एक तासाचा शिक्षक

Submitted by अर्जुन ..✍️ on 5 September, 2026 - 08:12

ऑफिसची मीटिंग कधी संपेल याची वाट पाहत होतो. "राहिलेले मुद्दे आपण ऑनलाइन मीटिंगमध्ये डिस्कस करू," असं सांगून मुंबईच्या ऑफिसमधील माझी पहिलीच मीटिंग शेवटी संपवली.
दुपारचे दोन वाजले होते. ऑफिसमधून बाहेर पडलो आणि पुण्याला जाणारी बस पकडण्यासाठी रिक्षा स्टँडकडे निघालो. तेवढ्यात कानावर 'वाशी जंक्शन' असे शब्द पडले आणि अचानक एक गोष्ट आठवली.
आपली कॉलेजमधली मैत्रीणही इथेच कुठेतरी एका कॉलेजमध्ये लेक्चरर आहे.
सोळा वर्षांपूर्वी आमची शेवटची भेट झाली होती. त्यानंतर फक्त अधूनमधून सोशल मीडियावर एखादा-दुसरा मेसेज, एवढंच काय ते बोलणं.
मुंबईला आलोच आहे, तर एकदा आपल्या कॉलेजमधल्या मैत्रिणीला भेटू या, असा विचार केला आणि तिच्या कॉलेजच्या दिशेने निघालो.
कोणतीही पूर्वकल्पना न देता तिला भेटावं आणि आश्चर्याचा धक्का द्यावा, या विचाराने मी थेट तिच्या कॉलेजमध्ये पोहोचलो.
कॉलेजच्या कॅम्पसमध्ये दोन ठिकाणी चौकशी केल्यानंतर समजलं की, ज्युनिअर कॉलेजचे वर्ग तिसऱ्या मजल्यावर भरतात आणि मॅडम तिथेच भेटतील.
मी मात्र विद्यार्थ्यांच्या गर्दीतून वाट काढत, जिने चढत 'कॉम्प्युटर सायन्स'च्या वर्गाबाहेर जाऊन उभा राहिलो.
तेवढ्यात वर्गामध्ये सूचना देणाऱ्या माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीची नजर माझ्याकडे गेली आणि क्षणभर तिला काय बोलावं हेच सुचेना.
सोळा वर्षांनंतर झालेली ती अनपेक्षित भेट होती!
तिला एवढा आनंद झाला होता की तिने मला वर्गातच बोलावून घेतलं आणि माझ्याशी बोलू लागली. पण थोड्याच वेळात समजलं की, तिला पुढच्या तासाला दुसऱ्या वर्गावर जायचं होतं आणि तो तास दुसऱ्या कोणाला देता येणार नव्हता.
पण जाता जाता तिने मला अजून एक धक्का दिला.
भरलेल्या वर्गासमोर तिने सर्वांना सांगितलं, "हे सर तुमचा पुढचा तास घेतील आणि तुम्हाला मार्गदर्शनही करतील."
एवढ्या मुलांसमोर बोलल्यामुळे मला 'नाही' म्हणणंही खूप कठीण झालं.
"१२ वीच्या मुलांना शिक्षणानंतर उपलब्ध असलेल्या, शिक्षणाच्या विविध संधी, नोकरीच्या संधी आणि करिअरविषयी थोडं मार्गदर्शन करा," एवढं सांगून ती वर्गाबाहेर निघून गेली.
कॉम्प्युटर सायन्सच्या लॅबमध्ये साधारण ३० ते ४० विद्यार्थी होते. पुढची ५० मिनिटं हे सगळे माझ्या ताब्यात देऊन ती मात्र दुसऱ्या वर्गावर निघून गेली.
इथे मी तिला सरप्राइज देण्यासाठी आलो होतो; पण खरं सरप्राइज तर मलाच मिळालं होतं!
खाजगी कंपनीत नोकरी करत असल्यामुळे मला शाळा किंवा कॉलेजमध्ये लेक्चर देण्याचा कोणताही पूर्वानुभव नव्हता. खरं तर, वर्गात नेमकं कसं शिकवतात, हेदेखील मला माहीत नव्हतं.
आणि अशातच माझ्यासमोर १२ वीच्या वर्गातील मुलं-मुली बसलेली होती. हे असं वय असतं, ज्यांना आपण लहानही म्हणू शकत नाही आणि पूर्णपणे प्रौढही मानू शकत नाही. या वयातील मुलांशी नक्की काय आणि कसं बोलायचं, हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न होता.
सुरुवातीची १० मिनिटं कोणीच माझ्याकडे लक्ष देईना. वर्गात कसलाच ताळमेळ लागत नव्हता. गोंधळ इतका होता की माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हता.
शेवटी, त्या गोंधळावर मात करण्यासाठी मी एक वेगळाच मार्ग निवडला.
मी वर्गातील एका-एका विद्यार्थ्याला जागेवर उभं करून स्वतःबद्दल बोलायला सांगितलं.
पुढच्या अवघ्या दोन मिनिटांत संपूर्ण वर्ग शांत झाला!
कारण बऱ्याच लोकांना स्वतःविषयी जाहीरपणे बोलणं आणि स्वतःची मतं मांडणं हीच एक अवघड गोष्ट वाटते.
माझ्यासमोर बसलेली पिढी ही आजची 'Gen Z' होती. त्यांच्याशी बोलताना जाणवलं की त्यांची स्वप्नं मोठी होती.
पण पुढच्या काही मिनिटांत मला आणखी एक गोष्ट जाणवली—ही स्वप्नं खरंच त्यांची स्वतःची होती का?
सोशल मीडियावर दिसणारा चकचकाट, इतरांचं यश आणि आजूबाजूच्या लोकांचं ऐकून त्यांनी आपल्या आयुष्याची काही स्वप्नं ठरवली होती. कारण त्या स्वप्नांबद्दल जेव्हा मी त्यांना थोडे सखोल प्रश्न विचारले, तेव्हा त्यांच्याकडे मात्र ठोस उत्तरं नव्हती.
नेमक्या याच ठिकाणी मला जाणवलं की, त्यांना उपदेश करण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधणं अधिक महत्त्वाचं आहे.
त्यांची आजची परिस्थिती काय आहे आणि त्यांना जे मिळवायचं आहे, ते मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल—या वास्तवावर जर आपण त्यांच्याशी बोललो, तर ही मुलं नक्कीच ऐकतील, असा विश्वास मला वाटला.
कॉलेज संपल्यापासूनच्या सोळा वर्षांत मी वेगवेगळ्या ज्या कंपन्यांमध्ये काम केलं होतं. त्या अनुभवातून मी काय शिकलो, आजच्या परिस्थितीत आपण अजून काय काय चांगलं करू शकतो आणि आपल्याकडे असलेल्या साधनांचा योग्य वापर करून आपल्या ध्येयापर्यंत कसं पोहोचता येईल, यावर त्यांच्याशी अगदी मोकळा संवाद साधला.
आणि हे बोलता बोलता एक गोष्ट स्पष्ट होत गेली—उधार घेतलेल्या स्वप्नांना खरं बळ फक्त एकाच गोष्टीतून मिळतं, आणि ती म्हणजे मेहनत. स्वप्न कुठून आलं यापेक्षा ते सत्यात उतरवण्यासाठी आपण किती झिजायला तयार आहोत, हे जास्त महत्त्वाचं असतं.
तास संपवता संपवता मी त्यांना एवढंच म्हणालो,
"या जगात 'गरिबी' किंवा 'अभाव' यांच्यासारखा दुसरा मोठा शिक्षक नाही. जर आपलं जीवनमान उंचावायचं असेल, तर मेहनतीला कोणताही पर्याय नाही. हे सत्य जर तुम्हाला वेळेत समजलं, तर आयुष्यात कदाचित कोणत्याही मोटिवेशनल स्पीकरची गरज भासणार नाही.
पैशांची श्रीमंतीही आयुष्यात हवीच. पण तो पैसा स्वतःच्या कष्टातून मिळवून, स्वतःसाठी हक्काने खर्च करता येणं, यासारखा दुसरा आनंद नाही."
हे सगळं बोलता बोलता ५० मिनिटं कधी निघून गेली, हे समजलंच नाही.
अशा रीतीने, अनपेक्षितपणे मिळालेला माझा तो तास संपला.
पण त्या ५० मिनिटांनी मला एक गोष्ट मात्र पक्की समजली—
'शिक्षक होणं' हे बाहेरून जितकं सोपं दिसतं, तितकं ते नक्कीच नसतं.
कारण शिक्षक फक्त वर्गासमोर उभा राहून एखादा विषय शिकवत नसतो; तो समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचा विचार करायला शिकवत असतो.
आणि कदाचित, हाच शिक्षणाचा खरा अर्थ असावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users