राजवाड्यातले बालपण (१)

Submitted by -शर्वरी- on 11 September, 2026 - 03:25

प्रत्येकाने मनात एक घर जपले असते. लहान असतानाचे. माझेही आहे. त्या लहानग्या वयात खुप मोठे, सुरक्षित आणि उबदार वाटणारे, उतरत्या छपराचे, कौलारू घर. स्वप्नातल्या घरासारखे. त्याहूनही सुंदर. माझ्यासारख्या अशक्त, बुजऱ्या मुलीला राजवाड्यातील समृद्ध बालपण देणारे.

मी पहिल्यांदा जेंव्हा हे घर पाहिले तेंव्हा मी चवथीत होते. तोपर्यंत पुण्यामध्ये रामबाग कॉलनीत फ्लॅट संस्कृतीत वाढलेली मी एक अतिशय शहरी मुलगी होते. आई-वडिल नोकरी करणारे. दादा आणि मी दोघेही खुपच state of the art अशा टाय वै गणवेश असणाऱ्या पण मराठी शाळेत जायचो. शाळा कोणतीही वा कशीही असली तरी मला कधीच आवडली नाही. पण हे घरच शाळेत होते आणि तरीही मला मनापासून आवडलेच! पहिल्याच नजरेत. या घरी आधी मी, आई, दादा पोचलो. कारण आम्ही एसटी ने आलो होतो. सामानाच्या ट्रक बरोबर बाबा आले. मी बाबांची वाटच पहात होते. बाबा घरी पोहोचेपर्यंत हे घर मी आत-बाहेरून मस्त ओळखीचे करुन घेतले होते. ट्रकच्या आवाजाने मी धावत बाहेर गेले. बाबांचा हात पकडून त्यांना ओढत आत आणले. बाबा, बघा हे घर किती मोठे आहे, त्याला किती खिडक्या, किती दारे आहेत, हे त्यांना सांगत मी त्यांना सगळे घर दाखवले. बाबांच्या चेहऱ्यावरील काळजी तेंव्हा मला समजली नाही. पुढची कित्येक वर्षे समजली नाही. जूने, दगड-मातीचे, रेल्वे च्या डब्ब्यांसारखे आडवे पसरलेले, शेजार नसलेले, एकलकोंडे घर पाहून बाबांना काळजी वाटायचीच होती.

तर फ्लॅटमधून सातारच्या या बैठ्या घरी आलो. सातारा किती सुंदर होते. सगळ्या बाजूने हिरवे गार डोंगर. आम्ही सातारा गावात, अगदी मधोमध-प्रतापसिंह हायस्कूल च्या परिसरात रहायचो. Heart of the city. कारण आई प्रतापसिंह हायस्कूल ची मुख्याध्यापक होती. हायस्कूल जुन्या राजवाड्याच्या एका भागात भरायचे. महाराजांच्या खाजगी दालनाचे रुपांतर मुख्याध्यापकांच्या कार्यालयात केले होते. अतिशय सुंदर भित्तिचित्रे तिथे होती. मराठा साम्राज्याच्या गतवैभवाच्या खुणा ठायी ठायी दिसत. त्या कार्यालयाच्या गवाक्षातून अजिेंक्यतारा दिसायचा, गार-भरार वारा यायचा. सातारा फार सुंदर दिसायचे. महाराजांचा खाजगी दरबार जिथे भरत असे तेथे तेंव्हा शिक्षकांच्या मिटिंग्ज होत.

शाळा राजवाड्यात भरायची, त्यामुळे नेहमीच्या शाळे सारखी आजीबातच वाटत नसे. मोठमोठ्या दालनांमध्ये बाकं घातली होती. तेच मुलांचे वर्ग. राजवाड्यात अनेक मोठमोठे दगडी चौक, खोल्या, दारे, खिडक्या होत्या. आत्ता बांधून बंद केलेली मात्र आतून थेट अजिंक्यताऱ्यापर्यंत पोचणारी भुयारे होती. भुयारांमध्ये म्हणे वाघापासून सापांपर्यंत आणि भूता-खेतांपासून-चोर दरवडे खोरांपर्यंत सर्वांचा वावर होता. लपवलेला खजिना होता. तेल घालून ठेवलेल्या कधीही पेटवता येतील अशा मशाली आणि चक्रव्यूहासारख्या वाटा होत्या. त्याबद्दलच्या अनेक रंजक कथा, गोष्टी, अफवा होत्या. नविन लोकांना हरवून जायला होतील असे अनेक जीने, चोरवाटा या राजवाड्यात होत्या. -तर ही गोष्ट फार म्हणजे फारच रोमांचक होती. पुण्याच्या कृष्णधवल चित्रातून एकदम रहस्यमयी,रंगीत, जादूच्या गोष्टीत आल्यासारखे मला वाटत होते. राजवाड्यामागे राहणारे खानविलकर काका, बादशहा काका यांची मुले आमचे दोस्त बनले, वाटाड्या बनले. आम्ही फारच लवकर सगळे रस्ते, चोरवाटा माहित करुन घेतल्या.

राजवाड्याबाहेर अश्वशाळा होती. मग भलामोठा दरवाजा उघडून एका बाजूने मैदानात जाता यायचे. मैदानाच्या पलिकडे मुख्याध्यापकांचा निवास आणि वापरात नसलेले एक बंद हॅास्टेल होते. २ मजली असेल. फार मोठे, उत्तम स्थितीत मात्र वापरात नसल्याने भूता खेतांच्या गोष्टींसाठी कुप्रसिद्ध. शाळा सुटली की राजवाडा सुद्धा एकदम गप्प होत असे. थोडे दूर, राजवाड्यामागे शिपाई क्वार्टर्स होत्या. तो आमचा शेजार. असे गावाच्या मधोमध राहताना सुद्धा संध्याकाळ नंतर आम्हाला गावाबाहेर राहण्याचा फिल येत असे.

त्यात भर म्हणजे बाबा आमच्याबरोबर नव्हते. त्यांची नोकरी पुण्यात, त्यामुळे ते पुण्यात रहायचे आणि बुधवारी किंवा शनिवारी यायचे. पुढे आईने माझ्या चुलत बहिणीला- ती माझ्यापेक्षा ९ वर्षांनी मोठी आहे, तिला बोलवले. ती काॅलेजला होती. आता आम्ही तिन भावंडे आणि आई. सुरुवातीला बाबांशिवाय राहणे फार अवघड वाटे. मी आणि आई तर रोज संध्याकाळी रडायचो. मग दादा पण तुम्ही दोघी का रडता म्हणून रडवेला व्हायचा. ताई आली. आईला सोबत झाली. आम्हीही जरा रमलो. तरी बाबांच्या मनात आमची सतत काळजी असायची. तेंव्हा फोन घरोघरी नव्हते. बाबांकडेही फोन नव्हता, आमच्या साताऱ्यात घरीही नव्हता. शाळेत मुख्याध्यापकांच्या कार्यालयात फोन असे, ज्याचा संध्याकाळी उपयोग करणे हे जवळजवळ अशक्य आणि फार धाडसाचे काम होते. राजवाड्याचे ते भले थोरले करकरणारे २ दरवाजे उघडून मग चिंचोळ्या जिन्यातून वर जायचे. जिना एवढा उंच, चिंचोळा होता की पायात गोळे येत. याचे कारण आई सांगायची की शत्रु च्या सैन्याला एकदम घुसता यायला नको ना, म्हणून तो असा. पाय-या पण माझ्यासाठी जरा जास्तच उंच होत्या. मग सगळी भिंतीवरची राजे-महाराजांची तैलचित्रे ओलांडत मोठ्या दरबारातून त्या लहानश्या पण दिमाखदार खोलीत जायचे. तिथं तो काळा फोन असे. हे सगळे करण्याची गरज सहसा भासत नसेच कारण कोणाकडेच फोन नव्हते. पण १-२ रात्री-emergency मध्ये हे पण प्रकार केले होते.
प्रतापसिंहांचे भूत रात्री अंधारात राजवाड्यात फिरते ही एक आल्या दिवशी ऐकलेली बातमी होती. त्यामुळे दिवसाच्या उजेडात आणि विद्यार्थ्यांच्या कोलाहलात गजबजणारा राजवाडा रात्री मात्र गुढ दिसायचा. या गोष्टी सांगण्यात नंतर आम्ही ही दोघे पटाईत झालो. पदरचा मीठ मसाला लावून या सुरस गोष्टी आल्या गेल्या पाहुण्याला राजवाड्याची सैर करताना आम्ही पण ऐकवल्या.

माझी आई लहान चणीची होती. पण फारच निर्भीड होती. आवाज तर असा खणखणीत होता की सहा फुटी माणूस गपगार होईल. बरोबर तेच करायची, योग्य ते बोलायची. अजागळपणा, बिनकामी गोंधळ तिला आवडत नसे. फालतू बडबड केलेली चालत नसे. त्यामुळे आम्हीही भीती बाजूला सारली होती. मला आणि भावाला सर्वात जास्त भीती वाटायची ती पाली आणि उंदरांची. मला अजूनही वाटते. साताऱ्यात राजवाड्यात आणि घरी-दारी तर उंदरांचा सुकाळ होता.

भूताखेतांची भीती तेंव्हाही वाटली नाही. नऊ वर्षांच्या मला आई म्हणायची, ताई, प्रतापसिंह महाराज जर भेटलेच तर चांगले काम करतेय याचे त्यांना कौतुकच वाटेल. त्या एका वाक्यात सगळी भीती गेली. खरंतर, उत्सुकता निर्माण झाली. त्या संपूर्ण परिसरात एक गूढरम्यता होती. भीतीदायक गूढता नव्हतीच. रात्री चांदण्यांच्या प्रकाशात राजवाडा खुप मनोहरही दिसायचा. शिसम व सागवानातील खांबांवरचे कोरीव काम, हत्ती यावेत जावेत या आकाराचे प्रचंड दरवाजे, दरवाज्यांच्या जडशीळ कड्या आणि साखळदंड, राण्यांसाठी स्नान व प्रसाधनांसाठी पाण्याची सोय असलेले चौसेपी हौद. आम्ही त्यात पळापळी खेळायचो. त्यात पूर्वी म्हणे स्नानासाठी गरम पाणी भरत. गुलाबांच्या पाकळ्या, सुगंधी द्रव्ये टाकत. माझ्या डोळ्यांसमोर राजवाडा जिवंत होत असे. समयांच्या प्रकाशात उजळायचा. ब्रिटीश धोक्याने प्रतापसिंहांना पकडण्यासाठी आले तेंव्हा पलित्यांच्या धगधगत्या आगीतून मला महाराज लढताना दिसले. चिंचोळ्या जिन्यातून निसटण्याचा प्रयत्न त्यांनी केला असणार! त्या गर्द अंधारात या राजवाड्यानेच त्यांना साथ देत लपवायचा प्रयत्न केला असणार.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ही शाळा. २-३ दिवस चालून हा लहानगा मुलगा उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जेंव्हा सातारच्या या राजवाड्याच्या शाळेत पोचला असेल तेंव्हा त्या उंचच उंच पाय-या चढताना त्यांच्याही पायात गोळे आले असतील का? तेंव्हा या देखण्या राजवाड्याला काय वाटले असेल?

त्यानंतर अनेक वर्ष प्रत्येक पायरीवर पाऊल ठेवताना मला प्रतापसिंह महाराज तरी दिसत किंवा बाबासाहेबांची धूळभरली पावले उमटलेली दिसत. अशा ठिकाणी भीती कशी वाटावी?
आपल्याच इतिहासाची साक्ष सांगणारा हा राजवाडा माझ्यासाठी आजोबा झाला, मित्र झाला, सहोदर झाला!

-शर्वरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेत.
राजवाड्याबद्दल, शाळेबद्दल काहीच माहीत नव्हते.

खूप छान.
>>>>>ताई, प्रतापसिंह महाराज जर भेटलेच तर चांगले काम करतेय याचे त्यांना कौतुकच वाटेल.
_/\_
>>>>>> २-३ दिवस चालून हा लहानगा मुलगा उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जेंव्हा सातारच्या या राजवाड्याच्या शाळेत पोचला असेल तेंव्हा त्या उंचच उंच पाय-या चढताना त्यांच्याही पायात गोळे आले असतील का? तेंव्हा या देखण्या राजवाड्याला काय वाटले असेल?
लेख एका वेगळ्याच उंचीवर गेला.

सुंदर आठवणी 👍

हा भाग १ असे शीर्षक आहे. म्हणजे आणखी भाग येणार ? तसे असल्यास प्रतीक्षारत.

वा! सुंदर लिहिलं आहे.
मला शीर्षक वाचून गौतम बुद्धाविषयी काही असेल असं वाटलं होतं Happy

खूप छान लेख..!
लेख वाचताना च राजवाडा बघायची इच्छा झाली. लगेच गुगल करून फोटोज बघितले.

नवीन प्रतिसाद लिहा