”या" बर्याच जणांना बरंच काही बोलायचं असतं. सांगायचं असतं.
त्यातलं बरंचसं ते एकमेकांत बोलत राहतात. आपापल्यात चर्चा करतात. वाद घालतात. दोघा-चौघा भरवश्याच्या लोकांत विरोध प्रकट करतात. भांडतात. निषेध करतात. घरी जातात. झोपतात.
झोपेत भांडणाची स्वप्नं पडतात. ती भांडणं क्रांतीची वाटतात. अजून हे बोलायला हवं होतं... हेही बोलायला हवं होतं... अस्सं ठणकावून सांगायला हवं होतं.... असं सारं गंभीर क्रांतीचं व्हायला हवं होतं.... या धुंदीत झोपतात. पराक्रम पांघरून झोपतात. पुढच्या क्रांतीचे संवाद मनात तयार करत झोपतात.
बोललेल्याची दहशत वाटू नये. झोप नीट यावी. आतून ग्रेट वाटत रहावं.
’हे’ बरेच जण, बराच काळ ज्या गोष्टींवर नाराज़ असतात - त्याविषयी जाहीर उच्चार करत नाहीत. केला तरी शक्य तेवढ्या मवाळ, हळू, चतुर आणि द्वैर्थी भाषेत करतात.
स्वत:ला ते फार जपतात. म्हणजे स्वत:च्या आयुष्यातल्या स्थैर्याला, सुरक्षेला ते फार जपतात.
कारण त्यांच्या मते त्यांच्याकडे गमावण्यासारखं फार असतं. आणि ज्यांच्यापायी ते सारं गमवावं अशी ’त्यांची’ (म्हणजे ज्या व्य्क्ती किंवा समूहावर नाराजी आहे) ’लायकी’ नसते.
"कुठं ’तसल्या’ लोकांच्या नादी लागा?"- हे वाक्य सुद्धा ते एकमेकांनाच सांगतात. तेही कुजबुजत.
"या" वर्गाचा नाराजीचा लपवून ठेवलेला बाण ज्यांच्यावर रोखलेला असतो ’त्या’ ’दुसर्या’ वर्गातही बरेच जण असतात मात्र ते प्रचंड निर्धोक आणि मोकळाढाकळे असतात. ते आपसात कुजबुजत नाहीत. ते ज्याच्याशी बोलायचे आहे त्याच्याशी थेट बोलतात. न बिचकता, न विचार करता, न शंका घेता बोलतात. बोलतच राहतात. तेही मोठ्या आवाजात. आपला आवाज कमी झाला तर त्यांच्या आतलं सपाट रिक्त बेचव वैचारीक मौन सगळ्या जगाला ऐकू जाईल ही ’त्या’ बर्याच जणांची असुरक्षितता असते.
ते बिनधास्त भिडतात. शब्द त्यांना कमी पडतात बहूतेकदा (कारण त्यांच्याकडे ते कमीच असतात) म्हणून ते व्यक्त होण्यासाठी देहबळ वापरतात. काही केल्या व्यक्त होत राहणं त्यांच्यासाठी गरजच नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाचा तो प्रश्न असतो. आपण बोललो नाही, आवाज केला नाही तर आपण ’त्यांना’ दिसणारच नाही ही असुरक्षितता असते. शिवाय त्यांच्या मते त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही फार नसतं.
थोडक्यात ’हे’ आणि ’ते’ दोघंही एकमेकांना घाबरतात. हा वर्गभेद धर्म-जाती-वर्ण-रंग-लिंग या सार्या भेदांच्या परे आहे. तो विश्वातल्या सगळ्या समाजांत आहे. सगळ्या देशांत आणि राज्यात आहे. हा भेद कमी-जास्त होत राहतो. पूर्णपणे संपत कधीच नाही. मात्र जसजसा समाज अर्थिकदृष्टय़ा विकसित होत जातो, समाजातली प्रत्येक व्यक्ती किमान आर्थिक विवंचनेतून बाहेर पडते आणि त्या पातळीवर अस्तित्वाची लढाई रहात नाही - तसतसा हा भेद कमी-कमी होतो.
या सार्याच्या मागे समाजाचे मानसशास्त्र तर आहेच पण अर्थशास्त्र सुद्धा आहे.
The Status Syndrome: How Social Standing Affects Our Health and Longevity हा Michael Marmot यांचा प्रचंड गाजलेला दिर्घलेख आहे. यात या वर्गभेदाचा फार छिद्रान्वेशी अभ्यास केलाय. यात विख्यात अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांच्याही अनेक विधानांचा संदर्भ घेतलाय. व्यक्तीचे जीवनमानच नव्हे तर आयुर्मर्यादा, आरोग्य, लैंगिक जीवन या सगळ्या बाबीही त्याचा ’वर्गस्तर’ ठरवतो आणि त्याचा वर्गस्तर निव्वळ शिक्षणानं नव्हे तर तो ज्या समाजात राहतो तिथल्या दरडोई उत्पन्नामुळे ठरतो असं या निबंधात अत्यंत अभ्यासपूर्ण रितीने सांगितलंय. म्हणजे उत्पन्न फक्त त्याचं नव्हे.... त्याच्या आजूबाजूच्या इतरांचं ही. Demian: The Story of a Boyhood या Hermann Hesse यांच्या नोवेल मध्ये या वर्गभेदाचं फार चपखल आणि नेमकं वर्णन आहे.
तर ते सारं असो. मुद्दा हा की या दोन एकमेकांना भिऊन असणार्या पण एकमेकांवर अवलंबूनही असणार्या वर्गांमधला संघर्ष काही नविन नाही. हा संघर्ष दोन्ही वर्ग आपापल्या पद्धतीनं सुप्त पातळीवर लढत राहतात तोवर सारं सुरळीत असतं. समस्या निर्माण होते तेंव्हा - जेंव्हा ’या’ वर्गातला कुणी आपला ’कूजबूज’ धर्म सोडून ’त्या’ वर्गाला मोठ्या आवाजात आणि स्पष्ट शब्दांत काही सांगू जातो (विद्यानंद बापट). किंवा ’त्या’ वर्गातले कुणी आपली आक्रमकता आणि गलका सोडून शांतता आणि वैचारिकतेच्या माध्यमातून ’या’ वर्गाला त्यांचं वास्तव दाखवू जातो (जंतर-मंतर आंदोलन, सफाई कर्मचार्यांचं आंदोलन).
या दोन्ही घटनांची समाजाला सवय नसते. त्यामुळे असं काही झालं तर समाज गडबडून जाणंच स्वाभाविक असतं. ’या’ आणि ’त्या’ दोन्ही वर्गातले गोंधळून जातात. ’आपल्यातल्या वेगळ्याची (’यांच्या/त्यांच्या सारखं’ वागणार्याची) बाजू घ्यावी की त्याला वेगळं पाडावं? पण भाषा बदलली असली तर मुद्दे तर आपलेच आहेत... पण पद्दत तर तत्त्वात बसत नाही... काय करावं?’ या भलत्या गोंधळात आणि विवंचनेत समाज सापडतो. अगदी विद्वान, नोकरदार, कामगार, मजूर, साहित्यिक, राजकारणी - सारेच सैरभैर होतात. त्यांना ठाम भुमिका घेता न आल्याने भुमिका बदलत राहतात. बरेचजण अश्यावेळी कुंपणावर जाउन बसतात.
व्यक्तीला ’लेबल’ लावण्याची जी तातडी माणसांना उगाचच असते - ते पटकन् करणं अश्यावेळी भल्याभल्यांना जमत नाही. त्यामुळं अस्वस्थता वाढत जाते पण ती दाखवता येत नाही. निमित्त्ये शोधावी लागतात. स्वत:चं सैरभैर असणं स्वत:लाच जस्टिफाय करत बसावं लागतं. आजूबाजूला घडणार्या परिवर्तनाला समजून घेताना माणसं एकाच वेळी आशावादी होतात, आनंदी होतात, आणि संदिग्ध, साशंकही होतात. आपल्याला या बदलत चाललेल्या परिस्थितीचं नीटसं स्पष्ट आकलन होत नाहीये हा कमीपणा स्वत:पाशी स्वीकारण्याचंही धाडस नसतं. गोंधळ वाढत जातो.
आपल्या आजूबाजूला या वर्षी हा सामाजिक गोंधळ जरा ठळकपणे वाढलेला लक्षात येतोय. अश्यावेळी गोंधळाचा भाग होण्यापेक्षा त्यातून बाहेर पडून सार्या परिस्थितीकडे त्रयस्थपणे पाहता आले तर बर्याच गोष्टी लक्षात येतील. विहंगम दृष्टीकोन ठेवला तर बरीच उत्तरं सापडतील कदाचित.
किती सुंदर लिहिलं आहे!!!
किती सुंदर लिहिलं आहे!!!
बरेच जणं सुरक्षित हे मधे येतात माझ्यासकट.
मला कळले नाही. तुमच्या
मला कळले नाही. तुमच्या कविताही बरेचदा मला कळत नाहीत. माबुदो.
सगळं कळलंच असं नाही. पहिले
सगळं कळलंच असं नाही. पहिले दोन परिच्छेद वाचताना मला त्यात शाम मनोहरांच्या कादंबरीची बीजे दिसू लागली.
थोडे फार कळले असे वाटले. फार
थोडे फार कळले असे वाटले. फार हा आणि तो झालेला आहे असे वाटते त्यामुळे थोडा गोंधळ उडतोय.
एक सुधारणा - जंतर मंतर हे खरे तर या गटातील पुढच्या पिढीनेच केलेलं आंदोलन आहे. त्यामुळेच त्याला तितकी वाईट नावं ठेवली गेली नाहीत असे मला वाटते. जर ते त्या गटातील लोकांनी केलं असतं तर मग आधी जशी वेगवेगळी नावं ठेवली गेली होती तशी ती त्याला पण ठेवली गेली असती. आता सुद्धा बापटांना छुपी नावं ठेवत आहेतच. पण ते या गटात असल्याने त्यांना तितकी नावं ठेवली गेली नाहीत. भरतने या स्वरूपाचा एक मुद्दा बापटांच्या धाग्यावर मांडला असे मला वाटले. तो तिथे अस्थानी असून इथे बरोबर वाटतो.
अगदी सगळं समजलं अस नाही पण
अगदी सगळं समजलं अस नाही पण मनाला भिडलं हे लेखन!