पाककृती लेखन स्पर्धा- अस्मिता- चिवडा आणि पाल्हाळ

Submitted by अस्मिता. on 22 September, 2026 - 18:56

चिवडा आणि पाल्हाळ

चिवडा-
साहित्य - साधारण सहा सात वाट्या पातळ पोहे, एक वाटी भाजलेले शेंगदाणे आणि डाळं मिळून, अर्धी वाटी सुके खोबऱ्याचे काप, एक चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धी वाटी कढीपत्त्याची पाने, दोन चमचे जिरे आणि मोहरी प्रत्येकी, पाव चमचा सायट्रिक ऍसिड किंवा अर्धा चमचा आमचूर पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे मोठे तुकडे, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. साखर आणि मीठ, अर्धा चमचा हळद.

मी पोहे साधारण दोन भागात मायक्रोवेव्ह मधे तीन मिनिटे एकावेळी दीड मिनिटे असं करत मग पुन्हा हलवून अजून एक वेळा दीड मिनिट असं भाजून घेते. जरूरी प्रमाणे किंवा पोह्याच्या जातीप्रमाणे हा वेळ बदलेल. हेच गॅस वरही भाजता येईल.

नंतर एक वाटी तेलाच्या फोडणीत, जिरे मोहरी, कढिपत्ता. ते तडतडले की शेंगदाणे, डाळं, खोबऱ्याचे काप एकानंतर एक घालत सतत हलवत राहायचे. आलं लसूण पेस्ट घालून परतून घेऊन. थोडी साखर, मीठ, सायट्रिक ऍसिड, कोथिंबीर व दोन्ही मिरच्या घालून पुन्हा परतून घ्यायचे. कोथिंबीर आणि हिरवी मिरची कुरकुरीत दिसली की हळद घालून लगेच भाजलेले पोहे घालून भरपूर परतून, भाजून घ्यायचे. फोडणी करपली की चिवड्याचा घात होतो म्हणून सतत लक्ष ठेवा व हलवत राहा. थोडे तीळही घालू शकता यात. खूप सोप्या पद्धतीने होतो आणि मायक्रोवेव्ह मधे भाजणे पटकन होते त्यामुळे मी नेहमी करते. मी भरपूर मसाला घालते म्हणजे प्रत्येक घासात एक दाणा, एक डाळं यायला हवं.

पाल्हाळ -

माझे वडील मला बरेचदा माझे आईस्क्रीम मागून फिलॉसॉफीकल बोलायचे ( हो, आमच्याकडे होतेच ते बाळकडू) तर ते उगाच - अस्मिता, खरा आनंद त्यागात आहे भोगात नाही. त्यामुळे तू मला तुझे आईस्क्रीम दे. तेव्हा मी बाणेदारपणे - मग तुम्ही घ्या तो त्यागाचा आनंद म्हंटले होते. मला तेव्हापासून माहिती आहे खरी फिलॉसॉफी कशी पटवून द्यायची. त्यांच्या प्रयोगशील वृत्तीमुळे मी आज अशी होऊन बसलेय.

तर आता पाल्हाळ लावा असं स्वतःहून कुणी म्हणत असेल तर नेकी और पुछ पुछ. माझ्या लेकीला पहिलीत असताना बर्फ कसा तयार होतो, हा एक प्रयोग म्हणून समजावून सांगताना पॉप्सिकल बनवायचा प्रोजेक्ट होता. तेव्हा आदल्या दिवशी बनवून फ्रीझमधे ठेवून दुसऱ्या दिवशी खायचे होते. ते तिने - "We have to eat it, it's for the project !" अशा त्यागाच्या आविर्भावात सांगितले की बस! तसं हे पाल्हाळ म्हणजे त्याग आहे त्याग, तो मला नियमापायी करावाच लागणार आहे. 

मनात जुळवाजुळव करून मी चिवड्यावर लेख लिहायचा ठरवले व लिहिताना फोन टॅबलेट घेऊन बसलेली असताना व्हाट्सॲप वर एका अमराठी मित्राने मला माझं काही तरी वाचून- "इतनी मराठी सुनके, अभी तू विद्यानंद बापट की बेहन लग रही है! " म्हंटले. पण मी बापटांचे काहीही वाचले/ पाहिले नव्हते, पूर्णपणे "बापट व्हर्जिन"! विश्वास ठेवा, I am too brave too lie anyway. कधीतरी पाहू म्हणून तो धागाही पाहिला नव्हता. पण आता अचानक "व्हर्जिनिटी का चिवडा, व्हर्जिनिटी का चिवडा" अशा धर्मसंकटात सापडल्याने आधी व्हर्जिनिटी गमावण्याचे स्खलनस्वातंत्र्य घेऊन बापटांची एक मुलाखत पाहून मग हे लिहायला घेतले. 

आमच्या लहानपणी आमचं घर / वाडा टेकडीवर होतं, त्याचा चढ जेथे सुरू होतो त्यापुढे मजाल है काहीही चढू शकले तर! एकदा एक थोर लेखक आमच्या शाळेत येऊन गेले, त्यांना दारापर्यंत रिक्षा न येण्याचा पुढेही गल्लीबोळांचा इतका त्रास वाटला की पुन्हा ह्या लहान शहरातल्या भिकार भागात कधीही येणार नाही म्हणून चालते झाले, अशा लहान मुलांसमोर त्यांच्याच घरादाराला कमी लेखणाऱ्याचं भाषण ऐकून मला पहिल्यांदा विरोधाभास कळाला. थोरवी आणि प्रसिद्धी या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तेथे कोणतीही रिक्षा, गाडे चढायचे नाहीत, बोळकांडात कार येऊ शकायच्या नाहीत. तेथे सगळे साथ सोडायचे. पुढे "आपापलं जा" म्हणत. "तेरी गलियोंमें ना रखेंगे कदम आजके बाद" हे ऐकत आम्ही मनाने सुद्धा काटक झालो.

त्याच उतारापाशी फेरीवाले आलटून पालटून उभे राहायचे. तेथेच एक चिवडावाला सायकलवर ट्रंकमधे चिवडा घेऊन येऊन विकायचा. एकदम छान रंगवलेली पेटी सारखी धातूची ट्र्ंक आणि त्यात तळलेल्या पोह्यांचा चिवडा असायचा. त्यासोबत दुसरं काही विकताना मी त्याला कधीही पाहिल्याचं आठवत नाही. जगात भारी चिवडा होता त्याचा. मस्त कलाकुसर करून प्रो बोयनवाड असं त्याचं नावही लिहिलेलं होतं पेटीवर. आम्ही "बोयनवाड आला, बोयनवाड आला" सांगत फिरायचो. तो तसा अधूनमधून यायचाच पण ते फार रँडम होते. त्याहीपेक्षा रँडम त्यावेळी आम्हाला चाराणे,आठाणे देणारं कुणी सापडणं होतं. कधीकधी कुल्फीवाला व तो एकाच वेळी यायचे आणि चार आणे असूनही अर्जुनविषाद योग यायचा, कुल्फी घेऊ का चिवडा? त्यावर आम्ही पुष्कळ खल केला, चाराण्याच्या कुल्फीत फक्त दूध असतं, टोकाला तर चक्क पाणीदार पारदर्शक गोड दूध, खाली रूंद झालेल्या भागाला चातकासारखे चाटत बसण्यापेक्षा बोयनवाडचा चिवडा घेतलेला बेहेत्तर. हा निर्णय आठाणे मिळेपर्यंत ठरलेला असायचा. बरेचदा आजोबांचा अघळपघळ सदरा डोक्यावरून काढताना खिसा उलटा होऊन चिल्लर पडायची. ती आम्ही ताबडतोब स्वर्गातली पुष्पवृष्टी समजून उचलून तडक उतारावर हनुमानाटाईप उडी घेऊन जे मिळेल ते आणायचो. त्यातही बोयनवाड नेहमीच वर !

कधीतरी कॉलेजात असताना मैत्रिणीला कुठूनतरी कळाले की दंगलीत बोयनवाडला कुणीतरी मारून काढले, थोडं वाईट वाटलं. थोडंच ! त्याची पेटी फेकून चिवडा सांडून गेला असेल याचं जास्त वाईट वाटलं. "आपण नीच आहोत ना? हो, डेफिनेटली नीच" असंही नंतर बोललो. सुखरूपच असेल तो. पण गरिबाचं नुकसान.

अशीच चिवड्याची आणखी एक आठवण. माझ्या मावस बहिणीच्या लग्नासाठी आम्ही सगळे जण परभणीला गेलो होतो. तेव्हा दोन ड्रमभरून चिवडा केला होता, तो जगातला सगळ्यात वाईट चिवडा झाला नेमका. कुणीही तोंड लावेना गेले, लग्न झालं- पाहुणे गेले. आम्ही सख्खे मामे, मावसभावंडं, मामा, मावश्या उरलो. बहुतेक या बेकार चिवड्याला संपवायची क्लृप्ती आई आणि मावशीने मिळून लढवली. या बेकार चिवड्यावर चिंचेची चटणी, कांदा, कोथिंबीर घालून पोह्याची भेळ करून देऊन गोडगोड बोलून रोज चार वाजता देऊ लागले. मी थोडं चक्काजाम आंदोलन सुद्धा केलं, मला माहिती तुम्ही बंडल चिवडा आम्हाला संपवायला लावताय वगैरे. पण माझ्या आंदोलनाला कुणी विचारले नाही व भुकेली वाढीच्या वयाची आठदहा मुलं असल्याने बघताबघता दोन ड्रम चिवडा संपला. तो इतका वाईट होता की त्याचाही आघात अजून टिकून आहे.

अजून एक लाडू व चिवड्याची आठवण मुक्तपीठ शैलीत. ही कधीतरी आधी सांगितली आहे, पण आज पुन्हा. मी न्यूयॉर्कला गेले होते तेव्हा आम्ही सगळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहायला जाताना सोबत चिवडाही घेऊन गेलो होतो. एकदम ममव ट्रिप होती, लेडी लिबर्टीला साडी चोळीचा आहेरच बाकी होता ,लॉन्ग आयलन्डला घरून निघून ट्रेन गाठली. आम्ही बरोबर आठ -नऊ जणांचा ग्रूप. दोन ज्येना. सगळी माझी आत्याकडची फॅमिली. त्यापैकी आत्याला घरंच सोडायचं नसतं. आधी ठाण्याचं आणि मग जेथे जाईल तिथलं. काय करायचंय बाहेर जाऊन? घरीच किती छान वाटतं, हवं तेव्हा झंडू बाम लावता येतं, हवं तेव्हा बाथरूमला जाता येतं, हवं तेव्हा झोपता येतं असे प्रखर मत असलेली ज्येना मंडळी घरात आहेत. काहीही कौतुक वाटत नाही कशाचंच. घरीच मराठी मालिका बघणं व त्यातल्या नायिकेचं कौतुक करणं. त्यात तिला सततच थंडी वाजते, तुमच्याकडचे वारे आम्हाला बघून सुटते म्हणायच्या ती आणि आई. अशा अजिबात प्रेरणादायी नसलेल्या व्यक्तिमत्त्वांना बाहेर नेणं म्हणजे एक आव्हान असतं.

त्यांना फार चालावे लागू नये म्हणून माझ्या भाच्याने कारने न्यूयॉर्क सिटीत नेले, आम्ही ट्रेनने गाठलं. त्यांना दगदग नको म्हणून. नंतर लिबर्टीच्या स्टेशनावर फेरी गाठली, तेव्हा लंचची वेळ झालीच होती. ठाण्याहून आणलेला चिवडा आणि बेसनाचे लाडू. येथे घरून नेलेली पोळी, मेथीची मुद्दा भाजी, चटणी. सगळ्यांना पुरेल इतकं. एकदा माझ्या ताईने प्लॅन केले की कुणाची हिंमत होत नाही बाहेर खायची. मी मधेच सबवे -सबवे केले पण तिने डोळे मोठे करून चिवड्याची पिशवी दिली. चिवड्याची पिशवी अतिशय सखोल होती, एवढे सखोल तर माझे फिलॉसॉफीकल लेखही नसतात. "स्कूबा" करूनच चिवडा मिळायचा. मला या पाईपमधे उडी मारायला लावू नको असेही मनात आले. असं करत फिरत फिरत आम्ही सुव्हिनियर म्हणून आम्ही खटारा मॅग्नेट्स घेतले, परंपरा म्हणून. अशाने घरात खटारा पसारा गोळा होतो. वेळ घालवायला आणि फेरीच्या वेगवेगळ्या बाजूने असलेल्या डेकवर व त्या संपूर्ण फेरी बोट मधे आतबाहेर करत राहिलो. नंतर बसून "मुक्तपीठ" जेवणाचा आस्वाद घेतला. कुणीही लाजले नाही, लाज आता संपल्यातच जमा आहे. आमचे भावजी खूप हुशार, दोन MS आणि एक MBA... खरंच. हे झाल्यावर त्यांनी आईस्क्रीम घेतलं सगळ्यांना, तेव्हाही ताईने चिडून लाडू होते ना म्हंटलेच. अशा वेळी डिग्री काही कामाची नाही. अशी मस्त ट्रिप करून परत आलो.

अशा अनेक फराळाच्या आणि ज्यांच्यासोबत फराळ केला- चिवडा खाल्ला, अशा प्रकारच्या आठवणी सगळ्यांच्याच असतील, या जरा विस्कळीत आहेत चालवून घ्या! काहीतरी करून गणेशोत्सवात भाग घ्यायचा होता म्हणून आवर्जून पाल्हाळ खरडलेय.

-अस्मिता

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खमंग लिहीलं आहेस .. त्या चिवड्यासारखंच. पाल्हाळ म्हणत खाता येतोय की नाही असं वाटलं एक क्षणभर Wink
बाय द वे. अस्मिताच्या हातचा चिवडा अफलातून असतो. मंडळींनी संधी मिळाल्यास अजिबात सोडू नका. त्याच्यासाठी पाल्हाळ ऐकणंपण वर्थ आहे Proud

पहिलीच पोस्ट ॲक्चुअली चिवडा खाल्लेल्यांची आल्याने फारच मस्त वाटलं. मी विसरून गेले होते की माझ्या हातचा चिवडा खाल्लेली दोन माबोकर आहेत. थॅंक्यू अंजली. Happy
हा एक पुरावा आहे. Happy

Lol ते पेटीवर लिहिलेलं म्हटल्यावर आणि प्रो दिसल्यावर माझ्या डोक्यात चॉईस का लाईफ द्विधा आधीच झाली. Wink बोयनवाडने जरा बरं वाटलं. बंडल चिवडा वगैरे भोग तुमच्या नशिबात आले म्हणून तुला असे किस्से लिहायला मटेरियल तयार झालं. हल्ली जेव्हा पासून अतरंगी गोष्टी घडल्या की गप्पा मारायला विषय मिळतात हे मला समजलं आहे, तेव्हांपासून मी अतरंगी गोष्टी आयुष्यात व्हाव्या याची चातकासारखी वाट बघत असतो.
संत वगैरे सुख दुःख समेकृत्वा सांगतात, त्यात त्यांनी स्थितप्रज्ञ वगैरे न सांगता नॉर्मल पेक्षा वेगळं काही घडलं की गप्पा मारायला विषय मिळतो सांगितलं असतं तर जग एव्हाना बाय प्रॉडक्ट म्हणून स्थितप्रज्ञ झालं असतं.
प्रतिसादात पाल्हाळ लावायचं आहे का? तर चिवडा...
चिवड्याची कृती लिहून टाक चटकन यात... मला काहीतरी वेगळा चिवडा हवाच आहे.

लेखनाचीच स्पर्धा आहे पाककृतीचे फक्त नाव म्हणून पूर्ण वापर केला, व्होल वावर ईज अवर! तो परभणीचा चिवडा वास असलेल्या तेलाचा आणि वातड पोह्यांचा होता. चाईल्ड अब्यूज वगैरे गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या नाही तर ते तेच होते. आम्हाला चंपक, चांदोबा हातात देऊन मग चिवडा द्यायचे. ते वाचत वाचत सत्य फक्त मलाच कळालं होतं. Lol

हो, लावा पाल्हाळ हवं तितकं. चिवडा मी डोळे बंद करुनही करू शकते. लिहिते कृती. उगाच स्थितप्रज्ञ होऊ नका, थोडी बिथरल्याशिवाय मजा नाही. माझ्याकडे खूप किस्से आहेत, मी काही त्यातून शिकलेबिकले नाही पण सांगायला खूप काही आहे. Happy बिनतात्पर्याचे किस्से.

ते प्रोप्रायटर होते. प्रो बोयनवाड! Happy
प्रो दिसल्यावर माझ्या डोक्यात चॉईस का लाईफ >>>> Lol

फाउल.
लेखात चिवड्याची कृतीच नाही.
नियम वाच.

पण........
वाचायला मजा आली.
त्या पाहुण्यांना तुम्ही न हाथी है न घोडा है, यहॉं पैदलही आना है असं गाणं म्हणून दाखवायचं होतं.

कृती अपडेट करून दिली आहे वर. Happy

तुम्ही न हाथी है न घोडा है, यहॉं पैदलही आना है >>> Happy आम्हाला त्यांच्या चढ चढता न येण्याची कमाल वाटायची.‌ फिटनेस नव्हता काही आणि आम्हाला किती अवघड ठिकाणी राहाता म्हणायचे.‌

अस्मिता Happy
किती छान लिहिलं आहेस!!
उत्तम आहे तुझा चिवडा.....

Lol वाचायला सुरूवात केली तेव्हा खरेच पाल्हाळ वाटले पण स्वर्गातून पुष्पवृष्टी, पाणी घातलेली कुल्फी, लेडी लिबर्टीला साडीचोळी, नातेवाईकांना बघून सुटणारे वारे - सगळे मस्त. स्वर्गातून पुष्पवृष्टी आणि ज्येष्ठांची प्रखर मते वाचून टोटल फुटलो.

कुल्फी आणि चिवडा यात ठरवताना तुम्ही त्यावेळेस तुम्हाला कल्पना नसताना तुम्ही "मार्शमेलो टेस्ट" पास झालात Happy

मजेदार झालाय चिवडा!
स्वर्गातून पुष्पवृष्टी आणि ज्येष्ठांची प्रखर मते वाचून टोटल फुटलो.>> +१

Lol Proud
मला एकदम statue of liberty समोर खण नारळाची आणि ' वटी ' ची दुकाने लागली आहेत आणि मराठी बाया भाव करत आहेत असे चित्र समोर आले. ओटी घेऊन, 'आई लिबर्टी मुलाचे ग्रीन कार्ड ह्या वर्षी तरी येऊ देत तुझी परत ओटी भरेन ' असा नवस बोलत आहेत असे पण आले. Proud

खुसखुशीत लेख आहे चिवड्यासारखाच! Lol

मला एकदम statue of liberty समोर खण नारळाची आणि ' वटी ' ची दुकाने लागली आहेत आणि मराठी बाया भाव करत आहेत असे चित्र समोर आले. ओटी घेऊन, 'आई लिबर्टी मुलाचे ग्रीन कार्ड ह्या वर्षी तरी येऊ देत तुझी परत ओटी भरेन ' असा नवस बोलत आहेत असे पण आले.>>> Rofl

चिवड्यासारखा चटकदार लेख.

काय करायचंय बाहेर जाऊन? घरीच किती छान वाटतं, हवं तेव्हा झंडू बाम लावता येतं >>> ही तुमच्याकडची मंडळी आणि आमच्याकडचं एक पात्र कुंभमेळ्यात हरवलेली भावंडं असावीत. कोणी निरुपा रॉय सदृश होतं का आपापल्या खानदानात याचा शोध घेतला पाहिजे.

पेटीवर लिहिलेलं म्हटल्यावर आणि प्रो दिसल्यावर माझ्या डोक्यात चॉईस का लाईफ द्विधा आधीच झाली. >>>> पाल्हाळ फक्त लेखकाने लावणे अपेक्षित आहे ना Light 1

थॅंक्यू सर्वांना! Happy
काही तरी हलकंफुलकं लिहावं हे ठरवून लिहिले आहे तरीही प्रत्येक गोष्ट, आठवण आणि संवाद खरा आहे यातला. फक्त एकत्र ओवून देऊन टाकले.

मार्शमेलो टेस्ट, हो. अगदी. Lol

लंपन Lol आपल्यासारखे "चिवडा लाडू" पीप्स वरचेवर जात राहिले तर होईलही तसे.

माझेमन - Lol झंडूबामची एक आठवण. मी नांदेडला गेले होते एकदा तेव्हा जरा डोकं दुखतंय बाम कुठे आहे असं आईला विचारलं तर कुठल्याही कपाटातल्या कुठल्याही खणात हात घाल तुला एक झंडू बाम तर सापडेलच असं म्हंटली होती. Happy

यांना बघून सुटणारं वारं - हेही आईचंच. आमच्याकडे कॅलगरीत आलेली असताना जुलै मधे म्हणजे तिथल्या उन्हाळ्यात आम्ही बॅंफला घेऊन गेलो यांना तर थोडे वारे ब्रीझ म्हणू असे वाहात होते तरी तिला थंडी वाजू लागली. मी म्हंटले सहसा जुलै मधे सुटत नाही वारं तितकं तर मग आम्हाला बघून सुटलं काय की! Happy हे तिने जाऊन आत्याला कधीतरी सांगितले तर आत्याला एकदम पटले. ती म्हंटली तिलाही न्यूयॉर्कला असंच होतं. दोघींचा डायलॉग.

सुशीची आठवण लिहून टाकते. आई आमच्याकडे आलेली असताना मी तिला सुशी म्हणजे काय हे सांगत होते. अगं, आपला दहीभात काकडी घालून देतात तसेच साधारण. तर ती - मग हे का खायचंय पैशे घालून तेच घरी करून खावं.

आमच्याकडच्या ज्येष्ठांना खास करून स्त्रियांना घरातच राहायला आवडतं. अजिबात चंट किंवा याही वयात हौशी वगैरे नाहीत. रिअलिस्टिक ज्येना आहेत.

'दहीभात, काकडी घालून' हे सुशीचे वर्णन! माझ्या हृदयाची धडधड इथेच वाढू लागली आहे!
अर्थात मी बरीटो म्हणजे गुंडाळी पोळीत भाज्या, भात, चटणी, कोशिंबीर घालून. असं सांगितले आहे.
बरिटो बोलवर मातोश्रींची प्रतिक्रिया, यावर चाट मसाला, चिंचेची चटणी आणि शेव घालून जरा आणखी बरं लागेल होती हे ही आहेच. Proud

बाकी झंडू बाम प्रत्येक खणावरुन, माझी ड्रायव्हर लायसन्स आणि कारची किल्ली अशी हात घालू तिकडे अवतीर्ण व्हावी आणि शोधत बसायला लागू नये ही सूप्त इच्छा आहे. गाडी बदलली तर फिंगर प्रिंट अनलॉक आणि व्हॉईस + बायोमेट्रिक इग्निशनची गाडी घेणार आहे मी. तरी पोलिस आणि कुठे हॉटेल/एअरपोर्टवर चेकिन वगैरे करताना ड्रायव्हर लायसन्स लागते ते ही फिंगरप्रिंट स्कॅनरने जेव्हा सुरक्षित प्रकारे करतील तो सुदिन.

मस्त झालंय पाल्हाळ
आणि आता चिवडा खावासा वाटत आहे.
इतकं चिवडा चिवडा वाचलं Lol
बॉयनवाड ला पाहिलं आहे मी
पण त्याचा चिवडा खायचा राहिला.
बाहेरच्या पदार्थात कचरा असतो असं सांगितलं गेलं होतं आम्हाला आणि ते खरं वाटलं होतं
असंच ज्याला काही लोक बॉबी म्हणतात ते मुरकुल असतात ना त्यात पाल असते असं सांगितलं होतं
तुमच्याकडे child abuse चिवडा
आमच्याकडे restriction मुरकुल
..
कमलाकर ची भेळ मात्र नशिबाने खाल्ली आहे
एक रुपये प्लेट होती

खमंग झाला आहे लेख. अगदी संगीत चिवडामणी.

"We have to eat it, it's for the project !" >> हम सायन्स की तरफ से हैं आठवलं.

त्यात बापट आले, अर्जुन आला, मुक्तपीठ आणि स्कूबा पण आले - म्हणजे तोही चिवडा करून झाला. मुपि आणि लाडूवरून लाडू कावळा आठवला. Happy

असंच ज्याला काही लोक बॉबी म्हणतात ते मुरकुल असतात ना त्यात पाल असते असं सांगितलं होतं >>> आम्हांला पण. ती हौस आता मिळेल त्या बुफेमध्ये बॉबी खाऊन पुरी करते.

असंच ज्याला काही लोक बॉबी म्हणतात ते मुरकुल असतात ना त्यात पाल असते असं सांगितलं होतं >>>अगदी अगदी आम्हालापण.
त्यात वर धमकी अशी की एक पोरगं ती बॉबीतील पाल खाऊन मेलं .
मग आम्ही त्या बॉबी फुंकून मग खायचो.

लाडू कावळा - जरा उकलून सांग ही गंमत!
हम सायन्स की तरफ से हैं आठवलं. >>> Lol अगदी.

आपण ज्येष्ठ होईपर्यंत मिळेलही किल्ली, लायसन्स कुठेही. किंवा फिंगरप्रिंट किंवा चिप्स बसवून "आपला हात जगन्नाथ" होईल. सध्या ही सोय मला टीव्हीच्या रिमोट साठी पाहिजे.

मुरकुल मधे पाल आम्हालाही सांगितले होते आणि ते "आयस्क्रोट" हा शब्दच नाही पण ते पत्त्यातल्या "नाठॅठोम" सारखं स्वयंसिद्ध इंग्रजी आहे. ते आयस्क्रोट ( पॉप्सिकल) वर मीठ घातलं की अळ्या येतात म्हणून आम्हाला खाऊ द्यायचे नाहीत तरीही खाल्ले आहेतच.

ऋतुराज Lol आमच्याकडे पण अफवा आली होती ही.

धमाल आहे चिवडा पाल्हाळ 😀

यातही बापट आलेच. मुक्तपिठाचा उल्लेखही आला. मला त्याचा अचानक शोध लागला होता आणि एकटाच हसत सुटायचो त्या लेखावरच्या प्रतिक्रिया वाचून.

तुमचा चिवडा reminds me ..एक गायक होते शरद मुठे त्यांचं नाव. ते ठसक्यात गाणं सादर करायचे :

चिवडा खाऊनी येईल जवानी (!)
म्हातारी नाचेल छन छम छम….
ले लो भाई चिवडा ले लो
गरम मसालेदार चिवडा ले लो
या हो या, चिवडा घ्या गरम मसालेदार चिवडा घ्घ्या

BTW, त्या बॉबी ला आमच्याकडे पोंगापंडित म्हणायचे !

प्रतिसदांत पाल्हाळ आणि गप्पांचे पान करायचे असेल तर...
आम्ही बेकरीतून इकडे आलो तेव्हा सोफ्याने गिळंकृत केलेले दोन तीन रिमोट तो सोफा उचलल्यावर खुळखुळ्यासारखे वाजलेले. तुम्ही घर मूव्ह करुन बघा. बर्‍याच गोष्टी सापडतात. जिथल्या तिथे राहुन गेलेल्या असतात. Proud

अनिंद्य, Happy
तुम्ही तर अमरावतीची आठवण सांगितलीत !!

Pages