पाककृती लेखन स्पर्धा- अस्मिता- चिवडा आणि पाल्हाळ

Submitted by अस्मिता. on 22 September, 2026 - 18:56

चिवडा आणि पाल्हाळ

चिवडा-
साहित्य - साधारण सहा सात वाट्या पातळ पोहे, एक वाटी भाजलेले शेंगदाणे आणि डाळं मिळून, अर्धी वाटी सुके खोबऱ्याचे काप, एक चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धी वाटी कढीपत्त्याची पाने, दोन चमचे जिरे आणि मोहरी प्रत्येकी, पाव चमचा सायट्रिक ऍसिड किंवा अर्धा चमचा आमचूर पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे मोठे तुकडे, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. साखर आणि मीठ, अर्धा चमचा हळद.

मी पोहे साधारण दोन भागात मायक्रोवेव्ह मधे तीन मिनिटे एकावेळी दीड मिनिटे असं करत मग पुन्हा हलवून अजून एक वेळा दीड मिनिट असं भाजून घेते. जरूरी प्रमाणे किंवा पोह्याच्या जातीप्रमाणे हा वेळ बदलेल. हेच गॅस वरही भाजता येईल.

नंतर एक वाटी तेलाच्या फोडणीत, जिरे मोहरी, कढिपत्ता. ते तडतडले की शेंगदाणे, डाळं, खोबऱ्याचे काप एकानंतर एक घालत सतत हलवत राहायचे. आलं लसूण पेस्ट घालून परतून घेऊन. थोडी साखर, मीठ, सायट्रिक ऍसिड, कोथिंबीर व दोन्ही मिरच्या घालून पुन्हा परतून घ्यायचे. कोथिंबीर आणि हिरवी मिरची कुरकुरीत दिसली की हळद घालून लगेच भाजलेले पोहे घालून भरपूर परतून, भाजून घ्यायचे. फोडणी करपली की चिवड्याचा घात होतो म्हणून सतत लक्ष ठेवा व हलवत राहा. थोडे तीळही घालू शकता यात. खूप सोप्या पद्धतीने होतो आणि मायक्रोवेव्ह मधे भाजणे पटकन होते त्यामुळे मी नेहमी करते. मी भरपूर मसाला घालते म्हणजे प्रत्येक घासात एक दाणा, एक डाळं यायला हवं.

पाल्हाळ -

माझे वडील मला बरेचदा माझे आईस्क्रीम मागून फिलॉसॉफीकल बोलायचे ( हो, आमच्याकडे होतेच ते बाळकडू) तर ते उगाच - अस्मिता, खरा आनंद त्यागात आहे भोगात नाही. त्यामुळे तू मला तुझे आईस्क्रीम दे. तेव्हा मी बाणेदारपणे - मग तुम्ही घ्या तो त्यागाचा आनंद म्हंटले होते. मला तेव्हापासून माहिती आहे खरी फिलॉसॉफी कशी पटवून द्यायची. त्यांच्या प्रयोगशील वृत्तीमुळे मी आज अशी होऊन बसलेय.

तर आता पाल्हाळ लावा असं स्वतःहून कुणी म्हणत असेल तर नेकी और पुछ पुछ. माझ्या लेकीला पहिलीत असताना बर्फ कसा तयार होतो, हा एक प्रयोग म्हणून समजावून सांगताना पॉप्सिकल बनवायचा प्रोजेक्ट होता. तेव्हा आदल्या दिवशी बनवून फ्रीझमधे ठेवून दुसऱ्या दिवशी खायचे होते. ते तिने - "We have to eat it, it's for the project !" अशा त्यागाच्या आविर्भावात सांगितले की बस! तसं हे पाल्हाळ म्हणजे त्याग आहे त्याग, तो मला नियमापायी करावाच लागणार आहे. 

मनात जुळवाजुळव करून मी चिवड्यावर लेख लिहायचा ठरवले व लिहिताना फोन टॅबलेट घेऊन बसलेली असताना व्हाट्सॲप वर एका अमराठी मित्राने मला माझं काही तरी वाचून- "इतनी मराठी सुनके, अभी तू विद्यानंद बापट की बेहन लग रही है! " म्हंटले. पण मी बापटांचे काहीही वाचले/ पाहिले नव्हते, पूर्णपणे "बापट व्हर्जिन"! विश्वास ठेवा, I am too brave too lie anyway. कधीतरी पाहू म्हणून तो धागाही पाहिला नव्हता. पण आता अचानक "व्हर्जिनिटी का चिवडा, व्हर्जिनिटी का चिवडा" अशा धर्मसंकटात सापडल्याने आधी व्हर्जिनिटी गमावण्याचे स्खलनस्वातंत्र्य घेऊन बापटांची एक मुलाखत पाहून मग हे लिहायला घेतले. 

आमच्या लहानपणी आमचं घर / वाडा टेकडीवर होतं, त्याचा चढ जेथे सुरू होतो त्यापुढे मजाल है काहीही चढू शकले तर! एकदा एक थोर लेखक आमच्या शाळेत येऊन गेले, त्यांना दारापर्यंत रिक्षा न येण्याचा पुढेही गल्लीबोळांचा इतका त्रास वाटला की पुन्हा ह्या लहान शहरातल्या भिकार भागात कधीही येणार नाही म्हणून चालते झाले, अशा लहान मुलांसमोर त्यांच्याच घरादाराला कमी लेखणाऱ्याचं भाषण ऐकून मला पहिल्यांदा विरोधाभास कळाला. थोरवी आणि प्रसिद्धी या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तेथे कोणतीही रिक्षा, गाडे चढायचे नाहीत, बोळकांडात कार येऊ शकायच्या नाहीत. तेथे सगळे साथ सोडायचे. पुढे "आपापलं जा" म्हणत. "तेरी गलियोंमें ना रखेंगे कदम आजके बाद" हे ऐकत आम्ही मनाने सुद्धा काटक झालो.

त्याच उतारापाशी फेरीवाले आलटून पालटून उभे राहायचे. तेथेच एक चिवडावाला सायकलवर ट्रंकमधे चिवडा घेऊन येऊन विकायचा. एकदम छान रंगवलेली पेटी सारखी धातूची ट्र्ंक आणि त्यात तळलेल्या पोह्यांचा चिवडा असायचा. त्यासोबत दुसरं काही विकताना मी त्याला कधीही पाहिल्याचं आठवत नाही. जगात भारी चिवडा होता त्याचा. मस्त कलाकुसर करून प्रो बोयनवाड असं त्याचं नावही लिहिलेलं होतं पेटीवर. आम्ही "बोयनवाड आला, बोयनवाड आला" सांगत फिरायचो. तो तसा अधूनमधून यायचाच पण ते फार रँडम होते. त्याहीपेक्षा रँडम त्यावेळी आम्हाला चाराणे,आठाणे देणारं कुणी सापडणं होतं. कधीकधी कुल्फीवाला व तो एकाच वेळी यायचे आणि चार आणे असूनही अर्जुनविषाद योग यायचा, कुल्फी घेऊ का चिवडा? त्यावर आम्ही पुष्कळ खल केला, चाराण्याच्या कुल्फीत फक्त दूध असतं, टोकाला तर चक्क पाणीदार पारदर्शक गोड दूध, खाली रूंद झालेल्या भागाला चातकासारखे चाटत बसण्यापेक्षा बोयनवाडचा चिवडा घेतलेला बेहेत्तर. हा निर्णय आठाणे मिळेपर्यंत ठरलेला असायचा. बरेचदा आजोबांचा अघळपघळ सदरा डोक्यावरून काढताना खिसा उलटा होऊन चिल्लर पडायची. ती आम्ही ताबडतोब स्वर्गातली पुष्पवृष्टी समजून उचलून तडक उतारावर हनुमानाटाईप उडी घेऊन जे मिळेल ते आणायचो. त्यातही बोयनवाड नेहमीच वर !

कधीतरी कॉलेजात असताना मैत्रिणीला कुठूनतरी कळाले की दंगलीत बोयनवाडला कुणीतरी मारून काढले, थोडं वाईट वाटलं. थोडंच ! त्याची पेटी फेकून चिवडा सांडून गेला असेल याचं जास्त वाईट वाटलं. "आपण नीच आहोत ना? हो, डेफिनेटली नीच" असंही नंतर बोललो. सुखरूपच असेल तो. पण गरिबाचं नुकसान.

अशीच चिवड्याची आणखी एक आठवण. माझ्या मावस बहिणीच्या लग्नासाठी आम्ही सगळे जण परभणीला गेलो होतो. तेव्हा दोन ड्रमभरून चिवडा केला होता, तो जगातला सगळ्यात वाईट चिवडा झाला नेमका. कुणीही तोंड लावेना गेले, लग्न झालं- पाहुणे गेले. आम्ही सख्खे मामे, मावसभावंडं, मामा, मावश्या उरलो. बहुतेक या बेकार चिवड्याला संपवायची क्लृप्ती आई आणि मावशीने मिळून लढवली. या बेकार चिवड्यावर चिंचेची चटणी, कांदा, कोथिंबीर घालून पोह्याची भेळ करून देऊन गोडगोड बोलून रोज चार वाजता देऊ लागले. मी थोडं चक्काजाम आंदोलन सुद्धा केलं, मला माहिती तुम्ही बंडल चिवडा आम्हाला संपवायला लावताय वगैरे. पण माझ्या आंदोलनाला कुणी विचारले नाही व भुकेली वाढीच्या वयाची आठदहा मुलं असल्याने बघताबघता दोन ड्रम चिवडा संपला. तो इतका वाईट होता की त्याचाही आघात अजून टिकून आहे.

अजून एक लाडू व चिवड्याची आठवण मुक्तपीठ शैलीत. ही कधीतरी आधी सांगितली आहे, पण आज पुन्हा. मी न्यूयॉर्कला गेले होते तेव्हा आम्ही सगळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहायला जाताना सोबत चिवडाही घेऊन गेलो होतो. एकदम ममव ट्रिप होती, लेडी लिबर्टीला साडी चोळीचा आहेरच बाकी होता ,लॉन्ग आयलन्डला घरून निघून ट्रेन गाठली. आम्ही बरोबर आठ -नऊ जणांचा ग्रूप. दोन ज्येना. सगळी माझी आत्याकडची फॅमिली. त्यापैकी आत्याला घरंच सोडायचं नसतं. आधी ठाण्याचं आणि मग जेथे जाईल तिथलं. काय करायचंय बाहेर जाऊन? घरीच किती छान वाटतं, हवं तेव्हा झंडू बाम लावता येतं, हवं तेव्हा बाथरूमला जाता येतं, हवं तेव्हा झोपता येतं असे प्रखर मत असलेली ज्येना मंडळी घरात आहेत. काहीही कौतुक वाटत नाही कशाचंच. घरीच मराठी मालिका बघणं व त्यातल्या नायिकेचं कौतुक करणं. त्यात तिला सततच थंडी वाजते, तुमच्याकडचे वारे आम्हाला बघून सुटते म्हणायच्या ती आणि आई. अशा अजिबात प्रेरणादायी नसलेल्या व्यक्तिमत्त्वांना बाहेर नेणं म्हणजे एक आव्हान असतं.

त्यांना फार चालावे लागू नये म्हणून माझ्या भाच्याने कारने न्यूयॉर्क सिटीत नेले, आम्ही ट्रेनने गाठलं. त्यांना दगदग नको म्हणून. नंतर लिबर्टीच्या स्टेशनावर फेरी गाठली, तेव्हा लंचची वेळ झालीच होती. ठाण्याहून आणलेला चिवडा आणि बेसनाचे लाडू. येथे घरून नेलेली पोळी, मेथीची मुद्दा भाजी, चटणी. सगळ्यांना पुरेल इतकं. एकदा माझ्या ताईने प्लॅन केले की कुणाची हिंमत होत नाही बाहेर खायची. मी मधेच सबवे -सबवे केले पण तिने डोळे मोठे करून चिवड्याची पिशवी दिली. चिवड्याची पिशवी अतिशय सखोल होती, एवढे सखोल तर माझे फिलॉसॉफीकल लेखही नसतात. "स्कूबा" करूनच चिवडा मिळायचा. मला या पाईपमधे उडी मारायला लावू नको असेही मनात आले. असं करत फिरत फिरत आम्ही सुव्हिनियर म्हणून आम्ही खटारा मॅग्नेट्स घेतले, परंपरा म्हणून. अशाने घरात खटारा पसारा गोळा होतो. वेळ घालवायला आणि फेरीच्या वेगवेगळ्या बाजूने असलेल्या डेकवर व त्या संपूर्ण फेरी बोट मधे आतबाहेर करत राहिलो. नंतर बसून "मुक्तपीठ" जेवणाचा आस्वाद घेतला. कुणीही लाजले नाही, लाज आता संपल्यातच जमा आहे. आमचे भावजी खूप हुशार, दोन MS आणि एक MBA... खरंच. हे झाल्यावर त्यांनी आईस्क्रीम घेतलं सगळ्यांना, तेव्हाही ताईने चिडून लाडू होते ना म्हंटलेच. अशा वेळी डिग्री काही कामाची नाही. अशी मस्त ट्रिप करून परत आलो.

अशा अनेक फराळाच्या आणि ज्यांच्यासोबत फराळ केला- चिवडा खाल्ला, अशा प्रकारच्या आठवणी सगळ्यांच्याच असतील, या जरा विस्कळीत आहेत चालवून घ्या! काहीतरी करून गणेशोत्सवात भाग घ्यायचा होता म्हणून आवर्जून पाल्हाळ खरडलेय.

-अस्मिता

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वानंदी, हो मलाही फारच अव्वाच्या सव्वा वाटलं. नको याच्या नादी लागूस. आपापला पोह्यांचा पर्याय बरा. Happy

राज, तुम्हाला मुपी वंचितांचे आशीर्वाद लागतील. धन्यवाद. Happy

Pages