लेखन स्पर्धा - पाककृती लेखन + पाककृती स्पर्धा क्रमांक ३ - जयु - जश्न -ए- बहार - एकपात्री प्रयोग

Submitted by जयु on 23 September, 2026 - 13:28

मायबोलीकर रसिकहो नमस्कार.
सादर आहे एकपात्री प्रयोग : चवींचा त्रिवेणी संगम :- पेय - फळ + फूल + मसाला : जश्न - ए - बहार.
सादरकर्ते : जयु

मायबोली गणेशोत्सव २०२६ सुरु झाल्यावर नेहमीप्रमाणे लगेचच सदस्य झाले. नेहमी, मी फक्त फोटोच्या झब्बूत २-४ फोटो टाकते. मला लिखाण करायला सुचत नाही, टायपिन्ग जमत नाही आणि पाकक्रुती करायला आवडत नाही.
पण आज अचानक माझ्या मनात ,पेय बनवण्याच्या कल्पनेला धूमारे फुटून बहार आला.
एकदम ३-४ त्रिवेणी संगम सुचले. पण सर्व गुण जमवणे ( फळ + फूल + मसाला ) ह्या पेयासाठीच शक्य होते.
ऑफिस मधून येताना फुलाचा बंदोबस्त केला. बाकीचे सगळे साहित्य घरी होते.
घरी आल्या आल्या हातपाय धुवून आधी सगळे साहित्य गोळा केले. सादरीकरणाचे ग्लास ,प्लेट काढून ठेवले आणि बाप्पाचे नाव घेऊन सुरुवात केली.
तर पेश आहे: जश्न - ए - बहार
WhatsApp Image 2026-09-23 at 19.17.34.jpeg
साहित्यः
फळ: सफरचंद , डाळींब
फूल : गुलाब : वाळलेल्या पाकळ्या
मसाला : दालचिनी, लवंग, वेलची ,केशर
कृती:
मला काश्मिरी कहवा करायचा होता . पण त्यात फळ येत नव्हते. म्हणून थोडे बदल करून जश्न - ए - बहार बनवला. जन्नत - ए - कश्मिर ला मिळतेजुळते म्हणून हे नाव Happy
१. प्रथम सगळे मसाले एका भांड्यात घेऊन थोडेसे ठेचून घेतले. त्यात थोड्या गुलाब पाकळ्या चुरडून घातल्या. आणि एक कप पाणी आणि एक छोटा चमचा साखर घालून उकळत ठेवले.
२. पाणी उकळतंय तोपर्यंत डाळिंबाचे दाणे सोलून घेतले. लागतील तेव्हढेच( एक फोड कापून त्याचे) :). ते मिक्सरला फिरवून त्याचा रस काढून, गाळून घेतला.
३. उकळलेल्या पाण्याचा गॅस बंद केला .
४. नंतर रस काढण्यासाठी लागेल तेव्हढ्याच सफरचंदाची साल काढून, गर मिक्सरला फिरवून त्याचा रस काढून, गाळून घेतला.
५. आता सादरीकरणाची तयारी :
टेबलवरचा पसारा काढून फोटो काढण्यासाठी जागा केली. प्लेट ग्लास मांडून बघीतले. सफरचंदाच्या फोडीचे पातळ काप करून त्याला पिसाऱ्यासारखे पसरवून प्लेटमधे मांडले.  थोडे डाळिंबाचे दाणे सोलून प्लेटमधे पसरले. मसाल्यातला एक एक घटक शेजारी ठेवून दिला.
६. आता मुख्य पात्राची असेंब्ली:
ग्लासमधे प्रथम डाळिंबाचा रस घातला. त्यावर सफरचंदाचा रस ओतला. ( थोडा डार्क झाला होता. थोडासा लिंबू पिळायला हवा होता रस काढताना) हे ओतल्या नंतर लक्षात आले Sad . जाऊदे . आता मसाल्याचे गार झालेले पाणी गाळून हळूच ग्लासमध्ये ओतले. त्याला मात्र मस्त सोनेरी रंग आला होता केशरामुळे.
७. ग्लास प्लेटमधे ठेवला. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या आणि केशरकाड्या घातल्या.
फोटोसेशन:
आता वेगवेगळ्या अँगलने , झूम इन, झूम आऊट करून १०-१२ फोटो काढले. झाले .
WhatsApp Image 2026-09-23 at 19.17.33 (1).jpeg
आता खरी लढाई. लिखाण आणि फोटो अपलोड करणे.
म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना, नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने , आधिच उल्हास त्यात फाल्गुन मास वगैरे वगैरे. मला अजिबात लिहायची( टायपिंग आणि लिखाण/ साहित्य लिहणे )सवय नाही पेक्षा जमत नाहि. मोबाईलवरून सुरुवात केली. म्हटले आधि फोटो अपलोड करून घेऊयात. तर व्हॉटसअँप वर पाठवलेले फोटो सेव्ह होईनात. . भरवश्याच्या म्हशीला टोणगा. तसे सेव्ह ऑप्शनच येईना.
मग लॅपटॉपचा सगळा पसारा मांडला , त्यात व्हॉअ  ओपन करून फोटो डाऊनलोड करून घेतले. माबो उघडली लॉगिन केले. गॅलरीत जाऊन सगळे फोटो अपलोड केले. हुश्श... अर्धे काम झाले.
आता  लिखाणाला सुरुवात. हाय रे कर्मा लॅपटॉप मधे इंग्लीश मधून मराठी टाईप करायला जमेना.
परत मोबाईल हातात घेतला तर तो मरायला टेकलेला. हे असे सगळे म्हणून वरच्या म्हणी..... :)  त्याला चार्जिंगला लावले. तेव्हा लक्षात आले, ज्यासाठी एवढा खटाटोप केलाय ते पेय पिऊन बघितलेच नाहि.  घरातले गिनीपिग  टेस्ट बघायला तयार नव्हते . ( हे आधिच माहित होते म्हणूनच थोडेच पेय बनवले होते) हा हा हा. मग बाप्पाचे नाव घेऊन एक घोट घेतला. छानच लागले . न लागायला काय झाले. सगळे छानछान पदार्थ एकत्र केले होते. मस्त  मॉकटेल सारखे. बर्फ घातला असता तर एकदम हॉटेल सारखे लागले असते. नवऱ्याला सांगितल्या वर त्याने उरलेले अर्धे एका घोटात संपवून टाकले.
फोन चार्ज होतोय तोपर्यंत जेऊन घेतले. आणि नव्या जोमाने उरलेल्या अर्ध्या लढाईला सुरुवात केली. फोन वरून दोन ओळी टाईप केल्या आणि ड्राफ्ट सेव्ह करायचा ऑप्शनच सापडेना. परत घोडे अडले. मग विचार केला कि आधी नोटमधे लिहून काढूया आणि तिथून माबोवर कॉपि पेस्ट करूया.
मग काय धडाधड लिहून काढले नोटमधे हँड रायटिंग किबोर्डने. लिहिल्यावर लक्षात आले की हे तर नाकापेक्षा मोती जड झाला. पाककृती नखभर आणि त्याची सांगायची स्टोरी मणभर. अनासाये या गणेशोत्सवात एक पाककृती लेखन स्पर्धाही आहे. म्हटले चला , एका दगडात दोन पक्षी मारुयात.
कधीही पाककृती न करणारी आणि कुठलेही ललित लेखन न करणारी मी, श्रीगणरायाच्या कृपेने पाककृती स्पर्धेत आणि पाककृती लिखाण स्पर्धेत भाग घेत आहे हो .
रसिकजनहो आपला लोभ असावा . आपला अभिप्राय जरूर कळवावा ही विनंती. धन्यवाद!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाए ये रंग केसरिया

छान आहे मॉकटेल. तुम्ही मसाले बरेच वापरले आहेत.

Apple juice तसेही खूप versatile मटेरियल आहे, छान चव असणार.

सर्वात जास्त आवडल्या म्हणी 😁

जयु, तुम्हांला पाक कृती लेखन स्पर्धा आणि चवींचा त्रिवेणी संगम पाककृती स्पर्धा , अशा दोन्ही स्पर्धांत भाग घ्यायचा आहे ना?
शीर्षकात लेखन स्पर्धा - पाककृती लेखन + पाककृती स्पर्धा क्रमांक ३ - जयु - जश्न -ए- बहार असे लिहा.

मस्त दिसतय
चवही छानच असेल
लिखाणही छान आहे

धन्यवाद अनिंद्य . माझी काकू रोजच्या बोलण्यात अश्या म्हणी वापरायची त्यामुळे मलाही थोडी सवय आहे म्हणी वापरण्याची Happy
धन्यवाद भरत बदल केला आहे.
धन्यवाद कविन.