राजवाड्यातले बालपण (१) https://www.maayboli.com/node/88793
राजवाड्यातले बालपण (२)
मुख्याध्यापकांचे निवास हे राजवाड्याबाहेर होते. पण तेही बांधताना कसलीच कंजुसी केली नव्हती. प्रचंड मोठ्या ५ खोल्या, व्हरांडा, तिथे आंघोळीसाठी ऐसपैस न्हाणीघर -त्यात पाणी साठवण्यासाठीची जुन्या काळातील मोठे तांब्या पितळ्याची रांजणाच्या आकाराची भांडी. त्यावर धातूची झाकणे. बाहेर हौद, हौदापाशी कपडे धुण्यासाठी मोठा दगड, चूल, चुलीवर आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी तांब्याचा रांजण, ३ मोठ्या खोल्या-सरपणासाठी एक. त्या दगडी तटबंदीच्या चौकोनात २ झाडे-एक कडुलिंबाचे व शेवग्याचे. या भागात बाहेरून येण्याजाण्यासाठी एक दरवाजा. या घराचा व्हरांडा एवढा मोठा होता की आम्ही भावंडे तिथे सायकल चालवायचो. प्रत्येक खोलीला दार होते आणि ते या व्हरांड्यामध्ये उघडायचे. एवढे असूनही हे घर अंधारे होते कारण सगळ्या खिडक्या रस्त्याच्या बाजूला होत्या आणि रहदारी व धूळीमुळे त्या उघडता येत नसत. सागवानी लाकडाच्या आडव्या पट्ट्या मारून त्या खिडक्या पूर्वी कोणी बंद करून घेतल्या होत्या. राजवाड्याच्या शाळेला सुतारकाम शिकवायचे शिक्षक होते. वायदंडे त्यांचे नाव. ते वृद्ध झाले होते आणि खुप सावकाश काम करायचे. काळे, चकचकीत, उंच आणि किडकिडीत होते. दुपारी निवांत बसून डबा खायचे. पूर्वीच्या गप्पा मारायचे. डब्बा खाणे हा त्यांच्या दिवसाचा हायलाईट असायचा नेहमी. त्यांची बायको बहुतेक जेवण भारी बनवत असणार! त्यांच्या डब्यात एकदा खेकड्याचे चवदार कालवण खाल्लेले आठवतंय! तर त्यांच्याकडून आईने त्या फळ्या काढून घेतल्या व खिडकी उघडण्याची सोय झाली. पण रस्ता उंचावर आणि घर खाली असल्याने लोकांचे पाय व वाहनांच्या चाकांनी धूळ थेट घरात येई. त्यामुळे खिडक्या बंदच ठेवल्या जात.
दरवाजे मात्र दिवसभर उघडे असत आणि घरासमोर मोठी मोकळी जागा होती याची मजा काही औरच होती. घरासमोर तारेचे कुंपण घातले होते. त्यानंतर शाळेचे मैदान. मग घोड्यांच्या पागांची बाजूने राजवाड्याला वेढणारी बसकी इमारत. इथे प्राथमिक शाळा भरायची. मैदानाच्या भोवती गुलमोहराची झाडे रांगेने लावलेली. याच मैदानात दादाने मला आणि माझ्या मावसभावाला सायकल शिकवली. मी चवथीत होते. मावस भाऊ तिसरीत. ग्राउंडला एका बाजूला उतार होता. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून थेट या पागेजवळच्या दरवाजातून आत घुसत असे. दरवाजा पूर्वी घोड्यांची ये जा करण्यासाठी होता. मजबूत होता व शाळा संपली की बंद ठेवला जाई. एका संध्याकाळी दादाने मला सायकलवर बसवले आणि उतारावर सोडून दिले. बंद दरवाजाला धडकून पडेपर्यंत मी सायकल शिकले होते! मावसभावाने मात्र पडापड केली नाही. सायकल चालवायला शिकला ते थेट रात्रीचे १२ वाजले तरी गडी सायकल चालवतच होता. शेवटी आता मध्यरात्री एखादे भूत येऊन बसेल मागे, असं म्हंटल्यावर घरात आला!
आमच्या घरासमोरची बाग एकेकाळी पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. त्या बागेत अनेक प्रकारचे गुलाब होते. काळे गुलाब सुद्धा होते म्हणे व ते पहायला लोकं लांबून यायची. गेटपासून घराला जोडणारी एक सुबक, बांधीव पायवाट होती. एकाबाजूला कडुलिंबाचे अर्ध्या घरावर पसरलेले मोठे झाड होते. समोर आंबा-जांभूळाची जोडगोळी होती. त्याखाली पाण्याची सोय केली होती. मग सोनचाफा आणि प्राजक्ताचे झाड. मग एक निलगिरीचे झाड आणि आंब्याचा एक जुना, डेरेदार वृक्ष होता. अजूनही काही छोटी-मोठी झाडे व फुलझाडे होती. सगळ्यात माझे आवडते झाड म्हणजे अगदी दारामध्ये एक हिरव्या चाफ्याचे झाड होते. हे झाड जास्त कोणी लावत नाहीत. दारात तर नाहीच. त्या फुलांच्या वासाच्या मागे नाग येतो म्हणत. लांबट, हिरवीगार, तुकतुकीत पाने होती या झाडाची. याला खुप फुले यायची आणि त्यांचा मंदमंद सुगंध आसमंतात मंतरल्या सारखा पसरलेला असायचा. ही फुले मात्र दिसायचीच नाहीत. मी शोधून शोधून २-४ फुले गोळा करायचे. हे माझे फार आवडते झाड. सोनचाफ्यापेक्षाही जास्त. मी फुले शोधायचे, त्याच्याखाली बसून भांडीकुंडी खेळायचे, आमच्यानंतर कोणी तिथे रहायला येईल त्यांच्या मुलांसाठी मी आणि दादा एक दोन ओळींची पत्र, नाणी, बिया पुरून ठेवायचो.
एकदा बाबांना शेती करायची लहर आली. माझे आजोबा-नाना शिक्षक होते. त्यांची त्याकाळी पुष्कळ शेती सुद्धा होती. बाबा तब्येतीने मजबूत असल्याने लहानपणापासून नानांना त्यांनी शेतीत मदत केली होती. गावी एक विहीर सुद्धा खोदली होती. नोकरी निमित्त पुण्याला आल्यावर त्यांना २० वर्षे तरी मातीत हात घालायचा चान्स मिळाला नव्हता. त्यामुळे मस्त मोकळी जागा, माती वैगेरे पाहिल्यावर त्यांच्यातला शेतकरी जागा झाला. त्यांनी खुप सारी माती बागेच्या एका बाजूला आणून नीट पसरवून घेतली. या मुख्याध्यापक निवासाला माळीकामासाठी सुद्धा एक माणूस असायचा. दोघांनी मिळून आरे खोदले, मग शेजारच्या मंडईतून त्यांनी मोड आलेले एक किलो बटाटे आणले, लावले. येता, जाता शेती कशी करावी यावर आमचे क्लास घेतले. फार महिन्यानंतर आता पोतभर बटाटे मिळणार या आनंदात त्यांनी व माळ्याने खोदायला सुरुवात केली. अर्धा दिवस खोदल्यावर व वरची माती खाली व खालची वर केल्यावर त्यांना १०-१२ बाळबटाटे सापडले. पुढे अनेक वर्षे साधा बटाटा वडा खावा वाटतोय, असं म्हंटलं तरी घरी हास्याचे फवारे उडायचे. आई चेष्टा मस्करी करायला एकदम तयार. दादा सेम तिच्यासारखा. ती तर हसायला लागली की हसून हसून तिच्या डोळ्यात पाणी यायचे. पुढे अनेक वर्षांनी, निवृत्तीनंतर बाबांनी पुण्याच्या घरी टेरेसवर शेती करुन त्यांची हौस भागवून घेतली. बऱ्याच फळभाज्या, अगदी लिंबू, पेरू, अंजिर सुद्धा यायची. पण त्यांनी बटाटे काही लावले नाहीत!
दारासमोरचा आंबा फार मोठा होता. हा वृक्ष फार जीर्ण झाला होता. माळीकाका म्हंटले, अहो, बांडगूळं वाढलीत त्यावर म्हणून फळ धरत नाही. मी आयुष्यात बांडगूळ हा शब्द पहिल्यांदा ऐकला. ती दिसतही अगदी वाईट होती. झाडाचा सगळा जीवनरस शोषून घेणारी. पुढे अनेक वर्षेांनी हॅरी पॉटर वाचताना डिमंेटर्स चे वर्णन वाचून मला ही बांडगुळ आठवली.
आईने खुप वेळा ती कापून घेतली. झाडाला जरा मोकळा श्वास घेता आला. हे झाड मला दाढीवाल्या, सुरकुतलेल्या म्हातारबा सारखे वाटायचे. जरा लांब, एका कोपऱ्यात मरणाची वाट पहात असल्या सारखे. पण बांडगूळ कापून टाकल्यावर ते जरा ताजेतवाने दिसू लागले. त्या वर्षी त्याला मोहोरही आला. तिथे चालून आले की पाय चिकट होऊ लागले. त्यानंतर लहान लहान कैऱ्या लगडल्या. त्यांचे आंबे झाले. त्यामागे पाखरे आली. झाड गजबजून गेले. कमी केसर असलेला, साखरेहून गोड गावठी आंबा खात तिथे बसून लायब्ररीतून आणलेली कितीतरी पुस्तके मी त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचली.
प्रत्येक झाडाची एक गोष्ट. जांभळाचे झाड इतके उंच वाढले होते की त्यावर चढणे जवळपास अशक्य होते. जांभळे पिकून खाली सडा पडायचा. त्यातून आम्ही न फुटलेली जांभळे शोधायचो. पक्षी नुसते बिया टाकायचे. झाडावर झुलणारे जांभळाचे काळे घोस खालून बघून मला वाटायचे जगातले माणसाने बनवलेले एकसुद्धा झुंबर एवढे सुंदर दिसत नसणार.
-शर्वरी
राजवाड्यातले बालपण (शेवटचा भाग)
https://www.maayboli.com/node/88808
दोन्ही भाग एकदम छान जमले आहेत
दोन्ही भाग एकदम छान जमले आहेत. अगदी सोप्या आणि थोडक्या शब्दात असलेल्या वर्णनामुळे डोळ्यासमोर चित्र उभं राहतंय. तुमच्या बालपणातल्या अनुभवांचा हेवा वाटावा इतकं मस्त लिहिलं आहे.
सुरेख!
सुरेख!
चित्रदर्शी
चित्रदर्शी
बागेची, झाडांची वर्णनं तर ❤
छान.
छान.
आहाहा काय सुरेख वर्णन.
आहाहा काय सुरेख वर्णन.
बटाट्यांचा किस्सा वाचून हहपुवा..
दोन्ही भाग छान झालेत.
दोन्ही भाग छान झालेत.
सातारचा राजवाडा माहीत आहे पण तिथे शाळा होती हे नव्याने कळतंय.
हा भाग पण सुंदर झालाय.
हा भाग पण सुंदर झालाय.