लेखन स्पर्धा - पाककृती लेखन

Submitted by संयोजक on 3 September, 2026 - 12:44

नमस्कार मायबोलीकर मंडळी !

दरवर्षीच्या मायबोली गणेशोत्सवात पाककृती स्पर्धा असतातच. यंदाही आहेत. पण ही स्पर्धा जरा नव्हे, बरीच वेगळी आहे. ही लेखनाची , लेखनकौशल्याची स्पर्धा आहे. तुम्हांला हव्या त्या पदार्थाची कृती इथे तुम्ही सांगायची आहे. ते लेखन पेरलेल्या विनोदांमुळे खुसखुशीत ,चुरचुरीत, खमंग ; घेतलेल्या चिमट्यांमुळे तिखट, टोकदार, काटेरी ; भावनांना - आठवणींना हात घातल्याने स्निग्ध , रसाळ, हरवाळ किंवा अगदी संपता संपेना असे पसरट , पातळ, रटाळ कसेही असू शकते.

अट एकच. कोणी या कृतीनुसार पदार्थ करायचा म्हटला, तर तो करता आला पाहिजे आणि केल्यावर खाण्याजोगा (किंवा पिण्याजोगा) असला पाहिजे.

स्पर्धा म्हटली की नियम आलेच.

१. प्रवेशिका पाठवण्याकरिता मायबोली गणेशोत्सव २०२६ या ग्रुपचे सदस्यत्व घ्यावे लागेल. हा ग्रुप सदस्यनोंदणीकरता सोमवार १४ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होईल.
२. या ग्रुपचे सदस्यत्व घेतल्यावर लेखनाचा धागा हा पर्याय निवडून तुमची पाककृती लिहा. तुमच्या पाककृतीला साजेसे नावही द्या.
३. प्रवेशिकेचे शीर्षक पुढीलप्रमाणे द्यावे - लेखन स्पर्धा - पाककृतीचे नाव - (तुमचे मायबोली सदस्यनाम)
४. शब्दखुणांमध्ये मायबोली गणेशोत्सव २०२६ असे लिहा.
५. प्रवेशिका देण्याची अंतिम मुदत शुक्रवार २५ सप्टेंबर २०२६ अमेरिकेतील पॅसिफिक टाइम झोननुसार रात्रौ १२ .
६. स्पर्धेचे विजेते मतदानाने निवडण्यात येतील.
७. लेखन कुठेही पूर्वप्रकाशित नसावे.
८. एक सदस्य कितीही प्रवेशिका देऊ शकतो.

गणपतीबाप्पा मोरया!

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच कल्पक स्पर्धा
या निमित्ताने पहिल्यांदा पाककृती स्पर्धेत भाग घेता येईल