पाककृती स्पर्धा क्र १: खाओ पनीर, बनो स्वास्थ्य से अमीर!! mi_anu

Submitted by mi_anu on 23 September, 2026 - 10:49

आजूबाजूला सुगरणी खऱ्याखुऱ्या मराठी छान रेसिपी बनवतायत.आणि आपण 'सगळे पदार्थ एका वेळी फोटो काढा' वाल्या अटीवर कळवळतोय.'गेल्या 10 वर्षात केलेले छान छान एका घटकाचे पदार्थ फोटो टाका' म्हटलं असतं तर किमान 10 तरी जमवले असते.

अरे हो.भूक लागली की असं असंबद्ध बोललं जातं.कातरवेळ.सगळ्यांचे जिरा त्यांना त्यांना ढकलून देऊन लॅपटॉप बंद करून सुटकेचा निश्वास टाकून स्वयंपाकाकडे वळावं तर कोणीतरी 'क्विक कॉल?' असा टिम्स संदेश दिलेला दिसतो आणि चुकचुकत परत एखाद्या कॉल वर झुंजावे लागते.घरातले सदस्य आजूबाजूला भुकेले अंदाज घेत फिरत टेबलावर ठेवलेल्या बाकरवडीचे बकाणे भरत असतात(आणि या शहाण्यांना मी सकाळी खरेखुरे नो शुगर नो शुगर अल्टरनेट पूर्ण घटक वाचून प्रोटीन बार डब्यात देते हा अजूनच मोठा विनोद.)

अचानक फ्रीजमधले 2 मोठे पनीर ठोकळे आठवतात आणि मन 'डिब्स ऑन पनीर!!' ओरडते.आणि पटापट 3 पदार्थ बनतात.हॉटेलमध्ये भुकेले थकेले लोक आले की वेटर्स कसे पटकन मसाला पापड आणून देऊन त्यांना शांत करतात तसा 'आमच्या हिथल्या गावरान शुद्ध दुरूम गव्हाचा पास्ता' आणि मशरूम कॉर्न उकळायला ठेवून तात्पुरत्या पोटभरू रेसिपी ची तयारी केली जाते.आणि मुख्य रेसिप्या बनवून पटापट फोटो काढून तुटून पडले जाते.

पाककृती पुष्प 1. पनीर ग्रील
1. पनीर चे सपाट तुकडे करावे.
2. भोपळी मिरची आणि टोमॅटो चे तुकडे करावे.फ्रीजमध्ये अगदी भाजीला पुरणार नाही इतका उरलेला फ्लॉवर असेल तर तोही समाविष्ट करावा.मिरची चे तुकडे जाड नको.जगात कमी शिजलेली भोपळी मिरची आवडीने खाणारे संत फार कमी उरलेत(अनुभवाचे बोल काही वर्षांपूर्वीचे)
3. मरीनेशन साठी 1 मोठा चमचा दही, चिमूटभर ओवा, ताक मसाला जलजीरा किंवा चाट मसाला यापैकी जे हाताला लागेल ते, klm, लाल तिखट यापैकी जे हाताला लागेल ते, छोले मसाला, राजमा मसाला यापैकी जे हाताला लागेल ते, तांदूळ पिठी, बेसन, मीठ हे नीट एकत्र करावे.मिश्रण पातळ असावे.
4. आता या मिश्रणात घोळवून मुद्दा क्र. 2 मधली सर्व मंडळी लाकडी बार्बेक्यू सळईत खुपसून घ्यावी.
5. तुम्हाला धीर आणि घरातल्या मंडळींना भूक किती यावर अवलंबून 1 किंवा 4-5 सळया बनवाव्या.
6. झाकणाचा पाणिनी मेकर ग्रील किंवा तवा तापवावा
7. त्यावर या सळया साधारण 2 मिनिटांनी एकदा सर्व 4 बाजूनी फिरवून मस्त खमंग भाजून घ्याव्या.त्याला फुड कलर न टाकता मायलार्ड रिऍक्शन ने सुंदर खमंग नारिंगी रंग आला की ताटात काढावे.

पाककृती पुष्प क्र 2: पनीर सोया क्रंब कटलेट
1. पहिली रेसिपी मुद्दा क्र 3 मधले मिश्रण उरवावे.उरले नसेल तर परत बनवा.
2. सोया चंक दुसऱ्या तव्यावर नीट भाजून घ्यावे.डाग नाही पडले पाहिजे.
3. गार झाले की मिक्सरमधून काढावे.हे आपले वर लावायचे क्रंब.
4. आता पनीर हाताने बारीक कुस्करावे.त्यात klm(किंवा तिखट), मीठ घालून नीट मळावे.मिक्सरमधून काढल्यास फाऊल धरले जाते.
5. याचे चप्पट गोळे बनऊन क्र 1 च्या मरीनेशन मध्ये घोळवावे आणि सोया चुऱ्यात दाबावे.
6. नॉन स्टिक तव्यावर मोजून 1 छोट्या चमचा तेल घालून दोन्ही बाजूनी खमंग परतून गरम खावे.

पाककृती पुष्प क्र. 3: पनीर पराठा
1. दुसरी रेसिपी मुद्दा क्र 4 मधले पनीर कुस्करा उरवावे.त्यात klm किंवा तिखट, बारीक केलेले आले लसूण कोथिंबीर घालून मीठ घालून छान मिसळावे.
2. कणकेचे गरम गरम पराठे लाटून तव्यावर मोजून अर्धा बारीक चमचा तेलावर भाजावे.
3. रोल बनवण्याची पायरी वैकल्पिक आहे.आम्ही ताटात जागा नसल्याने बनवले.
4. अचानक एक पनीर चा तुकडा सापडावा आणि ताटात स्पंज बॉब बनवून पटकन फोटो काढून ताटाचा भुकेल्या मंडळींना नैवेद्य दाखवून पटापट ओट्या वरचा पसारा आवरायला घ्यावा
5. आता उरले सुरले पनीर तुकडे, भाज्या तुकडे पटापट उरल्या मरीनेशन मध्ये घोळवून पाणिनी मेकर मध्ये किंवा तव्यावर परतायला टाकावे आणि जेवायला जावे.यांना वेळ लागतो त्यामुळे विसरलं तरी चालतं.तोवर कोणी न कोणी ओट्यापाशी जाऊन ते बंद करतं.
6. 'आता स्पर्धेच्या पुढच्या राउंड मध्ये काय बनवणार' हा प्रश्न न ऐकल्या सारखा करून मस्त टीव्ही लावून फ्रेंड्स बघत बघत जेवावे.टीव्ही बघत जेवणे पाप. पण आजूबाजूला लोकांनी दिवसभर ऑफिस मध्ये इतकी पापं केलीत की आपण एखादं शांतपणे करून टाकावं.
IMG_20260923_211216.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.. छान खुसखुशीत लिहिल आहे अगदी "मुद्दे"सूद.
थाळीचा फोटो पण मस्त.
कातरवेळ मी का? तर वेळ असे वाचले.

पनीर आवडतं. त्यामुळे पनीर ऐवजी बटाटा चालेल का असं विचारणार नाही.

ही प्रवेशिका या स्पर्धेत सुद्धा चालेल.

राजकीय पक्षाने दुसर्‍या पक्षाचे आमदार फोडावेत, तशी विचारणा करतोय. आणि आमच्या राज्यात दुहेरी सदस्यत्व सुद्धा नियमात बसतं. त्यामुळे इथे पक्ष फुटत बिटत नसतो. फक्त शीर्षकात दुसर्‍या स्पर्धेचं सुद्धा नाव द्या.

पदार्थ आणि लिखाण मस्तच.

आजूबाजूला सुगरणी खऱ्याखुऱ्या मराठी छान रेसिपी बनवतायत.आणि आपण 'सगळे पदार्थ एका वेळी फोटो काढा' वाल्या अटीवर कळवळतोय.
>>>> अगदी अगदी माझ्या मनातलं बोललीस.
त्यात मी तांदूळ मनाशी धरून एवढ्या रेसिप्या योजल्या होत्या. पण ऍडमिननी पहिल्याच फेरीत तांदूळ वापरून टाकला.

भारी रेसिप्या !
फक्त फोटोतल्या त्या सॉसच्या (?) ब्राऊन रेषा काढून फोटो काढता आला तर बघा.. ते काहीतरी वेगळच वाटत आहे.. Proud

धन्यवाद प्रतिसादक मायबाप!! भरत, इतकेही विनोदी नाहीये की त्या एंट्रीत टाकावे Happy
माम, आपण दोघी बहिणी बहिणी!!
पराग, आता ए आय ची मदत घ्यावी लागेल.प्रयत्न करतो आणि जरा 2-3 बादल्या पर्यावरण पाणी घालवतो. बनी तो बनी नही तो अब्दुल गनी.(असं बहुधा नाना पाटेकर तिरंगा मध्ये म्हणतो.)आम्ही आपले मास्टर शेफ वाल्यांचे बघून करायला गेलो.पण डिश चा रंग गडद असल्याने वेगळे दिसतेय.

थाळी छान. लिखाणही छान.
पनीर कधीच आणत/करत नाही. बाहेर कुठेही पनीर खाणे टाळते. त्यामुळे माझा पास.

मस्त!
ग्रील पनीर आणि पनीर पराठा खूप वेळा होतो. कांदा, सिमला मिरची, आणि अननस हे ग्रिल करुन छान लागतात.
बाकी या कृतीच्या ३ पासून चालू करा, आणि आता तिच्या चार पासून चालू करा... या कृती को-पायलटने कंझ्युम करायला लिहिल्या आहेत किंवा सध्या सगळं को-पायलट कडून करुन घ्यायची सवय झाल्याने तसेच प्रॉम्प लिहिले जाऊ लागलेत की काय वाटलं.
सगळे कंस बंद केलेत ना बघणारा एजंट लिहिलास की नाही! Proud Wink

कंस ही एक दुष्ट प्रवृत्ती आहे.कोणाही यंत्र एजंट वर विश्वास न ठेवता त्यांना स्वतःच बंद करावे.कधीतरी गोल कंसाचा बंद कंस म्हणून महिरप चुकून आली तर ते स्खलनस्वातंत्र्य म्हणून सूट म्हणून अंतर्भूत करावे(जमलं की नाय आम्हाला पण??) सर्व कंस मॅन्युअल सुबक हातवळणीने बंद केले आहेत.

रेसिपी मस्त आणि लिहिले पण भन्नाट !!!

नो शुगर नो शुगर अल्टरनेट पूर्ण घटक वाचून प्रोटीन बार डब्यात देते इथेच तुम्ही चुकलात Lol

खुशखुशीत लिहिलेय.

चवही छानच असेल, फोटो मात्र पदार्थांना न्याय देणारे नाहीत (sorry, unpopular opinion 🙈 )

अनु, लिखाण भारीच!
पण मलाही अनिंद्य यांच्यासारखंच वाटलं. फोटो मेहनतीला आणि पदार्थांना साजेसे हवे होते. (तू आधीच टोमॅटोच्या रेसिपीत चांगले फोटो टाकून बार उंचावलास म्हणून या वेळी अपेक्षा वाढल्या.)

चालवून घ्या हो जनता जनार्दन आहेत तसे फोटो.आता परत रेसिप्या करून परत फोटो काढायची शक्ती नाही.
शप्पत सांगते चव चांगली आली होती Happy

होय. चालतील. तुमच्या शपथेवर विश्वास आहे 😀

तुम्ही, अस्मिता Sportingly घ्याल हे माहित असल्याने थोडा मनमोकळा प्रतिसाद दिला दोन्हीकडे.

मस्त आहे
प्रोटीन packed रेसिपी
पनीर असल्याने आवडते देखील.

शप्पत सांगते चव चांगली आली होती>>> असणारच! लिखाण ज्या हातांनी करतेस त्याच हातांनी बनवतेय न, चटकदार तर असणारच!

शप्पत सांगते चव चांगली आली होती>>> असणारच! लिखाण ज्या हातांनी करतेस त्याच हातांनी बनवतेय न, चटकदार तर असणार याची खात्री आहे!

शप्पत सांगते चव चांगली आली होती>>> असणारच! लिखाण ज्या हातांनी करतेस त्याच हातांनी बनवतेय न, चटकदार तर असणार याची खात्री आहे!

शप्पत सांगते चव चांगली आली होती>>> असणारच! लिखाण ज्या हातांनी करतेस त्याच हातांनी बनवतेय न, चटकदार तर असणार याची खात्री आहे!