सादर करीत आहोत...

Submitted by अपूर्व जांभेकर on 7 September, 2026 - 03:19

"तुम्ही...आ...आत्ता?"....दुपारी साडेबारा-पाऊण च्या सुमारास, नचिकेतच्या बाबांना दारात अनपेक्षितपणे पाहून नचिकेतची आई चपापलीच. ती नुकतीच न्हाऊन बाथरूम मधून बाहेर आली होती. ओल्या गच्च केसांवर पंचा बांधला होता...सावळा गोलाकार चेहरा....मध्यम बांधा...बुटकीशी आकृती आणि चाळीशी ओलांडून स्थिरावलेलं एकंदरीतच सर्वसाधारण वय व व्यक्तिमत्व. "का? माझ्याच घरी, दुपारी यायला बंदी आहे कि काय मला?" दारात उभे असलेले नचिकेतचे बाबा घराच्या आत निरखून डोकावत खरखरीत सुरात म्हटले . "मुद्दामून अर्धा दिवस रजा काढून आलोय आज ऑफिसातून!" "नाही नाही ...तसं नाही हो...पण फार क्वचितच असं..." ती चांगलीच बावरली "बॅग द्या ना तुमची..." डोक्यावर बांधलेला पंचा अजून घट्ट बसवत तिने बागेचा ताबा घेतला तोवर नचिकेतचे बाबा घराच्या आत आले. छोटाश्या एक बेडरूम असलेल्या घराचा कानोसा घ्यायला त्यांना फारसा वेळ लागला नाही. "तुम्ही बसा ना...मी पाणी आणते..." थोडीशी घाबरतच, ती स्वयंपाकघराकडे वळली .."तासाभरापूर्वीच, केतु गेली शाळेत...तिचा गृहपाठ करून घेण्यात वेळ गेला म्हणून माझं आवरायला थोडा उशीर...हे काय आता...अंघोळ करून पूजा..." तिचे वाक्य संपायच्या आताच, बेडरूम मधून पांघरूण जोरात झटकण्याचा आवाज आला. "आणि हे पेशवे..." नचिकेतच्या बाबांनी नचिकेतच्या दंडाला घट्ट धरून चांगलं गदागदा हलवलं. नचिकेतला क्षणभर काही सुधरलंच नाही. तो अजूनही अर्धवट झोपेत होता. "दिवस डोक्यावर आला, तरी अंथरुणात ऐश झोडतायत...!" असं म्हणत त्यांनी नचिकेतला ढकललं "हे...हे नाही सांगितलंस मला!" एव्हाना...नचिकेतची आई तिथे आलीच होती. "बाबा!" नचिकेतच्या आवाजात नाराजी अन विरोध होता. "किती दिवस चाललंय हे?" नचिकेतच्या बाबा नचिकेतच्या आई कडे पाहून कडाडले. "तुम्हाला काय वाटलं...काय दुधखुळा आहे मी?...काय रे..." त्यांच्या तोंडात खरं म्हणजे शिवीच आली पण कसाबसा त्यांनी स्वतःच्या तोंडाला आवर घातला. "जवळ जवळ महिना झाला पाहतोय मी...हा दिवटा...सकाळी ऑफिस ला निघावं ...तर झोपलेला...आणि संध्याकाळी घरी यावं ...तर ह्या 'आदर्श माता पुरस्कार' आम्हाला मूर्ख बनवतात...'अहो... तुम्ही निघालात ऑफिसला की उठतो तो...दहालाच पडला घराबाहेर… दिवसभर कॉलेज आणि मग, अकाउंट्स चा क्लास करून, संध्याकाळी ऑर्केस्ट्रा च्या प्रॅक्टिस ला जातो...' दृष्टच काढायला पाहिजे मला माय-लेकाची!" असं म्हणत, नचिकेतच्या बाबांनीं नचिकेतवर हात जवळजवळ उगारलाच! त्यांच्यात साक्षात जमदग्नी संचारले होते! त्याच्या गोरा गोरा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. पन्नाशीच्या जवळ येऊन सुद्धा त्यांच्या काळ्याभोर अन दाट असलेल्या केसांत घाम आला होता. डोळ्यांत जाळ भडकला होता आणि कपाळावरची निळी-हिरवी शीर थाड थाड उडत होती. नचिकेतच्या चेहऱ्यावर आता पांढरी-फटक जाग आली होती! थोडं घाबरून आणि जास्त नाईलाजाने तो पटकन मागे सरकला! "अहो काय करताय....मोठा झालाय तो आता..." नचिकेतची आई मेटाकुटीला येऊन म्हंटली..."हो ना? ...कळतंय ना तुला? मग तुझ्या ह्या लाडावलेल्या श्रावण बाळाला समजाव ना...!" नचिकेतचे बाबा इतके संतापले होते की त्यांना श्वास लागला..." अहो...तुम्ही शांत व्हा...आधी पाणी प्या बघू...असं काय करताय....तुम्हाला काही झालं ...तर काय करायचं आम्ही..." नचिकेतच्या आईने अलगद त्यांच्या खांद्याला धरून त्यांना बेडरूम पासून परावृत्त करत, परत हॉल मध्ये आणलं. "होऊच दे मला काहीतरी..."असं म्हणत नचिकेतच्या बाबांच्या डोळ्यांत पाणी आलं..."तिथे ऑफिस मधलं टेन्शन...घरी हे असं....रक्त आटवतोय गं मी तुमच्यासाठी...काहीच कसं वाटत नाही तुम्हाला...हे नाटक, गाणी-बजावणी...सगळी साली भिकेची लक्षण...बरं त्यातही म्हंटलं...देवानी इतका चांगला गळा दिलाय, शास्त्रीय शिक...तर!" ते परत दात-ओठ खायला लागले..."तर म्हणतो कसा...बाबा...मला प्लेबॅक सिंगर व्हायचंय... ह्या स्वयंभू गंधर्वांचा, आज्जाच होता ना .मोहम्मद रफी..."

पळधेंच्या घरी असे प्रसंग, नचिकेत वयात आल्यापासून काही नवीन नव्हते. मात्र, आजच्या सारखा स्फोट पहिल्यांदाच झाला होता. एरवी, दुराचरणाची सुरुवात, मग त्याची परिसीमा, मग प्रलय आणि त्यानंतर एक, आठ-सोळा प्रहारोत्तर, सत्ययुगाची नांदी असा नियमित सृष्टिक्रम! पण आजचा संताप, तर थेट महाप्रलयाच्या लाटा वाटत होत्या.
सर्वसामान्यांच्या चौकटीत झक्क बसणारे चौकोनी पळधे कुटुंब! एकटे कमावणारे, निर्व्यसनी असण्यावाचून पर्यायच नसणारे वडील; आई गृहिणी, पदवी हि केवळ माहेरची ऐपत म्हणून घेतलेली; थोरल्या चिरंजीवांची आभाळाएवढी पण दिशाहीन स्वप्न; "यार...किशोर दा गेले रे....नाहीतर... त्यांच्या हातून बेस्ट प्लेबॅक सिंगर चं फिल्मफेर घेतलं असतं!" आणि शेंडेफळाचं, एकंदरीतच ह्या सगळ्या परिस्थितीकडे पाहून, शांतपणे हुशार होणं! "मी ठरवलंय...दहावी नंतर सरळ डिप्लोमा करायचा...आणि मग.. इंजिनिअरिंग...!"

"१० जानेवारी १९९५" आमटीसोबत पोळीचा एक घास घेत नचिकेतचे बाबा म्हणाले. "आं?" तव्यावरची पोळी उलटताना, नचिकेतच्या आईच्या एकदम लक्षातच आले नाही. "आजची तारीख!" श्री पळधेंच्या आवाजातच नाही तर चेहऱ्यावरही आता एक तिटकाऱ्याची रेघ उमटली. कालच्या महासंग्रामानंतर, तब्बल दहा तासांचे व्यत्ययरहित मौनव्रत पाळल्यावर, केवळ चाचपणी साठी म्हणून त्यांच्या लेकीच्या शाळेतील आठवीच्या वर्षाची दुसऱ्या टर्म च्या फी चा चेक सौ पळधेंनी भरून त्यांना तपासायला दिला होता. "अगं...चेक वर तारीखच लिहिली नाहीयेस!" नचिकेतचे बाबा वैतागलेच! तशा, सौ पळधे मागे वळल्या. " अय्या, खरंच की!" त्यांनी मनगटाने केसांची बट मागे करत चेक हातात घेतला. "हम्म्म...आता लाव ह्याला खरकटे हात!" त्यांनी तिरस्काराने मान हलवली. "त्या बाईसाहेबांचं तरी चाललंय का बरं?" पळधे भात कालवत होते. "हुशार आहे हो आपली केतू...सेमी इंग्लिश ह्याच वर्षी सुरु होणार होतं तिच्या शाळेत… पण, अजून एखाद वर्ष लागेल असं म्हणत होत्या त्यांच्या प्रिन्सिपॉल मॅडम...त्या भागवत बाई...नाहीतर, याच वर्षी, मिळवलं असतं आपल्या केतुने! ... तुम्ही अजून आमटी घ्या कि! कोरडं होतंय हो..." घरातलं वातवरण परत निवळणं ह्या परिणामाला सौ पळधेंनी आंतराष्ट्रीय यशस्वी मुत्सद्देगिरीचा दर्जा दिला होता आणि ज्याचं श्रेय, मोठ्या आनंदानं, मनातल्या मनातच त्या स्वतःलाच बहाल करून टाकायच्या! "पुरे पुरे!" नचिकेत चे बाबा हात दाखवून म्हंटले..."पेशवे, चक्क आज सकाळी सकाळी घराबाहेर? नक्की कॉलेजच की?..." नचिकेतच्या वडिलांच्या आवाजात संशयी जरब होती आणि ह्याच अरुंद क्षणाची सौ पळधेंना नेहमी भीती असायची. हा अरुंद क्षण म्हणजे जिवंत ज्वालामुखी....कुठल्याही बिंदुवर उद्रेक व्हायची दाट शक्यता आणि क्षणांत सारं होत्याचं नव्हतं! "आज तो सकाळीच गेलाय कॉलेज ला....बजावलंय त्याला मी! हा शो शेवटचा...आणि आजच आहे...भरतनाट्यला... म्हणजे उद्यापासून २ महिने फक्त अभ्यास एके अभ्यास! त्याला चांगली ताकीद दिलीये मी, परीक्षा झाली कि लगेचच एम कॉम च्या ऍडमिशन चा फॉर्म भरून टाकायचाय!" नचिकेतच्या आईने त्याच्या बाबांसाठी डबा भरला..."छान!" श्री पळधेंनी ताटातला शेवटचा घास संपवला आणि हाताबरोबर ताट उचलून सिंक मध्ये ठेवले. "म्हणजे हा परत उनाडक्या करायला मोकळा...!" त्यांनी जोरात चूळ भरली. "ते काही नाही....एकदा का आता त्याची बी कॉम ची परीक्षा झाली ... की एक दिवस ह्याला फुकटचा घरात ठेऊन घेणार नाही...उठायचं आणि कामाला लागायचं..हमाली केली तरी चालेल मला...अभिमानानं बाप म्हणवून घेईन त्याचा...आणि शिक्षणाचा एवढाच पुळका असेल ना...तर...स्वतः कमवायचं आणि शिकायचं ... माझ्याकडचे पैसे संपले!!" कालपासून चाललेल्या झंजावाताचे अखेरचे तडाखे देऊन आणि सोसून श्री व सौ पळधेंनी त्या दिवशी एकमेकांचा निरोप घेतला!

नचिकेत पळधे, वीस-एकवीस वर्षांचा सर्वसाधारण सावळा, काटक अंगाचा उत्साही तरुण! सकाळपासूनच त्याच्या कार्यक्रमाच्या अंतिम तालमीत मश्गुल होता. त्याच्या आवाजात मुळातच सूर होता. पळधे घराण्यात, कमीत कमी तीन-एक पिढ्यांची, कला व संगीताशी तोंड ओळखही नसताना, नचिकेतचं गाणं हे एक आश्चर्यच होतं! सार्वजनिक गणेशोत्सवात भरभरून मिळालेल्या प्रोत्साहनाच्या बळावर आणि गरवारे कॉलेजच्या वाणिज्य शाखेत कला मंडळातील सक्रिय सहभागाच्या जोरावर आपण नव्या युगाचा किशोर कुमार होऊच हे त्याचं त्यानेच मांडलेलं गृहीतक! देवाने दिलेल्या देणगीला आकार द्यायचा असतो, ती सिद्ध करायची असते, इतक्या प्रगल्भ विचारापासून तर तो कितीतरी प्रकाशवर्ष लांब होता. पण जग, हे सार्वजनिक गणेश मंडळ आणि कॉलेज ह्या पेक्षा अनंत क्षितिजे मोठं असतं, इतकी व्यापकताही त्याच्याकडे नव्हती. तालमी, कार्यक्रम हेच त्याचं आयुष्य होतं आणि हेच आयुष्य असतं अशी त्याची समज! मग साहजिकच, आजुबाजुच्या मित्र-मंडळींमध्ये वर वर कौतुक व पाठीमागे थट्टा, कमाल सहभाग आणि किमान श्रेय... पुरेपूर तालीम पण सादर करण्यासाठी कमीत कमी गाणी..."तेज्या....तो गिटारचा पीस झाला ना....की, ऑफ-बिट उचलतो कडवं...धम्माल येईल..." "आयला नच्या , म्हणजे इकडेपण atkt भेन्चोद"....तेजस, त्यांचा गिटारिस्ट मोठयाने हसला.
अनेक वर्षं तो आणि त्याचे नाटक व संगीत मित्र-मंडळ एका रात्रीचे अभ्यास वीर! उद्या परीक्षा की आदल्या रात्री ताणून अभ्यास आणि मग कोणी काठावर तर कोणाला कमरेपर्यंत...तर कुणाच्या गटांगळ्या...! नचिकेत काठावर असणाऱ्यांमध्ये असायचा आणि ह्याचीच त्याच्या वडिलांना जास्त चीड! "अरे नालायका...आणखीन थोडा अभ्यास करशील तर किमान सेकंड क्लास तरी मिळेल?!..."

'मेलडी मेकर्स' ला आदर्श मानून पुण्याच्या सर्व २० वर्षांच्या आतील प्रतिभावान कलाकारांनी, कलाकारांसाठी सुरु केलेला मंच, म्हणजे 'यंग हार्मोनीज'! या मंचाला सुरु होऊन, जवळ जवळ चार वर्ष झाली होती. आणि गेली तीन वर्षं नचिकेत ह्यातील उत्साही कार्यकर्ता होता. 'गगन-सदन', हा हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील गाजलेल्या प्रार्थना गीतांचा कार्यक्रम, 'भाव-गंधार', हा मराठी भाव गीतांचा कार्यक्रम, तसेच, 'सृजन', सर्व मराठी तसेच हिंदी संगीत दिग्दर्शकांच्या पहिल्यावाहिल्या रचनांचा आगळा वेगळा प्रयोग, असे बरेच उपक्रम लोकप्रिय ठरले होते. आजची संकल्पना सुद्धा तशीच प्रगल्भ आणि पोक्त होती जिचा पहिलाच प्रयोग असणार होता...'श्रद्धांजली' - हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्व गायक-गायिकांना समर्पित...अगदी सहगल पासून ते येसूदास पर्यंत आणि शमशाद बेगम पासून ते रुना लैला पर्यंत... "हॅलो हॅलो, ऐका ऐका... आज कार्यक्रम झाल्यानंतर, प्लीज प्लीज सगळ्यांनी थोडा वेळ थांबा....माहितीये, बराच उशीर, जवळ जवळ १२:३० वाजले असतील...पण प्लीज...मला सगळ्यांना एक सरप्राईझ द्यायचंय!" असावरी छत्रे सगळ्यांना उद्देशून म्हंटली. ती अनेक वर्ष शास्त्रीय शिकत असलेली गायिका होती. फर्ग्युसन कॉलेज मधून मानसशास्त्र विषयात पदवी घेत होती. गोरी-पान उंच-पुरी लांब केस आखीव रेखीव चेहरेपट्टी आणि अभिजात गोड गळा. तिची आणि निनाद देशपांडेची जोडी चांगलीच जमायची कारण दोघेही ताकदीचे शास्त्रीय गायक! त्यातल्या त्यात, निनाद भाव गीते तर गायचाच पण उडत्या चालीची गाणी सुद्धा हळू हळू गायला लागला होता... बहुतेक ती एकच जागा, जिथे नचिकेत त्याच्या वरचढ ठरायचा! त्या दोघांचे 'एक चतुर नार' गाण्याचे सादरीकरण हमखास वन्स मोर मिळवून जायचे आणि लक्षात राहायचा तो निनाद पेक्षाही नचिकेत व त्याचं भन्नाट सादरीकरण...

"ऐक ना...नच्या...आपण 'चतुर नार' ड्रॉप करतोय!" सुबोध, त्यांच्या कार्यक्रमाचा निवेदक नचिकेतला सांगायला आला. "अबे साल्या का? आणि भेंडी; रात्री शो आहे...आत्ता काय हा चेंज?" नचिकेत उचकलाच. "भाऊ...कार्यक्रमाचं नाव 'श्रद्धांजली' आहे..." सुबोध समजावत म्हंटला. "अरे पण...मन्नाडे आणि किशोरदांना ह्याहून चांगली 'श्रद्धांजली' काय असू शकते..." ह्यावर सुबोध काहीच बोलला नाही आणि बोलूच शकत नाही असे फक्त हावभाव करून दाखवले. "ठीके...आता काय..." नचिकेतने एक उच्छवास सोडला "साल्यांनो आधीच माझी इन-मिन चार गाणी...त्यात तुम्ही आणखी एक घालवता..." सुबोधने त्याच्या खांद्यावर दोस्तीत हात ठेवला "तुला तीन गाणीच लै झाली...खाऊन टाकशील अक्खा शो...चल ...सुट्टा कटिंग घेऊन येऊ..." असं म्हणत ते जाणार इतक्यात मागून असावरीचा आवाज आला..."नच्या...थांब! कुठे चाललात तुम्ही?" दोघेही मागे वळले. "नच्या तू थांब...सुबोध तुला जायचं तर जाऊन ये तुझ्या ब्रेकवर..." असावरी बोटांची कात्री करत म्हंटली. "मला कळलं... की 'चतुर नार' ड्रॉप करतायत ...खूप वाईट वाटलं यार...केवढं एन्जॉय करते मी ते गाणं..." संपूर्ण 'यंग हार्मोनीज' मध्ये नचिकेतच्या बाजूची दोनच मुलं! एक, तेजस आणि दुसरी असावरी. आणि खरं सांगायचं तर...नचिकेतला असावरी नेमकी कधी आवडायला लागली त्यालाच कळलं नव्हतं! "सोड ना यार" नचिकेत मान खाली घालत म्हंटला..."तुला तर माहितीये ना माझ्याबरोबर कसं होतं ते?...ए पण असावरी, आपण आपलं डुएट मस्त करायचं बरं का?" असावरी हसली! "नेहमीसारखंच!" असं म्हणत त्या दोघांनी एकमेकांना टाळी दिली!

“ 'यंग हार्मोनीज' आणि 'अलुरकर म्युसिकल्स' यांच्या संयुक्त विद्यमाने, 'यंग हार्मोनीज', सहर्ष, सविनय, सादर करीत आहोत, हिंदी चित्रपट सृष्टीला, १९५० ते १९७० च्या दशकात खऱ्या अर्थाने सुवर्ण युग बनवणाऱ्या सर्व सर्व संगीत कलावंतांसाठी मानवंदना...'श्रद्धांजली'...." सुबोधचा शांत आवाज प्रेक्षागृहात तितक्याच अलगदपणे अंथरला गेला आणि भरगच्च झालेल्या प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट उतू गेला...आणि जातच राहिला...पुढचे अडीच-पाउणे तीन तास! एकंदरीतच कार्यक्रमाला भरगोस प्रतिसाद मिळाला...'मेलडी मेकर्स' ची काही ज्येष्ठ मंडळी मुद्दाम कार्यक्रम बघायला आली होती व त्यांनी निनाद ची जातीने भेट घेतली. तबला वादक आणि बासरी वादकावरही ते विशेष खुश होते. आणि ह्या सगळ्यात, नचिकेतचे सादरीकरण झाकोळले गेले. असावरी आणि त्याच्या द्वंद्वगीतातही असावरीच उठून दिसली!

कार्यक्रम संपला होता. गायक आणि वादक कलाकार, यशस्वी प्रयोगामुळे भलतेच उत्साहात होते. नचिकेत जीव तोडून गायला होता...पण एकंदरीतच, कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना, त्याच्यासारख्या आनंदी व उडती चालीची किंवा हळूवार प्रेमगीतांच्या बाजूने फारशी उभी राहणारी नसल्याने, झालं ते होणारच होतं, ह्याचा अंदाज त्याला होताच! आज त्याला वैयक्तिक वाहवा जरी मिळाली नसेल, तरी, कधी पारडे वर तर कधी खाली या नियमाशी सरावलेला खेळाडू होता तो! कार्यक्रमाला मिळालेली भरगोस दाद, हेच आज त्याचे यश होते. आणि तो त्याच्या स्वभावगुणाप्रमाणे, सगळ्यांच्या आनंदात भरभरून सहभागी होत होता. अगदी निनाद सुद्धा त्याला अपवाद नव्हता! रसिकांच्या उदंड कौतुक सोहळ्यात बुडून गेलेले वादक कलाकार मधून मधून आपापले वाद्य संसार आवरत होते. इतर गायक मंडळी, निवेदक त्यांची मदत करत होते.

काही वेळानंतर, ‘भरत’ च्या बाहेरचा रात्री साडेबाराचा प्रहर उजळून गेला होता. सर्व कलाकार बाहेर आले. तशी आसावरी सगळ्यांच्या पुढे झाली आणि तिने सगळ्यांना थांबायची खूण केली. समोरच एक पांढरी शुभ्र मारुती ८०० AC गाडी उभी होती. आणि त्याला टेकून एक उंच तरुण उभा होता! ती त्याच्या जवळ गेली, आणि त्याचा हात हातात घेऊन, त्याला कंपूच्या दिशेने घेऊन आली..."मित्रांनो" ती काहीशी हसत आणि लाजत म्हणाली..."हे अक्षय देशपांडे...माझे होणारे मिस्टर!" मित्र कंपूत परत एक उत्साहाची लहर जिवंत झाली...सगळे जण टाळ्या शिट्ट्या मारू लागले...असावरीच्या सह गायिकांनी तिला मिठीच मारली आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. 'लग्नाआधीपासूनच अहो-जाहो', 'ए निनाद आणि अक्षय भाऊ भाऊ का?', असे म्हणत भरपूर चेष्टा मस्करी सुद्धा झाली. "हे अमेरिकेला असतात...आता जून मध्ये परत येतील तेंव्हा साखरपुडा आणि लग्न" असावरीचे डोळे कित्येक सुखद स्वप्नांचे जाळे विणत, अक्षयच्या डोळ्यांना भिडले. तोही हसला. असावारीने प्रत्येकाची ओळख त्याला करून दिली, अक्षय सुद्धा आपुलकीने सगळ्यांना भेटला आणि लग्नाला न चुकता यायचं असं आमंत्रणही दिलं. "ए...तू का असा मागे, एकटाच?” तिच्या या प्रश्नाने नचिकेत एकदम भानावर आला आणि ओशाळला! “अक्षय, हा नचिकेत माझा खूप खूप चांगला मित्र!" आसावरीने परिचय करून दिला "तुम्हाला माहितीये, हा आणि निनाद 'एक चतुरनार' काय कमाल गातात...आज नेमकं नव्हतं..." नचिकेत ह्यावर फक्त कसंनुसं हसला. "आपण तुमचा कार्यक्रमच ठेवूयात की...सीमांत पूजनानंतर?" अक्षयने हसत हसत विचारले..."खरंच?" आसावरी सुखद अविश्वासाने उद्गारली..."म्हणजे काय?....तू सुद्धा गायचंस बरं का?" ह्यावर असावरी गोड लाजली. नचिकेत मात्र तिथे असून नसल्यासारखा झाला होता...जणू सगळ्यांपासून आणि सगळ्यातून परका...पोरका...अबोल...पण त्याला धड अव्यक्तही होता येत नव्हतं..."त… तुम्ही काय करता...?" नचिकेतने थोडेसं चाचरतरच विचारलं. ह्यावर अक्षय काही बोलायच्या आत, असावारीच अभिमानाने अक्षयकडे बघत म्हंटली ..."ते... फोर्ड कंपनीत काय बरं..?" ती थोडीशी गोंधळली, "हां...सिनियर आर अँड डी इंजिनीअर..? हो ना?" हे सारं तर नचिकेतच्या कित्येक मैल आवाक्या बाहेरच होतं. “"अभि...हे...congratulations!" काहीश्या थरथरत्या मनानी त्याने अक्षयशी हस्तांदोलन केलं आणि संपूर्ण मित्रकंपूकडे पाठ केली....

कोणाचंही त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि त्याच्या लेखी भवताल गहाळच झाला होता... "उद्या उद्या येणार आहेस ना प्रॅक्टिस ला?..." असं असावरीचं शेवटचं वाक्य त्याच्या मेंदूपर्यंत पुसटसं, धूसर, पोहोचलं खरं पण त्यावर काही प्रतिक्रिया द्यावी किंवा द्यायची असते, ही प्रणालीच त्याच्यासाठी बंद झाली होती. रात्रीचा एक वाजत आलेला...रस्त्यावर मिट्ट काळोख, अधूमधून स्ट्रीट लाईट्सचा अशक्त पिंगळट प्रकाश, कुत्र्यांचं भुंकणं आणि त्यात, टिळक रस्ता ते वारजे नाका ह्या जवळ जवळ सहा-सात किलोमीटर अंतरावर पडणारी त्याची निर्जीव पावलं. एरवी, तेजस त्याला कर्वेनगर पर्यंत सोडायचा आणि तिथून तो चालत जायचा...आज तो चालतच होता अखंड...राहतं घर आहे आणि त्या दिशेने आपल्याला चालायचं आहे, हे केवळ त्याची अवचेतना जागृत होती म्हणून नाहीतर...तो हरवला असता....कुठेतरी...विरून गेला असता...! इतकं चालून देखील त्याला थोडाही थकवा जाणवत नव्हता...पायात वेदना उठत असतील पण उमटतच नव्हत्या...

लॅचची चावी सरकवून तो घराच्या आत आला आणि तिथे असलेल्या अंधाराने त्याला अखेर कुशीत घेतलं. "दादा, आलास का?" केतकी खुसपुसली..."आत आई-बाबा झोपलेत…कृपा करून कुठलाही आवाज करू नकोस...खाल्लयंस का काही?" अर्धवट झोपेतच तिने त्याला विचारलं. "तू झोप, केतु..." नचिकेतची प्रतिक्रिया, बर्फापेक्षाही थंड होती. दहा बाय दहाच्या खोलीतून स्वयंपाकघराकडे जायला थोड्याहि प्रकाशाची गरज नव्हती. स्वयंपाक घरात आल्यावर त्याने बोटांनी चाचपडत, छोटा पिवळा दिवा लावला. गेल्या दीड-दोन तासांतली त्याला झालेली एकमेव जाणीव म्हणजे...लागलेली कडकडून भूक! कुठलीही दारू किंवा अमली पदार्थानेही येणार नाही असा अंमल आज त्याच्या मेंदूच्या शिरे-शिरेत धावत होता. त्याने ओट्यावर नजर फिरवली. एका पातेल्यात ठेवलेला थोडा भात आणि दुसऱ्या भांड्याच्या तळाशी विसावलेलं थोडंसं वरण! त्याने फडफडीत झालेला तो भात, तसाच गार ढोण झालेल्या वरणाच्या भांड्यात ढकलला आणि उभ्या-उभ्याच जठराग्नीच्या स्वाधीन केला. घटा-घटा पाणी पिता पिता मात्र, त्याचं डोकं गरगरायला लागलं...कालपासून अनुभवलेली दृश्य, आवाज, त्याच्याभोवती पिंगा घालू लागली..." 'सादर करीत आहोत...'...ह्या स्वयंभू गंधर्वांचा अज्जाच होता ना मोहम्मद रफी...'...'हा माझा खूप खूप चांगला मित्र...'... 'सादर करीत आहोत...'...'मोठा झालाय तो आता...'...'त्यांच्या हातून बेस्ट प्लेबॅक सिंगर चं फिल्मफेर घेतलं असतं!...'आपण तुमचा कार्यक्रमच ठेउयात कि...'...तूला तीन गाणीच लै झाली..'...सादर करीत आहोत...'...तू का असा मागे, एकटाच?...'...'सगळी साली भिकेची लक्षण...'...'सादर करीत आहोत...'... ‘त तुम्ही काय करता...?'....'सादर करीत आहोत...'...'कृपा करून कुठलाही आवाज करू नकोस,'...'…'सादर करीत आहोत...'...'ते... फोर्ड कंपनीत काय बरं..?'...'सादर करीत आहोत...'...'तुम्ही शांत व्हा...आधी पाणी प्या बघू...'...''सादर करीत आहोत...'...अमेरिकेला असतात...'...'काय दुधखुळा आहे मी?...'...'सादर करीत आहोत...'...'सादर करीत आहोत...''सादर करीत आहोत...'...
नचिकेत तोल जाण्याचाही पलीकडे गेला होता. तो हळूच परत हॉल मध्ये आला आणि तिथल्या सोफ्यावर, आहे त्या कपड्यांमध्ये आडवा झाला. त्याच्या दृष्टीत गुंगी होतीच, आता अनावर पेंग येऊ लागली. त्याचे डोळे गपागप मिटायला लागले आणि कानांवर काहीबाही प्रतिध्वनी पुन्हा पुन्हा आदळतच होते...''सादर करीत आहोत...'...'सादर करीत आहोत...'...'सादर करीत आहोत...'...

समाप्त

©अपूर्व संजीव जांभेकर

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults