पाककृती स्पर्धा क्रमांक २ - दिसतं तसं नसतं – चमचमीत तुकड्या – शर्मिला

Submitted by शर्मिला. on 17 September, 2026 - 05:08

चमचमीत तुकड्या
Suran Kap-1.jpeg

मासे...?

नाही.. नाही.. तुम्हाला वाटताहेत तशा ह्या माशांच्या तुकड्या नाहीत.
तर हे आहे सुरणाचे काप!

साहित्य:-
अर्थातच
सुरण – मुख्य घटक.
+ आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, - हिरवं वाटण - मॅरिनेट करायला.
+ लिंबाचा रस (चवीला), हळद, लाल तिखट, मीठ – मॅरिनेट करायला.
+ तेल. – शॅलो फ्राय करायला.

कृती:-
आता कृतीला सुरवात करूया.

१. तर आधी निवांत वेळी भाजी बाजारात (निवांत वेळ तुमची नाही तर भाजीवाल्याची!) जाऊन सुरण नीट कापून आणायचा. सुरणाचे साधारण पाऊण इंच जाडीचे काप हवेत. नेहमी सुरण घेतांना तो ओबडधोबड कापलेला मिळतो. म्हणूनच निवांत वेळ असं सांगितलं.

२. आता घरी आल्यावर सुरणाचे माशांच्या आकाराचे काप करावे. ते तुम्हाला येत नसतील घरातल्या एखाद्या कला कौशल्य येणाऱ्या सदस्याची मदत मिळाली तर उत्तम. माझ्याकडे बाजारात जाण्यापासून ते काप करेपर्यंत चे काम +१ ने केलं.

३. तुकड्या स्वच्छ धुवून एका पसरट भांड्यात ठेवून (भांड्यात पाणी नं टाकता, कुकरमधे तळाला पाणी टाकायचे!!!) कुकरला दोन शिट्या करायच्या.

४. आता आलं + लसूण + हिरव्या मिरच्या + कोथिंबीर हे हिरवं वाटण तयार करायचं.

५. त्यात लिंबाचा रस (चवीला) + हळद + लाल तिखट + मीठ एकत्र करून कुकरमधून शिजलेल्या आणि थोड्या गार झालेल्या तुकड्यांना लावायचे.

६. थोडा किंवा जास्त वेळ (तुमच्या सोई प्रमाणे) मॅरिनेट करायचे. भरपूर वेळ मॅरिनेट झाले तरी बिघडत नाही. रात्रीच्या जेवणाला सकाळीच मॅरिनेट करून फ्रीज मधे ठेवले तरी चालेल.

७. ह्या तुकड्यांना तांदळाचे पीठ किंवा बारीक रवा लावून खरपूस शॅलो फ्राय करायचे.
गरमागरम तुकड्या तयार!
Suran Kap-2.jpeg

८. शक्यतो गरमच वाढायचे किंवा खायचे.
अवांतर:-

स्टेप दोन मधील माशांचे आकार नाही जमले तर आपल्याला जमतील तसे काप करावे. चवीत फरक पडत नाही. “ दिसतं तसं नसतं” हे दाखवायला मी माशांच्या आकारात (नवऱ्याकडून) कापून घेतले.

स्टेप ४ आणि ५ मधील घटक चवी प्रमाणे कमी-जास्त करायचे.

बरोबर एखादी चटणी असली नसली तरी फरक पडत नाही. लिंबू कांदा पुरेसा आहे.

मांसाहार नं चालणाऱ्या दिवसात किंवा घरी शाकाहारी मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे लोकं आले तर हा पदार्थ शाकाहारी लोकांकरीता करता येतो.
********************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे.

सुरण शिजवण्याआधी आम्ही कोकम रस लावतो त्याला म्हणजे तो खाजत नाही

अश्याच प्रकारे कच्च्या केळ्यांचे देखील काप करता येत्तात

मस्त!

मस्त दिसताहेत.
मला पण प्रश्न पडला की सुरण कोकम /चिंच न लावता कसा काय उकडावा... खाजाळू सुरण असेल तर घशाची वाट लागेल ना खाल्ल्यावर? कधीकधी तर कोकम लावूनही सुरणाची खाज निघत नाही.
हा एक प्रश्न सुटला तर मी दर आठवड्याला दोनदा तरी ही रेसिपी करेन म्हणते एवढी पसंत पडली आहे.

मस्त रेसिपी
कच्च्या केळ्याचे काप केले तर आकारही द्यावा लागत नाही
अगदी सुरमई तुकडीचाच आकार येतो
चवीलाही छान लागतात

शीर्षक आणि स्पर्धा माहीत होती म्हणून हे सुरणाचे काप असतील हे कळलं.
पण तरीही कल्पकतेला दाद.
पण माहीत नसलेल्या व्यक्तीला नक्की फसायला होईल.

तुमची कृती तंतोतंत पाळली तर कुकरची रिंग खराब होईल हं.>> नाही हो...

(कुकरमधे तळाला पाणी टाकायचे!!!) हे लिहिलेय मी.
काही गोष्टी भांड्यात पाणी नं टाकता शिकवते मी.
उदा. बटाटे उकडणे, कोरड्या उसळीकरता कडधान्य शिजवणे, सुरणाचे काप... इत्यादी.

किस्सीको पता नहीं चलेगा >> गलती करेनेसे क्या होता है ये सबको पता होना चाहिए.

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

खतरनाक दिसतेय !! बघताक्षणी फसलोच

तरी मला खात्री होतीच की असे मांसाहारारखे दिसणारे शाकाहार कोणाची तरी एन्ट्री येईल.

<<< दोन्ही प्रकारचे लोकं आले तर हा पदार्थ शाकाहारी लोकांकरीता करता येतो.>>> पण त्याच वेळी खरोखरचे फिश सुद्धा असता कामा नये Happy

छान आहे.
आम्ही असे काप करतो. तिखट, हळद,कोकम आणि मीठ लावलेले सुरणाचे काप रवा तांदळाच्या किंवा नुसत्या तांदळाच्या पिठात घोळवून तळायचे. कुठल्याही भाजीचे असे (कोकम वगळून)काप छान लागतात.

मस्त! Happy
वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे असे कच्च्या केळ्याचे करते बरेचदा.

'बावर्ची' सिनेमात राजेश खन्ना करतो ना असे 'दिसतं तसं नसतं' काप? की दुसरा काही पदार्थ करतो? सुरणाचाच करतो हे नक्की आठवतंय!

मुलाला लहानपणी हे काप आम्ही "मातीतले मासे " नावाने खायला द्यायचो.
लिंबू/चिंचेचा कोळ आणि हिरव्या वाटणामुळे ह्याची चव जरा सुरमई / हलवा कडे झुकते.

'बावर्ची' सिनेमात राजेश खन्ना करतो ना असे 'दिसतं तसं नसतं' काप? की दुसरा काही पदार्थ करतो? सुरणाचाच करतो हे नक्की आठवतंय!>> हो. तो सुरणाचे काप करतो.

एक नंबर!
आकार कापणार्‍याला अर्धं क्रेडिट. मासाच दिसतोय तो.
आजी हे नेहेमी उपासाला करत असे. ती असती, तर उपासाला माशाचा शेपमध्ये असे काप देऊन तिला चिडवलं असतं. Proud

आकार कापणार्‍याला अर्धं क्रेडिट. >> देऊन झालं.
त्याला करायला काहीतरी अँक्टिव्हिटी मिळाली म्हणून त्याने पण आभार प्रदर्शन करायला पाहिजे.

Happy मस्त रेसिपी. केळ्याचे काप मीही केले आहेत, हा प्रकार माहीत होता पण केला नाही कधी.‌ करून पाहावा वाटतोय.

बावर्ची मलाही आठवला.

बावर्ची मधला डायलॉग: कुछ लोग सुरन को मटन बना देते हैं, और कुछ मटन को सूरन! (शेवटी बायकोकडे बघत Happy )

रेसिपी नेहमीची असली तरी नियमात फिट्ट बसतेय आणि अगदी खऱ्या तुकड्या दिसतायत.

Pages