वाटायचं किती महाग असेल वगैरे म्हणून घरी कधी बोलले नाही किंवा चौकशी केली नाही.
नंतर स्वतः पैसे कमवायला लागल्यावर, वेळ नव्हता. नेहेमीच्या रहाट गाडग्यात विसरून गेले.

पुढे अमेरिकेत आल्यावर, मुलांना क्लासला न्यायचे तिकडे एक आर्ट स्टुडिओ होता. त्यांच्याकडे पॉटरी चा क्लास असतो हे कळलं.
पुढेमागे मुलाला तिकडे घेऊन गेले तेव्हा चौकशी केल्यावर कळलं की पॉटरी सिंगल सेशन ही बऱ्यापैकी महाग आहे.
वाटलं, मुलांचे हे एवढे खर्च त्यात आपण आपली का भर घाला?
म्हणे परत वेळ होता, शक्य होतं पण पैसे..?

गेल्या २-४ वर्षात पैसे, वेळ दोन्ही बाजूंनी शक्य आहे पण अचानक मला कळलं जवळपास २-३ क्लास / स्टुडिओ आहेत. कोणता जास्त चांगला हे बघण्या/ ठरविण्यासाठी वेळ काढुया आणि मग जाऊ या म्हणत.. अजून काही चाक हातात धरले नाहीये..
त्यामुळे अजून गेले करायचे राहून या यादीत आत्ता असलं तरी तिथे ते कायमस्वरूपी असणार नाही.

या लेखा निमित्ताने आता परत हा विषय निघालाच आहे तर पुढच्या वर्षी बाप्पा यायच्या आधी एकतरी मातीच भांड हातातून घडेल ही आशा!

**"

अजून एक .. इंजिनियरिंग विषयी कोणी लिहिलेले वाचले तेव्हा आठवले.
पण हा लेख लिहिताना ते विसरले आता जोडते.

दहावीत असताना सायकॉलॉजी करावे का हा एक विषय डोक्यात होता. अगदी फॉर्म पण आणले होते. त्याकाळी रांगेत उभ राहून फॉर्म घ्यावे लागत.

पण मग आयत्यावेळी वाटलं..
इंजिनियरिंग म्हणजे हमखास नोकरी/ करिअर
सायकॉलॉजी घेतल्यावर पुढे काय होईल भरवसा नाही.

त्यामुळे सायकॉलॉजी करायचं राहून गेलं.

Fast forward इतक्या वर्षांनी ***

माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीने सायकॉलॉजी करून उत्तम करिअर करते आहे.
इंजिनियरिंग करून मात्र मी भरकटलीये.. असं वाटतं Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाटलं, मुलांचे हे एवढे खर्च त्यात आपण आपली का भर घाला?
म्हणे परत वेळ होता, शक्य होतं पण पैसे..?>> सेम पिंच.

मी पण कायम हाच ममव विचार करत बऱ्याच गोष्टी केल्या नाहीत.
छान लिहिलंय.

मी पण कायम हाच ममव विचार करत बऱ्याच गोष्टी केल्या नाहीत >> हम्म पण बदलायला पाहिजे ना आपण.. ठरवून. Happy

छान, नेमके लिहिले आहे.
आजच्या काळात सायकॉलॉजीला डिमांड आहे हे मात्र खरे.

मी स्वच्छंदी तंतुवाद्य शिकण्यासाठी कोऑर्डिनेशन हवं असतं असं अज्जीबात समजू नका.
कोऑर्डिनेशन तयार होत जातं, मसल मेमरी तयार होत जाते.
कोवळ्या वयात ते फार लवकर जमतं. प्रौढांना वेळ लागतो, पेशन्स लागतात पण जमतं.
स्वानुभवाने सांगते आहे. मी आणि माझ्या दोन समवयीन मैत्रिणी शिकतो आहोत. माझं इन्स्पिरेशन माझ्या मैत्रिणीची आई. शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यावर त्या गिटार शिकल्या. आपल्याला शिकून कुठे कॉन्सर्ट गाजवायची नाहीये. 'स्वान्तसुखाय'च शिकायचं आहे. गेले करायचं राहून म्हणून सोडून देऊ नका.

गेले करायचं राहून म्हणून सोडून देऊ नका. >>> Lol
खरं सांगताय?

पण त्यांचं , तुमच आधीपासून चांगलं असेल म्हणून तुमची मसल मेमरी तयार झाली .

. मी आणि माझ्या दोन समवयीन मैत्रिणी शिकतो आहोत. माझं इन्स्पिरेशन माझ्या मैत्रिणीची आई. शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यावर त्या गिटार शिकल्या>>>> तुमच्या तिघींचही चौघींचही कौतुक!

पण त्यांचं , तुमच आधीपासून चांगलं असेल>>>>
नाही हो.
कधी कधी आमचे सर सांगतात की इथून मी घरी जाऊन डिनर करून झोपणार आहे. प्लीज मला नाईटमेअर्स येतील असं तरी वाजवू नका Lol

धी कधी आमचे सर सांगतात की इथून मी घरी जाऊन डिनर करून झोपणार आहे. प्लीज मला नाईटमेअर्स येतील असं तरी वाजवू नका>>> Lol

आजच्या काळात सायकॉलॉजीला डिमांड आहे हे मात्र खरे>> १०० प्रतिशत

तेव्हा पण गरज होती. आपल्याकडे आवडेल किंवा आवडतं यापेक्षा बाजारात कशाला भाव आहे, असा विचार केला की ते बहुतेक वेळा गंडत..

ऋन्मेऽऽष, रेव्यु धन्यवाद!

खूप प्रांजळ आणि छान झालाय लेख स्वच्छंदी.
सायकॉलॉजीची डिमांड वाढतच रहाणार आहे असे वाटते. अमेरिकेत सायकिअ‍ॅट्रिस्टची अपॉइन्टमेन्ट मिळायला तीन महीने लागतात. ज्या व्यक्तीचा नर्व्हस ब्रेकडाउन होतोय तिने कशी कळ धरायची?

ज्या व्यक्तीचा नर्व्हस ब्रेकडाउन होतोय तिने कशी कळ धरायची?
>> जाऊन दे, काही बोलत नाही.
इकडच्या हेल्थ केअर (लेस) विषयी माझा अनुभव फारसा चांगला नाही.

पण अभिप्रायाबद्दल धन्यवाद सामों!

प्रांजळ लिखाण. आवडलं.

>> माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीने सायकॉलॉजी करून उत्तम करिअर करते आहे. इंजिनियरिंग करून मात्र मी भरकटलीये.. असं वाटतं

हे खरंच अवघड असतं प्रीडीक्ट करणं. आता मलाही वाटतंय सिनेमाच्या क्षेत्रात गेलो असतो तर आता इंजिनियर म्हणून केलं त्याहून खूप काही करू शकलो असतो. पण एक काळ होता, तेंव्हा एक तर डॉक्टर नाहीतर इंजिनियर. नाहीतर काही खरं नाही! असा काहीसं चित्र निर्माण झालं होतं.

एक तर डॉक्टर नाहीतर इंजिनियर. नाहीतर काही खरं नाही! असा काहीसं चित्र निर्माण झालं होतं. >>> अगदी अगदी.
IT / सॉफ्टवेअर क्षेत्रात त्यावेळी आजूबाजूला सगळ्या सक्सेस स्टोरीज दिसायच्या पण..
त्यामुळे मग ते स्वाभाविक ऑप्शन वाटायचे.

आता असं जाणवतं, आपण बऱ्या पैकी सर्वायवल मोड मध्ये असतो.
त्यामुळे आपण आपली इच्छा/ आवड/ गरज यांकडे जराही न बघता ,

सध्या काय चालतंय ते बघून आयुष्यातील एवढा महत्वाचा निर्णय घेतो.

आणि भरीला सामाजिक दबाव, स्टेटस यांसारख्या खुळ्या (?) कल्पना असतातच.
:|