पाककृती स्पर्धा क्रमांक ३- चवींचा त्रिवेणी संगम- Pink Lady & Blue Gentleman - कविन

Submitted by कविन on 23 September, 2026 - 09:36

Pink Lady & Blue Gentleman च का? कारण दुसरं नाव सुचलं नाही, नाव जुने असले तरी non alcoholic हे नाविन्य आहे म्हणता येईल Proud . तसं काही वेगळही नाही रेसिपीत पण प्रत्येक ठिकाणी वेगळच कशाला हवय? वेगळं हवं, वेगळं हवं म्हणणाऱ्या पालकांनी ठेवलेली नावे आणि बारशाचे मीम काय कमी फिरतायत आजकाल? त्यात अजून कशाला ती भर म्हणून राहूदेत हेच नाव.

पदार्थाला चांगले नाव नसले आणि माझी फोटोग्राफी फार भारी वगैरे नसली तरी चव एक नंबर आहे. असं आपलं मी म्हणते आज. उद्या तुम्ही करुन पहाल तेव्हा तुम्हीही म्हणाल Proud
मधल्या पायरीचा फोटो विसरले काढायला. काल सकाळी ऑफीसला जाताना तयारी करुन गेले म्हणून साहित्याची मांडामांड करुन फोटो घ्यायचे विसरले, आठवण असती तरी वेळ नसताच मिळाला म्हणा. बेस तयार करुन गार व्हायला फ्रीजात ढकलला. रंगीत बर्फ पण तयार व्हायला ठेवला आणि संध्याकाळी असेंबल करुन मोजून ३ ग्लास (घरात माणसे ३) तयार केले

अरे हो ही लेखनस्पर्धा नाहीये नाही का ! ती वायली ही वायली. जाऊद्या मग नाही लावत पाल्हाळ अजून, डायरेक्ट कृतीवरच उतरते.

आधी फोटो बघा आणि आवडला तर पुढे जालच. नाही आवडला तरी पुढे वाचा ... मत बदलेल किंवा पक्के तरी होईल.

InShot_20260923_154012148.jpg

साहित्य:
१) Pink Lady - डाळिंब/ अनार दाणे, जास्वंदाची फुले, काळे मीठ, मिरची, बडीशेप, साखर
२) Blue Gentleman - निळी गोकर्ण फुले, लिंबू, मोसंब,काळे मीठ, पुदीना, साखर
१)अर्धा कप पाणी उकळले. उकळतानाच त्यात बडीशेप घातली होती. मी मायक्रिव्हेव्ह मधे पाणी गरम केल्याने गॅस बंद करायची गरज नव्हती. कप मावे बाहेर काढून त्यात जास्वंदीची ३ फुले घालून झाकून ठेवले. (पिंक फुलचा)
२) दुसऱ्याही कपात पाणी उकळून घेऊन त्यात गोकर्णाची फुले आणि पुदिना घालून झाकून ठेवले (ब्ल्यु फुलचा)
३) हॅंड ज्युसरवर मोसंबीचा रस काढून गाळून घेतला आणि त्या पाठोपाठच डाळिंबाचाही ज्युस काढून गाळला (अरे हो! मधे त्या ज्युसरवर पाणी घालून आधी साफही केले)
४) मोसंबीचा चोथा काही फार नव्हता पण डाळिंब्यांच्या उरलेल्या चोथ्यात बराच रस होता तो मात्र परत मिक्सरवर फिरवून गाळून वेगळा ठेवला. हा रस थोडा दाट होता. यात थोडी साखर घातली होती मी मिक्सरला फिरवतानाच.

आधीचा निव्वळ कलरफूल पाणीवाला ज्युस यात मिसण्या आधी कलरफुल बर्फ करायला सिलिकॉन चॉकलेट मोल्ड मधे घालून ठेवला. सेम निळा बर्फ गोकर्ण टी पासून करायला चॉकलेट मोल्ड मधे घातला थोडा आणि ते सेट करायला फ्रीजरला ढकलले
या स्टेप पर्यंत पिंक लेडी साठी डाळिंब ज्युस आणि ब्ल्यु जेंटलमन साठी मोसंबी ज्युस तयार झाले होते गाळून ते गार व्हायला फ्रिजात दिले ठेवून
तोवर आपला फुलचा पण पाण्यात रंग उतरवून तयार होता. तो ही वेगवेगळा गाळून घेतला. आता या फुलचाला तशी चव अशी नसते विशेष. त्याला नटवावे लागते. पिंक फुलचामधे बडीशेपची चव उतरली होतीच. त्यात काळे मीठ, साखर आणि एक मिरची स्लिट देऊन बुडवून ठेवली
ब्ल्यु फुलचा मधे पण काळे मीठ साखर आणि चाट मसाला अगदी पाव चमच्याइतका घातला
हे पण फ्रीजात गार व्हायला ढकललं
बर्फाच्या ट्रे मधे एका खोबणीत डाळिंब दाणे आणि पाणी घातलं बर्फ व्हायला त्याचा आणि दुसऱ्या खोबणीत गोकर्णाच फूल आणि पाणी घातलं

फोटो काढे पर्यंत वेळ झाल्याने फक्त सजावटीला गोकर्ण फुलाचा बर्फ शिल्लक राहिला होता. बाकी वितळायला लागल्याने सजावटी ऐवजी ग्लासातच घातले गेले (फुकट काही गेले नाही)

असेंब्लिंग
pink lady: साखरयुक्त डाळिंब रस + बर्फ + मिरची आणि बडीशेपची एकदम हलके चव उतरलेला जास्वंद फुलचा+ डाळिंब दाणे आणि ज्युस घालून केलेला बर्फ+ काळे मीठ. चव: गोड आणि हलके स्पायसी (यातही एका ग्लासमधे लिंबू रस आणि चाट मसाला घालून प्रयोग केला.ती चवही छान लागली

Blue Gentleman: साखरयुक्त मोसंबी रस+ गोकर्ण फुलचा + काळे मीठ आणि बर्फ ... वरुन हलके अर्ध्या लिंबाचा रस घातलाय. लिंबाचा रस जसा आत झिरपत जातो तसा हलके रंग बदलत जातो. चव आंबट गोड खारट याचा परफेक्ट बॅलन्स

ब्ल्यु जेंटलमन मधे सोडाही चांगला लागेल आणि सोड्याबरोबर वोडकाही छान लागेल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे पदार्थ
कवीन id चं बारसं करून फुलराणी करूयात का?
.

सुंदर रंगाचे पेय

काऊ सुंदर दिसतंय!! तुम्ही सर्व या स्पर्धा कॅटेगरी मध्ये भाग घेणाऱ्या लोकांनी एक मस्त फ्लॉवर मॉकटेल बार काढा.

मस्तच.
दोन्ही रंग जबरी दिसत आहेत.
मला ते गोकर्णाचा आईस क्यूब आवडला.
तुझ्याकडे आल्यावर हेच दे करून..

धन्यवाद मंडळी

हो चालेल. तू ये इकडे मी देईन हे करुन @ऋतुराज. गोकर्ण, पुदीना आणि लिंबू तिनही गोष्टी आमच्याच बागेतल्या आहेत. तुला गच्चीतली बाग पण तर बघायची आहे आमची.

दोन पेयांची आयडिया छान

I would choose pink lady any day !

समहाऊ खाद्य-पेय पदार्थांमधे निळा रंग synthetic वाटतो.

सहीच बहारदार, देखणे दोघे. लेखनही खुसखुशीत. करून बघणार नाही, डोंबिवलीत आलीस की सांग, येते प्यायला, मग चव सांगेन.

धन्यवाद सर्वांना

अंजू तुला कळवते डोंबिवलीत येणार असेन तेव्हा. रक्षाबंधनाला येऊन गेले भावाकडे पण तेव्हा फारच गडबडीत होते

@मेधा चालेल ठरव तारीख वार, होऊन जाऊदे गटग चक्रदेव स्टुडीओ नाहीतर बाप्टिस्टा काकांच्या बागेत Lol

परत एकदा सगळ्यांचे आभार