गणपती - आद्य स्वरूप ते आजचा बाप्पा!

Submitted by मीस्वच्छंदी on 21 September, 2026 - 22:10

गजमुख, लंबोदर, एकदंत, प्रेमळ, हसतमुख मूर्ती म्हटली की डोळ्यासमोर येतो तुमचा आमचा लाडका बाप्पा!
कालच या बाप्पांचं महाराष्ट्रभर, देशभर एवढाच नाही तर जगात अनेक ठिकाणी गणेशभक्तांनी मोठ्या प्रेमाने, आनंदाने, उत्साहाने स्वागत केलं, त्याची प्रतिष्ठापना केली.

मूर्तीचे स्वरूप, आकार, माप, आणायची पद्धत - भजने, झांजा, टाळ, लेझीम, ढोल-ताशे, बॅण्ड घेऊन वाजत गाजत काढलेली मिरवणूक किंवा रिक्षा, गाडी अथवा चालत आणणे - वेगवेगळी पण उत्साह, भक्तिभाव तोच. त्याच्यासाठी बनवलेले अगदी साधे, छोटे घरगुती मखर किंवा प्रचंड मोठे, डोळे दिपवणारी देखावे असो.. मंडळी काही दिवस आधीपासूनच कामाला लागतात. त्याव्यतिरिक्त प्रत्येक दिवसाचा प्रसाद- मोदक, पेढे, लाडू, शिरा,फळ नुसती धमाल! आणि हो जास्वंदीची लाल फुलं, केवडा, कमळ आणि सर्वात महत्वाच्या दुर्वा.. हौसेने, नवसाने केलेले बप्पासाठीचे सोन्या चांदीचे दागिने … आता नवीन युगानुसार सामाजिक माध्यमांसाठी प्रत्येक गोष्टीची रिल्स, मग त्यासाठी घेतलेले नवीन कपडे, अलंकार …
भक्तीभाव, सांस्कृतिक- सामाजिक- कौटुंबिक मेळावा ते प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल हे सगळंच सामावणारा हा आपला आजचा गणेशोत्सव… !

शाळेमध्ये असताना, लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशउत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरु केले, हे एक वाक्य आपण सगळ्यांनी शिकलेल असतं. पण मग त्याआधी कशी परिस्तिथी होती. गणपती उत्सव कधीपासून साजरा होऊ लागला. मुळात गणपती बाप्पाचे पूजन कधी सुरु झाले? हे व असे अनेक प्रश्न पडले. त्यांचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला, तो इथे मांडायचा केलेला हा अल्पसा प्रयत्न!

ऋग्वेदात, म्हणजे इ. स. पूर्व १५०० ते १२००, गणपती (गणपति) या संज्ञेचा उल्लेख आढळतो.
‘गणानां त्वा गणपतिं हवामहे’

हा वैदिक वाङ्मयातील 'गणपती' शब्दाचा सर्वात जुना नोंदवलेला उल्लेख आहे. येथे 'गणपती' हा शब्द गणांचा (समूहाचा) अधिपती किंवा नेता या अर्थाने वापरला गेला असून तो मुख्यत्वे ब्रह्मणस्पती (ज्ञानाची आणि वाचेची देवता) यांच्यासाठी उच्चारला गेला होता. वैदिक काळात 'गणपति' ही पदवी गणांचे रक्षण करणाऱ्या आणि अथांग ज्ञान असलेल्या देवतेला दिली जात असे.
ऋग्वेदात 'ब्रह्म' म्हणजे वेद किंवा पवित्र ज्ञानमंत्र, आणि 'पती' म्हणजे स्वामी. वैदिक काळात ब्रह्मणस्पती ही ज्ञान-मंत्रांचे रक्षण करणारी देवता मानली जात होती.

कालांतराने ब्रह्मणस्पतीचे गुणधर्म (ज्ञान, बुद्धी आणि मंत्रांचे अधिपत्य) हे गजानना मध्ये सामावले गेले. त्यामुळे पौराणिक काळात 'ब्रह्मणस्पती' हे गणपतीचेच एक नाव बनले.

पुढे यजुर्वेदात ( इ . स. पूर्व ६०० ते ४०० ) 'गणपती' शब्दासोबतच 'दन्तिन्' (दंत असलेला) आणि 'हस्तिमुख' (हत्तीचे मुख असलेला) असा स्पष्ट उल्लेख प्रथमच येतो:
तत्पुरुषाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥

यजुर्वेद आणि आरण्यकांच्या काळात 'रुद्र' दैवताशी विविध प्राण्यांच्या गणांना जोडले गेले. यात हत्ती (हस्ती/गज) या प्राण्याला अफाट बुद्धिमत्ता, ताकद आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले गेले.
तैत्तिरीय आरण्यकात पहिल्यांदा
'वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्' असा गायत्री मंत्र आढळतो.
येथे वैदिक ज्ञानतत्त्वाला (ब्रह्मणस्पतीला) हत्तीच्या मुखाचे ('दन्तिन्') साकार प्रतीक जोडण्यास सुरुवात झाली.

वैदिक काळात गणपती ही संकल्पना प्रामुख्याने अमूर्त व ज्ञानतत्वाशी संलग्न अशी आढळते.

इ.स.पूर्व पहिल्या शतकातील इंडो-ग्रीक राजे (उदा. हरमायस/Hermaeus) आणि पुढे कुशाण राजांच्या नाण्यांवर हत्तीचे मुख असलेल्या दैवताच्या आकृती आढळतात. राजा हरमायसच्या नाण्यांवर हत्तीचे तोंड असलेली आकृती आढळते, ज्याला प्राच्यविद्यातज्ज्ञ (Indologists) गणेशाचे आद्य रूप मानतात.
मथुरा आणि चंद्रकेतुगड (पश्चिम बंगाल) येथे इ.स. १ ले ते ३ रे शतक (कुशाण काळ) दरम्यानच्या गणपतीच्या सर्वात प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत.महाराष्ट्रातील पैठण आणि जुन्नर परिसरात सातवाहन राजांच्या काळात आणि पुढे राष्ट्रकूट, चालुक्य राजांच्या काळात भाद्रपद महिन्यात गणेशपूजन केले जात असल्याच्या नोंदी जुन्या शिला लेखांमध्ये व ग्रंथांमध्ये आढळतात.
यानंतरचे स्पष्ट पुरातात्विक संदर्भ आपल्याला ६ व्या ते ८ व्या शतकात घेऊन जातात. कर्नाटकातील बदामी येथील गुहा मंदिरांमध्ये तसेच महाराष्ट्रातील एलोरा लेण्यांमध्ये गणेश मूर्ती कोरलेल्या आढळतात.
पुराणातज्ज्ञांच्या मते गणेश पुराणाची रचना इ.स. ११०० ते १४०० या देवगिरीच्या यादवांच्या मध्ययुगीन काळात झाली.
गणेश पुरणाचा मुख्य भाग १३ व्या शतकादरम्यान लिहिला गेला असला, तरी त्यात पुढील काही शतकांमध्ये म्हंजे अगदी १६ व्या शतकापर्यंत त्यामध्ये विविध अध्याय व कथांची भर पडत गेली.

सतराव्या शतकात राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुण्याचा पुनर्विकास करताना कसबा गणपतीची स्थापना केली. शिवाजी महाराजांच्या काळात आणि मराठा साम्राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा होऊ लागला.
शिवकाळात भाद्रपद चतुर्थीला शिवरायांच्या घराण्यात आणि मराठा साम्राज्यात गणेशोत्सव एक कुलदैवत व उत्सव म्हणून राजमान्यतेने साजरा केला जात असे.
पुढे श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात शनिवार वाड्यात भाद्रपद गणेशोत्सव अतिशय भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जाई.
त्यानंतर हळू हळू परकीय आक्रमणे, ब्रिटिश राज या दरम्यान गणेशोत्सव खाजगी स्वरूपात घरच्या घरी साजरा होई.
काळाची गरज ओळखून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना रुजवली.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि गणपतराव घोटवडेकर यांनी १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव केला. लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये स्वतःचा (विंचुरकर वाड्यातील) गणपती बसवला आणि १८९३ च्या सप्टेंबरमध्ये 'केसरी'मध्ये पहिला लेख लिहून या उत्सवाचा व्यापक प्रसार केला. त्यावेळचे मुख्य उद्देश इंग्रजांविरुद्ध लोकजागृती करणे, लोकांना संघटित करणे, त्यांच्यातील एकजूट वाढविणे हे होते. त्यामुळे त्याकाळी उत्सवादरम्यान व्याखानमाला वगैरे आयोजित करून लोक प्रबोधन, देशभक्तीपर कार्यक्रम असे स्वरूप होते
लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशउत्सवाचे स्वरूप हळू हळू बदलत गेले. स्वातंत्र्योत्तर काळात सांस्कृतिक कार्यक्रम जसे नाटके, गायन, वंदन , नृत्य सादर होऊ लागले. त्यानिमित्ताने गावकरी एकत्र येऊन एकोपा वाढीस लागेल.
त्यानंतर पुढे वेगाने होत गेलेल्या सामाजिक स्थित्यंतरांबरोबर गणपतीचे - गणेशोत्सवाचे स्वरूपही झपाट्याने बदलत जात आजचा हा गणेशोत्सव आपल्यासमोर, आजूबाजूला साजरा होत आहे.

गणपती बाप्पा मोरया ! _/\_

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती आणि उत्तम आढावा.
'वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्' हा मंत्र तैत्तिरीय आरण्यकात आहे की यजुर्वेदात?

धन्यवाद!

हा गणेश गायत्री मंत्र कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय आरण्यकात (१० व्या प्रपाठात) पहिल्यांदा लिखित स्वरूपात आढळतो.

मेहनत घेउन समयोचित लेख लिहीलायस >>
गुरुदेव बाप्पा स्वप्नात आला, म्हणाला लिही, मग काय.. लिहीलं .. लिहावच लागलं. Happy

ऋन्मेऽऽष आणि सांमो _/\_